एकटी मी...
एकटी मी...
सकाळी साडेपाचचा अलार्म झाला तशी कांचनला जाग आली. हिवाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात हवाहवासा गारवा जाणवत होता. आणखी दहापंधरा मिनीटं रजई ओढून झोपावं अशी तिला अनावर इच्छा झाली. पण उशीर होईल म्हणून लगबगीने ती उठली आणि आवरायला बाथरूम मध्ये शिरली. भराभर आवरून तिने गोबी चिरायला घेतली. भाजी फोडणीला टाकून, कणिक मळून ठेवून, चहासाठी गॅसवर पाणी ठेवून ती बेडरूममध्ये आली.
"प्रशांत, अरे उठ. आवरायचं नाही का?"
आळस झटकत प्रशांत उठला. कांचन आणि प्रशांत हे एक उच्च मध्यमवर्गीय जोडपं. लग्नाला वीस वर्ष झालेली. निनाद आणि निकिता ही त्यांच्या संसारवेलीवर ची गोंडस फुलं. निनाद अठरा वर्षांचा आणि निकिता सोळा वर्षांची. प्रशांत एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत जनरल मॅनेजर च्या पोस्ट वर तगड्या सॅलरी पॅकेज वर काम करत होता. पाच वर्षांपूर्वीपर्यंत कांचन फ्रीलान्सर कॉर्पोरेट ट्रेनरचे काम करून चांगले पैसे मिळवत होती. पण मुलांची व्यवस्थित काळजी घेता यावी, त्यांच्याकडे नीट लक्ष देता यावे, म्हणून प्रशांतच्या सांगण्यावरून ती सध्या पूर्णवेळ गृहिणीचे काम आनंदाने पार पाडत होती. ऑफिसमधून आल्यावर रोज संध्याकाळी ड्रिंक्स घेण्याची सवय सोडली, तर प्रशांत तसा लौकिकार्थाने साधासरळ पुरुष होता. कांचनला त्याने घरातील, मुलांच्या बाबतीतील निर्णय आणि आर्थिक व्यवहारांबाबत पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे इतर मैत्रिणींच्या तुलनेत आपण फार सुखी आहोत, असं कांचनला नेहमी वाटायचं.
कामात असताना तिचा वेळ चांगला जायचा. पण प्रशांत ऑफिसला किंवा टूरला आणि मुलं कॉलेजला गेली की रिकामा वेळ तिला खायला उठायचा. घरी राहून काही काम करता येईल का ? याचा ती इंटरनेट वर सर्च करून अंदाज घेत होती. नाश्ता संपवून, लंच बॉक्स घेऊन प्रशांत ऑफिसला गेला. "मम्मा ! मला यायला उशीर होईल. आज कॉलेजमध्ये फुल डे वर्कशॉप आहे." बाहेर पडताना दारातूनच निनाद बोलला. निकिता अजून उठली नव्हती. कांचन तिच्या खोलीत गेली.
"निकी ! बाळा, बरं वाटत नाही का ?"
तिच्या कपाळाला हात लावून बघत कांचनने विचारलं.
"हो ग मम्मा, पोट दुखतंय. पिरियडस् आलेयत. आज कॉलेजला ही जाता येणार नाही."
"ओह ! तू आराम कर. मी हॉट वॉटर बॅग देते तुला शेकायला. जास्त दुखलं तर सांग, गोळी देईन."
असं म्हणून कांचनने किचनमध्ये येऊन गॅसवर पाणी तापत ठेवलं. तिचा मोबाईल फोन वाजला. डिस्प्लेवर मनीषा चं नाव पाहून उत्साहाने कांचनने फोन घेतला.
"हाय मनू !"
"काय ग ! कामात आहेस का ?"
"नाही ग ! बोल... आज कसा फोन केलास ?"
"ऐक ना... या महिन्याच्या १४ तारखेला हॉलिडे येतोय. सोळा - सतरा, सॅटर्डे - संडे. १५ ची सुट्टी टाकली की चार दिवस मिळताहेत. चारू आणि नीताशी माझं बोलणं झालंय. तुम्ही तिघी माझ्याकडे बडोद्याला या. आपण मस्त मजा करू. एक-दोन दिवस स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला जाऊया. उरलेले २ दिवस बडोद्यातच एखाद्या रिसॉर्ट मध्ये राहू या. काय म्हणतेस??"
"आता तू सगळंच परस्पर ठरवून टाकल्यावर मी काय म्हणणार ग ? डन....आजच रिझर्वेशन करते."
"ये हुयी ना बात...Ok then...See you on 14th."
चार दिवस बदल म्हणून बडोद्याला जायचं, तिथं बालपणापासून च्या जिवलग मैत्रिणींना भेटायचं, म्हणून कांचन खूपच खुशीत आणि उत्साहात होती. दर वर्षा दोन वर्षाने त्या चौघींचा भेटण्याचा परिपाठ होता. तिने जाण्यायेण्याचं ऑनलाईन रेल्वे रिझर्वेशन केलं, स्वतःसाठी थोडंफार शॉपिंग केलं, मैत्रिणीं साठी गिफ्ट्स घेतले आणि बॅग भरायला घेतली. बडोद्याला त्या सर्व मैत्रिणींनी खूप धमाल केली. एकमेकींशी सुखदुःख शेअर केलं. स्टॅच्यू ऑफ युनिटी ची भव्यता पाहून कांचनचं मन प्रसन्न झालं. चार दिवस कसे संपले त्यांना कळलंही नाही. ताज्यातवान्या होऊन सगळ्या आपापल्या घरी परतल्या. परत आल्यावर एक दिवस कांचन आपल्या खोलीत न्युजपेपर वाचत बसलेली असताना निकिता तिथं येऊन तिला म्हणाली,
"मम्मा, मला तुला काही सांगायचंय..."
तिचा चेहरा पडलेला दिसत होता.
"काय झालंय निकी???"
क्षणात कांचनच्या मनात असंख्य विचार चमकून गेले. निकिताची बॉयफ्रेंड वगैरे भानगड तर नाही ? ती कुठे अडकली तर नाही ?? वगैरे...
"अगं बोल ना..." मनावर शक्य तेव्हढा ताबा ठेवत तिने म्हटलं,
"तू इथं नव्हतीस तेव्हा पप्पा दोनतीन वेळा कोणाला तरी भेटायला गेला आणि उशिरा घरी परत आला. जाण्याआधी 'मी येतोय तुला पिकअप करायला, तयार रहा' असं बोलताना मी एकदा ऐकलं"
"अगं गेला असेल त्याच्या मित्रासोबत बारमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी"
"त्याचा फोन झाल्यावर तो बाथरूम मध्ये गेला असताना, मी त्याचा कॉल लॉग पाहिला. त्यात sty नावाच्या कॉन्टॅक्ट ला त्याने लेटेस्ट कॉल केला होता. तो बाहेर यायच्या आत तो नंबर मी पटकन माझ्या मोबाईल वरच्या ट्रूकॉलर मध्ये सर्च केला. खुशबू सिंग नावाच्या कोणाचातरी नंबर होता."
निकिता जे काही सांगत होती ते ऐकून कांचन ला धक्का बसला. पण वरवर तिने तसं दाखवलं नाही.
"असेल कोणीतरी ऑफिसमधली पप्पा ची कलीग.. तु जा..अभ्यास कर."
असं म्हणून तिने निकीता ला तिच्या खोलीत पाठवलं आणि विचार करू लागली.
'प्रशांत असं काही करेल?? नाही...नाही... निकीचा काहीतरी गैरसमज झाला असणार...तो तसा नाहीये... पण ही खुशबू सिंग कोण??? कधी त्याच्या ऑफिसच्या पार्टीला भेटलेली तर आठवत नाही... एकदा त्यालाच विचारून पाहू'
मनाच्या त्या विचित्र अवस्थेतही कांचनला निकीताच्या निरीक्षण शक्तीचं आणि तिच्या मम्माबद्दलच्या काळजीच कौतुक वाटलं. त्या रात्रीचं जेवणं, आवरा-सावर सगळं आटोपल्यावर कांचनने प्रशांत जवळ सहज तो विषय काढला.
"प्रशांत, तुझ्या ऑफिसमध्ये कोणी खुशबू सिंग म्हणून आहे का?" तिने प्रश्न केल्यावर प्रशांत थोडा दचकला, पण लगेच सावरून म्हणाला,
"नाही ग, अशी कोणी आमच्या ऑफिसमध्ये नाही. का विचारलंस?"
"नाही...सहजच...समोरच्या विंग मधली गीता विचारत होती."
प्रशांतनी सोडलेला सुटकेचा हलका निश्वास तिच्या तीक्ष्ण कानांनी बरोबर टिपला. तेव्हाच तिच्या लक्षात आले, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय.
दुसऱ्या दिवशी तिने मुंबईतील एका प्रख्यात डिटेक्टिव्ह एजन्सी ला फोन करून एका लेडी डिटेक्टिव्ह बद्दल चौकशी केली. लेडी डिटेक्टिव्ह घेण्यामागे हेतू हा की, तिला काय करायचे आहे? हे सांगताना कांचन ला संकोच वाटू नाही. थोड्याच वेळात तुमची डिटेक्टिव्ह तुम्हाला कॉल करेल असं कांचनला सांगण्यात आलं. बरोबर दहा मिनिटांनी तिला डिटेक्टिव्ह दामिनी पंडित चा कॉल आला.
"काय करायचं आहे मॅडम?"
जुजबी माहिती विचारून झाल्यावर दामिनीने विचारलं.
"माझा नवरा प्रशांत देशमुख याचे पुढच्या पंधरा दिवसातले सगळे डीटेल्स मला पाहिजेत. तो कुठे, केव्हां, किती वेळ, कोणासोबत असतो. शक्य झाल्यास त्याचे फोन कॉल्स आणि मेसेज डिटेल्स सुद्धा."
"ओके मॅडम, सगळे डिटेल्स शक्य झाल्यास फोटोग्राफ्स सहित तुम्हांला मिळतील. मी व्हाट्सएप आणि फोन कॉल वर तुमच्या संपर्कात राहीन"
प्रशांतचे फोटो, त्याचे बाकीचे डिटेल्स दामिनीला मेल करून तिचा ऍडव्हान्स ट्रान्सफर करून, यातून काही विपरीत बाहेर येऊ नाही आणि आपला संसार यापुढेही सहजतेने व्हावा, अशी ती मनोमन प्रार्थना करू लागली. वरवर पाहता सगळं व्यवस्थित चालू होतं पण कांचनच्या मनाला स्वस्थता नव्हती. तिचे सहावे इंद्रिय तिला धोक्याची सूचना देत होतं. दामीनीच्या मेसेज किंवा फोनची ती वाट पहात होती. आठवडा व्हायला आला, पण दामिनी कडून कुठलाही प्रतिसाद नव्हता. जसे दिवस जात होते, तसं तिला या गोष्टीत काही तथ्य नसावं, आपण उगाच प्रशांतवर संशय घेतोय असं वाटायला लागलं. नवव्या दिवशी संध्याकाळी दामिनीचा कांचनला कॉल आला.
"मॅडम, तुमचे मिस्टर प्रशांत देशमुख, त्यांच्या कंपनीच्या चंदिगढमधील व्हेंडर खुशबू सिंग यांच्याशी संपर्कात आहेत. गेल्या नऊ दिवसात त्यांचे त्यांच्याशी सात वेळेस फोनवर संभाषण झालं आहे. त्याचे कॉल डिटेल्स मी तुम्हांला मेल करते. आज दुपारी खुशबू सिंग मुंबईत आलीय. थोड्या वेळापूर्वी वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये मी त्या दोघांना सोबत जाताना पाहिलं. हॉटेलमध्ये शिरतांनाचा त्यांचा फोटोग्राफ मी तुम्हाला व्हाट्सअपवर पाठवते."
दामिनीचं फोन वरचं बोलणं ऐकून, कांचनच्या पायाखालची जमीन सरकली. तिला खूप मोठा धक्का बसला. सगळं आलबेल असण्याची उरलीसुरली आशा मावळली. तिच्या वैवाहिक आयुष्याचा पायाच खचला. मोबाईल तिच्या हातातून खाली गळून पडला. मटकन ती सोफ्यावर बसली. धावत आपल्या बेडरूममध्ये जाऊन, पलंगावर पडून, उशीत तोंड खुपसून ती हमसून हमसून रडू लागली.
'माझं काय चुकलं ? मी कुठे कमी पडले, म्हणून तू असं केलंस प्रशांत ?? आता मी काय करू ??? कुठे जाऊ ???? असा कसा तू लग्नाच्या वेळेस देवाब्राम्हणांच्या साक्षीने घेतलेल्या वचनांना विसरलास ? काय केलंस हे ? मुलांचा तरी विचार करायला हवा होता....'
तिचं रडणं थांबत नव्हतं. मन आक्रंदत होतं. अर्धा तास ती तशीच रडत राहिली. मुलं कॉलेजमधून येण्याची वेळ झाली, तेव्हा जड अंतकरणाने ती उठली. बेसिनशी जाऊन तिने चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले. आणि बाहेर येऊन मुलांची वाट पाहत बसली. मुलांना काही कळता कामा नाही. आता जे काही करायचं ते आपणच करायचं, असं तिनं ठरवलं. दामिनीने मेल वर फोन कॉल डिटेल्स पाठवले होते, त्यावर तिने नजर टाकली. व्हाट्सअप वर पाठवलेला दोघांचा हॉटेलमध्ये शिरताना चा फोटो पाहून तिच्या हृदयात कळ उठली. नवपरिणीत जोडीसारखे दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांच्या नजरेत हरवले होते. त्या रात्री कांचन आणि प्रशांतचे कडाक्याचे भांडण झाले. तिने त्याला फोन कॉल डिटेल्स आणि खुशबू बरोबरचा त्याचा फोटो दाखवून जाब विचारला. पण प्रशांत ने त्याचे खुशबू सोबतचे संबंध कबूल केले नाहीत. उलट त्याच्या मागे डिटेक्टिव्ह लावल्याबद्दल तिची निर्भत्सना केली.
"अगं, आमच्या कंपनीचे खुशबू मॅडमच्या फर्मसोबत बिझनेस रिलेशन्स आहेत. तिला एन्टरटेन करण्यासाठी मी किंवा दुसरा कोणीही उच्चपदस्थ ऑफिसर हॉटेलमध्ये घेऊन गेला, तर त्यात संशय घेण्यासारखे काय आहे? तू मानसिक रुग्ण झाली आहेस, म्हणून घरात बसून असले फालतू विचार करतेस. मी असं काही करेन का?"
कांचनला प्रशांतच्या खोटेपणाची चीड आली. तिला वाटलं 'कसला निगरगट्ट माणूस आहे हा...शी.. याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही'
कांचनने प्रशांतशी बोलणे सोडले. फक्त कामापुरते त्याच्याशी बोलायची, काय हवं नको तेव्हढं विचारायची. त्या दोघांत पतीपत्नीचे संबंध देखील उरले नाहीत. आश्चर्य म्हणजे, प्रशांतवर या सगळ्याचा काहीच फरक पडला नव्हता. त्याचे रुटीन नेहमीप्रमाणे सुरू होते. खुशबू सिंग सोबत त्याचे संबंध कुठल्याही अडथळ्याविना सुरू होते. कांचनने ठरवलं, पुन्हा आपलं कॉर्पोरेट ट्रेनिंग चं काम सुरू करायचं. स्वतः च्या पायावर उभं राहायचं. आकर्षक रेझ्युम बनवून, नोकरी शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेगवेगळ्या साईटस् वर तिने अपलोड केला. मित्रमैत्रिणींना आणि परिचयातील काही लोकांना 'तिला नोकरीची गरज आहे', असं फोन करून सांगितलं. कम्प्युटरचे आणि सॉफ्टवेअरचे बेसिक ट्रेनिंग देणारे व्हिडीओज तयार करून, ऑनलाइन कंप्यूटर ट्रेनिंग देणाऱ्या कंपन्यांना सॅम्पल म्हणून पाठवले. एका कंपनीकडून तिला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी विचारणा झाली. नोकरी शोधण्यासाठी मदत करणाऱ्या एका साइटवरून तिला एक पार्ट टाइम कॉर्पोरेट ट्रेनिंगची असाइनमेंट मिळाली.
वर्षभरात तिचे ट्रेनिंग व्हिडिओज लोकप्रिय होऊन तिला बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या रेगुलर असाइनमेंट्स सुरू झाल्या. आता कांचन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली होती. पुढच्या सहा महिन्यात कांचनने घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दिला. त्यासाठी तिच्या जवळ असलेले पुरावे सादर केले. तिच्या या निर्णयाने प्रशांत बिथरला. ती असं काही पाऊल उचलेल, अशी त्याला कल्पना नव्हती. पुढचे सहा महिने दोघांचेही कौन्सिलिंग झाले. समेट घडवून आणण्यासाठी प्रशांतने बरेच प्रयत्न केले. पण कांचन त्याच्यासोबत राहायला अजिबात तयार नव्हती. ज्याने तिचा एवढा मोठा विश्वासघात केला, त्याच्या सोबत एकाच छताखाली राहणं तिला मोठी शिक्षा वाटत होती.
निनाद आणि निकीताला विश्वासात घेऊन तिने सगळी कल्पना दिली. मुलं सज्ञान असल्याने, कौटुंबिक न्यायालयाने, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना आई किंवा वडिलांच्या जवळ राहता येईल असे सांगितले. प्रशांतला दोन्ही मुलांच्या पालन-पोषण आणि शिक्षणाचा खर्च उचलावा लागणार होता. कोर्टाने ठरवून दिलेली रक्कम त्याला कांचनला द्यावी लागणार होती. मुलं कांचनच्या जास्त जवळ असल्याने त्यांनी कांचनजवळ राहणे पसंत केले. प्रशांतला जेव्हा वाटेल तेव्हा आणि मुलांची इच्छा असल्यास त्यांना भेटता येणार होते.
एका नको असलेल्या बंधनातून आज कांचन मुक्त झाली होती. एक वेगळाच आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला होता. केव्हातरी वाचलेल्या एका कवितेच्या ओळीं तिच्या मनात निनादत होत्या...
एकटी मी असेन जरी
तरी नाही मी बिचारी
अन्यायाशी लढणारी
स्वयंसिद्धा मी खरी
***********
