हात
हात


मला हवेत हात असे... चित्रकाराच्या कुंचल्याने रंगलेले हात, मातीच्या गोळ्याला गणेशाच्या मूर्तीचे रूप देणारे हात, वीणेच्या तारा छेडणारे हात, संगणकाच्या कीबोर्डवर फिरणारे हात, नुकत्याच मातीत लावलेल्या रोपाला पाणी घालणारे हात, अंगणातल्या चिऊताईला दाणे टाकणारे हात, ढोलकी आणि डफावर ताल धरणारे हात, चंद्रयान चंद्रावर पाठवणारे हात, रांगोळीच्या रंगात रंगणारे हात, भुकेल्या तान्ह्याला दूधकाला भरवणारे हात. कवायतीसाठी ड्रमच्या बीटच्या आवाजावर एक साथ खाली वर लयबद्ध जाणारे हात, लेखकाच्या लेखणीला शृंगार करणारे हात, कृष्णाच्या बासरीवर साद घालणारे हात मला हवेत.
रंजल्या गांजल्याना मदत देणारे हात मला हवेत. आईच्या प्रेमाला पारख्या असणाऱ्या विद्यार्थिनींच्या डोक्यावर मायेने फिरणारे हात मला हवेत. "टीचर मैने किया!" म्हणून आनंदाने नाचत येणाऱ्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे हात हवेत. आई मला येतं म्हणत धावणाऱ्या बाळाला टाळ्यांनी प्रोत्साहन देणारे हात मला हवेत!!! प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांऐवजी माणुसकीला जपणारे हात मला हवेत!!!!!