ती आणि कोरोना
ती आणि कोरोना
निशाला आपली रोजची काम आवरून रोज काही ना काही वाचायची आवड होती. एक दिवस वाचत असताना तिने चीनमधील कोरोनाविषयीची बातमी वर्तमानपत्रात वाचली नी अनेक प्रश्नांनी तिचे भान हरपून गेले. काय आहे हा कोरोना, कसा दिसत असेल, कुठून आला, काय होत असेल याने, काय करावे नी काय करू नये यासारख्या अनेक विचारांनी तिला सुन्न करून सोडले नी माझ्याजवळ येऊन बसली, मला म्हणाली, "ताई ! हा कोरोना जर भारतात आला तर काय होईल?" मी तिच्याकडे बघतच राहिली.
आपल्या रोजच्या धावपळीत जगाच्या प्रश्नावर विचार करायलाही फुरसत मिळत नाही नि निशाला मात्र चीनची वार्ता हवी असे क्षणभर वाटले कारण तशी तिला सवयच होती. खबर ठेवायची नेहमी. आमच्या चहा पिताना गप्पा होतच असतात त्यात आज की ताजा खबर निशा रोजच देते म्हणून मी उत्तर न देता गप्पच राहिले. रोज कोरोनाची माहिती देणारे वर्तमानपत्रांचे मथळे, टीव्हीवर येणाऱ
्या बातम्या, सोशल मीडियावर येणारे updates नी कोरोना काय आहे ते समजलं नि घराजवळ आलेल्या या राक्षसाने दार बंद नाही केलं तर काय होऊ शकतं ते प्रत्यक्ष दिसत आहे. 'सगळीकडे बंद आहे,' असं म्हणत निशा मात्र दुसऱ्या दिवशी कामावर आली. एवढे शिकलेले डॉक्टर आहेत, नेते आहेत, काहीच करत नाहीत का कोरोनाला? आम्हाला म्हणतात कामावर जाऊ नका, ताई तुम्हीच सांगा नाही कामावर गेलं तर पैसा कुठून आणायचा, पैसा नाही तर खायचं काय? खरं होत निशाचं. मला आज कळालं त्या प्रश्नाचं उत्तर, काम नाही तर दाम नाही. तिला क्षणभर थांबवत मी म्हणाले,"निशा काळजी करू नको, कोरोनावर उपाय सापडेल, थोडा धीर धरु या, आपण घरी राहून सरकारला मदत करू या. नि राहिलाच प्रश्न पैशांचा तर पुढील दोन महिन्यांचा पगार घे, धान्य भरून ठेव."
अशा अनेक निशा असतील ज्यांना कोरोनाबरोबर आजच्या भाकरीच्या शोधासाठी घराबाहेर पडावं लागलं तर...