sujata siddha

Horror

3  

sujata siddha

Horror

झाड !! (भाग २ )

झाड !! (भाग २ )

5 mins
809


“तुष्या SSSSSS काय होऊन बसलं रे हे? तुला म्हटलं होतं मी, वॉर्न केलं होतं, नाही त्या गोष्टींशी पंगा घेऊ नकोस, पण ऐकलं नाहीस, गेलास जीवानिशी, मला एकट्याला टाकून... “ हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या शिवानंद हमसून हमसून रडत होता. आज चार दिवस झाले त्याच्या डोळ्यांचं पाणी खळलं नव्हतं, त्या भीषण ऍक्सीडेन्टनंतर शिवानंद जे बेशुद्ध पडला ते थेट हॉस्पिटलमध्येच शुद्धीवर आला, गावातल्या लोकांनीच त्याला ऍडमिट केलं.


तुषारचा विचित्र पद्धतीने लटकलेला चेहरा आणि धड एकत्र करताना सगळ्यांचं धाबं दणाणलं होतं, पोलिसांनाही पटकन धाडस झालं नाही हात लावायचं, गावाहून तुषारच्या आईला बोलवण्यात आलं, तिचा आक्रोश बघून, सर्वांनाच खूप हळहळ वाटली. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या देहाचे धिंडवडे तिला बघणं तर दूर ते अशापद्धतीने झालेत हे कानावर पडलेलंही सहन होणार नाही हे ओळखून ग्रामस्थांनी त्याबद्दल बोलायचे टाळले.


सगळे सोपस्कार उरकून, जुजबी उपचार घेऊन शिवानंद हॉस्टेलवर परतला, त्याला तुषारशिवाय दुसरं कोणी नव्हतं. एका प्रतिष्ठित घराण्याने देऊ केलेल्या स्कॉलरशिपवर अनाथ शिवानंद ‘जिऑलॉजी‘ या विषयात ग्रॅज्युएशन करत होता, त्याची आणि तुषारची भेट हाॅस्टेलवरच झाली, ते दोघे रूम पार्टनर बघता बघता एकमेकांचे जीवश्च कण्ठश्च मित्र झाले होते. तारुण्यातली उमेदीची स्वप्न दोघांनी एकत्र मिळून कितीतरी वेळा रंगवली होती. आता लास्ट ईयरची परीक्षा आटोपली की ते दोघं मिळून पुढचे प्लॅन्स करणार होते…


सगळं काही सुरळीत चालू असताना हा विचित्र अपघात घडला आणि नियतीला दोष देऊन सर्व मोकळे झाले, पण जे अपघाताच्या ठिकाणी गोळा झाले होते त्या सगळ्यांना राहून राहून नवल वाटत होतं ते म्हणजे शिवानंदला काहीही, साधं खरचटलं पण नव्हतं. अपघात घडूनही चार दिवस उलटले, त्या झाडाच्या इथून नेहमीसारखी लोकांची ये जा सुरू झाली, तशी ती जागा बाधीत वगैरे आहे अशी काही वदंता तिथे नव्हती त्यामुळे झाल्या प्रकाराचं नवल हे अजूनही शमलं नव्हतंच.


तरीही सर्व रूटीन सुरू झालं, शिवानंदही हॉस्टेलवर परत आला, एक शिवानंद सोडला आणि तिथेच राहणारं रेक्टरचं कुटुंब सोडलं तर सगळं हॉस्टेल रिकामं होतं. अजून निदान पंधरा दिवस तरी कोणी येणार नव्हतं. आता शिवानंदने आपला कॉस्मिक energy चा प्रयोग करायचं ठरवलं. सकाळी लवकर उठून आवरून तो साधनेला बसला, एकाग्र चित्ताने ते झाड डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करू लागला, मला तुझ्याशी बोलायचंय...!


त्याने त्या झाडाला संदेश पाठवला. त्यानंतर दिवसरात्र शिवानंद झपाटल्यासारखा झाडाला संदेश पाठवत राहिला. असेच काही दिवस गेले अन एके दिवशी रात्री झोपला असताना त्याला कोणीतरी हलवलं, “झोपू दे रे तुष्या... काय साली कटकट आहे...“ शिवानंद झोपेतच म्हणाला आणि दुसऱ्याच क्षणी सावध झाला. त्याला जाणीव झाली की रूम वर आपण एकटेच असतो आणि तुषार आता या जगात नाहीये. तो सपकन अंथरुणात उठून बसला, सगळीकडे एक प्रकारचा हिरवट उग्र वास भरून राहिला होता. त्या वासाने त्याला गुदमरल्यासारखं झालं. तितक्यात त्याच्यासमोरून गर्जना केल्यासारखा आवाज आला, “बोलsss“


शिवानंदने डोळे चोळून चोळून पाहिलं, अंधुक प्रकाशात त्याला दिसलं, समोर अर्धवस्त्रात एक असाधारण उंच मानवी आकृती उभी होती. हातात त्रिशूळ, आणि अंगभर रूद्राक्षांच्या माळा, अंधारात लखलखणारे भेसूर डोळे. त्याचं डोकं छताला लागलं होतं.


“को-कोण?“ शिवानंदने कपाळावर सुटलेला घाम पुसत भेदरलेल्या आवाजात विचारलं.

 

“का बोलावलंस?“ त्याच्या घोगऱ्या आणि राकट आवाजाने शिवानंदच्या पोटात गोळा आला. एवढ्या अंधारातही त्या आकृतीच्या क्रूर डोळ्यांमधली आग त्याला जाणवली.

 

“बोल का बोलवतोयस दिवसरात्र हाका मारून?“

  

“मी-मी? तुम्हाला? न-नाही...“ आपली बोबडी वळतीये असं त्याच्या लक्षात येऊन तो गप्प बसला.

 

“ज्या झाडाला तू दिवसरात्र संदेश पाठवत होतास, त्याच झाडातून आलोय मी. काय बोलायचंय तुला बोल...“ हे ऐकून, भेसूर दिसणाऱ्या या शक्तीला त्याच्या मनाविरुद्ध आपण इथे यायला भाग पाडू शकतो या विचारांनी त्याला जरा धीर आला आणि तो जरा सावरला. कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत त्याने विचारलं, 

“पण त्या झाडात तू राहत होतास का? दिसला नाहीस कधी तू? आय मिन तुम्ही?” घाबरल्यामुळे शिवानंद कधी तू कधी तुम्ही असं सी-सॉ खेळत होता.


“मी शरीररूपाने तिथे राहत नाही मूर्खाSSS, इंद्रियांच्या मर्यादा तुम्हाला असतात आम्हाला नाही...“ हा बाउन्सर होता शिवानंदसाठी, पण त्याला आठवलं त्याने कधीतरी वाचलं होतं, साधनेत प्रगत असलेले साधू किंवा मांत्रिक अथवा अघोरी असे दगडात किंवा झाडात राहून अदृश्य रूपाने साधना करतात, याच्या अवतारावरून हा अघोरी साधना करणारा असावा असं त्याला वाटून गेलं. 


“माझा जिवलग मित्र, तुषार त्याला तू इतक्या विचित्र पद्धतीने मारून टाकलंस, असं का केलंस हे विचारायचं होतं मला...“


त्याने तुझा अपमान केला, पण बस इतकंच? तू त्याचं अस्तित्वच नष्ट केलंस? तेही इतक्या हिडीस पद्धतीने? एवढ्याशा चुकीची एवढी भयानक शिक्षा?“ शिवानंदच्या डोळ्यासमोरतुषारचा झाडावर लटकणारा देह आला आणितो तळमळला.


