Sunita madhukar patil

Inspirational

4.7  

Sunita madhukar patil

Inspirational

गोधडी

गोधडी

5 mins
684


तो आज खूप खुश होता. त्याने स्वतःच्या हाताने विणलेली सुंदर नक्षीकाम केलेली पैठणी साडी आज आईसाठी विकत घेतली होती.


"आज खूप खुश दिसतोयस, शंतनू...! काय भानगड काय आहे." घरी जाता जाता कारखान्याच्या मालकाने त्याला विचारले.


"काय नाही मालक... आईची लई दिवसाची इच्छा होती, तिने माझ्या हाताने विणलेली, नक्षीकाम केलेली पैठणी नेसावी. तिची ती इच्छा आज पुरी होणार. तुमचं लई उपकार झालं मालक... खूप कमी किमतीत ही पैठणी तुम्ही मला दिली." शंतनुने मालकाचे आभार मानले.


"अरे... तुझ्या बाबाची पण इच्छा होती, तुझ्या आईला पैठणी घेऊन द्यायची. मी खूपदा त्याला बोललो होतो घेऊन जा, कमी किमतीत देईन तुला पण तो खूप स्वाभिमानी... मला म्हणाला मालक, माझ्या गरिबीची कीव करून जर कमी किमतीत देत असाल तर मला नको. मी पै पै गोळा करून घेईन पैठणी माझ्या कारभारणीला." मालक शंतनुकडे पाहत बोलत होते.


शंतनू पैठणी विणण्याच्या कारखान्यात काम करायचा. त्याचे बाबाही याच कारखान्यात काम करत होते. लहान असताना तो खूपदा बाबांसोबत या कारखान्यात आला होता. अभ्यासात त्याचं मन लागत नव्हतं. कारखान्यात आला की बाबा कसे काम करतात ते तो न्याहाळायचा आणि घरी आई गोधड्या शिवायचं काम करायची. शेजारच्या आया बाया जुन्या पुराण्या साड्या आणून द्यायचा आणि त्याची आई त्याच्या सुंदर नक्षीकाम केलेल्या गोधड्या शिवायची. तिने शिवलेली नक्षीदार गोधडी खूपच उबदार आणि आकर्षक वाटायची त्याला. त्याच्या बाबांचा तुटपुंजा पगार आणि आईने शिवलेल्या गोधड्यांच्या पैशातून जेमतेम घरखर्च चालायचा.


एक दिवस छातीत कळ आल्याचं निम्मित झालं आणि त्याचे बाबा देवाघरी गेले आणि त्याची आई पुरती कोलमडून गेली. वर्षानुवर्षे गोधड्या शिवलेल्या हातांना जणू लकवाच मारला. तिचा उत्साह पुरता मावळला. दिवसेंदिवस ती अधिकच खंगत गेली आणि परिणामी ती वारंवार आजारी पडू लागली.


कारखान्याच्या मालकाने त्याला बालवयातच त्याच्या बाबांच्या जागी कारखान्यात कामाला ठेवून घेतलं. पैठणीचं काम शिकायला त्याला तीन चार वर्षे लागली. पैठणीचं कोरीव नक्षीकाम करण्याची कला त्याला अवगत झाली ती त्याच्या आईमुळे. आई करत असलेलं गोधड्यांवरच कोरीव नक्षीकाम नेहमीच त्याचं लक्ष वेधून घ्यायचं. त्याने प्रचंड मेहनतीने पहिली पैठणी तयार केली आणि मालकाच्या परवानगीने ती आईला दाखवायला घरी नेली.


आपल्या लेकाने विणलेली पहिली पैठणी पाहून त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला खूप कौतुक वाटलं. पैठणी वरून मायेने हात फिरवत ती म्हणाली," पोरा... आरं, माझ्या गोधड्याच्या नक्षीकामाला तु केवढ मोल दिलंस. माझ्या गोधड्यांवरच्या नक्षीकामाला तु साडीवर चितारलं." आईने दिलेली ही शाबासकीची थाप त्याच्यासाठी खूप मोलाची होती. त्यानंतर मालकाच्या परवानगीने तो नेहमीच स्वतः विणलेल्या साड्या आईला दाखवायला घरी नेऊ लागला.


एक दिवस पैठणी न्याहाळतांना आई त्याला म्हणाली, "पोरा, माझी एक इच्छा आहे रं, तेवढी पुरी करशील का?"


"आई, मी तुला सांगितलंय ना, मी आताच लग्न नाही करणार. सारखं सारखं ते लग्नाचं भाषण मला नको सांगू." तो चिडून बोलला.


"अरे, टोणग्या माझं ऐकून तर घे. अरे बाळा, तु तुझ्या हाताने विणलेली, नक्षीकाम केलेली पैठणी मला नेसायची आहे रे..." ती डोळ्यात पाणी आणून बोलली.


"अगं आई कसं शक्य आहे, पैठणी किती महाग येते. मी पैठणी विणण्याच्या कारखान्यात काम जरी करत असलो तरी ते शक्य नाही गं," तो काकुळतीला येऊन डोळ्यातील आसवे लपवत बोलला.


"अरे, होईल शक्य... सगळे दिवस सारखे नसतात बाळा. एक दिवस तु ही श्रीमंत होशील, तुझ्याकडे देखील खुप पैसा असेल, नको काळजी करू." तिने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि प्रेमानं थोपटू लागली.


आणि आज त्याने चिकाटीने पै पै गोळा केलेल्या पैशातून आईसाठी पैठणी घेतली होती.


तो खूप उत्साहात आणि रोजच्यापेक्षा जरा लवकरच घरी आला. आईही आज त्याला खूप प्रसन्न वाटली. तो काहीतरी बोलणार इतक्यात आई घाईघाईने एक बॉक्स घेऊन आली आणि म्हणाली, "अरे, शंतनू मला तुला काहीतरी सांगायचं आहे."


"काय गं आई, आज खूप खुश दिसतेयस." त्याने आईचा उत्साह पाहून विचारलं.


"अरे, हा बॉक्स उघडून तर बघ," आई बोलली.


शंतनुने बॉक्स उघडला, आत पैठणी होती. अगदी तशीच जशी त्याने आईसाठी घेेतली होती. त्यानेच विणलेली, सुंदर नक्षीकाम चितारलेली पैठणी...!


"आई अगं, ही तर पैठणी मीच विणलेली, ही तुझ्याकडे कशी आली?" त्याने आश्चर्याने विचारले.


"अरे सांगते ऐक, मी ना तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली. तु रागावशील ना म्हणुन... तु रागावणार नसशील तर सांगते." 


"अगं नाही रागावणार... सांग तर आधी ही इतकी महाग साडी तुझ्याकडे कुठून आली." त्याने काकुळतीने विचारले.


"अरे, दोन तीन महिन्यांपूर्वी मोटार गाडीतून एक मुलगी घरी आली होती. ती लहान असताना आपल्या मागच्या गल्लीत राहत होती म्हणे... काय बरं तिचं नाव... हं, आता आठवलं... अंजली. तिची आई माझ्याकडून गोधड्या शिवून घ्यायची. आता किती दिवस झाले ना मी गोधड्या शिवायचं बंद केलं आहे. मला तर काही आठवत ही नव्हतं. तिच्या बाबांना चांगली नोकरी भेटली आणि ते इथून नवीन जागी रहायला गेले. तिकडे गेल्यावर गोधड्या शिवणारं कोणी सापडलं नाही त्यांना. भरपूर पैसे आले मग महागातली ब्लॅंकेट वापरात आली पण मी शिवलेल्या गोधड्यांची सर काही कशाला आली नाही असं सांगत होती. तिची आई नेहमी माझी आठवण काढायची म्हणे. मागील सहा महिन्यात तिची आई कसल्यातरी आजाराने मेली. तिच्या आईच्या साड्या घेऊन आली होती गोधडी शिवून द्या म्हणत होती." आईने त्याला हे सांगताच तो आईवर रागावला.


"आणि तु शिवून दिल्यास, अगं तुझी तब्येत बघितलीस का? हात नीट चालत नाहीत. जास्त वेळ बसलं की कंबर दुखते. बी पी वाढतो. कशाला हा उपद्व्याप करत बसलीस." तो आईवर खुप चिडला होता.


"अरे, मी तिला नाहीच बोलले होते. मला जमणार नाही माझा हात नीट चालत नाही. कामाचा उरक राहिला नाही. पण ती रडायला लागली आणि काही बाही बडबडायला लागली,' तिचा आईच्या साड्यांच्या गोधडीत शिरलं ना की आईच्या कुशीत शिरल्याचा भास होतो तिला. तिच्यात तिला गारठ्यात रक्षणारी तिच्या आईच्या मायेची ऊब जाणवते, तिला गुरफटून घेताच गाढ झोप लागते कुशी सारखी! तिच्या सैरभैर मनाला स्थित्यंतर प्राप्त होत. जेंव्हा जेंव्हा ती आईच्या पातळांच्या गोधडीमध्ये शिरते तेंव्हा मायेचा हात पाठीवरून फिरतो असं वाटतं तिला, एक नवीन उमेद मिळते...! लाखोंच्या आलिशान गादीवर जे सुख मिळत नाही ना ते सुख मिळते आईच्या त्या ओबड धोबड गोधडीमध्ये..! ती त्या गोधड्या तिच्या आईची आठवण म्हणून मरोस्तोवर सोबत ठेवणार आहे असं म्हणत होती. किती लागतील तेवढे पैसे घ्या. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ घ्या पण मला गोधड्या शिवून द्या. अरे, पाय धरले तिने माझे. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून मला नाही म्हणवलं नाही रे...!"


"काल सकाळी येऊन ती गोधड्या घेऊन गेली. खूप पैसे देत होती पण मी नाही घेतले रे, मी तिला म्हटलं, 'अगं तुझ्या आईसारखी मायेची पाखरण करील ही गोधडी तुझ्यावर त्यात ह्या मावशीच्या प्रेमाची ऊब पण असुदे की थोडी.' मला तिच्याकडून पैसे घेऊ नाही वाटले रे. मी तिच्याकडून पैसे घेतले नाही म्हणुन आज परत आली होती आणि जाता जाता मी नको म्हणत असताना हा साडीचा बॉक्स देऊन गेली."


हे सगळं ऐकून शंतनुचे डोळे पाणावले. आपल्या हातातला बॉक्स लपवत तो आईला म्हणाला,"मग नेसली का नाहीस, ही तर मीच विणलेली पैठणी आहे ना...!"


"हो रे माझा राजा ही तूच विणलेली साडी आहे, तिला बघताच मला ते कळालं पण मला तु तुझ्या हाताने विणलेली, नक्षीकाम केलेली आणि तुच दिलेली साडी नेसायची आहे. मग ही कशी नेसणार. ही तु जरी विणलेली असली तरी तु दिलेली नाही ना? दोन्ही गोष्टी निराळ्या बाबा..!" आईच्या तोंडून हे ऐकताच तो आईला जाऊन बिलगला आणि सोबत आणलेला पैठणी साडीचा बॉक्स तिच्यासमोर धरला.


आईने तो बॉक्स उघडून बघितला आणि आत तिच्या लेकाने विणलेली, नक्षीकाम केलेली, तिच्या गोधड्यांवरच नक्षीकाम तिच्यावर चितारलेली पैठणी पाहिली आणि तिचे डोळे आपोआप गळू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational