बालपण
बालपण
बालपण म्हणजे निरागसता! एकाग्रतेने लोकांचे निरिक्षण करणे, पंचेद्रियाचा वापर करुन आपल्या ज्ञानात भर करणे, सतत कुतुहल!!! डोळ्यातून भयंकर कौतुक, उत्सुकता, उत्साह ओसंडून वाहणे. पडले तरी प्रयत्न न सोडणे त्याच दमाने उठून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न! (अपयशाला न कुरवाळता) स्वतःच्या चुकांवर इतर हसले की स्वतःही मनमुराद हसणे! समोरच्यावर अतोनात विश्र्वास ठेवणे इतका की आपल्याला हवेत उंच फेकल्यावरसुद्धा खळाळत हसणे.... झेलतील की नाही, ही चिंताच नाही. भीतीचा लवलेषही नाही. मनमुराद हसणं इतकं की समोरच्याचा बिघडलेला मूडही छान होतो. हेच ते निरागस हास्य!
"आपल्याला जमेल का?" हा विचारच मनात नाही."आपण अपयशी होऊ का?"हे ही मनात डोकावत नाही. सरळ करुन पाहणे!!! रोज नवंनवं शिकण्याची इच्छा व शिकलेले करुन पाहण्याची. निरीक्षण कसं करावं हे शिकावं लहान मुलांकडूनच! स्वतःचीच कंपनी खूप आवडते यांना! कोणी आपल्या सोबत खेळायला आहे-नाही आहे काही फरक पडत नाही. दोन भांडी किंवा वस्तू मिळाल्या की खेळ सुरु... स्वतःत आनंद शोधणं, प्राप्त परिस्थितीत आनंद शोधणं,स्वतःची कंपनी एन्जॉय करणं ही किती मोलाची गोष्ट आहे.
पण ते एकच खेळ खुप वेळ नाही खेळत हं! त्यांना नावीन्य हवं कारण हे कसं होतं, याचं त्याचं त्यांनी उत्तर शोधलेलं असतं व आता त्यांच्या ज्ञानात भर घालेल असं नवं काहीतरी हवं असतं. सतत नावीन्याची ओढ... रटाळता टाळण्याचे सगळ्यात सोप्प उत्तर म्हणजे नावीन्याचा शोध!!! स्वतःचं कौतुक कसं करुन घ्यावं हे त्यांच्याकडून शिकावं. (माझ्यापुढे मोठा गहन प्रश्न असायचा, कोणी कौतुक केलं तर ते स्वीकारायचं कसं? कारण याची सवयंच मोडली होती अर्थात आपण स्वतःच, मोठं होण्याच्या प्रक्रियेत! मग ठरलेलं उत्तर ...कसनुसं हसायचं व तिथून शक्यतो लवकरात लवकर काढता पाय घेणे.)
गोडीगुलाबी व लडिवाळपणे आपल्याकडून कामं काढून घेणं आणि आपल्यालाही त्यांच्यासोबत ते बोबडे बोल बोलण्यात काय मज्जा येते ना! (कोणाकडे मदत मागणं फार अवघड जातं या मोठेपणात..."कमीपणा" की काय म्हणे वाटतो) बाललीला पाहताना आपल्या चेहर्यावर स्मित नाही आलं तर नवलंच! सतत उत्साह, कुतुहल, डोळ्यात अफाट उत्सुकता, आत्मविश्र्वास (काहीही करायला तयार असतात हो हे!) कारण भीती कशाशी खातात माहितच नाही यांना!
आणि आपण मोठे होतो... व या सगळ्या गोष्टींना मुकतो व काही कालांतराने प्रयत्नपूर्वक याच गोष्टी पुन्हा शिकण्याचा अतोनात प्रयत्न करतो. वेगवेगळ्या व नानातर्हेचे क्लासेस, कोर्सेस करुन... "समोरची व्यक्ती आपल्याला हसेल. (म्हणजे आपला अपमान की काय म्हणतात तो झाला) ही गोष्टच त्यांच्या गावी नसते त्यामुळे ते प्रयत्न करणं सोडत नाहीत. मोठमोठ्या फिया देऊन, वेगवेगळे कोर्सेस करुनही जे मला समजलं व जमलं नाही, ते मी लहान मुलांचे निरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा कळलं की हे तर निसर्गताच माझ्यात होतं, मीच प्रयत्नपूर्वक तोडलं माझ्यापासून... मग ठरवलं लहान मुलासारखंच वागायचं...
माझ्यातल्या छोट्याश्या मुलीला आवाज दिला. आधी थोडे आढेवेढे घेतले तिने! (साहजिकच होतं कैक वर्षांनी आठवण आली होती.) मी मात्र तिला मनवायचे प्रयत्न नाही सोडले. सगळ्यात सोप्पा उपाय केला... कौतुक!!! हळूहळू मग ती ही साद देऊ लागली... अताशा हळूहळू जमू लागले आहे थोडसं. पण होतीये गट्टी तिची नि माझी!!!
तुम्हीही साद घाला... करा प्रयत्न... जमेल हो... करून बघायला काय हरकत आहे...
(सर्वांना ALL THE BEST !!!)
©®गौतमी सिद्धार्थ
