एंजल भाग १
एंजल भाग १
# काल्पनिक लघुकथा
भाग १
एंजल
घड्याळात संध्याकाळचे साडेसहा वाजत आले तसे सुजाता ने काम आटोपतं घेतलं. हल्ली रोजच घरी जायला उशीर होत होता. लवकर ट्रेन मिळाली तर ठिक... नाहीतर गर्दी मुळे काही लोकल सोडाव्या लागत असतं तिला. तशी लेडीज कंपार्टमेंट मध्येच ती बसायची तेव्हा अगदी बसायला नाही पण आत शिरुन उभं रहायला तरी जागा मिळायची. पण हल्ली खुप हाल होत असतं. ऑफीस मधून निघून स्टेशन ला जाईपर्यंत पावणेसात .. सात वाजत, मग गर्दी ...काही विचारायची सोय नाही. गर्दीमुळे जीव मेटाकुटीला येत असे. बरं नोकरी तर करायला लागणारच होती. ती एकुलती एक त्यामुळे वयस्कर आई वडीलांची जबाबदारी तिच्यावरच होती.
ती निघायच्या तयारीत आहे हे बघून ज्योतीने तीला बाय केलं. ज्योती दादर मध्येच रहात असे त्यामुळे ती सहज सात सव्वा सातला ही निघे, पण सुजाता अंबरनाथहुन येत होती. अंदाजे वीस बावीस वर्षांची. ग्रॅज्युएशन झाल्यावर एका फर्म मध्ये नोकरीला लागली होती. अजुन दहा-अकरा महीने झाले होते नोकरीला लागुन म्हणूनच संध्याकाळ होताच तिला आईवडीलांचे चेहेरे डोळ्यासमोर येत. आज तर आईला घेऊन दवाखान्यात जायचे होते. तसे दोनतीन दिवसांपासूनच जायचे होते पण उशिरा मुळे जमले नव्हते. आज तरी जाऊच.... तिने निश्चय केला आणि ती स्टेशन वर आली..
"छह बजकर पचपन मिनट की लोकल आधा घंटा देरीसे आएगी..........अंबरनाथ जानेवाली सुपर फास्ट लोकल प्लाटफ्राम क्रमांक तिनं पर आनेवाली ....."
उशिराने गाड्या धावत आहेत. आजही गोंधळच आहे याची तिला अनाउन्समेंट ऐकल्यावर जाणीव झाली. जी गाडी येते त्यात चढावे पण अजून ती लेडीज कंपार्टमेंट पर्यंत पोचली नव्हती..... आणि ट्रेन तर समोर आली होती. मुंबई हुन भरपूर भरभरुन आली होती. अशीच गर्दी पुढेही असणार...तिने क्षणभरही विचार न करता जो पुरुषांसाठी असलेल्या डब्यात तिने शिरायचा प्रयत्न करायचे ठरवले. डबा पुर्ण भरलेला......अगदी शेवटी दारात बारला लटकुन ती उभी राहिली जेमतेम एक पाय आत अणि अर्ध शरीर.....एवढीच जागा तीला मिळाली........हे काही खरं नाही...आपण उतरायला हवंय. चुक केलीय आपण ... पण आता उशिर झाला होता...गाडी सुरू झाली होती. तिची तशी बेताचीच उंची होती. त्यामुळे डबल फास्ट लोकल मध्ये ती अक्षरशः लोंबकळत होती. हेलकावे खात होती.
तिची अवस्था आतल्या माणसांनी बघीतली नव्हती असं नाही. पण काहीतर अगदी दुर्लक्ष करत होते आणि काही खोडसाळ पणे गाडी हलते आहे याचा फायदा ती एकटीच आहे म्हणून मुद्दाम जास्त हलत डुलत होते. तिच्या ते लक्षात येत होतं पण चिडली असूनही ती काहीच करु शकत नव्हती. याचं वाईट वाटत होतं. काही माणसं तर ऊगिच हिंदी गाणी मोठ्यांनी म्हणून तिच्या घाबरलेल्या अवस्थेची मजा घेत होते.
बापरे ... फास्ट जाणाऱ्या लोकल मधून इतक्या बाहेरुन लोंबकळत जाताना आताच हाताला केवढी रग लागली होती आणि गाडी तर ठाण्याशिवाय अधे-मधे थांबणार नाही. अंतर ....वेळ बराच लागणार आहे.. कसा निभाव लागणार यातून?, आत्ताशी तर दहा पंधरा मिनिटे झाली आहेत, एकदिड तास कसा काढणार आपण ??? ती काकुळतीला आली होती. जरा विचार करुन चढायला हवं होतं. पण हे असं प्रवास करणं पण दिवसेंदिवस गर्दी वाढतेय....थोडं थांबलं तर साडे आठ नऊ होतात. घरचं पण बघायला हवं. कामं तर असतातच. कसा मार्ग निघायचा यावर..? असाच रोज प्रवास करायला आपण शिल्लक तर रहायला तर हवं.
तिची ही अवस्था अविनाश बघत होता. अंदाजे तिशीचा, मागच्या वर्षीच सी ए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वतः ची प्रॅक्टिस करत होता. आज एका क्लायंट कडे जायचे म्हणून दादरला आला होता. सुजाताच्या आधीच तो दारात एक पाय ठेवून चढला होता. खरंतर तो कधी स्त्रीयांकडे फारसं लक्ष देऊन बघत नसे पण सुजाताची अवस्था आणि त्याची मजा घेणारे पुरुष हे सगळं त्याच्या लगेच लक्षात आलं पण आपण काही मदत केली आणि ही मुलगी आपल्याला ओरडली तर म्हणून तो शांत होता. ....पण तिची बेताची उंची आणि हेलकावे खाताना होणारी तारांबळ..माणसांवरची चिडचिड, हलणारी पर्स आणि ....न मागताही तिला हवी असणारी मदत यामुळे त्याने त्याच्या हातातील बॅग त्याने गळ्यात अडकवली एक हात वर पकडला आणि उजव्या हाताने सुजाताला आत सरकवून बारला हात घट्ट धरून ठेवला. हे करताना आतल्या माणसांकडे डोळे वटारुन बघायला तो विसरला नाही...
अविनाश ने तिला केलेल्या मदतीने आतल्या माणसांना तो तिच्याबरोबर आहे असे वाटले आणि ते जरा शांत झाले. वरमले.
सुजाताला तर एकदम देवदूत धावून आल्यासारखे वाटले. अविनाश ने बारला धरल्यामुळे तिच्या जीवात जीव आला. माणसांचा त्रासही कमी झाल्याने तीने जरा निर्धास्त होऊन अविनाश कडे बघीतले. अविनाश तिच्या कडे बघून हसला. ती ही गोड हसली. उंचापुरा अविनाश अगदी रुबाबदार, तिला एकदम आवडून गेला. चेहेऱ्यावर विद्वत्तेचं तेज होतच. तीने मनोमन त्याचे धन्यवाद मानले.
ठाण्याला गाडी थांबली. पण फारशी काही गर्दी कमी झाली नाही फक्त आत जरा थोडे शिरता आले. डोंबिवली पार झाल्यावर मात्र त्यांना आत बसायला जागा मिळाली.
"आज तुम्हीच माझा जीव वाचवला, नाहीतर काहीच खरं नव्हतं माझं.. " सुजाता म्हणाली.
" अहो त्यात काय एवढं..." अविनाश हसून म्हणाला. आता अविनाश ने तिच्याकडे नीट बघीतले. थोडी सावळी पण खुप चुणचुणीत मुलगी होती ती. केस दाट. जाड वेणी. चेहरेपट्टी सुबक. कोणालाही आवडेल अशी.... त्यालाही आवडली.
"इतकी गर्दी असताना नका चढत जाऊ गाडीत. रीस्की आहे ते..."
अविनाश म्हणाला.
"हो...नं, पण काय करणार, घरी आईला दवाखान्यात न्यायचय.म्हणुन काही विचार न करता चढले गाडीत." सुजाता म्हणाली.
"कुठे काम करता तुम्ही" ? अविनाश ने विचारले.
"दादरला एका अकाऊंटन्सी फर्म मध्ये आहे... पण जायला यायला फारच लांब आहे आणि आई वडील म्हातारे आहेत त्यांना अशी काळजी वाटत असते. का ते काळजी करतात ते आज समजलं" सुजाता बोलत होती.
"आपण नुसतंच बोलतोय पण नाव काय तुमचं? " सुजाताने विचारलं .
" अविनाश सरपोतदार... रहाणार अंबरनाथला." अविनाश म्हणाला.
" तुम्हीही अंबरनाथला ... मी ही अंबरनाथलाच रहाते. माझं नाव सुजाता काळे.
" अरे वा ! हे तर फार छान झालं ! " अविनाश हसत म्हणाला. तशी सुजाता लाजली.
"काय शिक्षण झालय तुमचं? " अविनाश ने विचारले
"एम काॅम, झालंय. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन" सुजाता म्हणाली.
" दॅट्स नाईस! " अविनाश म्हणाला. " अनुभव आहे काही?"
" साधारण वर्षभराचा " सुजाता म्हणाली.
"छान वाटलं तुम्हाला भेटून" अविनाश म्हणाला.
"हो...न, मला तर खुपचं! " सुजाता म्हणाली.
गप्पा रंगात आल्या होत्या आणि अंबरनाथ स्टेशनही.. दोघेही गाडीतून उतरले. एव्हाना गर्दी पुर्ण ओसरली होती. सुखरुप घरी परतल्याने सुजाता आता रिलॅक्स होती.
दोघांनाही अजून गप्पा मारत बसावं असं वाटतं होतं. पण घरी तर जायलाच हवं.
" आता कधी भेट होणार... अचानक भेटलो आज.... आणि किती छान ओळख झाली...वाटलं ही नव्हत की अशाप्रकारे कोणी भेटेल..." सुजाता अविनाश ला म्हणाली.
" तुला चालणार असेल तर.... अविनाश सरपोतदार चार्टर्ड अकाऊंटंट फर्म मधे जाॅब करु शकतेस. माझी पण अकाऊंटींग फर्म आहे. अंबरनाथ मध्ये..." अविनाश म्हणाला.
" काय.. सरपोतदार अकाऊंटींग फर्म तुमची आहे सर...?"
सुजाता ने विचारले. मी खुप ऐकून आहे फर्म बद्दल. शुअर सर! मी उद्या सकाळी नक्कीच येईन. " सुजाता अतीव आनंदाने म्हणाली.
त्याने तिला कार्ड दिले, पत्ता नीट समजावून सांगितला. अतिशय आनंदाने आणि समाधानाने दोघेही घरी निघाले.
सुजाता जरा जास्तच आनंदात होती कारण अविनाशच्या रुपात आज तिला जणू एंजलच भेटला होता.
