संवाद
संवाद


सकाळी सात वाजेची वेळ थंडगार हवा अंगावर घेत मी गॅलरीत उभी होते. हा रोजचाच नियम. दहा मिनिट सारं काही विसरून दिवसाची सुरुवात निसर्गचित्र पहात उभे राहायचे. या सृष्टी निर्मिकाचे आभार मानत करायची. या लॉकडाऊनच्या दरम्यानचं चित्र काही स्तब्ध, शांत, प्रसन्न असं दिसत होतं कारण रोजच्या कर्कश हॉर्नचे आवाज नाही की वाहनांची गर्दी नाही. धावणारी सकाळ आता थोडी स्थिरावली होती. आंब्याच्या झाडावर पडलेल्या सूर्याच्या कोवळ्या किरणंनी चमकणाऱ्या त्या कैऱ्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. मनात म्हटलं बर झालं लॉकडाऊन आहे नाहीतर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी दगड मारून पडल्या असत्या. आता निदान त्या सुखरूप आहेत झाडावर. खरंच किती त्रास देतो ना निसर्गातल्या प्रत्येक घटकाला आपण. फिरायला जातात नि दुसऱ्या दिवसाच्या पुजेसाठी न उमलेल्या कळ्या तोडून आणतात. पर्यावरणाचा विचार न करता केलेल्या प्रत्येक कृतीचा विचार करत असताना मला किलबिल ऐकू आली. आंब्याच्या झाडावर चिमणी आणि कावळा यांच्यात संवाद होत होता.
चिमणी म्हणाली कावळ्याला, "अरे बाबा इकडचं तिकडचं काही खात जाऊ नको, कोणाच्या खिडकीत वाळवणात तोंड घालू नको. तुला नॉनवेज भारीच आवडतं, नाहीतर नसता डोक्याला ताप." यावर कावळा विचारतो, का गं चिमणे असं काय बोलतेस? चिमणी म्हणाली, "ती बघ माणसं कशी घरात बसलीत, काय तो कोरोना नावाचा रोग आलाय ना. माणसांना दुसरा पर्यायच नाही रे बिच्चारे" खरं आहे तुझं चिऊ, माणसांनी आपली घरटी असलेली झाड तोडलीत, आपली छोटी छोटी पिल्लं गेलीत, न उबवलेली अंडी फुटलीत, नुसती हावरट जात माणसांची. तरीच म्हटले एवढा सन्नाटा कसा? नी रस्त्यावर ही काळी तोंडं बांधून फिरणारी जमात कोणती? हो रे कावळ्या तुझं म्हणणं पटतंय रे मला पण माणसांची मुलं बाहेर खेळताना दिसत नाहीत, दंगा नाही, गर्दी नाही, सगळं कसं सुतक लागल्यासारखं, स्तब्ध... मला नाही आवडत रे. आपल्याला त्यांची सवय झाली आहे. चिमणीच्या नाराजीचा सूर ऐकून कावळा म्हणाला, अगं माणसाला देवाने बुद्धी दिली आहे तो शोधून काढेल कोरोनावर् उपाय.' पण उपाय मिळेपर्यंत रहायला हवं ह्यांनी शिस्तीत आपल्या घरात नाहीतर निघतील पाय मोकळे करायला. असो आपण सगळे मिळून माणसांसाठी प्रार्थना करू.
चिऊ काऊचा संवाद कानात साठवत मीही जड पावलाने घरात आले.