झाड !! (भाग १ )
झाड !! (भाग १ )


“या झाडाचा हा जो बुंधा आहे ना, तो काहीतरी वेगळाच वाटतो मला, तुला नाही वाटत ?”
“वाटतोय की,मग त्याचं काय ? “
“च च च ....तुझ्या लक्षात नाही आलेलं मला काय म्हणायचंय ”
“ ए चल रे तु , पकाऊ … तुला सवयच लागलीये सारखं काहीतरी संशोधकासारखं शोधत फिरायची , आधीच इथे बोअर झालंय दिवसरात्र तो दगडांचा अभ्यास करून राव, !.. ते ‘रॉक सायकल‘ आणि ती ‘बोवेन रिअक्शन सिरीज ‘ करून पिट्टा पडलाय , फिरायला जाऊ जरा मोकळ्या हवेत म्हटलं तर तू आता झाडाचा अभ्यास कर “
“ अरे ऐक तरी ,अभ्यासाचं नाही म्हणत मी , वेगळा म्हणजे तू नीट बघ माणसाचा चेहेरा वाटतो , बुंध्याऐवजी . “
“ए शिव्या ssतू चल बरं इथून , आपण तिकडे त्या पलीकडच्या रस्त्याने जाऊ.” तुषार, शिवानंद ला ओढत पलीकडे घेऊन गेला . मनात तोही जरा चमकलाच होता , त्या डेरेदार झाडाचा प्रचंड मोठा बुंधा खरोखरच एखाद्या रागीट माणसाच्या चेहेऱ्यासारखा दिसत होता , पण त्याने हे कबूल केलं असतं तर शिवानंदरोज येऊन इथे बसला असता निरीक्षण आणि प्रयोग करत . ‘जिऑलॉजी‘ च्या अभ्यासाबरोबरच “‘वैश्विक ऊर्जा आणि तिचेप्रयोग “ हा त्याचा आवडता अवांतरविषय होता . संपूर्ण विश्वात एकच ऊर्जा आहे आणि तीच आपल्यातही किंबहुना सर्व प्राणीमात्रात आणि चल -अचल वस्तूत खेळते आहे , म्हणूनच आपल्या मानसिक सामर्थ्याने आपण हवी तिथली ऊर्जा जागृत करून त्याच्याशी संवाद साधू शकतो , कनेक्ट होऊ शकतो , असा त्याचा ठाम समज होता , रोज मेडिटेशन करून काही अंशी का होईना , एकाग्रता साधणे त्याला जमू लागले होते , भरीस भर म्हणून पातंजल योगा सारखी अनेक पुस्तके वाचून त्याने आपल्या ज्ञानात भर घातलेली होती .प्रत्यक्ष एखादा प्रयोग successful झाला असं मात्र अजून काही घडलं नव्हतं , पण शिवानंद आपल्या विश्वासावर ठाम होता , त्यामुळे अलीकडे त्याची या विषयावरून खूप चेष्टा देखील होत असे , होस्टेल वर परत आल्यानंतरही रात्री शिवानंदच्या डोक्यात त्या बुंध्याचे प्रश्न सतावत होते .
पुढे काही दिवस परीक्षेच्या गडबडीत गेल्यामुळे तो झाडाबद्दल विसरून गेला , परीक्षा झाली ,पुढे कॉलेज ला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि सर्व जण आपापल्या घरी निघायची तयारी करू लागले , “ यार तुष्या तुम्हीसगळे गेल्यावर मी एकटा काय करू रे ? बोअर होईल किती राव “.. तुषारच्या आईने दिलेली चकली चहात बुडवुन खाता खाता , शिवानंद काळजीने म्हणाला . “ए तु लेका SS , चकली हि चहात बुडवायची गोष्ट आहे का ? “ त्याच्या हातावर फटका मारत भराभर सामान आवरून निघायची तयारी करता करता त्याच्या प्रश्नाने तुषार एकदम थबकला , “एक काम करतोस का शिव्या , तू पण चल माझ्याबरोबर ,आमच्या गावी . फॉर अ चेंज… आमचं गाव तुला नक्की आवडेल. शिवाय तुझं काय ते ‘ मेडिटेशन ‘आणि ‘कॉस्मिक एनर्जीरिसर्च ‘ ते करायला आमच्या माळरानावर तुला भरपूर निवांत जागा आहे , चल !.. “
एक क्षणभर विचार करून शिवानंद तयार झाला , सर्व आवराआवर करून त्या दोघांना निघायला रात्र झाली , राहिलेली काही मुलं आणि ते दोघे असे बस यायची वाट बघत आपापल्या सामानासकट स्टॉप वर गप्पा मारत बसले होते ,थोडयावेळाने बस आली पण ती तुषार ची नव्हती , हळूहळू एक एक करत सगळे गेले फक्त तुषार आणि शिवानंद राहिले , त्यांची बस यायला अजून तास भर , अवकाश होतामगवेळ आहे तरगंगाबाईच्या खानावळीत जेऊया असं त्या दोघांनी ठरवलं . गंगाबाईंची हि खानावळ त्यांची लेक सुमती चालवायची , सुमती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच तिच्या हाताला एक अद्वितीय अशी चव होती , त्यामुळे कायम तिच्या इथे waiting असायचं , एरवी मुलांना घाई असायची त्यामुळे तिच्याकडे जेवायचा योग क्वचितच येत असे ,आजही बस यायच्या आत नंबर लागला तर नशीब उजाडलं म्हणायचं असं त्यानां वाटून गेलं . त्यात कौतुक तिच्या जेवणाचं होतं कि दिसण्याचं कि दोन्हीचं हे मात्र त्यांचं त्यांनाच माहिती .पण आज नशीब उजाडलं आणि त्यानाजागा मिळाली ,आज गर्दी जरा कमी होती , दोघेही खूष झाले एकदम ,... त्या चविष्ट जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊन आणि सुमतीचेसौंदर्य नजरेनेच आकंठ प्राशन करून जेव्हा ते दोघे बाहेर पडले तोपर्यँत बस अर्थातच निघून गेली होती आणि वेडी वाकडी तोंड करून त्याना सामानासकट परत रूमवर कडे परतावं लागलं.परत येत असताना वाटेतपुन्हा एकदा ते झाड शिवानंद ला दिसलं . त्याला नवल वाटलं , एवढ्या अंधारातही त्याला ते स्पष्ट दिसलं ! त्याने असं तुषार ला बोलून दाखवताच तुषार एकदम भडकला.त्यात बस चुकली हा राग असेल त्यामुळेही असेल.पण तुषारशी आता त्याबाबत काही बोलायचं नाही असं शिवानंद ने ठरवलं .
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून ते दोघेही निघाले , पण आजहीकुंजीरवाडीहून एकही बस आली नाही , घाटात अचानक दरड कोसळल्यामुळे बसचा यायचा मार्ग बंद झाला होता ,वाट बघून ते पुन्हा हॉस्टेल वर परत आले . येताना अर्थातच झाड परत लागलं , पण आता शिवानंद शहाणा झाला होता त्याने तुषार जवळ झाडाचा विषय काढला नाही . परत आल्यावर मात्र त्याने मनाशी एक निश्चय केला , “तुष्ट्या तू जा !.. माझा काही यायचा योग दिसत नाहीये ,माझ्यामुळे तुझं पण कॅन्सल होतंय राव! “
“काहीही खुळ्यासारखं बोलू नकोस ,नैसर्गिक आपत्ती त्याला कोण काय करणार ?”
“नाही ,मला असं वाटतंय मी जाऊ नये असा संकेत असावा “ शिवानंद शून्यात बघत म्हणाला .
“ हॉ ?...खरंच ?, आणि कोण देतंय हे संकेत ? तुझं ते छपरी झाड ?”
“ यार छपरी वैगेरे कशाला म्हणतोस? कोणाबद्दल असे उगाचच अपशब्द काढू नयेत , कशात काय असेल, कुणाचा वास असेल काय माहिती ?”
“तू शिव्या डोक्यात जाऊ नकोस माझ्या, एका जागी शुंभासारखं उभं असलेलं ते झाड , त्याला एक इंच पण हलता येत नाही आणि ते दरडी पाडतंय, का ? तर म्हणे तू माझ्याबरोबर येऊ नयेस ? अरे हट SSS थांब आत्ता जाऊन एक लाथ मारून येतो म्हणजे तुझ्या डोक्यातून हि भंकस जाईल . “
तुषार तिरीमिरीने गाडी काढून निघाला , शिवानंद त्याला थांब थांब म्हणेपर्यत तो गेला देखील . तो परत येईपर्यँत शिवानंद च्या जीवात जीव नव्हता , लांबून गाडीचा आवाज आला तसा , शिवानंद ने सुटकेचा श्वास टाकला, परत येताना तुषार बत्तीशी दाखवत हसत येत होता , रूम वर येऊन चप्पल काढता काढता म्हणाला ,”आता जरा बरं वाटतंय , एक सणकून
लाथ घालून आलो, साल्या तुझ्या डोक्यातला भ्रम काढायच्या नादात , पायाला झिणझिण्या आल्या माझ्या , “
शिवानंद यावर काहीच बोलला नाही, दुपारी जेवण झाल्यावर दोघांचं ठरलंकी गाड़ी वरूनफाट्यापर्यत जायचं आणि तिथून जी बस मिळेल ती पकडून पुढे जायचं ,परत येईस्तोवर गाडी फाट्याजवळच्या गॅरेज वाल्याकडे ठेवायची , आता खात्रीने घरी जायला मिळणार म्हणून तुषार खूष होता , परत गंगूबाईच्या खानावळीत जेवण करून ते निघाले त्यातच सुमतीने त्याच्याकडे कधी नव्हे ते एक स्माईलफेकल्यामुळे तुषार खूष होता, शीळ वाजवत निघाला होता. मागे शिवानंद लगेज सांभाळत कसा बसा बसला होता , फाट्यापर्यँत गेल्यावर बघितलं तर गॅरेज बंद !..तुषार वैतागला तेवढ्यात समोरून एक जीप येऊन त्यांच्याशेजारी थांबली , “पाव्हणं कुणीकडं ?” आतून लाल पिचकारी सोडत ड्रायव्हरन विचारलं, “ काही नाही दादा , कुंजीरवाडीपर्यतं जायचंय पण काही योग् येईना झालाय , तिथून बस पकडून पुढच्या गावाला जायचंय . तुम्ही कुठून येताय ? “ “फुढं कंच्या गावाला जानार ? “
“बामणोली”
“मंग चला माझ्या संगट ,मी बी थीतच चाललूया ,लांबचा पल्ला हाये तेवढच सोबतीला व्हईन कुनीतरी , मलाबी. “
“पण दादा तुम्ही हिकडं उलटं कुठं आलाय ?शिवानंद न आश्चर्यानं विचारलं
“अरे काम हाये एक पाटलांकडं ,चला बसा आत,काम करून मंग फुढं जाऊ, लयी न्हाई तासाभराचंच काम हाये “
ड्रायव्हरचे तोंड जरी पाना ने लालभडक झाले होते तरी gentleman वाटत होता, दोघेही तयार झाले , पण गॅरेज बंद आहे तर
गाडी हॉस्टेल वर लावायची आणि तासाभराने ड्रायव्हरने त्यांना पिक अप करायचे असे ठरल्यावर तुषारने गाडी वळवली ,
आता तो आणखीन खूष झाला , थेट गावापर्यँत जायची सोय झाली होती , परत वळताना ते झाड दिसल्यावर त्याने त्याला पूर्ण बत्तीशी दाखवून वेडावून दाखवलं आणि तेवढ्यात काय झालं कळलं नाही , धाडदिशी आवाज झाला , तुषारची गाडी जोरात त्या बुंध्यावर धडकली मागे रिव्हर्स घेऊन पूर्ण गोल फिरून पुन्हा आपटली , तुषार फुटबॉल सारखा उडाला हे शिवानंद ने पाहिलं आणि त्याची शुद्ध हरपली.!!!!
कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि शिवानंद ने डोळे उघडले , क्षणभर त्याला आपण कुठे आहोत हेच कळेना,
तेव्हढ्यात त्याचे लक्ष वर गेले, वर अर्ध्या कवटीचा भाग एका फांदीला लटकत होता आणि .....आणि त्याच्याखाली उरलेला अर्धा पुढचा चेहेरा , पूर्ण बत्तीशी विचकत असलेला लटकत होता , तो चेहरा तुषारचा होता !!!!!
, शिवानंद ची परत एकदा शुद्ध हरपली ...... !!!!
क्रमशः