“चुका आणि शिक्षा यांची ताळेबंदी तुम्ही मांडता आम्ही नाही, तो माझ्या वाट्याला आला आणि संपला, त्याने डिवचलं नसतं तर हे भोग त्याच्या वाट्याला आले नसते...“


“मग मीही तुला संदेश पाठवून डिवचलंय, मग आता तू मलाही….?“ शिवानंदच्या पोटात गोळा आला.

 

“तू मला नाही, मीच तुला संदेश पाठवत होतो, म्हणून तुझी गावाकडे जायची वाट मी अडवत होतो. मध्ये जर तो तुझा मूर्ख मित्र कडमडला नसता तर एव्हाना माझं काम संपलं असतं...“ तो गरजला.

 

“मी-माझ्याकडे काय काम?“ शिवानंदला अचानक आपला आवाज एवढा चिरका का निघतोय कळेना.

 

माझ्या साधनेसाठी पूरक असणार शरीर मला हवं आहे, जे तुझं आहे...“


“नाही हो, मी कसा कामाचा असेन तुमच्या? (मी बघा किती बुटका तुम्ही किती उंच, हे शिवानंदने खुणेनेच सांगितलं, कारण बोलता येतंच नव्हतं.)“


“साधनेसाठी उंची नव्हे, स्पंदनं जुळायला लागतात, मूर्ख SSSSS तुझीही तुझ्या मित्रासारखी गत व्हायला नको असेल तर उद्या अमावस्या आहे, बरोब्बर रात्री बारा वाजता तिथे ये...“


“तिथे म्हणजे?“ डोळे थोड्या वेळात पांढरे होतील असं शिवानंदला वाटायला लागलं...

 

“त्याच तुझ्या त्या झाडाजवळ!“ असं म्हणून तो अघोर तिथून नाहीसा झाला. शिवानंदची झोप पूर्ण उडाली, ती अख्खी रात्र तो जागा राहिला. त्याला लक्षात आलं तो पळून जाऊ शकत नव्हता, तो पाताळात गेला तरी अघोर त्याला शोधुन आणेल आणि आपलं काम करून घेईल, त्याला तिथे रात्री जाण्याशिवाय पर्याय नव्हता!!!


रातकिडे किर्रर्र ओरडतात तो आवाज किती भयानक वाटतो...! शिवानंद झाडापर्यंत पोहोचला होता, १२ वाजत आले होते. थोड्याच वेळात त्यातून घुम्म घुम्म आवाज यायला लागले, मंत्रोच्चारण सुरू झालं. शिवानंदची आता घाबरून दातखीळ बसायची वेळ आली. समोर लाल वस्त्रात एक यंत्र होतं, त्याची नुकतीच पूजा केलेली दिसत होती.

  

“खाली बस...“ आतून घोगरा आवाज आला. त्याच्या डोक्यावर कसला तरी स्पर्श झाला आणि त्याने पाहिलं, एक हात त्याच्या डोक्यावर होता, भीतीने त्याने गपकन डोळे मिटून घेतले...


“ ओम , ऐ ह्री, श्रीम, अं, सत्ये, हं शवले, ह्सखफ्रे, खरवे, क्लिं रामे, ह्सखफ्रे, नारद ऋषी:, गायत्री छन्द:, श्री गुरू देवता, गुंबीज, ह्रीशक्ती: परकाया प्रवेश…“


पुढचं ऐकायला शिवानंद शुद्धीवर राहिलाच नव्हता. 


ट्रिंग ट्रिंग, सायकलवरून जाणाऱ्या दोन कॉलेज युवकांना पुढे चाललेल्या सुमतीने रस्ता करून दिला. पहिल्याचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो पुढे जाऊन म्हणाला, “बघितलं का कसला आयटेम होता?“


“नाय रे, आपलं लक्षच नव्हतं, मी त्या झाडाच्या बुंध्याकडंच बघत होतो, विचित्रच वाटला जरा...!“ सायकलवरून पुढे जात असतानाही मागचा वळून बुंध्याकडेच बघत होता आणि बुंध्याच्या आतून शिवानंद त्याच्याकडे बघत होता...!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror