घावटी. १
घावटी. १
आभाळ दोन दिवसांपासून नुसतं घुरमट धरून बसलं होतं.सारी थरवाडी रित्या ढगात बुडाली होती.झाडाची पत्तीही हालत नव्हती.ऐन हिवाळ्यात अंगास घामोटा जाणवत होता.नलू मॅडमनं चेहऱ्यावर पाण्याचा सपका मारत आरशात पाहिलं.पण तिला रयाच वाटत नव्हती.दोन दिवसापासून सदा सर आलेच नव्हते.एवीतेवी हल्ली ते केव्हा येतील नी केव्हा जातील याचं टाईम टेबलच नव्हतं.नलूला आपण या माणसाची जीव तोडून वाट का पाहतो हेच कळत नव्हतं.आजही ती सकाळपासून चहावरच होती.स्वयंपाक करूनही दुरडीत पोळ्या तशाच होत्या.फक्त बाल्याला जेवू घालत ती सदा सर जेवले नसतील तर मग आपण कसं जेवायचं या विचारानं तशीच झोपली.बाल्याला सरांना शोधून आणावयास पिटाळलं होतंच.
बाल्यानं साऱ्या थरवाडीचे पाडे,अड्डे, नदी, नाले व कपारी धुंडाळल्या.एकेक भट्टी झामलत तो बेडवाई पाड्यात सरकला.थरवाडीपासुन डोंगर चढत-उतरत नदीतून चार पाच मैल चालत गेल्यावर हा पाडा लागे.नदीच्या पाण्यातून चालतांना दगडगोटे, खेकडे सांभाळत खोलगट भागातून चालतांना बाल्याला भिती वाटू लागली.शिवाय सर जर तिथं ही नसतील तर एकटं परतावं लागेल अंधारातून .म्हणून त्यानं पाच वाजायच्या आत धावत पळत बेडवाई पाडा गाठला.पाड्यात जिकडे तिकडे दारूच दारुचा महापूर.तो एकेक भट्टी झोपडी झामलू लागला.'आया','आया' करत हातवारे करत भेटेल त्याला विचारू लागला.बऱ्याच लोकांना तो मुका आहे व काय विचारतोय हे माहित असल्यानं बोट दाखवत पुढे पाठवू लागले.तसा त्याला सर येथेच आहेत यानं धीर येऊ लागला.दोन डोंगराच्या बेच्यात नदी जेथून उगम पावत होती त्या दाट झाडीत सिंगा सरदाराची भट्टी चालायची.तो तेथून सिमेपार मध्यप्रदेशात दारू पुरवायचा.त्याच्या नादाला पोलीस ही लागायचे नाही.दरारा व दहशतीनं या ठिकाणी कुणीच पाय ठेवायचा नाही.पण सदा सरांना व बाल्याला याची भिती नव्हती.सदा सरांना थरवाडी,बेडवाई व सिंगा सरदारा ही देव मानायचे. पण हा त्यांचा देव एक वर्षापासून पुरा दारूत वाहत होता.बाल्या पोहोचला तेव्हा आंब्याच्या दाट राईत सदा सर उताणे पडले होते. कपडे माती चिखलानं माखलेले.तोंडावर माशा भणभणत होत्या.दाढीच्या वाढलेल्या खुटात चिलटे भुणभुणत होते.आधीच आभाळानं घुरमट घातलेलं,त्यात पहाडात लवकर अंधार पडतो .म्हणुन लवकर परतण्या साठी बाल्या तडफड करत होता."आया, आया!"करत त्यांना उठवत होता.पण सदा सर टसमस होत नव्हते.बाल्याची घायकुत पाहून सिंगा सरदारानं बादलीभर पाणी सदा सरांच्या अंगावर ओतलं. सदा सर डोळे चोळत पाणी हातानं निथरवत उठले."आया, आया"करणाऱ्या बाल्याला पाहताच "अरे!बाल्या तू!"
तसं बाल्या हात धरत सरांना उठवू लागला.
"बाल्या झोपू दे रे!त्या थरवाडीत परतून काय करू!ती थरवाडी मला गिळायला उठते रे",सदा सर हात सोडवत त्याला झिडकारू लागले.
"मालक, तुम्ही इथं राहणार पण ते पोरगं एकटं कसं परतणार? अंधार पडतोय लवकर निघा"सिंगा सरदारा विनवणी करत बोलला.
सदा सर बाल्याला घेत झोकांड्या देत परतू लागले.तो पावेतो अंधारानं हातपाय पसरले होते.रस्त्यात चालणाऱ्या भट्टीवरनं सदा सरांनी सोबत बाटली घेतली.नदीतल्या पाण्यात चिबूक डिबूक आवाज करत दोघे थरवाडीकडं परतू लागले.झाडीतून किर्रर्रssss..आवाज येत होता.चालतांना सदा सर बाटलीतून घोट घोट उतरली तशी रिचवतच होते.आता आभाळातला घामोट्यात उतार होत थंडी वाढत होती.थरवाडी जवळ यायला त्यांना रात्रीचे आठ वाजले.पाड्या पाड्यात उंच सखल भागात लाईट टिमटिमायला लागले होते.थरवाडी येताच सदा सरांनी बाल्याला "मी आलो तू चल पुढे"सांगत बळजबरीनं काढलं. त्यांनी पुन्हा सरीच्या गुत्त्याची वाट वाकडी केली.आता त्यांचे पाय एकमेकात अडकत होते.सरळ रस्ता ओलांडून ते काॅलेजकडनं पुढे सरकणार तोच घुर्र्रर्रर्र ..आवाज व तीव्र प्रकाश शलाका त्यांच्या अंगावर आली.व कचकचाकच ब्रेक दाबत गाडी थांबली.सदा सरांचे हात गाडीच्या बोनटवरच टेकले गेले."सांभाळ रे बाबा! आधीच मेलेल्या माणसाला मारून तुला काय मिळणार?"
सदा सर बोलत अडखळत सरकणार तोच धुंदीतही
विक्रांत कदम व सली गाडीत बसलेली त्यांना ओझरती दिसली.सदा सराच्या डोळ्यातली धुंदी क्षणात डोक्यात सरकत नस तडकू लागली.
"सले कसं असतं तुला माहितीय का? साधी लोकं कोऱ्या पाठीवर रेघोट्या मारल्या की स्वत:ला तुर्ररम खान समजतात.पण आमच्या सारखे बिलंदरच खरे सिकंदर असतात. कारण आम्ही कोऱ्या पाटीवर रेघोट्या मारण्यासोबतच इतरांच्या पाट्या पुसुन टाकुन त्यावरही नवीन रेघोट्या मारतो.नी तसल्या पाट्या पुसतांना जी धूळ उडते ना ती हाता अंगावर उडाली की वेगळीच मजा येते.भले सामान्य बुद्धीचे लोक त्यास बदनामी म्हणत असतील.पण आम्हाला त्यात वेगळीच धुंदी,नशा येते.आमच्या बापानंही अशीच पाटी पुसली व आम्ही पण तशीच...."
सलिता मिश्कील हसली.
" विक्रांत मुकाट्यानं चल आता!याची तर पाटीच फुटलीय!"
गाडी निघून गेली पण सदा सरांनी भिरकावलेल्या दगडांनी खांब्यावरचा लाईट व आजुबाजूच्या झोपडीवरचे कौलं फुटू लागले. त्यांनी सरीच्या गुत्त्यावर बाटल्यावर बाटल्या रिचवल्या.
रात्री अकराच्या सुमारास सदा सर खोलीवर परतले.अडखळत जिना चढतांना पडले.त्या आवाजानं वाट पाहत असलेली नलू मॅडम उठली.दरवाजा उघडत ती जिन्याकडं धावली.पायरीत तोंडावर पडलेल्या सदा सराला उठवत एक हात खांद्यावर घेत आधार देत त्यांना त्याच्या खोलीत आणलं.खोली उघडून लाईट लावत पलंगावर टाकत ती अंगातले माती, चिखलानं भरलेले कपडे काढणार तोच तिच्या अंगावर भितीचा काटा उभा राहिला.या अवस्थेत कुणी पाहिलं तर? या विचारानं ती क्षणभर मागं सरकली.
"नलू मॅडम!साले लोक आमच्या पाट्या पुसतात हो!माझी तर माझी पण आमच्या खानदानाच्याही? हूं! ती तर माझ्या आईनंच....स्वत:हुन पुसायला दिली...!"
सदा सर रागानं बेभान होत रडायला लागले.मागं सरकून भिंतीला उभी असलेली नलू यानं बावरली.
"नले लोकांनी काय म्हणायला व तुझी इज्जत जायला तुझ्याजवळ ती होतीच केव्हा?तुच कमावली ती स्वत:च्या सच्छील वागणुकीनं.नी दिना गुरुजीच्या संस्कारानं!मग का उगाच भिते लोकांना? शिवाय तुझ्या मनात समर्पण आहे,पाप नाही"असा मनात विचार करत ती पुढे सरकली.सदा सराच्या अंगातला सदरा तिनं बाहेर काढला.तोंडाच्या दारुचा उग्र दर्प येत असुनही हात पाय तोंड धुतले.सदा सराचा तोल जात नलूच्या अंगावर ते ढासळत होते.सदा सरांचा राग निवळत त्याची जागा आता गहिवर घेत होता.नलूला पुरुषी अंगाचा मर्दानी गंध प्रथमच जाणवत होता.पण त्यावर सेवाभावानं क्षणात मात केली.सदा सरांना पलंगावर बसवत नलूनं खोलीतून जेवणाचं ताट करून आणलं व ती घास भरवू लागली.पण नशेत धुंद सदा सर जेवतच नव्हते .नलूही सकाळपासून चहावरच होती.कोणती अनामिक ओढ,कोणतं हे नातं असावं? की आपण इतकं गुरफटावं.सलिता मॅडमनं सदा सरांना दिलेल्या धोख्यामुळं सहानुभूती की सदा सरांची ओढ? नलूनं जबरीनं खाऊ घालत पाणी पाजत ताट उचललं.खोलीत येऊन दोन चार घास ढकलले.
आता सदा सर झोपेच्या अधीन होत होते पण बरळणं सुरुच होतं.नलूनं पुन्हा खोलीत परतत लाईट घालवत चादर अंगावर टाकू लागली.तोच तिचा हात पकडत "सले!का गं अशी दूर चाललीस!"सदा सर झोपेतच ...
नलू मॅडमाच्या सर्वांगावर शिरशिरी दाटली.सदा सर हात ओढतच होते.
नलूनं शांतपणे हात सोडवत चादर टाकत बाहेर पडत खोलीचं दार लोटलं.
खोलीत येताच नलू मॅडम शाबूत इभ्रतीनं रात्रभर तळमळत राहिल्या
सकाळी उठल्यावर उतरताच सदा सरांनी अंघोळ उरकवत कपडे चढवत बाहेर पडण्याची तयारी चालवली.तोच नलू मॅडमांना चाहूल लागली.त्यांनी उठत तोंडावर पाणी फिरवलं.कारण आता जर सदा सर निघून गेले तर पुन्हा एक दोन दिवस भेट होणार नाही.म्हणून त्यांनी गडबडीतच बाहेर येत खोलीतच सदा सरांना गाठलं.दारात नलू मॅडमांना पाहताच खाली मान घालत सदा सर कोपऱ्यातच थांबले.
"नलू मॅडम रात्री माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा.शुद्धीत नसल्यानं..."
"एरवी ही आपण कुठं शुद्धीत असता हल्ली सर! नी चूक घडली तरी या नलूला त्याचं काहीच सोयरसुतक वाटणार नाही."
"........." ,सदा सरांची मान आणखीनं खाली झुकली.
"दत्ता सावंत सरांचा परवापासून तीन- चार वेळा फोन येऊन गेलाय.आजीची तब्येत सिरीअस आहे.तुम्हास ताबडतोब बोलवलंय निसरणीला.आजीनं तुमचा घोस लावलाय.जीव अडकलाय तुमच्यात !"
आजीच्या तब्येतीपेक्षा ही दत्ता सावंताचं नाव ऐकताच सदा सरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
"मग सर निघताहेत ना आज निसरणीला?"
"निसरणीला!"जोरात उसासा टाकत सदा सरांनी तोंड कडवट गेलंय.
"आजी आहे तुमची!तुमच्या शिवाय त्या जिवाचं कोण आहे या जगात?जो जीव आमच्या सारख्या परक्याला क्षणात आपलं करतो,तुमची तर बातच न्यारी.निदान अशा जिवास मरतांना तरी शांती मिळावी.म्हणून तुम्ही आज जाणार अशी आशा धरते अन्यथा उद्या मीच निघते"म्हणत नलूचं ह्रदय दाटून आलं.
"तसं नाही पण मधा व माधवी आहे ना! शिवाय आजोबा ही!मग आणखी मी जाऊन काय करणार?"
"मरणाऱ्या माणसासाठी भेटणारा माणूस काहीच करत नाही सर.पण....,"
नलच्यानं पुढे बोलणंच होईना.
"मॅडम कळतं हो मला.पण ज्यांना ज्यांना मी जीव तोडून जीव लावला अशी माणसंच जिवावर उठली व निघून गेली.आजीच अशी एक आहे की निदान ती तरी जीव ओवाळतेय.पण ...पण माधवी....."
"अहो सर निदान जीव लावायला तुम्हास माणसं तरी आहेत.आमच्या नशिबी तर......"नलू आता रडायला लागली.
"सदा सर लक्षात ठेवा माणसं निघून गेली, कोणी आपल्या पाट्या हिसकावून पुसल्या व रेघोट्या मारल्या तरी जिवनात आपली गेलेली पाटी पुन्हा हिसकावण्याची धमक ठेवावी माणसानं.ते ही होत नसेल तर दुसरी कोरी पाटी घ्यावी.पण लिहीणं सोडायचं नसतं जिवात जिव असेपर्यंत" नलू जीव तोडून ह्रदय उकलत होती.
'पाटी' ऐकल्याबरोबर सदा सर संतापानं थरथरू लागले.
"संताप, राग आवरा व त्या माऊलीची सरती भेट घ्या" म्हणत नलू बाहेर पडली.स्नान उरकत ती शाळेला निघाली.
सदा सर बराच वेळ तंद्रीत बसुन राहिले.'दत्ता, आजी आठवून रडू लागला तर सली विक्रांत, माधवी यांच्या तिरस्कारानं लाल होऊ लागला.आणि आई....... आई आठवताच तर तो नागापेक्षाही त्वेषानं फुत्कार सोडू लागला.बाल्या उठला होता तो खोलीत आला.सदा सरांना पाहून तो घाबरून कोपऱ्यात शांत बसला.त्याला जवळ घेत "बाल्या !"
म्हणत सदा सर उठले.पण निसरणीला निघण्या ऐवजी भट्टीकडंच.मागोमाग येणाऱ्या बाल्याला परोपरीनं विनवत त्यांनी माघारी पाठवलं. अंगात मव्हडा भिणताच डोक्यातून पाटी घुमू लागली.धूळ उठू लागली.ही धूळ आपण पाच -सहा वर्षांचे होतो तेव्हापासून सारखी राळ उठवतेय नी आपण त्यात पुरतं झाकोळून माखलं जातोय.आजी आजोबा जीव तोडून ही धूळ साफ करतायेत.तोच पुन्हा सलीनं ही अशीच धूळ उठवण्याची संधी विक्रांतला दिली नी मग आपण पुरतं गारद झालो.आता आजी थकल्यानं दत्ता, नलू मॅडम धूळ साफ करताहेत पण आपण धूळ माखलेच.यानं मग एकादी बाटली मारून निसरणीला निघायचं ठरवूनही सदा सर उठलेच नाही.दुपार पर्यंत त्यांचा टांगा पलटी होऊन घोडे फरार झाले. सरीच्या गुत्त्याबाहेरच आडव्या पडलेल्या सदा सरांना शाळेतून परततांना नलू मॅडमनं पाहिलं नी तिच्या काळजात चर्र.. झालं.ती तशीच शाळेत परतली व आठ दिवसाची रजा भरुन दुपारून बाल्याची शेजारी व्यवस्था लावत निसरणीकडं निघाली.निघतांना तिनं दत्ता सरांना फोन करून सारं कळवलं.जिपनं तालुक्याला व तेथून एस.टी., रेल्वेनं नी मग पुन्हा एस. टी पकडत रात्री च्या दहाला ती निसरणीत उतरली.गाडीत ती पुन्हा पुन्हा स्वत:लाच विचारत होती-का आपण इतकी धावपळ करुन जातोय?ज्यानं यायला हवं तो तर नशेत तर्रर्र होऊन पडलाय.मग आपण त्याच्याच साठी जातोय की आजीसाठी?नाही तरी आपलं म्हणून या जगात आपलं कोण आहे?केशव गुरुजी?की सदा सर?की आजी?..
आजीनं काही नातं नसतांना जी माया दाखवली त्यासाठीच का? साऱ्या प्रश्नाच्या गाठींचा गुंता घेऊनच त्या पायऱ्या चढल्या.आजोबानं नलूस पाहताच " सदाची मोठमाय! बघ कोण आलं तुला भेटायला!" म्हणत उरातला हुंदका महत्प्रयासानं दाबला.आजीनं मोठ्या कष्टानं डोळे उघडत नलूचा हात हातात घेत मायेनं नलूला प्राशायला सुरुवात केली. मग लगेच खाणाखुणा करत माझं पोरकं लेकरू सदा कुठंय? म्हणून इकडं तिकडं अधाशा सारखी पाहू लागली.नलूची मान खाली जाताच ती नजर तशीच कोरडी माघारली.
"सदाची मोठमाय,असेल पोर कामात!येईल.पोरगी तरी आली ना!"बाबानं मोठ मन करत खोटा दिलासा दिला पण तेही काळजातून हबकलेच.
आजी उठवत नव्हतं तरी उठत नलूला बिलगत होती.जमलेल्या शेजाऱ्यांनी जेवन आणलं .नलू दोन दिवसांपासून चहा व रात्रीच्या दोन चार घासावरच होती.पण तरी तिची जेवणाची वासनाच नव्हती.पण शेजारणीनं आजोबा व नलुस जबरीनं आग्रह करवून जेवू घातलं. नलूनं परिस्थती पाहून लगेच दत्ता सरांनी सांगितल्यानुसार फोन करून कळवलं. दत्ता सरांनी आपली कार काढत रात्रीच थरेवाडीचा रस्ता पकडला.रात्री एकच्या सुमारास त्यांनी ओळखीच्या माणसांना उठवत "आताच्या आता माझ्या सदाला शोधा" म्हणून फर्मान सोडलं.दत्तासर, सदा सर साऱ्या थरेवाडीचेच देव.त्यांनी लगेच अंधारात थंडीत झोपड्या झामलायला सुरूवात केली.दत्ता सर ही अंधारात धडपडत उठत फिरतच होते.
नलू आजोबा रात्री दोन पर्यंत आजीच्या उशाशीच बसून होते.उत्तर रात्रीला सह्याद्री पर्वतातून निसरणीत थंडी उतरू लागली तसे आजीच्या ग्रहदशेला यम लागले.आजीची शुद्ध हरपायला लागली.नलूचा हात धरत "रेवती पोरी माझी गुणाची लेक शेवटी आलीच ना आईला भेटायला!"आजी बरळू लागली.आजोबा रेवतीचं नाव निघताच कडवट तोंडानं धाय मोकलू लागले.नलूला त्याही स्थीतीत आपण कशासाठी आलो याचं उत्तर सापडलं.आजीचं बरळणं सुरुच होतं.कधी रेवती तर कधी नलू.
."नलू पोरी माझ्या सदाला सांभाळ गं!" म्हणत आजी बरळू लागली व नंतर घशाला घरघर लागली.पहाटे शेजारी उठले.त्यांनी नाडी ,ठोके पाहत आजीला भुईला उतरवत माधवला फोन लावला.सदासाठी नलूचा फोन दत्ता सरांच्या फोनवर खणखणला नी तिकडं सदा सापडला.भल्या पहाटेच दत्ताला पाहताच सदाच्या मनाचा सागर उचंबळला पण तो पावेतो आहे त्या स्थितीत दत्तानं त्याला गाडीत टाकलं व गाडी निसरणीच्या वाटेला लावली.
क्रमश:
भाग::-- दुसरा
दुपारी एकच्या सुमारास दत्ता सरांची गाडी निसरणीला अंगणात उभी राहिली.सदा उतरताच आजोबा त्याला बिलगून गदागदा रडू लागले.सदानं मोठमायचं दर्शन घेतलं.आजीजवळ शेजाऱ्या शिवाय जवळचं असं कुणीच नव्हतं.नलू व आजोबा शिवाय.त्याला काल सकाळी नलू मॅडमचं बोलणं आठवलं नी डोळ्यात अश्रू तरळले.नलू मॅडमनं दत्ता व सदा सरांना बाजूला घेत "रेवती ...ताईसाहेबांना.......कळवावं लागेल!"
सदा सरांना आपल्या कानात कुणीतरी तप्त लाव्हा रस ओतल्याचं जाणवू लागलं.आजोबांना ऐकू जात नसलं तरी नलू व दत्ताकडं ते आशेने पाहत होता.निदान अंतिम दर्शनाला तरी रेवतीनं यावं अशी आंतरीक आतड्याची ओढ त्यांच्या आसुसलेल्या डोळ्यात जाणवत होती.दत्तानं नलूकडनं नंबर घेत फोन लावला.
"हॅलो!कोण ताईसाहेब?"
"नाही मी सलिता!आपण कोण?"
"........." दत्ताच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या .श्वास फुलू लागला.
.
.
"देते" बहुतेक दत्ता सरांचा आवाज सलितानं ओळखला असावा.
"हॅलो मी रेवती!कोण आपण?काय हवंय?"
"ताईसाहेब आपल्या मातोश्री.....मोठमाय....गेल्यात..."
"......."
"आपण या लवकर" दत्ता भरलेल्या गळ्यानं बोलला.
"राॅंग नंबर" नंतर संतापात फोन कट केल्याचं जाणवलं.तरी दत्तानं पुन्हा नंबर फिरवला.पण उपयोग झाला नाही.दत्ताच्या चेहऱ्यावरील नाराजी सदानं ओळखली.त्याच्या डोळ्यात आग उतरू लागली.तोच मधा व माधवी आली.माधवी आल्या आल्या अगदी तटस्थ परक्यासारखी केवळ उपचार म्हणून मोठमायच्या प्रेताजवळ दोन तीन मिनीटे उभी राहिली व दूर सरकली.यानं ही सदाच्या डोळ्यातली आग अधिकच फोफावली.तोच ..तोच सदाचा जिवलग मित्र अन्वर आपल्या 'अन्वर ब्रास बॅंडच्या' गाडीसह नाशिक हून आला.आल्या आल्या तो आजीजवळ जाऊन रडू लागला.व लगेच सदाच्या गळ्यात पडत रडू लागला.
कोण ही माणसं! दत्ता,नलू मॅडम, अन्वर ही दूरची माणसं तरी हे प्रेम!नी जिच्या पोटी जन्म घेतला ती?...., मधा, माधवी...?सदा बिथरला.दत्ता सोबत होता म्हणून त्यानं सकाळपासून थेंब ही घेतला नव्हता.त्यानं अन्वर मियाला बाजूला नेलं.
"अन्वर मिया ,मुझे पिनी है!"
"सदा मेरे यारा तु तो अल्ला का नेक बंदा था.फिर ये सैतानी क्यो?"
"अन्वर मिया आज बाकी कुछ नही "
म्हणत तो अन्वर मियाच्या खिशातून पैसे काढू लागला.
थरवाडीत त्याला पैशाची गरज भासतच नसे.
"मेरे यार तुझ पे तो मै पूरी कायनात, ये जान भी न्योछावर कर दुंगा.तो फिर पैसा क्या चिज है."
सदानं कल्टी मारत दोन बाटल्या गटागटा रिचवल्या.व येऊन बसला.आज अन्वरचा ब्राॅस बॅंड जीव ओतून वाजत होता.पाच वेळा नमाज पढणारा अन्वर मिया चक्क जगतगुरु तुकोबा रायाचे अभंग गात होता.
"याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||"
सदाला मात्र धुंदी येऊ लागली नी बेभान होत कधी हलगीच्या तालावर तर कधी अन्वरच्या बॅंडवर नाचत होता. सदाची नशेतील ही अवनती पाहून दत्ता ,अन्वर मिया व नलू मॅडमचा ऊर फाटत होता.दत्ता सदाला हातानं कवटाळत बाजुला नेण्याचा असफल प्रयत्न करत होता.
"सदा !ऐक ना प्लिज...." दत्ताच्या डोळ्यात आसवाची दाटी होती.
"दत्ता !...आज माझी माय ,मोठमाय गेली नी.......नी....येऊ शकत नाही?...छोड मला आज...."
अन्वर मियानं सदाला उचलत बाजूला नेलं.
नलूनं घरातून चुलीवरून गरम पाणी आणत आजीला अंघोळ घालण्याची तयारी चालवली.अन्वरनं सदाला आजीजवळ नेलं नी आरती सुरू करण्याची घाई झाली तरी माधवी जवळ ही येईना.मग नलूच सदाजवळ उभी राहिली नी आरती केली.डोक्यावर पदर घेतलेली नलू मॅडम जवळ उभी पाहून सदा नशेतही हेलावला.
आजी अनंतात विलीन झाली.संध्याकाळी आलेली सारी परत फिरली.पण दत्ता नलू सदाजवळच थांबली.अन्वर मियानं आजोबाच्या खिशात लागणाऱ्या खर्चासाठी नाही म्हणत असतांनाही पैसे घातले.दत्ता सरांनीही नकार दिला तरी "आज मै जो भी कुछ कमाता हू वो मेरे यारा सदा की मेहरबानी सेही" म्हणत अन्वर मिया नाशिकला परतला.माधवीला मधानं निदान दसव्यापर्यंत तरी रहा म्हणून विनवलं पण ती फणकाऱ्यातच वडिलांसोबत माघारी फिरली.
दहा दिवसात सदाला शांत करत दत्ता व नलूला कुठं बाहेर पडूच दिलं नाही.
दत्ता त्याला परोपरीनं समजावू लागला.
"दत्ता तू सोबत असला की......मला जगावसं वाटतं रे!"नी मग सदा रडू लागला.
"सद्या!काय होता तू!नी निव्वळ एका....नादात इतका वाया गेलास?भावा निदान आता आजोबाचा तरी विचार कर"
"दत्ता!जिवनात ज्यांच्याकडं मायेसाठी हपापून पाहीलं ,जीव लावला ,तेच का मला सोडून जातात?न कळत्या वयात........ते तर नाव ही नको.घिण येते मला त्या नावाची!नंतर ऐन तारुण्यात स्वत:ला किती जपत असतांनाही कुणी येतं नी मग आयुष्य उध्वस्त करत निघून जातं!त्यातही ज्याला ही दुनिया दैवत मानतं तेच दैवत मला उध्वस्त करण्यात पुढाकार घेतं म्हटल्यावर या जिवाला बाटलीच जवळची वाटते रे!"सदा ह्रदयाला घरं पडतील अशा रितीनं आकांतानं बोलत होता.
"सद्या पण बाटली जवळ करण्याआधी निदान एक वेळसही मला सांगावसं वाटलं नाही तुला?या नलू मॅडम!कोण लागतात आपल्या? घरची वेळेवर आली नाहीत पण त्या रक्ताच्या नात्यापमाणं आल्यात व आजीला मांडी दिली.एक दिड वर्षांपासून तुला सांभाळत आहेत . का?याचा तरी कधी विचार केला का?"
आता मात्र सदानं खाली मान घातली.तरी तिरकी नजर नलू मॅडमवर पहिल्यांदाच रोखली गेलीच.सदाला आरतीच्या वेळी गर्दीत डोक्यावर पदर घेतलेली नलू मॅडम दिसू लागली.
"सद्या या दुनियेची रीत आहे आयुष्यात माणसं येतात ,जातात.काही हुरहुर लावून जातात तर काही दगा देऊन.त्यांच्या विचारानं आपलं आयुष्य डावावर लावायचं नसतं तर आहेत त्यांना साथीला घेत डाव मांडायचा असतो" दत्ता पोटतिडकीनं सदाला समजावत होता.
"........." तरीही सदा निरूत्तर.
"आता यापुढे तुला आजोबाची व माझी शपथ आहे जर दारूच्या थेंबालाही स्पर्श केलास तर!" दत्ताच्यानं पुढं बोललंच गेलं नाही.
"दत्ता जाणारे गेले तरी काय वाटले नसतं रे!पण लहानपणीच जन्मदात्रीनं इज्जतीचा फालूदा करूनही हिकमतीनं इज्जत कमवली.स्वत:चं नाव कमावलं.तेच नाव तीच इज्जत पुन्हा त्यांनीच पणाला लावावी... " सदाला 'तुमची वर्तणूक सहकारी शिक्षीकांशी बदफैलीची असल्यानं नोकरीवरून....'आठवू लागलं नी सदा रडू लागला.
"मित्रा शिंतोडे उडवणारे कोण ?त्यांना किती महत्व द्यायचं याचा तरी विचार कर.अरे तसं असतं तर रात्रीच्या दिड वाजेला थरवाडीचे लोक उठत तुला शोधत फिरलेच नसते.त्याचा देव दारूत बुडाला तरी पहाडात कोणीच त्याच्या केसालाही धक्का लागू दिला नाही.हे तू विसरू नकोस"
सदानं या बाजूनं कधी विचारच केला नव्हता.
"आता एकच मी पण पुन्हा थरवाडीतच येतो.ती संस्था गेली जाऊ दे.त्याच्या उरावर दुसरी संस्था तिथंच काढू.नी त्या सलीला,त्या विक्रांत,.. नी ..नी...त्या ताईसाहेबांचाही हिशोब चुकता करू.फक्त सद्या तू मला साथ दे"
सदाच्या डोळ्यात आग उतरली.त्याचं ह्रदय लोहाराच्या भात्याप्रमाणं धडधडू लागलं.
"दत्ता तू असलास ना तर मग हा सदा मरणालाही चित्तं केल्याशिवाय हटणार नाही..."
दत्तानं आपल्या सापडलेल्या मूळ मित्राला करकचून मिठी मारली. कारण सदा काय आहे हे त्याला पुरतं माहित होतं.शिवाय सलेनं केवळ सदालाच नाही तर त्यालाही धोखा दिला होता व सलेशी लढणं एकट्या दत्तालाही शक्य नव्हतं.त्यासाठी सदाच हवा होता.
आजीचं कार्य आटोपताच आजोबाला सोबत नेण्यास मधानं सपशेल नकार दिला.हवं तर पैसे पाठवेन पण सांभाळणं शक्य नसल्याच बजावलं.
दत्ता परततांना सदाला "लवकरच थरवाडीत ये मग नंतर मी पण येतोच.मग पुढचं काय नी कसं करायचं ते ठरवू" सांगून निघाला. सदानं तूर्तास आजोबाजवळच रहायचं ठरवलं.पण इथं राहून आपला बदला कसा घेता येईल या विचारात असतांनाच नलू मॅडमांनी आजोबास थरवाडीतच नेण्याचं सुचवलं.
सकाळीच सदा सर ,नलूमॅडम व आजोबा निसरणीहून निघाले.निसरणी सोडतांना आजोबाच्या डोळ्यात सगुणा गेल्यानं गावपंढरीला सोडून जावं लागतंय म्हणुन पाणी तरारलं.सदालाही हुंदका आवरता आवरेना.
रेल्वेत नलूमॅडम आजोबा जवळ बसली तर सदा सर समोरच बाजूला. गाडीनं वेग पकडला तशी नलू मॅडम झोपू लागली.खिडकीतून येणाऱ्या हवेनं गालावर येणारी केसाची बट उडू लागली. तसा सदा ही आपल्या विचाराच्या तंद्रीत अडकला. असाच तो सहा वर्षांपूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर थरवाडीला निघाला होता.
गाडी जितक्या वेगानं पुढं जात होती तितक्याच वेगानं सदा सर भुतकाळात जाऊ लागले.
.
.
.
दत्तानं तालुक्याला रेंजमध्ये येऊन फोन करत दोन दिवसात थरवाडीला येण्याचं कळवलं.सोबत कसं यायचं व कुठुन काय मिळेल सारं बयाजवार सांगितलं.नुकतंच राहुरी विद्यापिठातनं शिक्षण करून घरीच बसलेल्या सदाला या निरोपानं आनंद झाला.आजी-आजोबा ,मधा यांच्या आनंदाला तर सिमाच उरली नाही.आजीला तर काय बांधु नी काय नाही असंच झालं.पण दत्तानं फक्त कपड्यानिशी बोलवलेलं. तरी त्या बिचारीन दोन दिवसात शक्य होईल ते ते बांधलं.
सदा सकाळी निघाला .नाशिकहून रेल्वे पकडली पण तिलाच मेघा ब्लाॅक लागल्यानं तालुक्यालाच सायंकाळ झाली.सदानं शोधत शोधत थरवाडी पर्यत नाही पण खालच्या पाड्यापर्यंत जाणारी जिप पकडत रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत खालचा पाडा गाठला.तालुक्यापासुनच मृगाचा पाऊस सुरू झालेला.पहाडात जीप नदी-नाले पार करत अंधारात जेमतेम पोहोचली.जीपमधून उतरल्यावर कळलं की तेथून थरवाडी पाच-सहा किमी उंचावर.रात्री जायला गाडीच नाही.फोन करायला थरवाडीत रेंजच नाही. जवळच्या बांबू व आट्टीच्या कुडाच्या झोपड्यात सदानं चौकशी केली तर रात्री पावसात अस्वलाचा धोका असल्यानं जाणं जोखमीचं असतं. इथं रात्र काढा सकाळी गाडी भेटेल कळालं. तरी सदा पायी निघायची तयारी करू लागला.पण त्या माणसानं बाज आणत मुक्कामच करायला लावला.बाहेर पाऊस पहाडीपण दाखवत होता.ढगांचं वाघरूगत डरकाळणं चालूच होतं.सदानं कशीबशी रात्र काढली.पहाटे केव्हातरी पाऊस थांबला होता.पण नाल्यांना चहाचा पूर आला होता.त्याच माणसानं अंघोळीची व्यवस्था करत नंतर कोरा चहा पाजला . सकाळी आठ नऊला जीप मिळाली.अंतर पूर्ण चढावाचं व घाटाचं.वळणावळणानं गाडी वर चढू लागली.तसं दाट झाडी न्हाऊन सुंदर दिसू लागली.आंबा, साग, बांबू, महू अंजन जिकडे तिकडे डोळे दिपवत होते.उशीरानं मोहोरणाऱ्या काही आंब्याच्या झाडाखाली कालच्या पावसानं आंब्या ,कैरीचा खच पडला होता.पिकल्या रायवळ आंब्यांचा घमघमाट अरबी फायावरही मात करत होता.अनेक यु टर्न घेत जीपनं थरवाडीत उतरवलं. समोरून आपल्याच वयाच्या रुबाबदार, सुंदर तरूणी जात होत्या.रूबाबावरून शिक्षीत वाटल्यानं सदानं त्यांनाच दत्ताचा पत्ता विचारला.दत्ताचं नाव ऐकताच एकीच्या कपाळावर आठ्या पडल्या ज्या सदाला दिसल्याच नाही.त्या तरुणीनं सरळ उत्तरेकडं बोट दाखवत "दत्ता सरजीचा पत्ता हवाय आपणास.पण थरवाडी दोन असून ही छोटी आहे व मोठी थरवाडी तिकडं असून त्या वाडीतच दत्ता सर राहतात"खाली उतरणारी वाट दाखविली.
दत्तानं असं काहीच का सांगितलं नाही असा विचार करत सामान घेत सदा निघू लागला तोच सोबतीची दुसरी तरुणी काही तरी सांगणार होती पण आधीच्या तरुणीला तिला बोलू न देता सदाला पुढे होऊन रस्ता दर्शवला.
सदा चार पाच किमी उत्तरेला उतरत राहिला.तेव्हा थरवाडी लागली.एक माणूस दिसताच दत्ता सर कुठं राहता ?सदानं कपाळाचा घाम पुसत उसासा टाकत विचारलं.
"साहेब दत्ता सर गावात राहतात!हा थरवाडीचा पाडा आहे.तु्म्ही इकडे चुकुन आला वाटतं!"
सदा मटकन खाली बसला.आपला त्या तरुणींनं पोपट केलाय.तरीच ती दुसरी तरूणी काही तरी सांगत होती पण आपल्या लक्षात आलंच नाही .
सदा हाशहूश करत अडिच तीन तासाचा चक्कर खात पुन्हा चढत थरवाडीत परतला.एका माणसानं बारा -साडेबाराला सदाला दत्ता सराच्या रूमवर नेलं.पण सर काॅलेजातच असतील म्हणून पुन्हा काॅलेजकडं नेलं.
सदानं काॅलेजच्या गेटमध्ये प्रवेश केला.बोर्डवर 'अप्पासाहेब विंचुर्णीकर माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय'ठळक अक्षरात लिहीलं होतं.प्रशस्त मैदान लाॅननं सजलेलं, बाजूनं पहाडी झाडं कलात्मकतेनं नविनच लावलेली.दुमजली वास्तू दगड चुन्यात बांधून अस्सलपणा जोपासलेला. हाॅलमध्ये मिटींग सुरू होती.शिपायानं सरांना निरोप दिला.उलट्या पावलानं शिपाई आला.व सदाला मिटींग हाॅल मध्येच घेऊन जात मागच्या बेंचवर बसवलं समोर
सलवार कुर्त्यात पांढरी चंदू टोपी घातलेली व्यक्ती संबोधीत करत होते.दत्ता ही त्यांच्या शेजारी बसलेला.दत्तानं नजरेनं इशारा करत सदाला मागे बसायला लावलं.सदाची छाती धडधडू लागली.कदाचीत बसलेले सर्व शिक्षक असावेत.तोच सदाची नजर बाजूला पुढच्या दिशेस गेली तर मघा ज्यांनी सदाचा पद्धतशीर पोपट बनवला त्याच तरुणी बसलेल्या.ज्या तरूणीनं भलताच मार्ग दाखवला ती कोपरानं ढुसणी देत सोबतीच्या तरुणीला सदाकडं निर्देश करत पहायला लावत हसत होती.
त्याच्या चुळबुळीनं विचलीत होत संबोधीत करणाऱ्या माणसानं त्यांना ठोकलंच.
"सलिता तुला काही मांडायचं आहे का?"
"नाही अप्पासाहेब"
"मग चुळबुळ काय सुरुय तुझी?"
"तसं काही नाही अप्पासाहेब!"
संबोधीत करणाऱ्या व्यक्तीनं मग आटोपतं घेतलं.
तोच दत्ता उठला.
"अप्पासाहेब ज्युनीअरच्या सायंसच्या जागेसाठी मघा मी आपणाशी विषय काढला होता.ते सदा शिंदे आलेत" .दत्तानं सदास इशारा करत उठवलं.
"अच्छा!तुम्हीच का?ठिक आहे.यायला काही त्रास झाला का थरवाडीत?"
"नाही सरजी.उलट इथल्या लोकांनी सहकार्यच केलं"पण हे सांगतांना सदानं त्या तरूणीकडं नजर फेकताच त्या तरुणीची छातीची धडधड वाढली असावी.
"उद्यापासून या .काहीच हरकत नाही.दत्तानं आणलंय म्हणजे बाकी काही विषयच नाही.तुमची रहायची मोफत सोय होईल.शिवाय मोबदला ही मिळेल.फक्त जीव तोडून मेहनत दाखवा.बाकी काही नाही."
सदानं रूकार भरत नमस्कार केला.मग त्यांनी दत्ता व सलिता थांबतील बाकीच्यांनी जायला हरकत नाही सांगत मिटींग संपवली.
नंतर सदा दत्ताच्याच रुमवर राहू लागला.हळूहळू त्याला काॅलेजचा परिचय होऊ लागला.
अप्पासाहेब विंचुर्णीकर हे मूळचे औरंगाबाद चे.औरंगाबाद जिल्ह्यात त्यांची फर्टिलायझर व सीड्स व पेस्टीसाइड ची डिलरशीप.त्यात त्यांनी गडगंज संपत्ती कमावली.पण मुलबाळ नसल्यानं आपलं नाव चालावं म्हणून त्यांनी सारा पैसा ओतून सातपुड्यातील आदिवासी च्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आपल्या नावाच्या तीन संस्था नंदुरबार, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यात काढल्या.सारं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं.दत्ता हा त्यांचा चुलत भाचा.त्याची नेमणूक त्यांनी थरवाडीत केली.पण घरचा मामला बिथरला.त्यांच्या मावस साडुची मुलगी सलिता हिलाही थरवाडीतच हवं होतं कारण अप्पा आता थकत चालले होते.व पुढे ह्या संस्था आपसुक आपल्याच ताब्यात येतील ही सुप्त महत्त्वाकांक्षा दत्ताच्या नाही पण सलितात होती.दत्ता मात्र ही संस्था आपण उभी करतोय व त्यात ही सलिता लुळबुळ करत अतिक्रमण करतेय असं वाटे.म्हणून काहीना काही कारणाने दोघात सतत कुरबुरी होत व त्या अप्पाकडे जात.
आपणाला चुकीचा रस्ता का दाखवला गेला हे सदाला लक्षात आलं.मिटींग नंतर ही अप्पांनी म्हणूनच दत्ता व सलिताला थांबवत समज घातली.कारण त्यांना दत्ता व सलिता दोन्ही सारखेच.यांच्या शिवाय दुसरं जवळंच असं कुणीच नव्हतं.त्यांनी कुरबुरी नको व संस्थेत राजकारण ही नको म्हणून एकानं हायस्कूल सांभाळावी व एकानं ज्युनीअर काॅलेज व प्राथमिक शाळा सांभाळावी अशी विभागणी केली.त्यात सलितानं हायस्कुल न
िवडलं.पण अप्पा धूर्त होते.एकमेकांच्या नाड्या बरोबर दोघांच्याही हातात दिल्या.कारण प्राथ. विभाग चांगला तर हायस्कूल चांगली.व हायस्कूल चांगली तर काॅलेज .म्हणजे दोघांना आपलं काम दाखवणं आलंच.
असं काही होईल याची भणक आधीच दत्ताला होतीच म्हणून त्यानं आपला माणूस म्हणून सदाला बोलवलं होतं.
दत्तानं सलिताला शह देण्यासाठी तिचीच मैत्रीण असलेली नलू मॅडमला प्राथमिक विभागाचा चार्ज देत सलितावर मात दिली.
ज्युनि.च्या विज्ञानाची जबाबदारी सदावर आली व येथूनच सदा व दत्ताची कामगिरी बहरू लागली व एका संघर्षलढ्याची ठिणगी पडली.ज्यात सदा होरपळला गेला....
क्रमश:
भाग::-- तिसरा
सदाला अध्यापन क्षेत्रात पदार्पण करतांना सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, भरपूर स्ट्रेन्थ, संपन्न वातावरण, मोठा शिक्षकवृंद या सर्व बाबी मिळाल्या.सोबत जोडीला जिवाभावाचा मित्र दत्ता होताच पण त्यात सर्वात मोठी आव्हानेही होती.ती म्हणजे संस्थेतील काटशहाचं राजकारण, गुणवत्तेचा अभाव.
दत्ता व सलिता हे अप्पांचे निकटवर्तीय असल्याने व अप्पांचं वय थकल्याने याच्याच ताब्यात संस्था.पण दोघात वर्चस्वावरुन वैर.तसं पाहता दत्तानं रक्ताचं पाणी करून संस्था उभारली.मात्र सलिता आयतीच येऊन 'कानामागून आली नी तिखट झाली'या प्रमाणं वरटांग करत होती हेच दत्ताला सलत होतं.
सदानं दोघांच्या राजकारणापासून दूर राहत कामास प्राधान्य देत कठोर मेहनत करण्यास सुरुवात केली.चार पाच महिन्यातच तो विद्यार्थ्यात व इतर शिक्षकातही आवडता झाला.पण सलिता त्याला दत्ताचा मित्र म्हणून मुद्दाम डिवचत असे.
सलितानं मावशीला मध्यस्थी करत सर्व संस्थेचे आर्थिक व्यवहार आपल्याकडं मिळवले.म्हणून ज्युनिअर कॉलेज व प्राथ.ताब्यात असुनही दत्ताला अडचणी येऊ लागल्या.त्याचा त्रास नलू मॅडमांनाही होऊ लागला. सलिता नलू,सदा व दत्ता यांना सतत काहीना काही कारणानं सर्वासमोर डिवचत असे. पण सदात वेगळंच पाणी आहे हे तिने ओळखलं.
सदा व दत्तानं पोरांची तयारी प्राथ. व माध्य.स्तरावरच पक्की व्हावी म्हणून यावर काय काम करता येईल याचा प्लॅन आखला.पण त्यांना हायस्कूल मध्ये हस्तक्षेप करता येईना म्हणून त्यांनी पोराना येता जाता,उठता-बसता अभ्यासक्रम दिसावा म्हणून घर,गल्ली ,गाव रंगवायचं ठरवलं.त्याच्या नशिबाने नुकतच घरकुलाचं काम पुर्ण होऊन निम्याच्या वर गाव झोपड्या जाऊन पक्की घरकुलं बांधली गेली होती.मग त्यांनी नलू मॅडम व काही शिक्षकांना मदतीला घेत शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हे काम करण्याचं ठरवलं.पण पैशासाठी सलितानं स्पष्ट नकार दिला.दत्ता अप्पाकडे गेले पण तो पावेतो मावशीमार्फत अप्पांचे कान भरले गेल्याने अप्पांनी ही वाटाण्याच्या अक्षता लावल्यात.सदा व दत्ताला कुठल्याही स्थितीत काम करायचंच होतं.मार्च महिना असल्यानं लग्न सिजन सुरू होता.सदाला अन्वर मियाची आठवण आली.त्यांनी नाशिकला येत अगदी जवळच्या चार-पाच तारखा घ्यायला लावल्या.मध्यंतरी सदा चार-पाच वेळा नाशिकला जाऊन आला.अन्वर मियानं आपल्या हिश्शाचे पैशे ही सदाकडंच दिले .पैशाचा प्रश्न सुटताच सदा व दत्ता कामाला लागले. लोकांनाही मदतीला घेतलं.घराच्या भिंतींना भराभर कलर मारला जाऊ लागला.सदा सर, दत्ता सर, ड्राईंगचे साठे,निकम सर भराभर विषयवार अभ्यासक्रम भिंतीवर,झाडाच्या खोडावर उतरवू लागले.जेथे जागा मिळेल तेथे अभ्यासक्रम उतरवला.सारं गाव रंगीत दिसू लागलं.येता जाता मुलं , पालक वाचू लागले.जे अडू लागलं त्याची चर्चा होऊ लागली.या कामाची दखल वृत्तपत्रांनी घेतली.सदा सर, दत्ता सरांचं नाव झालं.पुढच्या चार पाच महिन्यात मुलांमध्ये यांचे परिणाम झिरपायला लागले.मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढू लागली.सलिता मात्र यानं दुखावली गेली.सदा सर,दत्तासर,नलू मॅडम अधिक जोमानं कामाला लागले.
विज्ञान प्रदर्शन आलं. सदा सर व दत्ता सरांनी उपकरण बनवायला सुरुवात केली.पण सदा सरांच्या मनात वेगळंच होतं.त्यांनी प्राथमिक व माध्यमिक गटात एकाच विषयावर वेगवेगळं उपकरण बनवायचं ठरवलं.त्यांनी प्राथ. गटात पदार्थाच्या तीन अवस्था ,त्यांच्या अवस्थांतरणात उष्णतेचा रोल व मानवी जिवन यावर उपकरण बनवायचं तर माध्यमिक गटात पदार्थांच्या पाच अवस्था, त्यांचे अवस्थांतरणात उष्णतेचा रोल व मानवी जीवन यावर उपकरण बनवलं.एकच विषय पण काठिण्य पातळीत फरक.पण पुन्हा प्रश्न तोच आला.हायस्कुलनं वेगळंच उपकरण बनवलं.यावेळेस सदानं स्वत:हून सलिता मॅडमची भेट घेतली.
"मॅडम उपकरण बनवलंय फक्त विद्यार्थी द्या"
"काय नाव तुमचं?सदा शिंदे ना?सध्या आपली खूप फडफड चाललीय.चांगलं आहे उडण्याची उर्मी असली की पंख फडफडावे लागतातच .पण मि. शिंदे!नविन माणसांनी मोठ्यांच्या भानगडीत पडायचं नसतं.तुम्ही उपकरण तयार करू शकतात नी आमच्या हाताला काय काकणं बांधली आहेत"
"मॅम तसं नाही नाव तुमचंच राहिल फक्त संस्थेत एकसुत्रता नी दोन्ही गटात एकाच विषयावर उपकरण म्हणून.."
"मि.शिंदे नावासाठी तुमची मदत घेण्या इतपत नादार वाटलो का आम्ही तुम्हास?,चालते व्हा"सलिताचा स्वर चढला.
"तसं नाही मॅम. पण राज्यावर राष्ट्रीय पातळीवर मोठी चुरस असते म्हणुन विषय व उपकरण ही त्या तोडीचं असावं व संस्थेसाठीच विनंती होती.."
"मि. शिंदे तालुक्याचा जिल्ह्याचा विचार करा आधी.कुठं राष्ट्रीय पातळीच्या भराऱ्या मारता आहेत"डिवचत सलिता उद्गारली.
"नाही मॅम हे उपकरण घेतलं तर निवड तर होईलच"ठाम निर्धारानं डोळ्यात लाली उतरवत सदा म्हणाला.
"आणि नाही झाली निवड तर?"सलिताचा स्वरही अधिक चढला.
"मी ही संस्थाच काय पण अध्यापणाचं हे क्षेत्रच सोडेल" थरथरत्या सर्वांगानं सदा उद्गारला.
"तसं असेल तर मग तुमचं चॅलेंज स्विकारण्यासाठी दिलीत मुलं तुम्हास.हवे ते विद्यार्थी घ्या नी तालुकास्तरीय नंतर शब्दाला जागून घाशा गुंडाळा तुमचा".
सदा निघाला.हायस्कुलातून इतर शिक्षकांच्या मदतीनं आठ दहा हजरजबाबी ,हुशार मुलं निवडली.
आठ दहा दिवस त्यांची तयारी करवून दोन मुलं निवडली.उच्च गटात ज्युनीअरची मुलं होतीच.
दत्ता व सदाला जवळ पाहताच सलितानं क्लर्कला सांगत तोफ डागली.
"मि. माने जाहीरात तयार करा ज्युनिअर सेक्शनला एक जागा लवकरच रिक्त होतेय नविन कॅन्डीडेट भरायचाय".
सदाला समजलं पण दत्ताला समजलं नाही.पण ज्यावेळेस समजलं त्या वेळेस त्यानं सदाला बोलवत"सद्या फसलास ना तिच्या डिवचण्यावर?मर आता!"संतापातच तो उद्वेगानं म्हणाला.
"दत्ता पाहूया!त्या शिवाय पर्यायच नव्हता.ही तेढ, काटशहाचं राजकारण संपवण्यासाठी.नी गेली तर गेली नोकरी.वयाच्या दहाव्या वर्षापासून संघर्ष करून पोट भरतोच आहे ना मग पुढे भरणार नाही का?"
या बोलण्यानं व सदानं एखादी गोष्ट ठरवली तर तो कोणत्याही स्थितीच करतोच यावर दत्ताचा पक्का भरोसा असल्यानं दत्ता शांत झाला.पण दोन्ही गटातून राष्ट्रीय पातळी गाठणं स्वप्नच आहे ही वास्तविकता दत्ताची झोप उडवून गेली.
तालुकास्तरीय, जिल्हास्तरावर दोन्ही गटात 'अप्पासाहेब विंचुर्णीकर'संस्थेनं प्रथमच प्रथम क्रमांक पटकावला.सलिताला आश्चर्य वाटलं.दत्ता व सदाची जोड केव्हा फुटेल याची वाट पाहायला तिला मजा वाटू लागली.विभागावर निभाव लागणारच नाही याची तिला खात्री होती.
आता स्पर्धेत चुरस वाढेल.एरवी जिल्ह्यात क्रमांक आला असता तर कोण आनंद झाला असता पण क्रमांक येऊनही पुढच्या चिंतेंनं दत्ता बावचळला.सदानं मात्र शांतता ठेवत मुलांची कोण काय विचारू शकतो व त्यांना नेमकी चपखल उत्तरं कशी द्यायची याची रात्रंदिवस तयारी करवून घेतली.
विभागावरही निवड होताच दत्तानं सदाला उचलत गच्च मिठी मारली.दोन्ही उपकरण पुढच्या स्तरावर सरळ जात राहिली.मध्यंतरी अप्पांनी दोघांचा विद्यार्थ्यांसहित मोठा सत्कार करत आर्थिक मदत देण्याच्या सुचना सलिताला केल्या.सलितानं वेगळचं आखलं होतं नी घडत वेगळंच होतं.तरी राज्यावर डावललं गेलं तरी सदा जाईल ही आशा होतीच. सदानं आता राहुरी विद्यापीठ, मुंबई विज्ञान केंद्रास भेट देऊन पदार्थांच्या अवस्थांबाबत विविध रिसर्च व थेसीसचा अभ्यास केला व विद्यार्थ्यांची तयारी करत राज्यावर उपकरण नेलं.राज्यावर माध्यमिक गटाचं उपकरण सलिताच्या (मार्गदर्शन)नावारच असल्यानं ती ही ऐनवेळी उपस्थित राहिली.तिला निवड न झाल्यावर सदा व दत्ताचा चेहरा पहायचा होता.
तिन दिवसात उपकरणास चांगला प्रतिसाद मिळाला पण परिक्षकांवर सारं काही होतं.परिक्षण झालं.सदानं निवड झाली नाहीच तर मुंबईहूनच परस्पर नाशिकला अन्वर मियाकडच परतायचं ठरवलं होतं.कारण दिलेल्या शब्दानुसार थरवाडीत परतणं शक्यच नव्हतं.सदा व दत्ता एकमेकाकडं पाहण्याचं टाळू लागले.निकालाच्या वेळी सदा मुद्दाम मागेच बसला.दत्ताला विद्यार्थ्यांसोबत पुढे बसवलं.
निकाल लागला उच्चगटात प्रथम व प्राथ. गटात द्वितीय क्रमांक येताच सदाच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. त्याला हरणाऱ्या आपल्या बापाचा चेहरा पुन्हा पुन्हा दिसू लागला. एकांतात हताश रडणाऱ्या बापाचा चेहरा दिसला की मग तो अधिकच पेटे नी मग काही तरी अचाट बोलून जाई.त्या दिवशीही सलिता बोलली होती तेव्हा तेच घडलं होतं. त्याला हाॅलमधलं काहीच दिसेना.विद्यार्थ्यांनी सदाला बिलगत मिठी मारली.दत्ता तर रडतच गर्दीतच सदावर खेकसला "सद्या मुर्ख लेका यापुढे केव्हाही काही ठरवतांना आधी या दत्त्याला निदान एक वेळा तरी आठव!माझी शपथ आहे.जीव टांगणीला लावून मला ही मारतोस."
सदानं त्याला गच्च छातीशी आवळत "दत्ता माझ्यावर भरोसा नाही का?"
"एक वेळा स्वत:वर भरोसा नाही पण तुझ्या कर्तृत्वावर त्यापेक्षा ही जास्त!म्हणूनच लोकांच्या नजरा तुला लागू नयेत म्हणून जीव तुटतो रे!"सलिताला जवळ येतांना पाहताच दत्ता बोलला.पण त्या आधीच सलिताच्या नजरेत सदा भरल्यानं तिची नजर तर लागणारच होती.
”मि. शिंदे सर हार्दिक अभिनंदन"
सलितानं हातात हात घेत शुभेच्छा दिल्या.
गरमीतही त्या थंड स्पर्शानं सदा शहारला.त्यानं हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत "मॅम आपणासही शुभेच्छा!"म्हणत प्रथमच नजरेत नजर मिळवली.
सलितानं हातानं हात दाबत हात सोडला.
राष्ट्रीय पातळीचं प्रदर्शन उटीत होणार होतं.पण आता सदाला ,दत्ताला मुळीच फिकीर नव्हती.कारण या पातळीवर निवड होवो अथवा न होवो सदाच्या नोकरीवर परिणाम होणार नव्हता.सदालाही आता जाणवू लागलं आपण भावनेच्या भरात किती मोठा धोका पतकरला होता.पण पदार्थाच्या अवस्था मांडतांना त्यानं प्लाझमा व बोस-आईनस्टाईन कन्डेनसेट अवस्था बाबत जी माहिती प्रस्तुत केली होती त्याबाबत आजपावेतो बरीच अनभिज्ञता होती.
सलिता बक्षिस समारंभात मोठमोठ्या मान्यवरांनी सदाचं केलेलं अभिनंदन व कौतुक यानं भारली.शिवाय राज्यातल्या दैनिकात त्याचं होणारं नाव यानं तिचं मन सदाकडं कसं झुकू लागलं ते तिलाही कळेना.आता सदाला नाही काढता आलं पण यालाच साथीला घेत दत्ताला आपल्या मार्गातून काढायचं.
दत्ताला तीन महिन्यासाठी अमरावतीच्या संस्थेत जाण्याचा अप्पासाहेबांचा निरोप ऐन उटीला जायच्या वेळीच आल्यानं तिथं जावं लागलं.सदाला सोबत कुणाला न्यावं हा मोठा पेच पडला.उपकरणासाठी तर कुणाची तरी मदत हवीच.पण कुणालाही घेतलं तरी दत्ता किंवा सलिता मॅम नाराज होईलच.दत्तानं नलू मॅडमचं नाव सुचवलं.पण सदास वस्तू उचलणं पटकणं यासाठी जेन्ट शिक्षक हवा होता.त्यातच सलिताचं त्याला बोलावणं आलं.
"या शिंदे सर! बसा!"
सदा बसायला संकोच करू लागला.ते पाहून "अहो तुम्ही आता मोठ्या हस्ती झाल्यात निसंकोच बसा" सलितानं गाॅगल्सच्या कोपऱ्यातून निरखतच म्हटलं.
"काय ठरवलं उटीला जायचं"
"तेच कोण येणार सोबतीला काहीच कळत नाही"सदा सरळतेने म्हणाला.
"त्यात काय एवढं.नलू मॅडम व श्री. ठाकूर सर व एक शिपाई जातील विद्यार्थी व साहित्य घेऊन रेल्वेने .नी मग माझ्या गाडीनं आपण सोबत निघू" , सलिता वेध घेत बोलली.
"क्काय आपण?येणार आधी?" विस्मयानं सदा उद्गारला.
"का मला नाही न्यायचं का सोबत?"
"नाही मॅम मला तसं नव्हतं म्हणायचं"
"मग काय म्हणायचं होतं?"
"मला आपलंच मार्गदर्शन असल्यानं आपण ही येऊ शकता हे कळलंच नाही!"
"नाही तरी आपणास बऱ्याच गोष्टी कुठं कळतात!"सलितानं फासा टाकून वाघरू कितपत अडकतंय याचा अदमास काळ्या गाॅगल्समधून घेऊ घेतला.
सदानं मात्र काही तरी वेगळच घडतंय म्हणून बापाचा हताश चेहरा आठवत चेहऱ्यावर वेगळाच ताठर भाव आणत "आपण ठरवाल तसं!पण तरी नलू मॅम आपल्या सोबत असल्या तर त्यांचाही रेल्वेचा त्रास वाचेल" इतकंच त्रोटकपणे बोलत निघू लागला.
रेल्वेने बाकी गेल्यावर सलिताच्या स्काॅर्पियोने दुसऱ्या दिवशी नलू, सदा, सलिता निघाली.सलितानं काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.पुढच्या सीटवर स्वत: गाडी चालवायला सलिता बसली.नलू मॅम ही तिच्या शेजारी पुढेच बसली.मागच्या सीटवर सदा बसला.गाडी धावू लागली.सदानं मस्त ताणून दिली. तसा आरशाचा अँगल झोपलेल्या सदाच्या चेहऱ्यावर होऊ लागला.सदा मागं गाढ झोपलेला.नलू अनभिज्ञ.पण सलिताचं सारखं कोन साधणं सुरूच होतं.गौर वर्णीय उणापुरा सहा फूट उंच, कष्टानं कमावलेला तगडा देह दोन नयन सारखे प्राशत होते.सूर्य वर चढू लागताच सदा उठला.त्याचं लक्ष समोर आरशात गेलं.भेदक डोळे पाठशिवणीचा खेळ खेळू लागले.तो सावध झाला.त्यानं आळस झटकत सीटवर जागा किचींतशी बदलवत आरशाचा कोन घालवला.पण काही वेळच.पुन्हा सलितानं आरसा फिरवला.तोच पाठशिवणीचा खेळ.काळ्या पैठणीच्या पार्श्वभुमीवर
सुवर्ण कांती, त्यावर डाळिंबी ओठाची लाली.काळ्या झाकेचे आय ब्रो,बट मोगऱ्याचा गजरा,मंद अत्तराचा सुवास ,त्यात गरगर बुबुळं फिरवत फिरणारे भिंगार नयन पाखरं सदाला नशा चढवू लागले.त्यात मंदसं खोडकर स्वार्थी हास्याची धुंद लकेर सदाला बावचळू लागली.नलू मॅम आता डुलकी देत असल्यानं सलिताला फावत होतं.पण सदानं मुद्दाम बापाचा चेहरा आठवत काबू ठेवण्याचा प्रयत्न केला.
"सदा, मधा !हा तुमचा बाप नपुसक ठरला रे! नाही थांबवू शकला तुमच्या आईला!......"अगतिक,असहाय रामजी शिंदे !"आता सदाला आरशात लहानपणीपासुन जो चेहरा आपण आठवण्याचं टाळतोय तोच .....आईचा चेहरा दिसू लागला.त्यानं नलू मॅमला उठवत गाडी थांबवली.सलिता बावरली.ढाब्यावर गाडी थांबवत चहा घेतला.नी सदानंच गाडी चालवायला घेतली.सदा ड्रायव्हिंग करत असावा हे सलिताला माहितच नव्हतं.सदानं गाडी तुफान दामटवत आरशाचा कोन बदलूच दिला नाही.पण तरीही त्याचं मनाचं पाखरूही उंडारलंच.सलितानं त्याला इतकं उंच उडवलं की महत प्रयासानं ही त्याला बापाचा चेहरा आठवेच ना नी मग तो बावचळला.त्यातच संध्याकाळी महाराष्ट् ओलांडून गाडीनं आंध्रात प्रवेश केला.सर्वत्र अंधार नी थंड स्पर्श लागताच सदानं मधला लाईट लावत मुक्कामाचं ठाव शोधत गाडी थांबवली.जेवण करतांना नलू लवकर आटोपून हात धुवायला उठली.संधी साधत सलितानं सदाला टोकलं.
"संवेदना आहेत की नाही सदा तुला!"
आपला एकेरी उल्लेख इतक्या लवकर तो ही सलिता कडुन व्हावा यानं सदाला सोलगडीचा घोट घेतांना जोराचा ठसका लागला.तो काही न बोलता हात धुवायला उठला.
तिथं नलू मॅम त्याला क्राॅस झाल्या.
"मॅम मला वाचवा!"
नलूला दिवसभरात शंका आलीच होती.पण तिचा विश्वास बसत नव्हता या वाक्यासरशी खात्री होताच "प्रसंगातून ज्यानं त्यानं संयम दाखवायचा असतो सर"म्हणत कढं दाबत नलू तुझं अस्तित्व क:पदार्थ एवढं ही नसतांना तू?मनातल्या मनात म्हणत नलू मॅम पुढे निघाल्या.
प्रदर्शन आटोपलं.दोघा उपकरणांना तृतीय क्रमांक मिळाला.सलितानं संधी साधत सदास मिठी मारली.सदा मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करु लागला. परततांना
सलितानं विद्यार्थ्यांसोबतच नलूला परत पाठवलं ती व सदा दोघेच मागे थांबले.सदालाही हे प्रकरण इकडेच संपुष्टात आणायचं असेल तर सलिताला स्पष्ट नकार द्यावाच लागेल म्हणून तो ही नाईलाजानं थांबला.
एक दिवस उटीत घालवला.रात्री चांदण्या रात्रीत बोटींगचा बेत सलितानं आखला.
त्रयोदशीचा चांद निलगिरी पर्वतातून वर आला.उन्हाळ्यातही थंड गारवा अंगास झोंबत होता.बोटीत दोघेच.
"सलिता मॅम मला काही सांगायचंय म्हणून मी एकटा थांबलो अन्यथा नलू मॅडमांना जाऊच दिलं नसतं!"
"काय सांगायचंय मला माहित आहे!"ती हसत म्हणाली.
"ऐका तसं काही नाही"तो शांत निश्चलतेने म्हणाला.
"मग मी सांगते आधी!"
"मॅम तुम्ही जे समजता आहेत ते मुळीच नाही.कारण माझ्या आयुष्याला कुणाला माहित नाही अशी काळ्या इतिहासाची झालर आहे"
"मला ती झालर नाही पहायची सदा!मला उज्वल भविष्यकाळासाठी फक्त सदा हवा!"
"सलिता मॅम उज्वल भविष्य!"सदा रजत चांदण्यात पांढरंफटक हसला.
"सलिता हा चांदणचुरा पहायला किती सुंदर वाटतो!पण तो वाटणारा चांदाचा काळा डाग लोक विसरत नाही हो!"
"मला चंद्र डागाळला आहे याच्याशी घेणं नाही.सदारूपी नाजुक चंद्रकोर जरी मिळाली तरी पुरे!" सलिता निग्रहानं म्हणाली.
"सलिता मॅम काळा डाग जिणं मुश्कील करतो हो!त्याच्या यातना माझ्या बापाला भोगणं असह्य झालं नी ते..!माझं तर बालपणच तिरस्काराच्या भट्टीत शेकलं गेलं! निदान एकदा ऐका मग आपोआप आपण माघार घेणार"
"मला नाही डोकायचं इतिहासात"
"मॅम!प्लिज!....ऐका ना "नी तो ढसाढसा रडायला लागला.
त्याला कुठुन सुरूवात करावी तेच समजेना.रावसाहेब कदम? आई...नाही रेवती?.....रामोजी अपघात?की विषबाधेनं आजी गेल्यापासून.......?
क्रमश:
भाग::-चौथा
रामोजी शिंदेनं रहमत मियाच्या ब्राॅस बॅन्डला चांगले दिवस आणत आॅर्केस्ट्रा सुरू केला. आवाजात व गायकीत कमालीची नजाकत व जादू असल्यानं अल्पावधीतच नाशिक मध्ये त्याचा चांगला जम बसला.ज्या रहमत मियाॅला खायचे फाके पडत त्याला रामोजी शिंदेनं हात देत वर आणलं. नऊ वर्षाचा सदा व सहा वर्षाचा मधा,रेवती यांना चांगले दिवस आले.रामोजी महिन्यात मनमाडला जात आपल्या आंधळ्या आईची सर्व तजवीज करून येई.आता लवकरच तो तिलाही रेवतीची समजूत घालून नाशिकलाच नेणार होता. रेवती गरिबीत जगलेली असल्यानं तिला श्रीमंतीचं आत्यंतिक आकर्षण होतं.रुपानं सौंदर्यान उजवी असल्यानं आपल्या रुपाची तिला मनात एक आढ्यताही होती.दोन मुलं होऊनही रामोजीबद्दल तिला आकर्षक असे नव्हतेच.ज्या आॅर्केस्टानं रामोजी खूष होत होता,त्यालाच ही 'नरड्यास चंदा नं घसाफोडीचा धंदा ' म्हणून हिणवी. रामोजी ज्या बिल्डींगच्या तळमजल्यावर भाड्यानं राही त्याच बिल्डींग समोर मध्यप्रदेशातील शामजी कदमाचं 'राव टूर्स अँड ट्रॅव्हल्स'चं मोठं ऑफिस होतं.त्यांच्या लक्झरी महाराष्ट्र,गुजरात व म.प्रदेशात सर्वदूर चालत.त्याचा रावसाहेब कदम हा ऐन बत्तीशीचा मुलगा आठवड्यातून दोनेक चकरा टाकत धंदा सांभाळी.त्यांची मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमेवरील गावात शेती व इतरही व्यवसाय होते.रावसाहेब विवाहीत होता व त्यालाही मुलगा होता.यानं रेवतीला हेरलं.रेवतीला त्याची श्रीमंती भुरळ घालू लागली.रामोजीला रेवतीची बदलती राहणी लक्षात यायला वेळ लागला नाही.वेगवेगळे सेंट, साड्या, बोटातल्या अंगठ्या त्याला सतावू लागल्या.ती कारणं दाखवत घरसंसारातून वाचवलेल्या व वडिलांकडून आणलेल्या पैशातून खरेदी केल्याचं दाखवू लागली.पण आपण घरात किती देतो व सासऱ्याची परिस्थिती माहित असल्यानं रामोजीला कोडं उलगडेना.रेवतीला तर विविध ब्रॅन्डच्या सेंटच्या सुवासात रामोजीचा कष्टाच्या घामाचा सुवासही घिण आणु लागला.ती वेगळ्याच विश्वात दंग राहू लागली.त्यानं रामोजीची चलबिचल वाढली.त्यानं पाळत ठेवली.संध्याकाळच्या कार्यक्रमाची तारीख असल्यानं तो बाहेर पडला.आता तो रात्री बारालाच परतेल.हे रेवतीनं हेरलं.आज रावसाहेब होताच.रामोजीनं रहमत मिया व त्याचा नुकताच विशीत प्रवेश करणारा अन्वरला सांगत बुट्टी मारली व पाचला घरातून बाहेर पडलेला रामोजी साडेपाच पर्यंत घराच्या समोर दबा धरून बसला.रावसाहेबाची इनोव्हा बिल्डींगमधल्या रुमजवळ आली.दार लोटलं गेलं.सदा - मधाच्या हातात सुट्टे देत दुकानावर सुसाट पाठवण्यात आलं. रामोजीचे कान खिडकीच्या भिंतीला लागले.त्याच्या कानात भट्टीतला तप्त लोखंडाचा रस पडू लागला.
"गेली का तुझी पिपाणी? "हास्याचा प्रवाह....
"किती गं आणतो गं कमवून"
"खूपच !महिन्यात तुम्ही अत्तरासाठी एकवेळा देता एवढे भरगच्च"
पुन्हा हास्याचा दबलेला स्फोट नी मग नको नको ते घुसमटीचे आवाज.
रामोजीच्या जिवनाच्या कव्वालीचे हरकती,सुर, ताल सर्वाची एकच घुसमट झाली.तो निघाला.पोरं गल्लीतून येतांना दिसताच तो बाजूला झाला.पण पोरासाठी देखील दरवाजा उघडला नाही.रामोजीचा ह्रदयाचा मेंदूचा तट भुसुरुंग लागून उडाला.बत्ती घरच्याच माणसांनी दिली.
अंगावर पडलेल्या माराने रेवतीनं रात्रभर राडा केला.सकाळी रामोजी घराबाहेर पडला.तो वेड्यासारखा गोदेवर फिरत राहिला.आक्रोश करत राहिला.संध्याकाळी घरी आला.पोरं रडून रडून शेजारी झोपलेले.त्यानं रेवतीचा तपास केला.तर रेवती व रावसाहेब दुपारीच गायब.दोन तीन दिवस तपास करूनही थांग लागेना.तो हिम्मत करून राव टूर्सच्या आॅफिसात चढला.नेमके शामजी कदम आले होतेच.रामोजीनं कढ दाबत हात जोडत आक्रोश मांडला."दादाजी माझात ताकद असती तर आग लावली असती पण नाही.निदान माझ्या दोन बछड्यासाठी मी सर्व विसरून इथून बाडबिस्तरा गुंडवतो.पण तुमच्या रावास समजवा व रेवतीस ताब्यात द्या"
शामजीनं समोरचं रिसीव्हर घुमवलं.पंधरा मिनीटात इनोव्हा आली.
"जा लेके जा अपनी चिज को अगर आती है तो.मै राव को समजा देता"
रामोजीनं सदा मधाला सोडलं .पोरं पळतच आईला बिलगली.पण रेवती....
"दादाजी ये नही जाना चाहती" रेवती ऐवजी रावसाहेबच बोलला.
शामजीनं खुणेनच रेवतीला विचारलं.
रेवती पोरांना दूर सारत रावामागं उभी राहिली.
ते पाहुन शामजीनं रामोजीकडं पाहिलं.
"अब तु देख क्या करना है!तेरी चिज ही नही बोलती तो मै क्या कर सकता!"
रामोजीनं तप्त रसाची घुटी गिळावी तसं रडणाऱ्या पोरांना घेत निघाला.आपण आखलेला प्लॅन नाही शक्य आता.तो हताश होत नविन विचार करू लागला.ती रात्र त्यानं रडतच काढली.आपल्या सदा- मधास पोटाशी लावत तो आक्रंदू लागला.
"पोरांनो!मी नाही सांभाळू शकलो! नाही देऊ शकत मी तुम्हाला आई!या बापाचं एक पक्क लक्षात ठेवा.जिवनात पुढे जाऊन काही ही करा भीक मांगा,जीव द्या हवं तर ; पण कलेच्या नादी लागू नका. या गायकीनं मी तिच्या अपेक्षा नाही पुऱ्या करू शकलो.आयुष्यात गायकीच्या नादी लागू नको सदा!या बापाचे शब्द कोरून ठेव.एवढ्याशा जिवास काहीच कळेना.पण आपला बाप काही तरी बेंबीच्या देठापासून सांगतोय या संवेदना सदाच्या कोवळ्या मेंदूत, ह्रदयात चटका देऊ लागल्या.
रामोजीनं पहाटे पोरांना घेत निसरणी गाठली.सासरा सासुकडं पोरांना ठेवलं.रेवतीचं विचारताच फुटणारा बांध रोखत "मी मनमाडहून येतोय तो पावेतो ती ही येईल" इतकंच सांगत तोंड फिरवत तो निघाला.सदा मधा त्याच्या पायाला बिलगत "दादा,दादा नका ना जाऊ.....!तुम्हीपण आईसारखं सोडून जाऊ नकाना!"
त्या सरशी सासु-सासऱ्यांना समजेना काय झालंय.रेवती कुठं गेली,ते जावयाला विचारू लागले.
"पोरांनो मी मनमाडहून आजीला घेऊन आलोच उद्या"सांगत तो निघाला.पोरं आकांत मांडू लागली.मधा तर मातीतच लोळू लागला.दूर जाऊन रामोजीनं कसायानं नेणाऱ्या गायीनं आपल्या बछड्यांना वळून पहावं तसं एक वेळा पाहून घेतलं.त्याच्या डोळ्यात आसवामुळं व रेवतीच्या डागणीनं मुलं सामावलीच नाही.
मनमाडला आल्या आल्या आईला स्वत:च्या हातानं खिचडी बनवून आपल्या हातानं खाऊ घातली.आंधळ्या आईला पोराचं काही तरी गणित बिघडलंय हे जाणवलं.पण तरी ती प्रेमानं खाता खाता त्याच्या तोंडातही घास भरवू लागली.दोन तीन दिवसांपासून अन्नाचा कण पोटात नसलेल्या रामोजीनं 'शेवटाचा हा उपाय आता' समजून दोन घास खाल्ले.आईला जरा बाहेर जाऊन येतो सांगत तो रेल्वे पटरीकडं निघाला.
"रामोजी तू फक्त पिपाणी आहेस!नाही लावू शकत तू कदमांच्या साम्राज्याला आग!पण मृत्यूला तर कवेत घेऊ शकतो ना!नाही तिला परतवून मारू शकला तू!"
पटरीवर समोरून गाडी येऊ लागली.तो बाजूला चालू लागला.गाडी धावत येऊ लागली.त्यानं अदमास घेतला अंतराचा.नी पटरीत उडी घेत टक्कर दिली........हाडा मासांचा चिखल शिंपडत गाडी पुढे निघाली.त्याआधी खिचडीतील गरळानंही चोख परिणाम दाखवत म्हातारीला थकलेल्या लाथेच्या टाचा घासत मुलांसोबत पाठवलंच.
आजी-आजोबांनी दोन्ही नातवांना लगोलग मनमाडला नेलं. सदा मधाला ऊर बडवून बडवून ही रक्तमासांच्या चिखलात बाप दिसलाच नाही.त्याच चिखलास व आजीला सदानं चूड दिली.व नंतर काळोख्या कष्टाचा प्रवास करण्यासाठी तो निसरणीला परतला.आजी-आजोबांनी सारं नाशिक धुंडाळून ही रेवती भेटलीच नाही.रहमत मियाॅनं राव टूर्सचा पत्ता धुंडाळला पण अनेक धंदे असलेल्या शामजीनं ते फर्मच बंद करत आपल्या मूळ गावी परतला.
जावईचं दु:ख, रेवतीचं जाणं यानं खचलेला आजोबा नातवासाठी उभा राहिला.ट्रॅक्टरवर, थ्रेसरवर कामाला जाऊ लागला.कुट्टीमशीनवर कुट्टी करू लागला.तर कधी मुरूम मातीचं काम करत नातवांना शिकवू लागला.सुट्टीला सदा ही थ्रेसरवर कणसं ढकलण्यासाठी,धान्याच्या पाट्या उचलण्यासाठी जाऊ लागला. जिव तोडून शिकणं राबणं सुरू झालं.रात्रीच्या अंधारात आईचं झिडकारुन कुण्या दुसऱ्या माणसामागं जाणं आठवलं की डोळ्यात अंगार दाटू लागला.हा अंगार झेलत तो वाढू लागला.पण तरीही अंधाऱ्या रात्री कुण्या लग्नातला डिजे वाजू लागला की त्याच्या धमन्यातलं रक्त उसळू लागे.कधी कधी वडिलांनी रिकाम्या वेळेत गायलेल्या कव्वाली,शिकवलेलं आठवू लागे.सिहाच्या छाव्यास शिकार कशी करावी हे शिकवावं लागत नाही.तसचं डिजेत गाणाऱ्या गायकाचं गाणं त्याला कळू लागलं.त्याचे कान मिळेल ते संगित ऐकू लागले.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी सदा नाशिकला आला.वसतीगृहात राहू लागला.पण गावात केव्हाही सहज काम मिळे शिवाय खर्च कमी.आता त्याला आर्थिक नड भासू लागली.आजोबाचं वाढतं वय, मधाचं शिक्षण यानं सदाला घरून काहीच मदत मिळेना.सदाला काही तरी काम पाहणं आलंच.वसतीगृहामागे लग्नासाठी लागणारे मंडपवाले,केटर्स,बॅन्डवाले होते.बरीच वसतीगृहातली मुलं केटर्सवाल्याकडं वाढायला जात.मजुरी व भरपेट जेवण मिळे.सदाही जाऊ लागला.
रामोजीनंतर रहमतमियाॅच त्याचा आॅर्केस्टाचं व बॅन्डचं साहित्य घेऊन आलेला होता.पण गायक न मिळाल्याने व रहमत मिया थकल्याने अन्वर कसाबसा बॅन्ड चालवत होता.सदा वाढायला तर कधी मंडप उभारायला जाऊ लागला.यात अन्वरशी ओळख झाली.अन्वरच्या घरी पडलेलं साहित्य पाहुन सदाला अंधुकसं बालपण व बापाचा आॅर्केस्टा आठवला.रहयतमियाॅनं ओळख पटताच सदाला आधार दिला. सदा बॅन्ड मध्ये वाजवायला जाऊ लागला.वाजता वाजता गायकी ऐकू लागला.पण बापाचे शब्द आठवले की नड पुरतं ठिक पण या गायकी नकोच म्हणत गायनाकडं दुर्लक्ष करे.मात्र ऐकणं कायम सुरूच.अशाच एका ठिकाणी गायक आलाच नाही.म्हणून दुसऱ्याच मुलाला उभं केलं .पण नाचणारे बिथरले.त्यांनी हुल्लड करायला सुरुवात केली.अन्वरही नव्हता.रहमत मियावर लोक खेकसू लागले.रहमत मिया रडकुंडीला येत गयावया करू लागला.सदानं डिजेच्या गाडीत चढत जे येईल ते गायला प्रथमच सुरुवात केली. त्याचं गाणं ऐकताच बिथरलेली डोस्की शांत झाली. गाणं ऐकून रहमत चाट पडला.त्याला सदात रामोजी दिसू लागला.रामोजीनं आपली लाईन लावली.हा आपल्या अन्वर ला पुढे आणल्या शिवाय राहणार नाही.रहमत मियानं सदाला एक दोन गायकाकडं स्वखर्चानं पाठवलं.काॅलेज करत संध्याकाळी सदा गाणं शिकू लागला.पण दोन महिन्यातच शिकणारेच त्याची गायकी पाहत थक्क होत."मियाॅ इसको क्या गाना शिकायेंगे हम.इससेच हबको शिकना चाहिये!"म्हणत सदास त्यांनी मोकळं केलं. नंतर अन्वर मियाॅच्या बंदिस्त गाडीत कुणाला दिसणार नाही अशा रितीनं सदा दोन तीन कव्वाल्या गाऊ लागला.पण त्याच्या आग्रहाखातर अन्वरनं गायक कोण हे पडद्यातच ठेवे.व नवनविन शहरात सुपारी घेऊ लागला.मास्टर सुरीला या बदलत्या नावानं कधी कुणाला न दिसणाऱ्या गायक धूम मचवू लागला.त्याच्या कव्वाली साठी लोक अन्वरच्या डिजेला साठ-साठ हजार मोजू लागले.सदा काॅलेज करत लग्न सिजनमध्ये सात आठ तारखाच घेई.तो नसेल तर अन्वरच्या ब्राॅस बॅन्ड वा डिजे पार्टीला दहा वीस हजार ही मिळेनात.सदाला वडिलांचे शेवटच्या दिवसातले शब्द आठवले की नको ही गायकी वाटे पण मधा व आपलं शिक्षण आणि आजी आजोबांना आधार करिता गायकीचाच आधार वाटू लागला.शिवाय ज्या गायकीनं वडिलांना आपलं कुटुंब सावरता आलं नाही.त्याच गायकीवर आपण काही तरी करून दाखवूच अशी जिद्द त्याने बांधली.पण सदा म्हणून उजेडात न येता पडद्यामागं राहत तो मास्टर सुरीला म्हणुनच गाऊ लागला.
बारावी नंतर काॅलेज बदलली नी त्याची ओळख दत्ताशी झाली .त्या दिवसापासून त्याचं जिणंच बदललं.आईमुळं घृणामय व तिरस्काराच्या नजरा झेलणाऱ्या सदास दत्तारूपी जिवलग मित्र मिळाला.तो त्याला दोन वर्षं सिनीअर पण त्यांची गट्टी जमली.एकमेकाकडे घरी जाणं येणं वाढलं.दत्ताची परिस्थिती ही जेमतेम .अशावेळी सदाचं गाणं अन्वर प्रमाणं दत्तालाही मदत करू लागलं.लग्न सिजन मध्ये सात आठ लग्नाच्या तारखा त्यांचा सारा खर्च पुरा करे.पुढे सदानं एम.एस्सी.राहुरी विद्यापिठात केलं.तो पावेतो दत्ता थरवाडीत लागला ही.सदानं मधाला कम्प्युटर सायंसचं शिक्षण ही केलं. व मग नंतर थरवाडीत आला.
.
.
.असा सारा जीवनपट आहे सलिता मॅम.माझ्या कलंकात होरपळून झालं.म्हणून हात जोडतो उद्या थरवाडीत परततांना हे सर्व इथेच विसरा व पुर्ववत वागण्यातच आपलं भलं आहे.
निलगिरीच्या थंड वाऱ्यात त्रयोदशीचा चांद चांदणं फेकत पहाटपर्यंत फिका पडला होता. तरी प्राचीची नवतेज आभा क्षितीजाकडं नव्या उमेदीनं उगवायला सुरूवात झाली होती.त्याकडं कुडकुडत्या अंगानं बोट दाखवत सलितानं सदास बिलगत "सदा फिकट डागाळलेला चांद विसर सलिता रुपी प्राची तुझी वाट पाहतेय जी तुझं जिवन उजळल्या शिवाय राहणार नाही.त्या थंडीत बोटीत सलिताचा उष्ण श्वास त्यास उबेचा वाटला व तो विरघळला.पण सदाला कुठं माहित होतं की सलिता रूपी प्राचीची दुपारी असह्य चटके देणार होती........
क्रमश: