Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Nilesh Desai

Tragedy

2.1  

Nilesh Desai

Tragedy

घरातला तरणा बैल

घरातला तरणा बैल

3 mins
880


गावाकडचं शिक्षण आणि भाषा, घरची गरीबी, स्वप्न, बंड, नकळत आलेली अपराधीपणाची भावना, जबाबदारी यांत हरवलेलं एका बैलाचं तारूण्य..


"का यड्यावाणी कराय लागलाय..? कानसुडात येक पडली की सरळ हुशील.." अडकीत्त्यातली सुपारी फोडत बाप माझ्यावर ओरडला. 


आय दरवाजाच्या चौकटीवर डोक्यावरचा पदर तोंडाजवळ आणून चुपचाप बघत राह्यलेली. तीच्या डोळ्यात माझ्यासाठीची काळजी दिसत व्हती. बापाला भरीसभर घालायला चुलतापण बाजूलाच बसल्याला. 


मी गप्प हुतो. मला तालुक्याच्या काॅलेजाला पुढच्या शिक्षणाला जायचं हुतं. बाप काही केल्या ऐकत नव्हता. त्याचं म्हणणं त्याच्या जागी बरोबर हुतं. पण मला त्याची कारणं पटत नव्हती. शेतीवर आमचं सगळं चाललेलं. त्यात न्हाय म्हणायला एक म्हस तेवढी हुती आमच्याकडं. बैल नव्हता, आन् बाप थकायला आलेला.. 


मंग घरात मीच एक बैल बाकी राहीलेला. चुलत्याची गणती आमच्या घरात नव्हती तो अगुदरच येगळा झालेला. आमची शेती भावकीतल्या धनाप्पाच्या बैलांमुळं चालायची. पण त्या बदल्यात बा बैलासारखा त्याच्या शेतात राबायचा. आन् आता हाच वारसा माझा बा माझ्यावर धकलू पाहत हुता. 


मला वकील बनायचं होतं. 'जली को आगचा विश्वनाथ' पाहील्यापासून माझ्यातला आपलं मत पटवून देणारा नायक जागा झाला होता. पिच्चरात पाहीलेलं, पुस्तकात वाचलेलं आन् म्हणूनच वकीलकी आंगात भिनाय लागली व्हती. गावातलं पोरापोरातलं झांगड मिटवायला मी पुढं राहू लागल्यालो. मंग आता म्या कसा गप राहणार हुतो जवा सवाल माझ्या हक्काचा हाय तर...शाळंतल्या दामणे मास्तरांनी मला थोडीफार मदत करतो म्हणून सांगितल्यालं. आमच्या घराची फाटकी अवस्था नायतरी सगळ्यांनाच माहीत हुती. रोजचा दिवस ढकलून जायल एवढंच काय ते घरात असायचं. बाकी बाप मर मर मरायचा कुणाच्याबी शेतात तवा आली तर यायची घरात ऐक्स्ट्रा इनकम्. आय लहान्या परश्याला सांभाळून घरातली कामं करायची. 


परश्या आमचा दहा वर्साचा. वय वाढलं पण डोकं नाही. कसलासा आजार हुता त्येला. डाक्टर बोल्ला हुता.. हे आता असंच राहणार म्हणून. आय जाम रडली तवा आन् तीथपासून परश्यानं ना आयचा पदर सोडला ना आयनं त्येला सोडून दिला.मी गप हाय ते बघुन बाप बी गप झाला. पण तेवढ्यात चुलता पचकलाच, "आर्र मिल्या, तरणा झालायस की गड्या.. वझं काढ आता बापाचं आन् घे तुझ्या आंगावर.." 


मला ग्यान शिकवून चुलता बापाकडं वळला, "सुभ्या, गाव सुटलं तर पोरगं हातचं जायल. कालजातली पोरं काय करत्यात ते ठावूक हाय मला.." 


त्याचं ऐकत ऐकत बाप आत हात धुवाय गेला. आय वाटतनं हटून माज्यापासनं जराशी बाजूलाच उभी राहीली. परश्या माच्यावर गाढ झोपल्याला. बाप हात धुन चुळ भरून यायला लागला.त्या दोघांनी आपली बाजू मांडली हुती. आता माझा वकील म्हणून मी बोलायं लागलो..


"आबा, मला वकील बनायचाय. दामणे मास्तरांची वळख हाय कॉलेजाला. पैका मी कायबी काम करून कमवीन आणि शिकीन. तुमास्नी न्हाय मागणार. मंग पुढं पैकाबी चांगला यील की घरात." मी."हाड्ड... सुक्काळीच्या..." शिवी हासडतच बाप माझ्यावर धाऊन आला. 


"बाला पैक्याचं स्वांग दावतुयस व्हयरं.. आजुन आंड्यातनं भायर न्हाय आलं आन् गुरगुरतय बेनं..." आसं म्हणतच कश्यालातरी धडकून बा माझ्या पुढ्यात. आर्धा सेकुंद बी नाय घावला सावध व्हाया आन् फटकं पडू लागलं मला. 


पाच-सा धपाटं सटकून पडलं त्येच चुलतं केकाटलं.. "लग्गा सुभ्याय्, आर्र वैनी... बघ्.." बा आन् मी आयकडं बघाया वळलो. आय खाली पडली व्हती. डोक्यातनं रगात वाहत खाली पसरलेलं. मी धावत आयकडं गेलो.. डोळं उघडंच व्हतं तीचं... जोरात वरडाया मी तोंड उघडलं पण... आत कयतरी कुठंतरी आडकलं व्हतं. आवाज त्या येळेला भायर फुटत न्हवता. कसासा हळूहळू आवाज निघू लागला. मी धाय मोकलून रडू लागलो.. बाप मटकन खाली बसला. पश्यातापानं त्येच्या डोळ्यातपण आसवं आली. मला माराय येताना बाच्या मधे आयच आलीली. तीलाच धडकून बा माझ्या पुढ्यात पोचला व्हता. आन् त्या धडकेच्या आघातानं आय भीतीवर डोक आपटून कायमची गेली. बा लहान मुलासारखं रडू लागला. चुलता उठून त्येला सावराय लागला.. माझी आय मला परत कधीच भेटनार न्हवती..थोड्या दिवसात आयचं कार्य आटपून आलेली सगळी पावणीपै निघून गेली. घरात मी, बा आन् परश्या हुतो. येवढ्या दिवसात शालीनं माझ्या थोरल्या बहीणीनं परश्याला सोबत दिली. ती बी आल्या पावली परत नवर्याघरी गेली. 


तापट बैलासारखा राहणारा माझा बा ह्या दिवसात ज्याम मिळमिळीत झाला हुता. माझ्याशी बी दचकूनच वागायचा. आय त्येच्या हातून गेल्याचं दुःख त्येला खायला उठत व्हत. माझ्या डोक्यात त्येच्यावर राग हुता. जिंदगीचा विलन माझ्या..रातच्याला जेऊन म्या भायर आलो. आयची आठवण येऊन रडलो. खुप वेळानं आपल्या वकीलीचं ध्यानात आलं. बापाला आज फायनल ठणकावून सांगायचं म्हणून घराकडं वळलो. घरी आलो तर बाप आयच्या जागंवर झोपला व्हता. कुशीत परश्याला घेऊन. आयचं लुगडं बानं आंगावर वढलं हुतं.. परश्याला आयच्या लुगड्याची ऊब मिळत हुती. माझं डोळं पाण्यानं खचाखच भरलं. खरंच बा ची किव यायला लागली. रागात त्येच्या हातून नकळत गुन्हा घडला. पण तो माझ्यामुळंच बिथरला व्हता तवा. म्हातारा बैल होत आलेला त्यो.. रहाटगाडं हाकत हाकत दमलेला.. मिळलं त्या शेतात राबलेला.. माझ्या वकीलीच्या जिद्दीनं त्याच्या हाताला कायंच लागणारं न्हवतं कदाचित. म्हणूनच रागाच्या भरात हे समदं घडलं. त्याचं आमच्यावरचं प्रेम दिसू लागलं व्हत मला. परश्याला एकटं सोडणं आम्हाला जमणारं न्हवतं.दुसर्या दिवसापासनं मी धनाप्पाच्या शेतात जाऊ लागलो. बानं आयची जागा घेतली. फक्त जेवन आन् घरातली कामंच न्हाय तर परश्यासाठी पण तो आय बनला व्हता. रोज रात्री मी सैपाकघरात बघायचो माझा बा आयचं लुगडं आंगावर घेऊन परश्याला कुशीत घ्यायचा. ते बघून रोज डोळ्यात आसवं यायची.वकीलीचा नाद मी सोडून दिला. धनाप्पाच्या शेतात काम केल्यानं त्याचं बैल आमच्या शेतीसाठीपण मिळत व्हतं. ऐक्स्ट्रा इनकम बी मिळायची कधीकधी दुसर्या कुणाच्या शेतात राबून. वकीलीची स्वप्न भंगल्याची हुरहुर मनात व्हती. पण आता घरातला तरणा बैल मीच हुतो..Rate this content
Log in

More marathi story from Nilesh Desai

Similar marathi story from Tragedy