STORYMIRROR

गौतमी सिद्धार्थ

Comedy Horror

4  

गौतमी सिद्धार्थ

Comedy Horror

हिवाळ्यातली ती रात्र...

हिवाळ्यातली ती रात्र...

2 mins
282

हिवाळा असल्याने लवकरच अंधार पडायचा. हाॅस्टेलला आल्यावर नेहमी प्रमाणे जेवण उरकुन मैत्रिणींशी दंगामस्ती चालली होती. एका मैत्रिणीने सांगितले की आपल्या इथे अठरा फुटी उंचीचा माणुस फिरतोय व तो मुलींना पळवुन नेतो. तेव्हा एकटे फिरु नका. यावर सगळ्यांनी तिची टिंगल केली की अस काही नसतं. ही फक्त अफवा आहे. (मी ही होते यात सामिल कारण मैत्रिणींची खेचण्यात माझा पुढाकार व योगदान नेहमी असते!) नंतर बर्‍याच अफवांवर चर्चा झाली. (वायफळ गप्पा म्हणुन मी त्याच महत्व तसुभरही कमी करणार नाही कारण आमच्यासाठी त्यात विचारांचे आदान -प्रदान,आचारांचे म्हणाल तर कधीकधी थोडीशीच मारामारी...थोडीशीच हं....थोडक्यात कायिक वाचिक फटकेबाजी असे...हुश्श! बरेच जड जड शब्द वापरले असो..तुम्ही भावना समजुनच घ्याल ) 

      ही चर्चा कमी की काय कोणीतरी हाॅरर चित्रपटांचा विषय काढला. मग काय उधाणच आलं.अगदी रामसे पासुन ते हाॅलीवुडपर्यंत चर्चा....मग हे चर्चासत्र सिनीअर दी ने येऊन अगदीच मायेने (शिव्या हासडुन) कौतुक केल्यावर थांबल्या. व माझ्या मैत्रिणीला जाताजाता आठवलं की धुतलेले कपडे तसेच गच्चीवर आहेत.आपण आणायचेच विसरलो. व नाही आणले तर सकाळी दव पडेल व ओले होतील. मला म्हणाली चल घेऊन येऊ. म्हटलं चल...वरती गेलो व दार उघडले. अगदी हाॅरर चित्रपटाप्रमाणेच आवाज करत उघडले ते....व दोघींनी एकदम एकमेकींकडे पाहिलं..मी आपलं उसनं अवसान आणुन व चेहर्‍यावर बेफिक्रीचा भाव बेमालुमपणे आणत (नाटकात काम केल्याचा असा फायदा होतो) पाऊल पुढे टाकलं आणि लाईट गेली व दोघी जोरात किंचाळलो.

      मैत्रिण म्हणाली चल परत जाऊ पण मी ठाम नकार दिला (अंगात अगाऊपणा जास्त ना)...म्हटलं आलोच आहोत तर घेऊनच जाऊ. चाचपडतच वाळलेले कपडे हातात घेतले व मागे फिरुन निघालो तर सरसर असा आवाज आला. दोघींनी एकमेकींचे हात घट्ट पकडले.आम्ही थांबलो की आवाजही थांबे.....आणि आम्हाला दोघींना अचानक एकाचवेळी अठरा फुटी माणुस आठवला (काय टाईमिंग आहे बघा) आणि दोघी एकदम म्हणालो तो माणुस तर नसेल ना! मलातर तो दिसुही लागला (कल्पनाशक्ती चांगली असणार्‍याच्या वाट्याला हा त्रास असतोच बाबा! चालायचंच...) मी म्हटलं पळ आणि पळण्याच्या नादात मैत्रिण धडपडली. पुन्हा आम्ही कपडे उचलुन पळु लागलो.या नादात मैत्रिणीची एक चप्पल तिथेच राहिली. म्हटलं जाऊ दे, सकाळी आणु. त्या अंधारातही आम्ही पायर्‍यांवरुन पळतच खाली आलो व लाईट आली. डोळ्यांनीच एकमेकींना खुणवत "तेरी भी चुप और मेरी भी चुप।"अस करत ,काहीच न घडल्याप्रमाणे खोलीत जाऊन झोपलो.

      सकाळी लवकर उठुन गच्चीत गेलो कारण रात्री कोण असेल याची भीती व उत्सुकता दोन्ही होती. समोरचं भयानक दृश्य पाहुन काय बोलावे तेच कळेना व दोघी एकदमच जोरजोरात हसु लागलो....कारण मैत्रिणीच्या चपलेत पतंगाचा मांजा अडकलेला व आम्ही चालल्यावर सरसर आवाज त्याचा होता, हे कळल्यावर तर हसुन हसुन मुरकुंडी वळली. मकरसंक्रांतीचे दिवस होते. कापलेली पतंग गच्चीवर येऊन पडलेली व तिचा मांजा चपलेत अडकलेला. मात्र आजही मकरसंक्रांतीला ही गोष्ट आठवते व हसु येते. ही गोष्ट आजतागायत आमच्या दोघीतच आहे. pls तुम्हीपण कोणाला सांगु नका. "तेरी भी चुप और मेरी भी चुप।".....


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy