हिरकणी
हिरकणी
आज मी तुम्हाला सतराव्या शतकातील एक सत्य कथा सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. रायगड हा सर्वात उंच गड मानला जातो. साधारणत: त्याची उंची 4,400 फूट आहे. शत्रूचा शिरकाव कोठूनही होऊ नये म्हणून चारी बाजूने योग्य तटबंदी केली आहे. सर्व गडाच्या कडा मजबूत आणि शाबूत आहेत. रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुसरे (वाळूसरे) नावाचे एक लहान गाव
होते. त्या गावात एका धनगर व्यक्तीचे छोटे कुटुंब राहत होते. कुटुंबात त्या व्यक्ती सोबत त्याची बायको हिरा व एक तान्हे बाळ होते. हिरा रोज सकाळी गडावर दूध विक्रीस जात असे आणि संध्याकाळी गडाचा दरवाजा बंद व्हायच्या अगोदर परत येत असे. हा तिचा दररोजचा दिनक्रम होता. एक दिवस तिला गडावर दूध विक्री करताना वेळ कसा गेला, हे समजलं नाही आणि ती उशिरा गडाचा दरवाजा बंद केल्यानंतर तिथे पोहचली.
तिने गडक-यांना दरवाजा उघडण्यासाठी खूप विनंती केली, परंतु त्यांनी तिला नकार दिला कारण महाराजांचीच तशी आज्ञा होती.महाराजांनी सांगून ठेवलं होतं की, रोज संध्याकाळी गडाचा दरवाजा बंद करायचं आणि सकाळी उघडायचं. हिरा बेचैन झाली, तिला सारखं तिचं तान्हे बाळ आठवायला लागलं.काय करावं? काय नाही? हे तिला सुचत नव्हतं, तेंव्हा ती गड कड्याचं सूक्ष्म निरीक्षण करायला लागली. तिने एका कड्यावर पोहचून वर जायला निघाली आणि पाहता पाहता ती तो उंच कडा उतरून खाली आली. कड्यावर असलेल्या आसपासच्या काटेरी झाडाझुडपामुळे तिच्या शरीराला काही जखमा झाल्या आणि त्या जखमेतून रक्त वाहत होतं, परंतु तिला त्याचं भान नव्हतं. तिला फक्त त्यांच्या तान्ह्या बाळाला भेटायचं होतं. गड उतरून ती घरी पोहोचली. आपल्या तान्ह्या बाळाला पाहून तिला अत्यानंद झाला. ती जखमांच्या वेदना विसरून सुखामध्ये नाहली.
महाराजांना जेंव्हा ही गोष्ट समजली तेंव्हा महाराजांनी तिला बोलवून साडी चोळी देऊन तिचा सत्कार केला आणि तिचे कौतुक केले. पुढे तिच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज रायगडावर त्या स्थानावर बांधण्यात आला आणि त्याचेच नाव 'हिरकणी बुरुज' असे ठेवण्यात आले. तिच्या गावाला तिच्या पराक्रमाप्रित्यर्थ 'हिरकणीवाडी' असे नाव देण्यात आले. नतमस्तक ह्या हिराला आणि तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला.
