Nilesh Bamne

Drama

2  

Nilesh Bamne

Drama

एक सुखद प्रेमकथा

एक सुखद प्रेमकथा

11 mins
1.3K


साधारणतः महाभारताच्या काळात विक्रम नावाचा एक राजा वैभवनगर नावाच्या एका संपन्न नगरीत राज्य करत होता. त्याची पत्नी सुनीता रूपवान आणि गुणवानही होती. साधू - संत यांचा ती मनापासून आदर आणि सेवा करीत होती. पण दुर्दैवाने तिला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठीच तिने तिचे गुरू महर्षी ध्यास यांना भेटायची इच्छा राजा विक्रांतकडे व्यक्त केली होती. पण एक दिवस महर्षी ध्यास स्वतःच तिला अचानक भेटायला आले. त्यांना प्रत्यक्ष आलेलं पाहून राजा - राणीला खूप आनंद झाला. त्या दोघांनी त्यांची मनोभावे सेवा केली. ते माघारी निघाले तेव्हा राजा - राणीने त्यांचे चरणस्पर्श करताच त्यांनी त्यांना पुत्रीवती भव असा आशीर्वाद दिला. त्यामुळे राजा - राणीला खूप आनंद झाला. लवकरच राणी सुनीता गरोदर राहिली आणि तिने एका सुंदर रूपवान मुलीला जन्म दिला. लवकरच तिचे सुवर्णा असे नामकरण झाले.


राजकुमारी सुवर्णा हळूहळू मोठी होऊ लागली. ती फक्त सुंदरच नाही तर शूर आणि धाडसी असल्याचा प्रत्यय सर्वांना येऊ लागला. राजाने तिला शस्त्रविद्येसह सर्व विद्या शिकविण्याची व्यवस्था केली. राजकुमारी सुवर्णा सोळा वर्षांची होताहोता राज्यकारभारात लक्ष घालू लागली. आता राजा - राणीला तिच्या विवाहाची चिंता सतावू लागली होती. अशात एक दिवस अचानक महर्षी ध्यास तेथे आले. त्यांना प्रत्यक्ष आलेलं पाहून राजा-राणी आणि राजकुमारी सुवर्णाला खूप आनंद झाला. राणीने महर्षी ध्यास याच्या सेवेची सर्व जबाबदारी राजकुमारी सुवर्णावर सोपवली. राजकुमारी अगदी मनापासून त्यांची सेवा करू लागली. तिच्या सेवेने महर्षी ध्यास खूप प्रसन्न होते. त्याचवेळी त्यांच्या सेवेला राजकुमारी सुवर्णाची एक मैत्रीण ललिता, हीसुद्धा होती तिच्यावरही महर्षी ध्यास खूप प्रसन्न होते. महर्षी ध्यासांनी त्या दोघींना गुप्त ज्ञानही दिले. ज्यावेळी महर्षी ध्यास माघारी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी राजकुमारी सुवर्णा आणि ललिताला एकांतात बोलावले आणि त्यांना एक कानमंत्र दिला जो उच्चरताच त्यांना हवे तेव्हा पुत्र अथवा पुत्री प्राप्त करून घेता येईल. जाताना महर्षी ध्यास राजा - राणीला म्हणाले, राजकुमारी सुवर्णा आणि तिची मैत्रीण ललिता दोघीही विवाहयोग्य झाल्या आहेत. त्यांच्यासाठी योग्य वर शोधून त्यांचा विवाह करून द्यावा. त्या दोघींचे पुत्र या राज्याला यश आणि कीर्ती मिळवून देतील.


