Vasudev Patil

Drama

3  

Vasudev Patil

Drama

घावटी..२

घावटी..२

29 mins
830


 भाग::--पाचवा


गाडी भर्रकन शिटीच्या आवाजाची हवा सोडत स्थानकात थांबली,तसा सदा विचार तंद्रीतनं ताडकन उठला.त्या आधीच नलू मॅडम व आजोबा सामान घेऊन तयारच होते.धावपळ करत उतरत ते स्थानकाबाहेर आले व बस-स्थानकातून तालुक्याची गाडी पकडली.गाडीत तुरळक गर्दी असल्यानं जागा मिळताच सदा पहिले पाढे पंचावन्न पुन्हा विचारात गुंगला.पण त्या आधी समोरच्या सहा आसनी बाकावर समोर तोंड करून आजोबाजवळ बसलेली नलू मॅडम सारखी आपल्याकडंच पाहत असल्याचं सदाच्या लक्षात आलं.या जर राहिल्या नसत्या तर दिड वर्षात आपण जगलोच नसतो.खिडकीतनं उतरत्या प्रहराची थंड हवा येऊ लागली.सदा झर्रकन समाधीस्त होत उटीत जाऊन पोहोचला.

 सलिताला सारा काळवंडलेला पट सांगुनही ती माघार घेत नाही म्हटल्यावर शाहु नांगरटीचं उन्हात तापलेलं ढेकळ मृगाच्या पावसानं विरगळत मऊ लोण्यागत व्हावं तीच गत सदाची झाली.तो सलिताच्या मृदगंधात विरघळला.चार पाच दिवस उटीत राहत दोघे परतले ते एकजीव होऊनच.

 दत्ता सरांना अमरावतीला तीनेक महिन्यासाठी पाठवतांना अप्पांनी त्यास पोटतिडकीनं खाजगीत सांगितलं होतं. "दत्ता अमरातीचा तिढा लवकर मिटवून ये मग लगेच सलिताशी तुझं उरकून टाकू.म्हणजे माझ्यापेक्षा तुझी मामीही खुश.कारण तुझ्या मामीनंच ती राजी असल्याचं तिला विचारलंय."यानं दत्ता खुशीतच अमरावती ला गेला होता.दत्ताला ही सलिता हवीच होती.कारण त्यानं दोघांमधला वाद आपोआप संपुष्टात येणार होता.

 मात्र तीन महिन्यात सलितानं सदा बरोबरचे आपले संबंध साऱ्या थरवाडीत स्वत:हून जगजाहीर केले.सदाला आता दुसरं काहीच सुचेना.पगार सुरू नव्हता.अप्पाकडनं तुटपुंजं मानधन मिळे.गायन ही बंद तरी सलिता त्याला पैशाची उणीव भासूच देत नव्हती.हायस्कुलचे पाच ते सात याच वर्गांना अनुदान आलेलं.त्यामुळं तिचा पगार सुरु.बाकी प्राथमिक , हायस्कुलचे वरचे वर्ग व काॅलेज नविन धोरणाचा फटका बसल्यानं विना अनुदानाच्या भोवऱ्यात अडकलेले.नलू मॅडम सुरूवातीला पाच ते सात वर्गावर असल्यानं पगार सुरु होता.त्यांच्याकडं फक्त प्राथमिकची जबाबदारी दिलेली.

 तीन महिन्यानंतर दत्ता खुशीत परतला.पण या ठिकाणी वेगळंच प्रकरण.दत्ता आल्या आल्या सदानं भेट घेतली.

"दत्ता तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे मित्रा!"सदा आनंदानं म्हणाला.

"सद्या मी पण आनंदाची बातमी देणार आहे तुला!"

"अरे व्वा,मग सांग तू आधी!"सदा अधिरपणानं उद्गारला.

"नको आधी तू काय सांगत होता ते सांग मग मी सांगतो नंतर" दत्तानं सांगितलं.

सदालाही मनातून आधी आपणच आपल्या जिवापाड मित्राला आधी सांगावं असंच वाटत होतं.

"दत्ता तुझी सलिता मॅडम...."सदा गोड हसू लागला.

"सद्या लेका नीट सांग लवकर!जीव टांगणीला लावू नकोस!"

सदानं उटीला काय काय घडलं व पुढचं सारं सांगताच दत्ताला काळजात कुणीतरी सुरा खुपसून गरगर फिरवतंय असंच वाटू लागलं.महा मुश्कीलीनं भावनावर ताबा ठेवत तोंडावर पांढरंफट्ट हसू आणत तो सदाचं अभिनंदन करू लागला.

"दत्ता तू काय आनंदाची बातमी देणार होता ते सांग ना आता!"सदा आनंदानं विचारू लागला.

"हेच सांगणार होतो मी.कालच सलितानं मला हेच सांगितलं असं."

दत्तानं सदाला कटवत बाहेर जाणंच पसंत केलं.

    बाहेर पडल्यावर दत्ता टेकडीकडं चालत निघाला.त्यानं विचार केला.सदा लहानपणापासुन प्रेमासाठी पारखा आहे.नाही आईचं प्रेम मिळालं त्याला तर सखीचं तरी मिळेल.आपलं काय! नाही तरी जी आपल्याशी सतत वाद घालत पाण्यातच पाहत होती तर संसार काय सुखाचा केला असता.शिवाय ती आपल्याजवळ बोललीच नव्हती.अप्पांनी सांगितलं नी आपण वाऱ्यावर भारे बांधायला निघालो होतो.जाऊ द्या पण आपल्या सदाचा संसार फुलेल हेच महत्वाचं.सद्या लेका तुझ्यासाठी असल्या छप्पन सलितावर मी पाणी फेरेल यार! मावळतीकडं सूर्यास काळ्या काळ्या मेघांनी ग्रासायला सुरूवात केली होती.

चार पाच दिवसांनी दत्ता अप्पांना भेटायला गेला.दत्ताला पाहताच अप्पांना आपला चेहरा लपवासा वाटू लागला.आपल्या चुलत बहिणीचाच मुलगा हा.आपण शब्द दिला याला पण त्या सलितानं मावशीला सांगितलं काय नी केलं काय! आता या पोराला कोणत्या तोंडानं सांगावं!.दत्तला काय सांगावं यासाठी अप्पा शब्दांची जुळवाजुळव करू लागले.पण त्यांना कोंडी फोडता येईना.

"अप्पा!मी काय म्हणतो,इथं सलिता व सदा सांभाळतील.मी अमरावतीलाच जायचं म्हणतोय.कारण आपण इतका पैसा ओतलाय पण अनुदान अजुन तिन्हही युनिटला नाही.इथले काही वर्गांना सोडलं तर.म्हणून मी अमरावतीलाच राहत तिथं प्रयत्न करतो तरसदा व सलिता इथलं पाहतील."

 दत्ता असलं काही सांगेल याची अप्पांनी कल्पनाच केली नव्हती.त्यांना वाटलं दत्ता सलिताच्या लग्नाबाबत आपण दिलेल्या शब्दाबाबत विषय छेडेल.पण उलट त्यामुळं दत्ता अमरावतीला जायचं म्हणतोय तर बरच आहे. अप्पा राजीनं तयार झाले.व दत्ताची बदली अमरावतीला केली.दत्ता निघाला त्या वेळेस सदानं त्याला भेटत परोपरीनं विनवलं 

"दत्ता मला बोलवून तुच निघून चालला.अप्पांना सांगून बदली रद्द कर ना!इथं मी कसा राह?"

"सदा नोकरी आहे मित्रा!जावं तर लागेलच.आणि तु इथं आता एकटा कसा काय!सलिता आहे ना तुझी काळजी घ्यायला,"दत्तानं मनातला कढ दाबत हसण्यावारी नेत सदाला समजावलं.

"दत्ता मी इथं आलो ते सलिता होती म्हणून नाही तर तुझ्यामुळं!"

"सदा आता जावं तर लागेलच.मित्रा आता एक कर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सलिताशी लग्न कर.नी काही अडलं तर मला कळव"

दत्ता निघाला.सदा उदास झाला.

काही दिवसांनी सदा सलितात रममाण झाला.प्रेमाचे धुमारे फुटू लागले ,धुरळा उडु लागला.एक वर्ष काळ लोटला.आता दत्ता परत येणार नाही ही सलिताला खात्री झाली.शिवाय थरवाडीत एका व्यक्तीचाचंचू प्रवेश झाला.

  थरवाडीला लागून बडवानी या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात आमदारकीस रावसाहेब कदम उभे राहिले.त्याच्या मतदार क्षेत्रातील वीस पंचवीस गावं थरवाडीला लागून होती. त्यांच्याशी नदीमुळं तिकडनं रस्ता नसल्यानं संपर्क हा थरवाडीकडूनच होई.रावसाहेबांनी या गावाच्या प्रचाराची जबाबदारी आपल्या पहिल्या पत्नीचा मुलगा 'विक्रांत कदम'यावर सोपवली.कारण पुढे त्यालाही जिल्हा परिषदेवर उभं करायचंच होतं त्याची रंगीत तालीम व्हावी म्हणून या वीस-पंचवीस गावाची प्रचारधुरा व तेथल्या मतदाराची सर्व खातीरदारी विक्रांतनं थरवाडीत राहून करण्याचं ठरलं.अप्पा विंचुर्णीकराचा फर्टिलायझरचा उद्योग होता तेव्हापासून रावसाहेब कदमाची अप्पांशी ओळख होती.थरवाडीत अप्पांची खाजगी संस्था म्हटल्यावर या संस्थेतच विक्रांतला थांबवून सुत्र हलवायचे रावसाहेबांनी नियोजन आखलं.

 विक्रांत तरणाबांड, उंचपुरा,गौरवर्णीय .खादी कपड्यातला राजबिंडा विक्रांतच अंगावर सोन्याचे दागिने मढवत थरवाडीत प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी नाराजीनंच आला.नर्मदा काठा काठानं बार्जवर उन्हातानात फिरणं,नको त्या लोकांना पाया पडत विनवणं,कार्यकर्त्यांना जेवणखानं,पिणं हे सारं करणं त्याला नको होतं.पण सावत्र भाऊ व आई विरोधात वडिलांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यानं जबाबदारी उचलत थरवाडीत अप्पाच्या संस्थेत येत प्रचारास लागला.

सकाळीच कार्यकर्त्यांना घेत तो पाड्यापाड्यात जाऊ लागला.रात्री थरवाडीत त्यांना जेवण देऊ लागला.

 सकाळी सकाळी गाडीत बसुन निघतांना त्याची नजर सलितावर पडली. त्यानं गाडी थांबवत एकाच्या कानात काही कुजबुजला व प्रचारास निघाला.पण दिवसभर त्याचं चित्त भिंगार पाखरासारखं सारखं भिरभिरू लागलं.संध्याकाळी तो लवकर परतला.सकाळच्या माणसानं येताच त्याला सारी माहिती दिली.त्यानं वडिलांना निरोप पाठवला.रावसाहेबांनी अप्पाची मदत मागितली.दुसऱ्या दिवसांपासून अप्पाच्या संस्थेची माणसं प्रचारात उतरली.

विक्रांतनं सलिता मॅडमांना आपल्या गाडीत घेतलं.सलितानं ठरवलं असतं तर नकार देऊ शकली असती.पण काल तिनं ही विक्रांतला पाहिलं नी पाहतच राहिली होती.उंचपुरा तगडा,राजसरुप पाहताच जिवनात तिची नजर प्रथमच कुण्या पुरुषासमोर खाली झुकली होती.एव्हाना ती कोणत्याही पुरूषाच्या नजरेज आपली खडी अशी रूतवे की पाहणारा लटापटा होत चालू लागे.पण काल विक्रातच्या खडीनं तिलाच जमीन पहायला लावलं होतं.म्हणुन तिला पुसटशी माहिती होती तरी दिवस भरात कार्यकर्त्याकडुन विक्रांतची तिनंही इत्यंभूत माहिती काढली होती .म्हणुन अप्पांच्या सुचना येताच व आज विक्रांतनं त्याच्या गाडीतच बसायला लावताच ती निघाली.

 गाडी बार्जजवळ जाताच खाली उतरत सर्व बार्जवर निघाले.पण विक्रांत गेलाच नाही.

"प्रचाराला जायचं ना?मग बार्जवर का नाही गेलात?"सलितानं विचारलं.

"नाव काय तुझं?"

"प्रचाराचा व नावाचा काय संबंध?"खडीनं खडीत उतरत धुरळा उठवणारा प्रतिसवाल केला.

"प्रचाराचं काय!मी नाही गेलो तरी होईलच.पण ......"

"पण काय?"खडी खडीत खोल खोल उतरू लागली.

विक्रांतला जास्त प्रस्तावनेची गरज पडलीच नाही.एका तासातच गाडीतच विक्रांतनं राजकारणाचा फड नाही पण सलिताचा मनाचा फड जिंकला.

पुढचे आठ दिवस कार्यकर्तेच प्रचार करत राहिले.विक्रांत गेलाच नाही.तो व सलिता वेगळयाच निवडणूकीच्या फडात फिरले.सदा बिचारा अप्पांची सुचना म्हटल्यावर पाड्या पाड्यात फिरत राहिला.

निवडणूक संपली रावसाहेब कदम निवडून आले.सारा ताफा थरवाडी सोडून परतला.पण विक्रांतचं येणं-जाणं सुरु झालं.

  मधा पुण्यात मोठ्या कंपनीत उच्च पदावर जाॅबला लागला.त्याच कंपनीत माधवी ही जाॅबला होती. दोघांचं सूत जमलं व त्यांनी लग्नाचं ठरवलं.मधानं सदाला निरोप पाठवत आजी- आजोबाकडं लग्नाचा विषय काढला.सदा मोठा असल्यानं आधी सदाचं मग मधाचं करू किंवा सोबतच करायचं आजोबांनी ठरवत सदासाठीही मुलगी पाहण्याचं ठरवलं.पण सदानंही सांगताच" तु ही मुलगी पाहिलीय तर लवकर ठरवा, दोघांचं एकसाथ उरकून टाकू!"

सदानं मधाला महिनाभर थांबायला लावत थरवाडीत परतला.

 होळी जवळ येऊ लागली तशी होळीची थरवाडीत धूम उडू लागली. दोन दिवसावर होळी आली.सदानं रात्री जेवण करत सलिताला टेकडीकडं फिरायला बोलवलं.आकाशात पूर्ण गोलाई धारण करू पाहणारा चांद डोंगराआडून वर सरकत होता.पाडा मागं पडून घरं विरळ होऊ लागताच सदा चालता चालता सलिताचा हात हातात घेऊ लागला.पण आज सलिताचा हात हातात येतांना ओढ जाणवली नाही.

टेकडीवर चांदण्यात भल्या मोठ्या दगडावर दोघं बसली.सदानं लाडीकतेनं नेहमीप्रमाणं तिच्या मांडीवर डोकं ठेवत नभातल्या चांदाकडं पाहू लागला.आज त्याला चांदातला काळा डाग प्रकर्षणानं जाणवू लागला.पण त्यानं तिकडं पाहणं टाळलं.

"सले!घरी गेलो होतो!लहान भावाचंही लग्न ठरल्यासारखंच आहे!म्हणून आपलं व त्याचं दोन्ही सोबतच करायचं आजोबा सांगत आहेत"

तोच सलितानं त्याला उठवत ताडकन उठली.

"का गं काय झालं बिचकून उठायला?"उभं राहत सदानं विचारलं.

"काही नाही रे!मांडीखालून काही तरी गेलं."

"विंचूकाटा असेल,उन्हाळ्याचं निघतात या वेळेस!"सदानं पुष्टी जोडली.

"सदा चल परतू या! भिती वाटतेय!"सलिता संधी साधत म्हणाली.

सदाचा हिरमोड झाला.परततांना सदानं पुन्हा सुरूवात केली.

"सलिता! घरात मी मोठा असल्यानं आधी आपलंच किंवा सोबत तरी करावं लागेल. म्हणुन तू आता घरात लवकर विचार म्हणजे मी आजी आजोबांना बोलवून घेईन."

सदानं पुन्हा तोच विषय काढला.

"बघू ना,काय घाई एवढी!"त्रोटकपणे बोलत सलिता टाळू लागली.

"तसं नाही सले.मला काहीच घाई नाही पण मधा माधवी थांबणार नाही व माझ्या आधी त्याचं उरकणं रितीला धरून होणार नाही.म्हणून तू घरी लवकर विचार".

पाडा आला नी सलितानं सुटकेचा श्वास टाकला.

 रात्री सलिता नलूजवळ झोपतांना विक्रांतच्या विचारात गुंतली.पण उशीरानं सदाला काय नी कसं सांगावं पेक्षा कसं टाळावं याचाही विचार करू लागली.

"सदाजीराव शिंदे!ही सलिता तुमच्यावर प्रेम करण्या इतपत भोळी मनीमाऊ वाटली का आपणास?ही मनीमाऊ दत्ता, सदाला खेळवत होती हो!दत्ता अप्पाच्या विश्वासातला.त्याला बाजूला काढायचं होतं मला.नी नेमके तुम्ही टपकलात 'फेव्हीकाॅल का मजबूत जोड'होऊन मित्रप्रेम दाखवायला.तुमची हुशारी अप्पाला वळवत होती.मग मी तुम्हालाच वापरायचं ठरवलं.केला वापर तुमचा.तुम्ही उंदरासारखं अलगद अडकलात.तुमचा उंदीर अन दत्ताचा पोपट केलाय या मनीमाऊनं."

सलिता मनातल्या मनात हसू लागली.

तोच पुन्हा तिला विक्रांत आठवला.

"दत्ताला कटवल्यावर आपण सदाला खेळवत ठेवलं असतं आपल्या मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत.पण लगेच विक्रांत भेटला नी खरच आपल्याला जिवनात पहिल्यांदाच मनात कुणाविषयी चलबिचल व भवरी उठली.पण ती जरी उठली नसती तरी त्याची श्रीमंती,ऐश्वर्य उपयोगात आणून जिवनात पुढे जाण्यासाठी त्यालाही उंदरासारखं खेळवलंच असतं"ती पुन्हा हसली.

आता तिचं विक्रांत सोबत फिरणं वाढलं.

निसरणीला सदा व सलिताबाबत कळताच आजोबा व आजी एकवेळ मुलगी पाहू व पटली तर घरच्याची भेट घेत पक्कं करू म्हणून सदाला विचारून थरवाडीस आले.

सदाच्या खोलीवर आले तेव्हा सलिता विक्रांतसोबत बडवानीला न सांगता गेलेली.विक्रांतनं रावसाहेब व रेवती आईशी तिची भेट घडवून आणली.दोघांना ती अप्पा विंचुर्णीकरांची भाची म्हटल्यावर व सुस्वरुप असल्यानं आवडलीच.

 आजी आजोबांना जेवण नलू मॅडमानंच केलं.सलिता चार दिवस आलीच नाही.सदाला वाटलं सलिता घरी विचारण्यासाठीच गेलीय.तो वाट पाहू लागला.नलू आजी आजोबांची सर्व सोय पाहू लागली.आजीला नलूचा स्वभाव वागणं खूप आवडलं.

सलिता आली.सदानं 'तिला आजी आजोबा आलेत तुला पहायला'म्हणून हसतच सांगितलं.

"अरे व्वा!मग पहावं त्यांनी मला वरून खालून!"ती म्हणाली.

"सले मस्करी सोड!जुन्या चालीरितीची आहेत ती.त्यांच्यासमोर व्यवस्थित वाग."

आजी आजोबांनी सलिताला पाहताच पसंद केलं.पण तरी आजीला मनाच्या तळाशी कुठं तरी नलूच आवडली होती.व पुसटसं सदानं नलूलाच निवडावं वाटत होतं.

सदानं सलिताला "आजी आजोबांना तु आवडली आहेस घरच्यांना कळव म्हणजे मग आम्ही येतो "सांगितलं.

"अरे सदा थांब आठ दिवसात आई वडीलच येणार आहेत इकडे"सांगत आणखी खेळवलं.

आठ दिवसात रावसाहेब व रेवतीचं अप्पा व सलिताच्या आई-वडिलांशी बोलणं झालं.आई वडिलांनी थरवाडीत यावं व इकडून कदम कुटुंबानेही थरवाडीत यावं असं ठरलं.अप्पाला आधी कळालं तेव्हा त्यांनी सलिताची आधी कान उघडणी केली.

"सले काय चालवलं हे!प्रेम म्हणजे खेळ वाटला का तुला?आधी दत्ता,मग सदा,नी आता विक्रांत?ती पोरं होरपळताहेत नी तू?"

"अप्पा दत्ताचं मी म्हटलंच नव्हतं.मावशीच भाचा भाचा म्हणत होती.सदाचं म्हटलं तर तो एक साधा कर्मचारी.संस्थेत अशांना हाताशी धरायचं असतं ना की प्रेम!"

"नी मग विक्रांत गं!"अप्पानी तिचा गळ काढला.

"अप्पा,तुमच्या संस्था माझ्या ताब्यात द्या याच्या मदतीनं एका वर्षात अनुदान आणते बघा तुम्ही!होणारे सासरे आमदार आहेत,ते केव्हा कामाला येतील!"

अप्पांनी सलिताची महत्वाकांक्षा पाहिली.वाढत्या वयात हिला समजावणं कठीण.शिवाय आपण पैसा ओतून संस्था उभारली पण अनुदान नाही आणू शकलो.आपलं नाव झालं पण राबणाऱ्यांच्या पोटाचं काय?रावसाहेब आमदारांनी अनुदान आणलं तर चांगलंच.म्हणून सदा विषयी किव वाटूनही त्यांनी नाईलाजानं होकार दिला.

आठ दिवसांनी आई वडील आले.सदा आजी आजोबांना घेऊन काॅलेजात गेला.नलू मॅमला महिन्यात बदललेलं वारं समजलं होतं.पण कसं नी काय सांगावं?शिवाय सलिता नेमकी काय करणार हे पत्तं उलघडत नसल्यानं ती ही शांत होती.

सदा काॅलेजात प्रवेशीत झाला त्याच वेळेला रेवती,रावसाहेब विक्रांतसोबत गाडीतून उतरत होते.रेवतीला पाहताच सदाला हा चेहरा धुंदला धुंदलासा ओळखीचा वाटू लागला.पण कुठं पाहिलाय नी कोण हे आठवेना.रेवतीचं लक्ष जाताच जवळपास वीसेक वर्षाचं अंतराळ व बदललेला सदा ओळख राहिलच कशी.पण आजी-आजोबांनी रेवतीला व रेवतीनं आई-वडिलांना ओळखलं.नजरानजर होताच आग उसळली.पण रेवतीनं डोळ्यावर काळा गाॅगल्स चढवत ओळखच नाही या अविर्भावात पुढं निघाली.आजी-आजोबांनी पोराच्या चांगल्या कामात घोळ नको म्हणून आग तशीच दाबत शांत झाले.पण तरी इटक्या वर्षात ही इथं कशी?हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला.

आजी-आजोबा वाट पाहत एक तास थांबले पण ना सलिता खाली येत होती ना आई -वडील.

सदा तिला भेटून विचारायला वर गेला तर हिरवी पैठणी नेसून बसलेली.आजूबाजूला गर्दी.

साऱ्यासमोर कसं विचारावं त्याला कळेना.विक्रांत कदम व रावसाहेब कदम प्रचारापासून ओळखीचे पण बाकी बरेच नवीन.शिवाय अप्पाही हजर.नेमकं काय चाललंय त्याला कळेना.त्याचा गोंधळ उडाला.तो त्याच स्थितीत तिथं उभा राहिला.सलिता पाटावर बसली.सुवासिनीने ओटी भरली. व नंतर विक्रांत नं रिंग....

सदाला कोडं उलगडलं...

तो कडाडला.

"सले !हा काय प्रकार चालवलाय?"

तोच आजी आजोबाही वर आले.

सलिता काहीच बोलेना.तिनं मात्र विक्रांतला याविषयी सांगितलं असावं .

म्हणुन विक्रांतच बोलला.

"मी सांगतोय ,सलिता व माझा वाङनिश्चय होतोय.दुसरं काहीच नाही."

सदा बेफाम संतापला.

"सले मला तुझ्याकडून ऐकायचंय"सदा नजरेत अंगार फुलवत म्हणाला.

"पोरी माझ्या नातवाशी तू लग्न करणार आहेस मग आणखी हा काय प्रकार?"आजोबा थरथरतच सलिताला काकुळतीनं विचारू लागला.

रेवतीच्या लक्षात आलं..ती सदाकडं पाहू लागली.ती सदात लहान्या सदा ची छबी आठवून पडताळू लागली.ओळख जुळू लागली.ती रावसाहेब कदमाच्या कानात काही कुजबुजली.कदमाचं पित्त ते ऐकून खवळलं.एकंदरीत रामोजीचं बेणं इतक्या वर्षात आपल्यासमोर दिसताच त्यांचा राग अनावर झाला.

"अप्पासाहेब काय चाललंय हे?आम्ही परतायचं का?असला अपमान नाही सहन होणार आम्हास!"

ते गरजले.

"सले सांग तूच!"

सलितानं उठत विक्रांतच्या बोटात अंगठी घातली .

सदा ते पाहून काय ते समजला.

"सले !काय मिळालं मला उध्वस्त करून!जन्मजात वैऱ्याच्या टोळीत तुही सामिल झालीस?"

आजी आजोबा रेवतीकडं पाहत कडाडले.

"पोटच्या पोराचाही संसार सुरू होण्याआधीच मोडला तू?आमच्या कुळाचा उद्धार केलास तू!व्वा!"

अप्पा झाल्या प्रकाराने सुन्न झाले.

सदाला सलिता व आई या दुहेरी धोख्याच्या धक्क्यानं गरगरू लागलं.रावसाहेब रेवतीनं आता तर माघार नाहीच या निश्चयानं पुढचं कार्य उरकलं.नलूनं आजी-आजोबांना सावरत घरी आणलं.सदा ढासळला,कोसळला.काळ्या डागानं घास घेतला आपला हे दु:ख करावं की सलिताचं?यासाठी तो नशेच्या काल कोठडीकडे वळला.....

आजी-आजोबानं मधाला बोलवलं.त्यानं ऐकून भावाला सावरण्या ऐवजी माधवीचं ऐकून परस्पर लग्न उरकवलं. सदावर घावाची मालिकाच कोसळू लागली.रेवती व राव कदमांनी मुद्दाम लग्न थरवाडीतच ठेवलं.हा सोहळा पाहावा लागू नये म्हणून सदा निसरणीला परतला पण तिथंही मधा माधवीनं सावरलं नाही.

.

.

क्रमश:


भाग::-- सहावा


 तालुक्याच्या एस टी.स्टॅण्डवर गाडी उलटी लावत ड्रायव्हर उतरला तशी सदाची समाधी पुन्हा भंग पावली.सारे उतरत थरवाडीकडं जाणारी जीप शोधू लागले.जीप भरायला अवकाश असल्यानं नलू मॅडमनं जागा ठेवायला लावत समोरच्या अन्नपूर्णा खानावळात आजोबा सोबत सदालाही चाऊ माऊ करायला लावलं.पोटातले कावळे शांत होताच सदाला तरतरी वाटू लागली.

जीप भरताच थरवाडीकडं निघाली. पुन्हा सोकावल्यासारखा सदानं स्वत:ला विचारात गाडून घेतलं.

 निसरणीला लग्नानंतर मधा-माधवी दोन महिने रजा घेऊन आले होते. सलिताचं लग्न पाहणं नको व उन्हाळी सुट्या यानं सदा निसरणीला परतला.चार पाच दिवस शांततेत गेले.पण दररोज सकाळी उठून पिणं यानं माधवी घर डोक्यावर घेऊ लागली.नवी नवरीचं असली रूप लवकर उघडं पडलं.तिला वाटलं ,मधाच कमवून या साऱ्यांना पोसतोय. ती छोट्या छोट्या कारणांवरून भांडण उकरी.सदाला तर जेवणाचा ताट जोरात ठेवणं, आडपडद्यानं घालून पाडून बोलणं सुरू झालं.पण सदाचं दु:ख वेगळं असल्यानं व दारू यामुळं सदा दुलर्क्ष करी.मुकाट्यानं आजीकडून मिळेल ते दोन चार घास गिळे व बाहेर पडे.पण तरी पंधरा दिवसात सळो की पळो करुन टाकलं.शेवटी कंटाळून सदा थरवाडीत परतला.

रुमवर तर पिणं खूपच वाढलं.नलू मॅडम जेवणाचं ताट व उपदेशाचे डोस न चुकता पुरवू लागली.मध्यंतरी सुटीत लग्न होताच विक्रांत व सलितानं अप्पाची भेट घेत रावसाहेब आपल्या तिन्ही संस्थाचं अनुदानाचं काम करून देतील नाव तुमचंच चालेल.फक्त सर्व संस्था सलिताच्या नावावर(कारभार) करण्याची अट घातली.अप्पा काय ते समजले.एवढा पैसा ओतून ही केवळ आपल्या नावाचीच पाटी राहिल.पण असंही वय थकत चाललं.आपल्यानंतर हीच मालकीण .मग अनुदान मिळत असेल तर कारभार जातोय तर जाऊ देत.पण निदान सलितानं आपण आहोत तोपावेतो तरी थांबायला हवं होतं; याचं त्यांना दु:खं झालंच.अप्पांनी अमरावतीची संस्था दत्ताकडंच ठेवली व दोन्ही संस्था सलिताच्या नावावर केल्या. तद्नंतर पुढच्या पंधरा दिवसात अप्पांनी जगाचाच निरोप घेतला.सलिता व विक्रांतला आयतंच मोकळं रान मिळालं.रावसाहेब कदमांनी केवळ शिक्षीका असुन सलिताला होकार देण्यामागं ही हेच कारण होतं.

 विक्रांत हा पहिल्या पत्नीचा मुलगा असल्यानं रेवती व त्याचं जमेचना.रावसाहेब तर रेवतीत अडकलेले.म्हणुन विक्रांतचं अलग साम्राज्य करुन द्यावं म्हणून त्यांना अप्पासाहेबांच्या तिन्ही संस्था हव्या होत्या.

काॅलेज उघडलं.सदाला पहिल्याच दिवशी 'आपली वर्तणूक सहकारी महिला शिक्षीकेंशी बदफैली प्रकाराची' म्हणून.....हातात कागद मिळताच सदानं तो पुढे न वाचताच फाडून सलिताच्या हळद उतरू पाहत असलेल्या चेहऱ्यावर फेकला.सलिता संतापून काही बोलणार तोच विक्रांत पुढे होत तणफणला."सलिता कशाला असल्या तीनपट लोकांच्या नादी लागायचं.तो आधीच अर्धमेला झालाय.आता आपल्याला काहीच करायची गरज नाही तोच वडिलांचा आदर्श घेत आपोआप 'गाडी' पाहील.थरवाडीतलेच काय पण या जगातलेच त्याचे दिवस भरलेत"

सदा आपल्या वडिलांचा असा नामोल्लेख होताच बिथरला.सरळ बेडवाई पाड्यातल्या सिंगा सरदाराच्या भट्टीत तो रमला.दिड वर्ष तो कसा जगला त्याला काहीच कळलं नाही.

.

.


जीप थरवाडीची वळणं घेऊन गावात उभी राहिली.बाहेर सर्वत्र अंधार असल्यानं सदाच्या डोळ्याला लागलेल्या धारा कुणाला दिसल्या नाहीत.नलूनं आजोबाला आधार देत उतरवलं.सदा खाली उतरला.त्यानं मनातल्या मनात आराधना केली.

"हे अलक्षा!नियतीनं लहानपणापासून माझ्यावर अन्याय केलाय.माझ्या आपल्यांनी छळलं,माझंही चुकलं असेल पण या थरवाडीत आता सदा पुन्हा नविन रुपात आलाय.यश दे! दुसरं काहीच नको."

त्याला उभं पाहतांना नलू समजली.तिनं माघारी फिरत त्याचा हात हातात घेत मूकपणे 'मी तुझ्या साथीत आहे. तू एकटा नाहीस,एकटी तर मी होते!'मनात म्हणाली.तिचा मऊ मुलायम रेशीमस्पर्शानं तो उटीला शहारला तसाच शहारला.पण या स्पर्शात त्याला सर्वस्वाच्या निर्मोही दानाची अनुभुती झाली.

रात्री नलू पडल्या पडल्या विचारात गुंतली.या कुटुंबानं आपल्याला काहीच केलं नाही पण तरी आपण यांच्यासाठी कोणतंही नातं नसतांना का बिलगतो एवढं.की गतजन्माची ऋणानुबंधाची गाठ असावी?की सदा....? आता जीपमधून उतरतांना त्याचा हात पकडतांना किती आश्वासकपणा आपण दाखवला!नी त्यानं ही त्यास किती पावित्र्यमय ,मंगलमय प्रतिसाद द्यावा!वासनेचा कुठलाही लवलेश नाही.आजी गेली त्या आधी काही दिवस रात्री नशेत चूर सदा सलिता समजून बिलगला पण तरी त्यात ओरबाडणं नव्हतं तर समर्पणानं विरणं होतं! आपण विरलो नाही तो भाग अलविदा होता.पण आता आपल्यालाही हे टाळणं शक्य नाही.पण आपण आहोत का सलिताची जागा घेणारे?"

नलूला आपण कोण?आपला धर्म कोणता?आपली जात कोणती?काहीच ठावठिकाणा माहीत नाही.ती मागेमागे सरकू लागली व आपलं अस्तीत्व शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न सदाला मिळवण्यासाठी करू लागली.

 कोठून सुरुवात करावी? केशव गुरुजीचं नगरपट्ट्यातलं गाव?की घाटातलं आपलं गाव शेवरी?की गुजरातमधील गणदेवी ऊस फॅक्टरी?....

.

.

.

 शेवरी गावातील मारत्या चव्हाण व कमली आपली बैलगाडी घेऊन नवसारी जवळ गणदेवी फॅक्टरीत टोळीबरोबर ऊस तोडायला गेलेले.पौष महिन्याची थंडी जीव घेत होती.ऐन पंचविशीतली कमली धन्याबरोबर राबत होती,पौषी थंडी पित होती पण पोट काही पिकेना! मनात सल होती तरी मारत्याच्या साथीत उभी होती.पहाटेच उठून रांधत फडावर जाणं,ऊस तोडणं,बांडी विकून परतणं, ऊस फॅक्टरीत टाकणं उशीरा जेवणं ,असं रहाटगाडगं सुरु.एक दिवस फड फॅक्टरीपासून लांब असल्यानं परतायला रात्र होऊ लागली. मारत्या भरलेली गाडी ओलकट शेतातून काढत होता.शेत निघेपर्यंत कमळी पायी चालत होती,बैलांना खालूनच मायेनं दमकावत होती. आजुबाजुला डोक्यापार वाढलेले ऊसाचे फड.नविन मुलूख.पण रानात खेटणारी माणसं भिऊन कसं पोट भरेल.रस्ता लागायला दोन तीन नंबर बाकी.तोच मागं चालणाऱ्या कमलीला फडातुन पोर रडल्याचा आवाज येऊ लागला.तिनं मारत्याला सांगताच "मुकाट्यानं चल उगीमुगी, कोल्हं- बिल्हं असेल". रात्र व नविन मुलूखाची जागा.काही जागा खंतड असतात म्हणून काही लचांड नको म्हणून मारत्या दुर्लक्ष करत होता.पण रडका क्षीण आवाज वाढू लागला तशी पोटी संतान नसलेली कमला विरघळली व अंधारात आवाजाच्या दिशेन फडात जाऊ लागली.झक मारून मारत्या गाडी थांबवत उतरला व कमळी मागोमाग फडात शिरला.फडात बांधापासून आठ दहा फुटावरच दोन अडिच वर्षाची उघडी नाघडी पोर केवळ गोधडीत गुंडाळलेली होती.पोर थंडीनं, भुकेनं अधमेली होऊन क्षीणपणे रडत होती.कमळीनं ही कुणाची?इथं कशी?कोणी ठेवली काहीच मागचा पुढचा विचार न करता तिला उचलून गाडीकडं आणलं.मायेची छाती मिळताच पोर शांत होत कमलीला बिलगली.साऱ्या तांड्यात कमलीला पोर सापडली म्हणून रात्रीच बोंबाबोंब झाली.चर्चेला ऊत आला.पण परिसरातूनही कोणीच आलं नाही.सारे समजून चुकले की टाकणाऱ्यांना ती नको असावी.मात्र कमली मारत्याला तर ती हवीच होती.टाकणाऱ्यानं तिच्या अंगावर कपडे ही ठेवले नसल्यानं जात, पात, धर्म याचा पत्ताच नव्हता व कमलीस त्याचं सोयर सुतक ही नव्हतं.नकोशी असणाऱ्या पोरीचं तांड्यानं नकोशी ऐवजी नलू नामकरण केलं.नलू मारत्या व कमलीची लेक म्हणून वाढू लागली.मारत्या व कमलीचं ही जगात कुणीच व काहीच नव्हतं.दरवर्षी ते नलूला घेत ऊस तोडायला जाऊ लागले.पण गणदेवीकडे जायचं त्यांनी टाळलंच.कमलीला भिती वाटे की न जाणो पोरीचे आई-वडील पुन्हा आले तर.म्हणून ते त्याऐवजी नगर ,नाशिक पट्ट्यात ऊस तोडायला जाऊ लागले.नलू सात वर्षाची झाली.नगरपट्टृयात जवळच्या वाडीतल्या केशव(दिना)गुरुजींची तांड्यावर साखरशाळेत नियुक्ती झाली.त्यांची नजर सात वर्षाच्या नलूवर पडली.नलूचं तर शेवरीलाही नाव दाखल नव्हतं.त्यांनी मारत्यास नाव दाखल करावयास लावलं.नलू साखरशाळेत पहिलीत दाखल झाली. एक महिना झाला.चुणचुणीत नलू गुरुजीची आवडती झाली.पण पुन्हा नलूचं दैव फिरलं.मारत्या कमली पहाटे अंधारातच नलूचं जेवण करून ऊस तोडायला निघाले.

"नले सुरजी आजी अंघोळ करून देईन.वेळेवर शाळेत जा.दुपारी जेवण कर"गाढ झोपेतल्या नलूला कमली दररोजप्रमाणे मायेनं निर्वाणीचं सांगत होती. तिला माहित होतं नलू घोरतेय पण तरी पोट न पिकलेल्या मातेची पोरक्या लेकरूवरची अखेरची माया बोलत होती.कमलीनं झोपलेल्या नलूचे पटापट पापे घेतले.

"कमले झोपेतल्या पोराचे पापे घ्यायचे नसतात गं!माहीत नाही का तुला!दामा मेटेची म्हातारी सुरजी कमलीच्या झोपडीतच झोपे,ती कमलीला दटावू लागली.

कमली व मारत्या पहाटेच हायवेनं फडाकडं बैलगाडीनं निघाले.पुर्वेला तांबडं फुटायला अवधी होता.बैलगाडी इतर बैलगाड्यांपेक्षा बरीच पुढे निघाली.इतर गाड्या व मारत्याच्या बैलगाडीत अंतर होतं.गाड्या सुसाट धावत होत्या मोठ्या ट्राॅल्याला ओव्हरटेक करतांना ट्रकवाल्यास समोरच्या ट्रकच्या उजेडात साईडनं चालणारी मारत्याची गाडी दिसली पण तो पावेतो उशीर झाला होता.बैलासहित गाडी भरधाव ट्रक चेंडूसारखी हवेत उडवत जीव वाचवत पसार झाला.कमली मारत्याच्या हाडामासाच्या चिखलात बैलांच रक्त झिरत सकाळपावेतो थिजलं.कमळीच्या काळजास नलूसाठी धडधडायलाही अवधी मिळाला नाही.जागेवरच खेळ खल्लास.नलू झोपेतून उठताच काय झालं ते न कळताही मातलेल्या हुल्लड ,आक्रोशानं सुरजी आजीला बिलगू लागली.हाडामासाचा चिखल गावावर कसा न्यायचा व कुणासाठी न्यायचा?असा विचार करत सोबत्यांनी तिथंच मुठ माती दिली.नलूच्या कोऱ्या सातबाऱ्यावर मारत्या काहीच देऊन गेला नाही पण साखरशाळेतल्या दाखल्यावर नाव मात्र आयुष्यभरासाठी देऊन गेला.

नलू सुरजी आजीकडं- दामा मेटेकडं राहू लागली.पण जो दामा मेटे स्वत:च्या आईला वागायला का- कू करत होता तो या आई बापाचा पत्ता नसलेल्या पोरीला कसा वागवेल.पंधरा दिवसातच त्यानं म्हातारीला तंबी दिली. नलू तांड्यातच रडत कुडत फिरू लागली.पट्टा पडला तांडा शेवरीकडं परतण्यासाठी तयारी करू लागला.पण सुरजी आजीला नलूला सोडायचं कुठं हा प्रश्न पडला.आजीला एक धुगधुगती आशा दिसली.आजीनं नलूला घेतलं व साखरशाळा गाठली.पट्टा पडला म्हणून केशव गुरूजीही शाळा बंद करत मुळच्या शाळेवर परतायची तयारी करत होते.आजीनं नलूला पुढे केलं.अंगावर व चेहऱ्यावर रया नसलेली नलू भेसूर चेहऱ्यानं खालमानेनं गुरुजीसमोर उभी राहिली.

"गुरुजी निमावतं पाखरू आहे.काहीही करा तुमच्या ओळखीनं कुणाच्या तरी पदरात घाला .तांडा गावाकडं चालला पण कुणीच कवेत घ्यायला तयार नाही.पोरीला कुत्र्यागत सुनं कसं सोडू?"सुरजी आजी दिलाच्या देठातून कारोण्या करू लागली.

गुरुजी स्तब्ध झाले.मारत्या गेला त्यानंतर नलू शाळेत येणं बंद झाल्यावर त्यांनी तांड्यातल्या दोन तीन लोकांकडं चौकशी केली तेव्हाच 'खायचे रहायचे जिथं वांधे, तिथं पोरीच्या शाळेचं काय घेऊन बसलात मास्तर!' गुरुजींना सुनावलं गेलं.हे ऐकून त्यांनी घरी विषय काढला होता.पण गडगंज श्रीमंती असुनही घरातून त्यांना स्पष्ट विरोध झाला होता.

"दुनियेत दररोज किती तरी पोरं अनाथ होतात.मग साऱ्यांनाच घरात आणून घरातच अनाथालय खोलणार का?मुळीच नाही.ही असली रिकामी ब्याद घरात नाही खपवणार मी".बाईनं गुरुजीला उडवून लावलं होतं.म्हणुन चुणचुणीत पोरीबाबत दयेचा सागर काळजात उचंबळत असतांनाही गुरूजीनं माघार घेतली होती.पण आता तर तांडा ही तिला टाकून जाणार तर मग पोरीचं काय? गुरुजी गलबलून मनात काही ठरवू लागले.

"आजे आजच्या दिवस पोरीला सांभाळ,पाहतो मी काय करायचं ते"सांगत गुरुजी निघाले.

 दुसऱ्या दिवशी तांडा जात असतांना गुरुजीनं मायेनं नलूला सोबत नेलं. नलू गुरुजीसोबत जातांना मागे वळून वळून जाणाऱ्या तांड्यात कमलीला शोधत होती.पण तिला मागे जाणारी सुरजी आजी व पुढे हातात हात धरून चालणारे केशव गुरूजी शिवाय कोणीच दिसत नव्हतं.

 गुरुजीनं मळ्यात राबणाऱ्या लखमनच्या खोपटात नलूची व्यवस्था केली.बदल्यात लखमनला गुरुजीकडून हवे तेव्हा हवे तेवढे पैसे मिळू लागले. लखमनकडे राहण्याची व्यवस्था लावत आपल्याच शाळेत गुरुजी नलूला शिकवू लागले. 

पोटच्या लेकीप्रमाणं नलूला वाढवत गुरुजीनं नलूला सातवीपर्यंत नेल्यावर घरचा विरोध मावळला नी मग नलूला गुरुजीच्या घरात प्रवेश मिळाला.घरची कामं करत नलूचं शिक्षण झालं.नी गुरुजीनंच ओळखीनं अप्पाच्या संस्थेत लावलं.

गुरूजी थकले.बाई गेल्या.मुलं-मुली परदेशात स्थायिक झाले.आई गेल्यावर गुरुजींनाही परदेशातच घेऊन गेले.पुन्हा नलूचा बाप दुरावला पण तो पावेतो नलूला स्वत:च्या पायावर उभं करून गेला.

..नलूची उशी ओलिचिंब झाली.तोच आजोबा पाणी पिण्यासाठी उठले असावेत.नलूची हालचाल त्यांना जाणवली असावी.त्यांनी पायातीला पडलेली चादर नलूच्या अंगावर टाकताच मायेची ऊब मिळताच नलू निद्रादेवीच्या अधीन झाली.

 दोन-तीन दिवसात अमरावतीहून दत्ता परतला.

दत्ता, सदा व नलू यांनी संगनमतानं पुढच्या प्रवासाची आखणी केली ज्यात थरवाडीत नव्या अध्यायाच्या ओनाम्याचा बिगुल वाजणार होता. 


क्रमशः


भाग:-- सातवा


    दत्ताला थरवाडीत पाहताच सलिताला शंका आली.हा अमरावती सोडून इथं कसा? शिवाय सदा बेवडा ही हल्ली शुद्धीत वावरतोय?हे दोघे एकत्र आले तर आपल्या विरूद्ध काही तरी कट कारस्थान करतीलच.म्हणून तिनं आपल्या मर्जीतल्या शिपायास पाळतीवर ठेवलं.त्यात यांना नलू साथ देतेय म्हटल्यावर तिचा पारा चढला.चालू सत्रात तिनं गडचिरोलीच्या संस्थेतला नलूच्या बदलीचा आदेश काढला.मधल्या सुटीत शिपायानं नलू मॅडमला सलिता मॅडमनं कार्यालयात बोलावल्याचा निरोप आणला.

"काय झालं मॅम आपण बोलवलंत!"

"या नलू मॅम! प्रथमतः तुमचं अभिनंदन.संस्था तुमच्या कामावर खुपच खुश आहे.आणि म्हणुनच तुम्हास गडचिरोलीच्या संस्थेत नेमणूक देत आहे.इथल्या सारखंच कसोशीनं व हिरीरीनं तिथं ही काम कराल व त्या संस्थेसही नावारूपाला आणणार याची संस्थेस खात्री आहे.म्हणूनच तुम्हास लगेच गडचिरोलीला हजर व्हायचा आदेश आहे" सलितानं नलूस सुनावलं.

संस्था आपल्या कामावर जर खूश आहे तर गडचिरोलीस नेमणूक हे न समजण्या इतपत नलू अजाण नव्हती.गडचिरोलीचं नाव ऐकताच नलूला भोवळ यायला लागली.आपण सदा व दत्ता सरांना साथ देतोय म्हणून याचा वचपा काढण्यासाठीच आपणास गडचिरोलीला पाठवलं जातंय हे नलूला लक्षात आलं.

"अभिनंदनाबद्दल मी आपली ऋणी आहे मॅडम!पण बदली संस्थेनं केली म्हणजे नेमकी कोणी केली हे कळेल का?"नलू विचारती झाली.

"मॅम! अप्पांनंतर संस्था आता कोण चालवतंय हे तुम्हास माहितीय ना!"सलितानं खुर्चीवर रेलून बसत सांगितलं.

"म्हणजे तुम्हीच?"

"नाही हो! मी तर नामधारी.आमचे विक्रांत सरच सारं पाहतात ना!"

"मग माझी बदली विक्रांत सरांनी केलीय तर? का मी काय संस्थेचं एवढं जास्तीचं भलं केलं होतं की त्यांना मलाच बढती द्यावीशी वाटली?" नलूच्या आवाजात आता धार येऊ लागली.

"आता बघा मॅडम ते तर तेच सांगू शकतील!त्यांनाच भेटा तुम्ही.देव जाणो ;त्यांच्या मनात आलं तर ते आदेश रद्द ही करू शकतील!" आता सलिताचा लहेजा फिरकी घेण्याचाच होता.

नलूनं आदेश झटक्यात हातात घेत कार्यालय सोडलं.

घरी येताच नलूला केशव गुरुजी आठवू लागले व ती हमसून हमसून रडू लागली. दत्ता व सदास कळेना काय झालं.त्यांनी भर ओसरू देत विचारल्यावर नलूनं आदेश समोर धरला.असं काही होईल याची दत्तास कल्पना होतीच.आपण अमरावतीस,नलू मॅम गडचिरोलीत, तर सदाचा नोकरीचा ठिकाणा नाही.काय करावं?तो विचारात पडला.

दत्ता सदाला संस्थेतून काढलं म्हणून कोर्टात जायची तयारी करत होता तोच नलू मॅमची बदली.

"सदा!आता नलू मॅमला गडचिरोली जावंच लागेल.कारण अप्पानंतर सलिताकडंच दोन्ही संस्था असल्यानं ती काही ही करू शकते.भले सेवाजेष्ठतेवर आधारीत आपणास लढता येईल पण त्यातून काहीच निष्पन्न निघणार नाही."चिंतेच्या स्वरात दत्ता बोलला.

"नलू मॅम काय म्हणताहेत?"

"मी काय म्हणणार ? नाही जायला मला दुसरा काय आधार आहे?" नलूनं रडतच म्हटलं.

.

.

.

थोडा वेळ शांततेत गेला.

"दत्ता !कोर्टात का जायचं!तर त्यांच्या हाताखाली राबण्यासाठीच ना! निकाल आपल्या बाजूनं लागला तरी त्यांच्याच हाताखाली राबायचं आहे!"

सदा निश्चल एकटक पाहत बोलला.

"मग?".....

"आपणच त्यांच्या नाकावर टिच्चून नविन शाळा काढली तर.....?"

"सद्या मारून आला का पुन्हा?शाळा काढणं तुला थंड हवेच्या ठिकाणी सहलीस जाऊन येणं इतकं सोपं वाटलं का?"दत्ता वैतागत बावचळला.

"का!आपल्या आधीही कोणी तरी काढल्याच ना शाळा!ती ही माणसंच होती ना!"

"अरे पण ज्यांनी काढल्या त्यांच्याकडं गडगंज पैसा होता,वशिला होता! तुझ्याकडं काय आहे?कुठुन आणणार पैसा?दत्ता घायकुतीला येत बोलू लागला."

"आज माझ्याकडं नाही पैसा!पण माझ्या गळ्याची जादू अजुन या दुनियेनं पुरती पाहिलीय कुठं?उभारेन मी पैसा!"

"सदा डोकं फिरल्यागत काहीही बरळू नकोस!नलू मॅडम उद्या तयारी करा.मी पोहोचवतो तुम्हास गडचिरोलीला! जाण्याशिवाय पर्याय नाही.मी नंतर पाहीन सदाचं काय करायचं ते."दत्ता निर्वाणीचं बोलला.

"दत्ता ऐकून तर घे आधी!माझ्यावर भरोसा करतोस ना!"

"सद्या स्वत:च्या श्वासावर नाही इतका तुझ्यावर भरोसा आहे.हवं तर अमरावतीहुन मी येतो तुझ्या मदतीला.मग हवं ते कर. पण त्या मॅडमांना थांबवू नकोस.त्यांना या नोकरीशिवाय दुसरा सहारा काहीच नाही रे!"

"दत्ता त्यांना जायचं असेल तर त्यांना मी अडवणारा कोण?"

"दत्ता सर ,आधी ते काय सांगता आहेत ते तर ऐकून घेऊ"नलू शांतपणे म्हणाली.

"अहो मॅडम, तो काहीही सांगेल ,पण शाळा काढणं इतकं सहजसोपं आहे का?"

"दत्ता उद्या नलू मॅडम जाताहेत जाऊ दे पण तू फक्त ऐक तरी एकदा."

"सद्या काय ऐकू तुझं!डिजे पार्टीतनं पंचवीस-तीस गोळा करशील तू!त्यात काय होणार रे!शाळा बांधणं, शिक्षक आणणं, पोरं आणणं नी मग हे सर्व उभं राहिलंच समज तरी अनुदानाचं काय?अरे ज्या अप्पासाहेबांनी आयुष्याची जमापुंजी-लाखो रूपये ओतून हा डोलारा उभा केला ,तरी त्यांना अनुदान आणणं शक्य झालं नाही नी तू हे स्वप्न पाहू तरी कसा शकतो?माणसानं स्वप्न पहावीत पण दिवास्वप्न नाही."दत्ता संतापात व त्रागा करत सदाला खडसावू लागला.

"दत्ता !असाच विचार अनेक शिक्षणमहर्षींनी केला असता तर महाराष्ट्रात शिक्षण संस्थाच उभ्या राहिल्या नसत्या."

"तू मुर्ख आहे.स्वत:ला तू कोण समजतोस!"दत्ता आवेगात बोलला.

"मी कोणीच समजत नाही.पण ज्यांनी माझ्या जिवनाची होळी केलीय,माझ्या दत्तालाही धोका दिला त्यांना धडा शिकवायचाय मला" सदा निग्रहानं म्हणाला.

"ते ठिक रे पण तू नाश पावशील!"

"दत्ता ,नाश ते पावतात ,ज्यांच्याकडं काहीतरी असतं.वडिलांनी रेल्वेला धडक दिली ती माझ्या नावावर कोणताही सातबारा न ठेवता.या नलूला तर जाती धर्माचंही अस्तीत्व नाही.कोण्या मारत्यानं दाखल्यावर नाव दिलं तेवढंच.हे असले आम्ही आणखी काय गमावणार"सदा गदगद होऊन बोलू लागला.

पण नलू मॅडमचा एकेरी उल्लेख ऐकून दत्ता व नलूसही धक्का बसला.नलू दुखातही खुश होत सदाकडं पाहू लागली.केशव गुरुजीनंतर आज हक्कानं नलू म्हणणारं तिला आपलं माणुस दिसू लागलं.गुरुजीत तिला बाप भेटला होता तर सदात तिला.......

"दत्ता ,तू साथ दिलीस तर या विक्रांत, सलिच्या शाळेस नाही टाळं लावलं तर सांग!" सदा त्वेषानं फुत्कारत होता.

दत्ताला सदाची आग समजत होती, सलितानं दिलेला धोका समजत होता, पण पुढचा रस्ताच काय पण पाऊलवाटही दिसत नव्हती म्हणून त्याचं मन मानत नव्हतं.

"दत्ता ,आपण कुडाच्या झोपडीत जरी वर्ग भरवले तरी एका महिन्यात सलिच्या शाळेतली मुलं नाही वळवली तर सांगायचं."

"सद्या मुलं वळतील रे.पण वळलेली पोरं टिकवणं,त्यांना पुढं नेणं,त्यासाठी इतर शिक्षक....सारं सारं आलंच.नी त्यासाठी आपणाकडं काहीच नाही रे"

"जे नाही ते आणू,आणि जिथं दत्ता नी सदा एकत्र उभं राहतील तिथं सारं येईलच हळूहळू आपोआप" सदा पुढेच धावत होता.

"नलू मॅम !काय वाटतंय तुम्हास?" दत्तानं विचारलं.

"दत्ता सर मी काय सांगणार?पण हे मात्र निश्चित की गडचिरोली ला जाऊनही ते मला त्रास देणार नाही हे कसं सांगावं!"

"मग तुम्ही काय ठरवलंय?"दत्ता भितीनं विचारता झाला.

"तेच तर अवघड आहे सर!जावं तरी नोकरीची शाश्वती नाही नी राहिलं तर मुळीच नाही."

"मॅडम या सदासारखं तुम्ही बिनबुडाचा विचार करू नका.सर्व गमावून बसणार"दत्ता पोटतिडकीनं सांगू लागला.

"सर आयुष्यात इतकं गमवत आले ना ;आता गमवायला काही उरलंच नाही" नलू मॅम रिक्ततेने बोलू लागल्या.

  "तुम्ही दोघं मुर्ख आहात म्हणत दत्ता संताप करू लागला व नंतर रडत त्याच्यातच सामील झाला.

दत्तानं अमरावतीला जात एक तुकडी वाढवत नलूची तात्पुरती नियुक्ती तिथं करून तो सारा कारभार व्यवस्थीत सोपवत तीन महिने रजा टाकून आला.समजा सदानं ठरवलंय त्यात अपयश आलंच तर पर्याय म्हणून नलूची सोय दत्ता करून आला.अमरावतीची संस्था लवकरच अनुदानीत होणारच होती.

सदा व दत्ता साऱ्या थरवाडीत लोकांशी संपर्क साधत पटवू लागले.लोक तर त्यांना देवच मानायचे. अप्पाच्या शाळेपासून तीन किमीपेक्षा जास्त अंतराची बेडवाई पाड्याची जागा निवडण्यात आली.लोकांनीच तात्पुरत्या स्वरुपात कुडाचे छप्पर उभं करण्याचं आश्वासन दिलं.

 विक्रांत सलिताला हे कळताच त्यांनी रावसाहेब कदमांच्या व रेवती आईसाहेबांच्या कानावर घातलं.

 रावसाहेब कदम,रेवती विक्रांत व सलिता सारे थरवाडीत आले.गाडी दत्ता ,सदा व नलू बेडवाईपाड्यात शाळेची जागा साफ होत होती त्या ठिकाणी थांबले असतांना तिथंच येऊन थांबली.

कदम खाली उतरले.

"तू दत्ता ना रे! मला वाटतं तू अमरावतीला असायला हवं.इथं काय करतोयस?माणसाला सुखाचे दोन घास मिळतील अशाच ठिकाणी रहावं माणसानं व उद्योग ही तेच करावेत."

दत्ता शांत ऐकत होता.

"आणि काय गं तू कोण?सलिता हीच ती चव्हाण का?(सलिताकडं पृच्छा करत) तुझी गडचिरोलीची आर्डर काढलीय ना?मग?उद्याच्या उद्या तू तिथं हजर हो!अन्यथा गाठ माझ्याशी आहे! हे कदम आहेत,अप्पा विंचुर्णीकर नाहीत कर्मचाऱ्यांचे लाड पुरवायला" कदम आवाज चढवत बोलले.

 तो पावेतो रेवती व सलिता ही गाडीबाहेर आल्या.

"अहो बाबा ही मोठी मंडळी झालीत आता! शाळा काढणार आहेत ते!" विक्रांत समोर येत बोलला.

"रेवती! हा कोण गं?याला कुठं तरी पाहिलंय? हा! साखरपड्यात राडा करणारा हाच ना!काय रे कदम कोण आहेत माहित आहे ना पूर्वीपासुन? का मग पुन्हा पुन्हा आड येतोय? आमच्या आड येणाऱ्यांना रेल्वेही जवळ करत नाही!माहित नाही का तुला?रेवती समजव याला.शाळा काढतंय हे!"

रेल्वेचं नाव ऐकताच सदाच्या मुठी आवळल्या.श्वास वाढला ,रक्त तापू लागलं.त्याची नजर रेवतीबाईंवर व सलितावर रोखली गेली.

"अय काय पाहतोय? बाडबिस्तरा गुंडवून इथनं सटकायचं!कसली शाळा काढतोय इथं" विक्रांतनं सरळ सरळ धमकावलंच.

सदा चालत रावासमोर आला.

"काय 'कदम 'नाव सांगितलंय ना तुम्ही? हा तर मि. कदम मी कोण हे त्यांना विचारण्यापेक्षा या सलीताला विचारलं असतं तर तिनं तुम्हास माझी ओळख अचूक पटवली असती.कारण आम्ही दोघे उटीला पक्के चार दिवस सोबतच होतो रात्रंदिवस.का गं बरोबर ना! नाही सांगितलं असणार तू मी कोण ते ? निदान वरवरची तरी ओळख सांगितली असती ना!सांगते का मीच सांगू? चार दिवसातला सारा रंगपट?" सदा सलिताकडं पाहत विचारू लागला.

तोच विक्रांत संतापून चाल करत सदास मारण्यासाठी धावला.

सदानं त्याची गचांडी पकडत हातानं लांब ठेवत अल्लर पकडत सलिताकडं सहेतूक पाहत "विक्रांतराव का तुम्ही! तुम्ही तर आमच्या अनौरस पुत्राचे औरस बाप!तुमच्यावर कसा हात उचलणार मी.पण घरी जाऊन एक तसदी घ्या. तुमच्या मुलाचा चेहरा न्याहाळा.काय साम्य आढळतं ते निवांत पहा जरा."

हे ऐकताच राव कदम व रेवती च्या चेहऱ्यावरील ताठा क्षणात उतरला.विक्रांत तर हात झटकत सदाला पकडण्याचा प्रयत्न करत होता गपगार झाला व सलिताकडं पाहू लागला. 

"राव ! दुसऱ्यांच्या संस्थेच्या 'पाट्या' उतरवणार तर तुमच्या ही पाट्या कोणीतरी फोडणारच!आता हयातीभर सांभाळा फुटलेल्या पाट्या!.राहिला प्रश्न शाळेचा तर माझा बाप मरतांना सांगून गेलाय की पोरा गायकी सोडून बाकी कसलेही उद्योग कर!पण आता मी गायकी वरच लोकांचे उद्योग बंद करण्याचा रिकामा उद्योग मनोभावे करणार.नी यात कोणी आडवं आलंच तर असं आडवं करणार ." सदानं विक्रांतला सोडताच तो आडवा पडला.

सदा बोलत होता पण अनौरस-औरसच्या चक्रात अडकलेले राव , रेवती,विक्रांत व सलिता तेथून सैराट निघाले.सदाचा उतारा करायला आले नी आपल्याच इज्जतीचा पाण उतारा करवून घेत ते परतू लागले.

  सदा, नलू व दत्ताची आगेकूच शाळेच्या रूपानं सुरू झाली.


    क्रमश:


 भाग::-- आठवा


 अप्पा विंचुर्णीकरांच्या संस्थेस ते गेल्यानंतर रावसाहेब कदमांनी मंत्रालयात आपलं वजन वापरून अवघ्या दोन - अडिच वर्षात अनुदान आणलं.थरवाडीचे उरलेले युनिट व गडचिरोली ची संस्था शंभर टक्के अनुदानीत झाली. त्यांना वाटलं आता विक्रांत स्थीरस्थावर होईल.फक्त आपला दुसरा मुलगा विनयची घडी बसवावी लागेल.विनय दिल्लीला फिल्म मेकिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रशिक्षण घेऊन नुकताच परतला होता.

 सदा ,दत्तानं तात्पुरते कुडाचे वर्ग तयार करून पाच ते आठ वर्ग सुरू केले.सुरुवातीस नलू मॅम सदा व दत्ताच अध्यापन करू लागले.एका वर्षात बेडवाईपाडा, थरवाडी व इतर पाड्यातल्या मुलांचा ओघ वाढला.नंतर गावातलेच नुकतंच शिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना त्यांनी भरत दुसऱ्या वर्षी संपूर्ण पाच ते दहा वर्ग सुरू केले.अप्पा विंचुर्णीकरांच्या संस्थेतली बरीच मुले पटावरून कमी होत सदाच्या कुडाच्या शाळेत दाखल होऊ लागली.ही काही जादू नव्हती तर सदा-दत्ताचं त्या संस्थेतलं काम व नंतर त्यांनी एका वर्षात आपल्या शाळेत घेतलेली मेहनत आणि गावातले नविन भरलेले नव्या दमाचे शिक्षक-ज्यांना ही शाळा कुण्या परक्याची नसुन आपल्याच गावाची आहे या भावनेनं राबत होते ,ही कारणं होती.अनुदानीत शाळेत पट खालावला तर विना अनुदानित कुडाच्या शाळेत वर्गात बसायला जागा मिळेना.सदानं उन्हाळ्यात अन्वरच्या डिजेत भरपूर काम करत पैसा उभा करत शाळेत राबणाऱ्या नविन शिक्षकांना थोडा फार मेहनताना दिला.पण पैसा कमी पडू लागला.दत्ताच्या अमरावतीच्या संस्थेलाही अनुदान मिळाल्यानं त्याचा पगार व तिथलं सारं इतर अनुदान इथं वापरलं जाऊ लागलं.पण तरी संस्थेचा दिवसेंदिवस वाढणारा पसारा सांभाळणं सदा दत्ताला जड जाऊ लागलं.नलूनं परदेशातील केशव गुरुजींना व भावांना सारं सांगत मदतीची याचना केली.केशव गुरुजींच्या मुलांनी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ भरपूर मदत दिली.सदा दत्तानं त्या पैशातून ग्रंथालय व प्रयोगशाळा उभारली. शाळेमागील टेकड्यांना लागून असलेल्या मोकळ्या जागेत स्थानिक वाणांची लागवड करत बाग उभारली. त्यांची कुडाची शाळा बाळसं धरू लागली तशी सलिताची सर्व सोईंनी सुसज्ज असलेली शाळा विद्यार्थ्यांअभावी दम तोडू लागली.सलिता विक्रांतमध्ये खटके उडू लागले.रावसाहेबांनी दोघांना समजावत जसं आहे तसं चालू ठेवत प्रयत्न करा.ते काही दिवसात दम तोडतील.कारण एवढा डोलारा सांभाळण्यासाठी त्यांना पैसा हवाच.तो अनुदानाशिवाय शक्यच नाही.व अनुदान मिळणं त्यांना शक्यच नाही.मिळालं तरी मी मिळू देणार नाही.फक्त तुम्ही तग धरत शाळा सुरू ठेवा. तोच रेवतीनं रावसाहेबांना दम भरत "आपल्या विनयकडं पण पहा. की मरेपर्यंत विक्रांतलाच पुरवत राहणार?" सवती मच्छरानं धमकावलं.

नी कदमांनी विनयला बोलावलं.

 विनयला चित्रपट निर्मीती क्षेत्रात करिअर करायचं होतं.पण सुरुवातीलाच मोठा धोका पत्करण्यापेक्षा त्यानं छोट्या पडद्यावर एखादा शो निर्मिती करावं असं ठरवलं. त्यास लागणारा पैसा पुरवण्याची रावसाहेब कदमांनी हमी भरली.विनयनं मुंबईतल्या मित्राच्या साथीनं व कदमाच्या ओळखीनं सारी तयारी करत संगित शो ची निर्मिती सुरू केली.'सुर रत्न' म्हणून शो चं नामकरण झालं.तीन नामांकित संगीत दिग्दर्शकांना परिक्षक म्हणून नेमलं व शहरा शहरात ऑडीशन होऊ लागल्या.वीस ते पस्तीस वयोगटातील कोणत्याही गायकासाठी ही स्पर्धा खुली होती व प्रथम येणाऱ्या गायकास नामांकित प्राडक्शनच्या बॅनरखाली निर्मीत चित्रपटात गायनाची संधी मिळणार होती.

इंदौर, मुंबई, पुणे, दिल्ली कोलकाता,अशा ठिकाणी ऑडिशन्स होऊ लागल्या.

अन्वरकडनं ही बातमी सदापर्यंत आली.पण या शोचं दिग्दर्शक, निर्माण कोण करतंय याची त्याला सुतराम कल्पना नव्हती व तसल्या शोत गायन काय पण अन्वरच्या डिजेशिवाय त्यानं कुठंही गायन केलं नव्हतं.त्यानं सुरुवातीस त्यास सपशेल धुतकारलं.पण अन्वरनं त्यास विनवत "देख यारा तु क्या चिज है ये तुझे खुद को मालूम नही!अल्ला की तुझपर खिदमत है!तू ये शो मे अगर आ गया तो तेरी स्कुल की सब प्राॅब्लम छूट जायेगी!मेरी बात मान और पुना आॅडीशन देने को चल.मै तेरे पाव पडता."

सदाला स्पर्धा काय?जिंकलो तर काय?हे काहीच माहित नव्हतं पण शाळेची समस्या जर सुटत असेल तर काय हरकत आहे,म्हणून तो तयार झाला.

 सदा गायनाच्या मोठ्या मंचवर प्रथमच जात होता.त्यानं त्या शो ची माहिती मिळवली.परिक्षकाच्या नावाशिवाय त्याला ओळखीचं कुणी वाटेना.विनयनं निर्मीती केली होती तरी त्यानं नाव मुद्दाम मित्राचच टाकलं होतं.संगित शो आहे व समजा फ्लाॅप झाला तर पदार्पणातच बदनामी नको आपलं स्वप्न चित्रपट निर्मितीचं आहे.म्हणुन पाहू शो जर लोक प्रिय झाला तरच पुढच्या राऊंडनंतर आपलं नाव देऊ असा विचार त्यानं केला होता.

 सदा व अन्वर पुण्यास गेले.गर्दी पाहुनच सदा बावचळला.

”अन्वर!ये अपने बस का काम नही चल वापिस चलते है!"सदा अन्वरला विनवू लागला.

"सदा!मैने सिर्फ तेरीच आवाज नही सुनी बल्की चाचाजी की आवाज सुनते सुनते इस लाईन मे आया.मेरे यारा चाचाजी का दर्द तुझे दुनिया को दिखाना है!तुझे भिड से मतलब नही!"

वडिलांचा नामोल्लेख होताच सदात अंगार फुलला.'पोरा काही ही कर पण गायकी नको' काजरबिलाई रातीतलं बापाचं अखेरचं जीव तोडून सांगणं आठवलं .नी त्याला बापाच्या दिलाच्या गर्भकुडीतलं दु:खं दिसू लागलं. त्या धुंदीतच सदा रांगेत उभा राहिला.

गाण्यासाठी दिड मिनीट दिला होता.सदा गेला .'सानु एक पल चैन न आवे'ही कव्वाली त्यानं गायली.सारा सन्नाटा पसरला.दिड मिनीटात त्यानं परीक्षकांना जिंकलं. परीक्षकांनी थक्क होत त्याला सर्व फेऱ्यातून वगळत थेट टाॅप टेन मध्ये प्रवेश दिला.टाॅप टेन मध्ये असा प्रवेश करणारा तो एकटा होता.त्या ऑडीशनमधल्या त्याच्या गाण्याच्या बाईट्सला लाखो व्युवर्स मिळू लागले.दिग्दर्शकाने याचा फायदा उचलत शोचं टाईटल साॅंगच बदलवत सदाच्या गाण्याची थीम ठेवली.शो काही दिवसातच घराघरात पोहोचत टिआरपी वाढला.विनयला सदा कोण हे माहित नव्हतं पण ही बाब राव कदमानं, रेवतीनं टिव्हीवर पाहताच विनयच्या शो ची लोकप्रियता पाहून जल्लोष करावा की सदा.....

रेवतीला ते बाइट्स पाहून रामोजी दिसू लागला.

राव कदमांनी दिग्दर्शक व परीक्षकांना फोन करत काही कानगोष्टी केल्या.

 सदा दत्ताची हायस्कूल सुरूच होती.आता लवकरच त्यांनी ज्युनिअर काॅलेजचं युनीट सुरू करण्याचे बेत आखले. हा पसारा वाढवतोय खरं पण अनुदानाचं कसं होईल ही चिंता त्यांना सतावत होतीच.

 टाॅप टेन स्पर्धकाचे राऊंड सुरु झाले.अन्वर सदा सोबत मुद्दामच गेला नाही. दत्ताला नेणं म्हणजे शाळा ओस पाडणं म्हणून सदा एकटाच गेला.यानं अन्वर हिरमुसला.त्याचा कयास वेगळा होता.

दिग्दर्शकानं व वाहिनीनं शो ची जाहिरात करतांना राव कदमाचं काही एक न ऐकता सदाच्या गाण्यालाच केंद्रबिंदू ठेवलं.

 तीन फेऱ्या होत एकाची निवड होणार होती व त्या फायनल राऊंडला 'प्रितम झा' प्रसिद्ध दिग्दर्शक ,निर्माते प्रमुख म्हणून येणार होते व विजेत्या स्पर्धकास त्यांच्या आगामी चित्रपटात गायकाची संधी मिळणार होती.

 सदानं तीच कव्वाली म्हटली पण या वेळेस त्यानं दोन गायकाच्या वेगवेगळ्या आवाजात रिमीक्स व्हर्जन मध्ये गात धूम मचवली.पुन्हा पाच स्पर्धकात निवड होत तो पुढच्या फेरीत गेला.राव कदम संतापले.पण परीक्षकांनी दिग्दर्शक आणि वाहिनीकडं बोट दाखवत हात झटकले.दिग्दर्शकानं "कदमजी! शोचा टिआरपी त्या सदावर तर आहे.शिवाय त्या स्पर्धकाशी तुम्हास काय घेणंदेणं?तुम्हास तर गुंतवलेला पैसा मिळतोय ना?तरी शेवटच्या राउंडपर्यंत तो जाणारच.कारण त्याच्या गायनातला दर्द कोणाला पुढे जाऊच देणार नाही.तरी आम्ही हवं तर त्याला फायनल ला विजेता नाही होऊ देणार म्हणजे तो पावेतो आपला शो ही धंदा करेल व शेवटी त्याला ही रिकाम्या हाती परतवण्याचं तुमचं कामही होईल.

 पुढच्या राउंडच्या शुटींगच्या वेळेस राव कदमांनी मुद्दाम सलिता व विक्रांतला पाठवलं.सलिताला समोर पाहून तरी हा फ्लाॅप होईल. या राउंडला परीक्षक स्पर्धकांना गाणं देणार होते. सदाला 'चदरीया झिनी रे झिनी'हे गाणं आलं.

सदानं सलिताला समोर पाहताच ज्वालामुखीचा विस्फोट अनुभवला.ज्याची धग रामोजीस रेवतीबाईनं दिली होती तशीच जाणवत होती.

सदानं आपलं कसब दाखवत गाणं मेल फिमेल दोन्ही आवाजात असं काही उठवलं की ऐकणाऱ्यास दोन गायकच गात असावेत असाच भास होई.

पाचपैकी दोघात निवळ पुन्हा झालीच. शो प्रसारीत झाला त्या रातीत सदा अवघ्या देशात पोहोचला.बाॅलीवूड मधल्या नामांकिताच्या भुवया वक्रावल्या.

  फायनल च्या शुटींग ला मात्र अन्वरच्या मनाप्रमाणं दत्ता व नलू ही गेली.सदाच्या कुटुंबातले म्हणून त्याचीही मुलाखत झाली.निवेदकानं नलूकडं पाहत या कोण म्हणून विचारताच नलू घाबरली.सदा चुळबुळला.तोच भान राखत दत्तानं सदाची भावी जोडीदार अशी ओळख करून देताच नलू विष्मयानं दत्तकडं पाहू लागली.पण तो पावेतो सदानं तिचा हात हातात घेत साऱ्या प्रेक्षकांना कबुली दिली नी नलू ही सदात सामावली. कार्यक्रम पाहणाऱ्या सलितानं हाॅटेल रूममधला टिव्ही मात्र नाहकच फोडला.

 फायनलला दोन्ही स्पर्धकांना एक आपल्या आवडीचं व एक परीक्षकांनी सांगितलेलं गाणं म्हणायचं होतं.सदाचा स्ट्राॅंग झोन सॅड साॅंग्स आहे हे ओळखून व निर्माता राव कदमांच्या सांगण्यानुसार परीक्षकांनी मुद्दाम मेलडी गायला लावलं. नलू समोर असल्याचा फायदा सदास झाला.अन्वर अडाणी होता पण त्याला हे आधीच कळालं असावंम्हणून तो आला नव्हता. सदाचं गाणं ऐकून प्रमुख प्रितम झा त सदाच्या आवाजावर फिदाच झाले.पण फायनलला दुसऱ्याच स्पर्धकाची निवड झाली.सदाला खाली हात परतावं लागणार होतं.करारानुसार प्रितम झा च्या आगामी चित्रपटात एक गाण्याची संधी दुसऱ्या स्पर्धकास मिळणार होती.सलिता विक्रांत एकदम खुश झाले.सलिता तर कशी झिरवली या तोऱ्यातच पाहू लागली.पण...

पण...

शुटींग संपलं नी प्रितम झा नं सदाला जवळ बोलवत. हातात हात गच्च धरत आपल्या घरीच आॅफिसला नेलं.आपल्या सहायकास चालू चित्रपटात एक कव्वाली टाकावयाला लावली.गीतकारानं कव्वाली लिहीली.सदानं मेल फिमेल दोन्ही आवाजात गात नायक नायिकेवर फिल्मवलं गेलं हे सारं अवघ्या आठ दिवसात झालं.करारानुसारचा चित्रपटाला तर अवकाशच होता.चालू शोची क्रेझ तर अजुन उतरलीच नव्हती तोच सदाचा हा धमाका प्रेक्षकांनी असा उचलला की सदा अल्पावधीतच स्टार सिंगर झाला.शो च्या वाहिनीवाल्यांना व दिगदर्शकांना आता पश्चाताप वाटू लागला की आपण रावव कदमांच ऐकून नाहकच निकाल फिरवला.पण प्रितम झा अवलीया कलाकार होता,त्याला खररा कलाकार कसा ओळखावा. हे माहित होतं.त्यानंअचुक हिऱ्याची निवड करत कोंदणात बसवला. सदास पटापट चित्रपट मिळू लागले.रातोरात पैशाचा ओघ येऊ लागला.पण तरी तो आधी झा साहेबांच्या कामासच प्रायोरिटी देऊ लागला.

  सदा ,दत्ताची शाळा पक्की बांधली गेली व प्रितम झा च्या ओळखीनं अनुदानीतही झाली.सलिता ,विक्रमनं आपली शाळा दुसऱ्याकडं स्थलांतर केली. पण भट्टी जमलीच नाही.सदाच्या आवाजाच्या जादूनं पहिलाच हिट शो देणाऱ्या विनयचा आत्मविश्वास वाढला.त्यानं एकाचवेळी दोन चित्रपटाचं निर्माण सुरू केलं.चित्रपट पुर्ण होईपर्यंत राव कदमांनी आपले सर्व धंदे ,शेती विकली.पण चित्रपटाला पैसा काही पुरा होईना.सरतेशेवटी गडचिरोलीची संस्था ही विकली. सारं होतं नव्हतं विकून चित्रपट जेमतेम पूर्ण करत प्रदर्शित झाले.पहिला बाॅक्स आॅफिसवर एक आठवडा ही तग धरू शकला नाही.तीच गत दुसऱ्याची झाली.टाकलेला पैसा निघालाच नाही.राव कदम ,विनय, विक्रांत कफल्लक झाले. सलिताला 'आपण कोंदणातला हिरा हाती लागूनही गमावला याचं आयुष्यभर शल्य राहिलं. रामोजी व सदाला आठवत रेवती बाई पश्चातापानं कंठू लागल्या.

 सदाचं गायन सुरू राहिलं. संस्था त्यानं दत्ताकडं सोपवल्या. नलूनं आयुष्यात काहीच नसतांनाही सदारूपी कोंदणातला हिरा जपत भरपूर कमावलं........Rate this content
Log in

Similar marathi story from Drama