महर्षी ध्यास निघून गेल्यावर राजा-राणीला राजकुमारीच्या लग्नाची चिंता सतावू लागली. आता राजकुमारीसाठी योग्य वर शोधायचा कसा? या दरम्यान एकेदिवशी राजकुमारी सुवर्णा ललितासोबत वनात फिरत असताना अचानक राजकुमारी सुवर्णाने महर्षी ध्यासांनी दिलेला कानमंत्र पुटपुटला त्या क्षणी अचानक तिच्यासमोर सूर्याप्रमाणे तेज असणारी एक लहान बालिका प्रकट झाली. हे सारे पाहणारी ललिताही आवक झाली. आता या मुलीचे करायचे काय? हा प्रश्न त्या दोघींनाही पडला! राजकुमारीने त्या मुलीला हळूच उचलून घेतले, तिच्या दंडावरील सुर्याची निशाणी तिने डोळ्यात साठवली आणि रेशमी कपड्यात गुंडाळून तिला तेथेच सोडून नाईलाजाने राजकुमारी सुवर्णा ललितासह राजवाड्याच्या दिशेने निघाली. काही दिवसांत घडलेला प्रसंग त्या दोघी विसरूनही गेल्या. येथे राजा विक्रमने राजकुमारी सुवर्णाच्या स्वयंवराची घोषणा केली की, जो कोणी तरुण राजकुमारी सुवर्णाला तलवारबाजीत हरवेल त्याच्याशीच मी राजकुमारी सुवर्णाचा विवाह करून देईन आणि तो तरुणच वैभवनगराचा भावी राजा असेल. ठरल्याप्रमाणे स्वयंवराच्या दिवशी अनेक तरुणांनी प्रयत्न केला पण कोणीही राजकुमारी सुवर्णाला तलवारबाजीत हरवू शकला नाही. पण विराट नावाच्या एका देखण्या तरुणाने सुवर्णाला तलवारबाजीत हरविले आणि त्याचा विवाह राजकुमारी सुवर्णाशी झाला. तिची मैत्रीण ललिता हिचा विवाह परराज्यातील एका सरदाराशी झाला. त्या राज्याचं नाव होतं लक्ष्मीनगर! लक्ष्मीनगरच्या राजाला नुकतेच एक कन्यारत्न प्राप्त झालं होतं. त्या राजकुमारीच नाव होत यामिनी!

 

इकडे राजा विराट आणि त्याची पत्नी सुनीता यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारून वनात राहायला गेले. आता राजकुमारी सुवर्णाचा नवरा विराट वैभनगरचा नवीन राजा झाला. आता जनतेला नवीन राजकुमार अथवा राजकुमारीची प्रतीक्षा होती. पण विराट राजात काही शारीरिक त्रुटींमुळे राजकुमारी सुवर्णा माता होऊ शकत नव्हती त्यामुळे तिने विराट राजाला महर्षी ध्यासानी दिलेल्या कानमंत्राबद्दल सांगितले आणि ते ऐकून राजा विराटला प्रचंड आनंद झाला. त्याच्या आज्ञेने राणी सुवर्णाने एक पुत्र प्राप्त करून घेतला. त्या पुत्राचे नाव होते विजय! राजकुमार विजय जन्मतःच तेजस्वी होता. त्याच्याही दंडावर सुर्याची निशाणी होती. त्याचा चेहरा राणी सुवर्णाशी मिळताजुळता होता. त्यानंतर दोन वर्षानी राणी सुवर्णाने एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी म्हणजे राजकुमारी प्रणाली. दिसायला एखाद्या परीसारखी! तिकडे लक्ष्मीनगरात राजकुमारी यामिनीला लहानपणापासूनच युद्ध कलेचे ज्ञान दिले जात होते. तिचे वडील महाराज विरसेन आणि महाराणी विजया तिच्याकडे विशेष लक्ष देत होते. त्यात तिच्या जोडीला तिची मावसबहीण राजकुमारी रूपवती होतीच! त्याच राज्याचे सेनापती अशोक म्हणजे ललिताचे पती यांनाही एक पुत्र प्राप्त झाला होता. त्याचे नाव होते प्रताप!

    

मध्ये पंधरा वर्षांचा काळ लोटला. तिकडे वैभवनगरात राजकुमार विराट आणि राजकुमारी प्रणाली मोठे झाले. लक्ष्मीनगरात राजकुमारी यामिनी आणि रूपमती मोठ्या झाल्या आणि त्यासोबत सेनापती अशोकचा मुलगा प्रतापही मोठा झाला. तिकडे राजकुमार विजयच्या मनात राज्यविस्तार करण्याचा विचार बळावू लागला. त्यासाठी त्याने प्रचंड सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. राजा विराट आणि राणी सुवर्णाचा त्याला आशीर्वाद होताच! एका शुभमुहूर्तावर राजकुमार विजय मोहिमेवर निघाला. छोटी-मोठी राज्ये जिंकत तो लक्ष्मीनगरच्या दिशेने निघाला. राजकुमार विजय आपल्या राज्यावर आक्रमण करणार असल्याची बातमी मिळताच महाराज विरसेन आणि महाराणी विजया अस्वस्थ झाल्या. पण ही बातमी राजकुमारी यामिनीला मिळताच ती चवताळली आणि तिने सैन्याला युद्धास तयार राहण्याचे आदेश दिले. युद्धाची सर्व तयारी झाली. राजकुमारी यामिनी स्वतः युद्धात उतरली तिच्यासोबत राजकुमारी रुपमती आणि प्रतापही होता. प्रत्यक्ष रणभूमीवर समोरासमोर येताच राजकुमार विजय अस्वस्थ झाला की आपल्याला एका स्त्रीशी युद्ध करावे लागणार. पण आता त्याच्याकडे युद्ध करण्याशिवाय कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. दोन्हीकडून शंखनाद होताच हरहर महादेव म्हणत युद्धाला सुरुवात झाली. प्रचंड रक्तपात सुरू झाला. अशात राजकुमारी रुपमती राजकुमार विजयसमोर आली. त्यांच्यात लढाई सुरू झाली. रुपमतीचा चेहरा जिरेटोपाने झाकलेला होता. दोघांत घमासान लढाई सुरू असताना रुपमतीचा जिरेटोप खाली पडला आणि तिचे लक्ष विचलित होताच राजकुमार विजयची तलवार तिच्या मानेवर होती पण तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून राजकुमार विजय तिच्या प्रेमात पडला. मृत्यू साक्षात समोर उभा असतानाही राजकुमारी रुपमती गालात गोड हसली! त्याची तलवार तिच्यावर चालणारच नव्हती पण तेवढ्यात प्रसंगावधान राखत राजकुमारी यामिनी मागून त्याच्या मानेवर तलवार लावणार तोच तो पलटला आणि त्याने तिची तलवार आपल्या ढालीवर झेलली. त्यानंतर त्याच्यात आणि राजकुमारी यामिनीत बराच वेळ लढाई सुरू राहिली पण एका क्षणाला राजकुमार विजयने तिच्या शिरपेचावर ढालीचा वार केला, ते शिरपेच खाली कोसळताच त्याने यामिनीचा चेहरा पाहिला आणि तो अवाक झाला कारण साक्षात त्याची आई त्याच्यासमोर उभी असल्याची त्याला जाणीव झाली. तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि तिने क्षणात आपली तलवार त्याच्या मानेवर लावून त्याला राजकैदी केले.


त्याला कैद करून राजा विरसेन समोर उभे करण्यात आले. त्याला कैद करून तुरुंगात ठेवण्यात आले असता राजकुमारी रुपमती त्याला भेटायला गेली. तिला पाहताच त्याच्या चेंहऱ्यावर हसू उमटले. राजकुमारी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाली, कसे आहात राजकुमार विजय? त्यावर राजकुमार विजय तिला म्हणाला, पाहुणचार घेतोय तुमचा! त्यावर रुपमती त्याला म्हणाली, मला तुमच्या वीरतेचे कौतुक आहे पण मला सांगा जर राजकुमारी यामिनी आली नसती तर खरंच तुमची तलवार माझ्या मानेवर चालली असती? त्यावर राजकुमार विजय म्हणाला, मानेवर तलवार असतानाही तुम्ही हसत होतात याचा अर्थ न कळण्याइतका मी मूर्ख नाही.

त्यावर राजकुमारी रुपमती म्हणाली, राजकुमार विजय तुम्ही फक्त शूर नाही तर हुशारही आहात, मग मला सांगा तुम्ही राजकुमारी यामिनीसमोर शरणागती का पत्करलीत? त्यावर राजकुमार विजय म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर माझी आईच देऊ शकेल! 


तिकडे युद्धात पराभूत झालेल्या वैभवनगरच्या राजकुमाराला राजकैदी केल्याची बातमी ललिताला प्रतापने सांगताच ललिता अस्वस्थ झाली. तिने प्रतापकडे राजकुमाराला भेटण्याची विनंती केली असता त्यासाठी राजकुमारीची परवानगी लागेल म्हणाला. एका राज्यात राहून आपले पती त्या राज्याचे सेनापती असतानाही ललिताने कधीच राजकुमारीचे तोंड पाहिले नव्हते. पहिल्यांदा प्रताप ललिताला घेऊन राजकुमारीला भेटायला गेला. राजकुमारी यामिनीला पाहताच ती राजकुमारी सुवर्णाची जंगलात सोडलेली मुलगी आहे याची तिला खात्री पटली. राजकुमारी सुवर्णाकडे तिने राजकुमार विजयला भेटण्याची परवानगी मागितली. राजकुमारी यामिनीने त्याचे कारण विचारले असता ती म्हणाली, राजकुमार विजय खूप सुंदर आहे असे मी ऐकले आहे. मला त्याला पाहण्याची इच्छा होती. त्यावर राजकुमारीने त्याला भेटायची परवानगी दिली. ती विजयला भेटली असता प्रतापने विजयची तिच्याशी ओळख करून दिली असता तिने सांगितले, मी तुझी मावशी आहे, तुझ्या आईची जिवलग मैत्रीण, कशी आहे ती? एव्हाना तुला कैद झाल्याची बातमी तिला पोहचली असेल? तू शरणागती पत्करली असलीस तरी वैभवनगरची महाराणी सुवर्णा आता गप्प बसणार नाही! तू शरणागती का पत्करलीस ते मला माहित आहे. पण! झाली तेवढी जीवितहानी पुरी झाली, आता नवीन संकट नको ! तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकते पण आता ती वेळ नाही! 


तिकडे वैभवनगरात राजकुमार विजयच्या कैदेची बातमी पोचताच महाराणी सुवर्णाने त्यांचा सेनापती चंद्रसेन याला बोलावून घेतले आणि त्याच्यावर राजकुमार विजयला सुरक्षित सोडवून आणण्याची जबाबदारी सोपवली. चंद्रसेन गुप्त मार्गाने यामिनीच्या महालात शिरला आणि त्याने गुंगीचे औषध लावून राजकुमारी यामिनीला बेहोष केले. पण त्याने तिचा चेहरा पाहिला नाही. त्यांनतर क्रमाक्रमाने एकेका सैनिकाला बेहोश करत तो राजकुमार विजयपर्यंत पोहचला आणि त्याला सुखरूप सोडविले पण ते जात असताना राजकुमारी रुपमती त्यांना सामोरी आली. पण तिने त्यांना अडवण्याऐवजी त्यांचा रस्ता मोकळा केला. राजकुमार विजय कैदेतून पळून गेल्याची बातमी राजकुमारीला शद्धीवर आल्यावर मिळाली. राजकुमार विजय सुखरूप वैभवनगरात पोहचला. त्याला पाहून महाराणी सुवर्णाला खूप आनंद झाला. एकांतात असताना राजकुमार विजय महाराणीला म्हणाला आई! राजकुमारी यामिनी हुबेहूब तुझ्यासारखी दिसते म्हणून माझ्याच्याने तिच्यावर तलवार चालविण्याची हिंमत नाही झाली. तिकडे मला ललिता मावशी भेटल्याचे सांगताच महाराणीला शंका आली की, राजकुमारी यामिनी म्हणजे माझी ती जंगलात सोडलेली मुलगी असावी. पण खात्री करायला हवी! तिकडे राजकुमार विजय कैदेतून पसार झाल्यामुळे राजकुमारी यामिनी अस्वस्थ झाली पण राजकुमारी रुपमतीला राजकुमार विजयला भेटायचे होते एका रात्री ती गुप्त मार्गाने राजकुमार विजयच्या महालाच्या दिशेने मुखवटा लावून शिरत असताना सेनापती चंद्रसेनने तिला अटक केली आणि तिचा मुखवटा दूर करून पाहताच त्याने तिला त्याच्या महालात सोडले. राजकुमारीने झोपलेल्या राजकुमाराचे डोळे नाजूक हाताने झाकताच राजकुमार तिच्या स्पर्शाने जागा झाला. तो जागा होताच तिने खंजीर त्याच्या मानेला लावताच तो हसला. त्याला हसताना पाहून तिने आपला मुखवटा काढताच राजकुमार विजयला प्रचंड आनंद झाला. तो तिच्या मिठीत असतानाच महाराणी सुवर्णा आणि राजकुमारी प्रणाली तिथे येताच राजकुमारी रुपमती ओशाळली! ती महाराणीच्या पाया पडताच, ती काही बोलण्यापूर्वीच विजय म्हणाला, त्यापेक्षा तू अधिक सुंदर आहेस! तुझे आमच्या राज्यात स्वागत आहे! त्यावर राजकुमारी रुपमती म्हणाली, राणीसाहेब तुम्ही हुबेहूब राजकुमारी यामिनीसारख्या दिसता! क्षणभर मला वाटलं तिच माझ्यासमोर उभी आहे. त्यावर विषय टाळत त्या म्हणाल्या, आता तू आमची पाहुणी आहेस, राजकुमारी प्रणालीच्या महालात तुम्ही आनंदाने रहा! 


तिकडे राजकुमारी यामिनी घोडेस्वारी करत असताना तिचा घोडा उधळला आणि राजकुमारी जखमी होऊन घोड्यावरून नदीत पडली आणि जखमी अवस्थेत नदीतून वाहात वैभवनगरात पोहोचली. जखमी अवस्थेत बेहोश असणाऱ्या तिच्यावर सेनापती चंद्रसेनची नजर पडली. जखमी झाल्यामुळे तिचा चेहरा ओळखू येत नव्हता. चंद्रसेन आपल्यासोबत तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर उपचार सुरू केले असता काही दिवसांनी तिला शुद्ध आली. तिने विचारणा केली असता तिच्या लक्षात आले की, आपण शत्रूच्या राज्यात त्या राज्याच्या सेनापतीच्या घरी उपचार घेत आहोत. त्यामुळे तिने आपली खोटी ओळख सांगितली! या दरम्यान ती चंद्रसेनच्या प्रेमात पडली. ती पूर्ण बरी होताच ती आरशात आपला चेहरा पाहत असताना चंद्रसेन तिला म्हणाला, तुम्ही तर हुबेहूब आमच्या महाराणीसारख्या दिसता! ते ऐकून यामिनीच्या मनात विचार आला म्हणूनच कदाचित राजकुमार विजयने माझा चेहरा पाहताच माझ्यावर शस्त्र चालविले नाही. 


यामिनीने चंद्रसेनकडे महाराणीला पाहण्याची विनंती केली असता चंद्रसेन तिला घेऊन राजवाड्यात गेला. महाराणीच्या महालाच्या दिशेने जाताना यामिनीने राजकुमारी रुपमतीला राजकुमारी प्रणालीसोबत पाहिले. महाराणीला भेटताच चंद्रसेन महाराणीला म्हणाला, हीच ती मुलगी मला जखमी अवस्थेत भेटली होती तिला तुम्हाला पाहायचे होते. त्यावर महाराणी त्याला म्हणाली, ठीक आहे, तू जा राजकुमाराला भेटून ये तोवर मी बोलते तिच्याशी. महाराणीला पहाताच तिला असे वाटले जणू ती तिचेच प्रतिबिंब पाहतेय! यामिनीने आपल्या चेहऱ्यावरचा पडदा दूर करताच महाराणी सुवर्णा तेथे असणाऱ्या दासीला म्हणाली, तू बाहेर जाऊन थांब आणि कोणालाही आत सोडू नकोस! 


यामिनीचा चेहरा पाहताच तिने लगेच तिच्या दंडावरील कापड दूर केले आणि पाहिले असता तिच्या दंडावर सुर्याची खूण होती. ती पाहून महाराणी सुवर्णाने राजकुमारी यामिनीने माझी मुलगी म्हणत तिला मिठी मारली आणि दोघीही सावरल्यावर महाराणी सुवर्णाने तिला सारी हकीगत सांगितली. पण इतक्यात हे रहस्य उघड न करण्याची विनंती केली. त्यानंतर चेहऱ्यावर पडदा लावून ती सेनापती चंद्रसेनसोबत निघून गेली. पण त्या रात्री अचानक ती आपल्या राज्यात निघून गेली. तिला माघारी आलेलं पाहून राजा-राणीला खूप आनंद झाला. तिने त्यांना आपल्या जन्माचं रहस्य विचारलं असता त्यांनी तू आम्हाला जंगलात भेटल्याचे मान्य केले. त्यांनी राजकुमारी रुपमतीही बेपत्ता असल्याचे म्हणताच ती म्हणाली, ती सुखरूप आहे, काळजी करू नये.


राजकुमारी यामिनी राज्यात नाही ही बातमी मिळताच लक्ष्मीनगरच्या शेजारच्या राजाने लक्ष्मीनगरवर हल्ला करण्याची योजना आखली. त्याबद्दल महाराणी सुवर्णाला माहिती मिळताच तिने सेनापती चंद्रसेनला राजकुमारी यमिनीच्या मदतीला पाठवले. त्या राजासमोर यामिनी पराभवाच्या छायेत होती कारण तेव्हा राज्याचे सेनापती अशोक आणि त्यांचा पुत्र दुसऱ्या एका मोहिमेवर राज्याबाहेर होते. चंद्रसेन तेथे पोहोचला आणि त्याने समोरच्या राजाच्या सैन्यावर तुटून पडून त्याचा पराभव केला. युद्ध समाप्त होताच त्याने जखमी झालेल्या राजकुमारी यामिनीला आधार देताच त्याने तिचा चेहरा पाहिला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तो काहीच म्हणाला नाही पण राजकुमारी यामिनी त्याला म्हणाली, तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता पण माझा नाईलाज होता. तू इथे कसा? असा प्रश्न विचारताच तो म्हणाला, महाराणीचा आदेश होता.


राजवाड्यात पोहचताच राजा विरसेन आणि त्याची पत्नी विजया यांनी चंद्रसेन याचे आभार मानले आणि त्याला काही दिवस तेथेच राहण्याची विनंती केली. ते ऐकून राजकुमारी यामिनीला खूप आनंद झाला कारण ती चंद्रसेनच्या प्रेमात पडली होती. इकडे राजकुमार विजयला राजकुमारी यामिनी आणि सुवर्णा यांच्यात असणारं साम्य सारखं अस्वस्थ करत होतं. त्याची अस्वस्थता लक्षात घेऊन तिने कुटुंबातील सर्वांनाच एकत्र बसवून कित्येक वर्षे आपल्या उदरात लपविलेले सत्य उघड केले. ते सत्य उघड होताच सर्वांना खूप आनंद झाला. मोहिमेवर गेलेले सेनापती अशोक आणि त्यांचा पुत्र प्रताप माघारी येताच त्यांना फार वाईट वाटले कारण ऐन गरजेच्या वेळेला ते राज्याबाहेर होते. त्यांनी सेनापती विरसेनची भेट घेऊन त्याचे व्यक्तीशः आभार मानले पण प्रत्यक्ष महाराणी सुवर्णाचे आभार मानण्यासाठी ते ललितासह वैभवनगरात दाखल झाले. महाराणी सुवर्णाला पाहताच सेनापती अशोक व प्रतापला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. बऱ्याच वर्षांनंतर आपल्या प्रिय सखीला भेटून महाराणी सुवर्णाला प्रचंड आंनद झाला. या भेटाभेटीत राजकुमारी प्रणाली प्रतापच्या प्रेमात पडली. महाराणी सुवर्णाने प्रतापला आपल्याजवळ बोलावले आणि त्याच्या दंडावर सुर्याची निशाणी आहे का ते पाहिले तर ती नव्हती आणि राजकुमारी प्रणालीच्या दंडावरही नव्हती. महाराणी सुवर्णाने ललिताला विचारले, तू महर्षी ध्यासांच्या मंत्राचा उपयोग नाही केलास? त्यावर तिने नकार देताच महाराणी सुवर्णा म्हणाली, राजकुमारी प्रणाली राजवैद्यांच्या उपचार आणि प्रयत्नांचे फलित आहे.


ललिता महाराणी सुवर्णाकडे राजकुमारी प्रणालीचा हात प्रतापसाठी मागायला बिचकली असता तिनेच प्रतापला राजकुमारी प्रणालीसाठी विचारणा केली. हे ऐकून त्या दोघांना खूप आनंद झाला. इकडे राजकुमार विजय आणि राजकुमारी रुपमतीचा विवाह ठरल्यात जमा होता पण त्याची परवानगी घेण्यासाठी राजकुमार विजय, राजकुमारी रुपमती आणि महाराणी सुवर्णा लक्ष्मीनगरात गेले असता त्यांचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराणी सुवर्णाने महाराज विरसेन आणि महाराणी विजयाचे मनापासून आभार मानले कारण त्यांनी यामिनीला जीवापाड जपले. यामिनी युद्धात जखमी झालेली असल्यामुळे अजूनही उपचार घेत होती आणि सेनापती चंद्रसेन तिची काळजी घेत होते. यामिनीने महालात प्रवेश करताच चंद्रसेनने पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला त्यावर महाराणी त्याला म्हणाल्या, चंद्रसेन मी तुझ्यावर खूप खुश आहे. तुझ्यावर सोपवलेली आणि न सोपवलेली जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडलीस. आता माझीही जबाबदारी मी तुझ्यावरच सोपवते कायमची. ते ऐकून राजकुमारी यामिनी लाजली आणि तिने उठून महाराणी सुवर्णाचे चरणस्पर्श केले. त्यावर महाराणी सुवर्णाने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, तुझा भाऊ तुला भेटायला आला आहे. विजयने पुढे होऊन यामिनीचे चरणस्पर्श करून तिला प्रेमाने आलिंगन दिले आणि मिठीतून दूर होताच राजकुमार विजय म्हणाला, मोठ्या बहिणीवर शस्त्र उचलण्याचे पातक अनवधानाने का होईना माझ्या हातून घडले होते. राजकुमारी रुपमतीनेही पुढे होत यामिनीला मिठी मारताच यामिनीला विचारले राजकुमार विजयला आपल्या कैदेतून तूच सोडवलेस ना त्यावर तिने चंद्रसेनकडे बोट दाखवताच सर्वजण हसले. महाभारताच्या काळातही अशी एक सुखद प्रेमकथा घडली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama