एक रोमांचक डेट
एक रोमांचक डेट
रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खूष होत्या. त्याचा मेसेज आला होता संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदा कॉफीसाठी बाहेर भेटणार होता. निनाद आणि रितू एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. ३ महिनेच झाले होते रितूला ते ऑफिस जॉईन करून. दोघंही एकाच टीममध्ये असल्याकारणाने क्लोज फ्रेन्डशिप झाली होती. दिवसभर ते दोघे ऑफिसमध्ये एकमेकांना नजरेनेच लाईक करायचे. आज त्याला ऑफिसबाहेर भेटायला रितूचे मन आतुर झाले होते. तिची पावले आता झपाझप घराच्या दिशेने वळू लागली. त्याच्या विचारांमध्ये रितुने घर कधी गाठले ते तिचे तिलाच कळले नाही. घरी आल्यावर फ्रेश होऊन रितू तिच्या रूममध्ये गेली. पलंगावर स्वतःला झोकून ती निनादचे स्वप्न रंगवू लागली. निनादच्या विचारांत रितू गुंग होऊ लागली. थोड्याच वेळात त्याचा मेसेज आला, मी निघालोय १५ मिनिटांत कॅफेला पोचतो. ती ताडकन पलंगावरून उठली आणि कपाटामधून निळ्या रंगाचा चुडीदार बाहेर काढून आरशासमोर उभी राहिली. रितुने आरशात स्वतःवर एक नजर फिरवली आणि रोमँटिक गाणी गुणगुणत तयार व्हायला सुरवात केली. ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक, कपाळावर नाजुकशी टिकली आणि कानात साजेसे असे मोत्यांचे टॉप्स घालून ती छान तयार झाली. खूप दिवसांनी रितू अशी मनसोक्त नटली होती. केस मोकळे सोडल्यामुळे तीचे रूप अजूनच खुलून आले होते. पुन्हा पुन्हा ती आरशासमोर स्वतःला निरखत होती. रितूसाठी आजचा दिवस खूप खास होता. ती लाजतच गालातल्या गालात हसली आणि हातात पर्स अडकवून निघाली. मनामध्ये थोडस दडपण आलं होतं. येणारा प्रत्येक क्षण ती त्याच्याच विचाराने अधीर होऊ लागली.
रितू लगबगीने ठरल्या ठिकाणी पोचली. समोर पाहताच कोपऱ्यातल्या टेबलवर तो बसलेला दिसला. तोदेखील रितूच्या येण्याची वाट बघत होता. रितू त्याच्यासमोर जाऊन बसली. दोघांनी एकमेकांना नजरेतूनच स्मितहास्य केले. तिची नजर हळूच चोरून त्याला निरखत होती. काळ्या रंगाच्या शर्टात तो अगदी हँडसम दिसत होता. त्याच्याकडे नुसतं पाहतच बसावं असे तिला वाटले. कॉफी मागवायची का? त्याने रितूला विचारले. तिने नुसतीच मान डोलावली. तोही हळूच संधी साधून एकटक तिच्याकडे बघत होता. थोडावेळ त्यांच्या टेबलवर शांतता होती. कोण आधी सुरुवात करेल याचीच जणू ते वाट बघत होते.
त्यांच्यामधली निशब्द शांतता सगळं काही व्यक्त करत होती. तितक्यात निनादने सुरुवात केली. या ड्रेसमध्ये तू खूप सुंदर दिसतेस, निळा रंग अगदी उठून दिसतोय तुझ्यावर. ती लाजरीबुजरी होऊन थँक्यू म्हणाली. तिच्या गालावर नाजुकशी खळी खुलून आली. लाजत लाजतच ती नजर खाली झुकवून बसली. त्याच्या नजरेला नजर मिळवायची तिची हिम्मत होईना. परत तीच निरव शांतता. थोड्या वेळाने तोच बोलला, वारा छान सुटलाय ना आज. रितू मात्र आता त्याच्या नजरेला नजर भिडवून बोलू लागली. वातावरण पण मस्त झालय आज, प्रसन्न वाटतंय. दोघेही क्षणातच बोलते झाले. त्यांचा संवाद सुरूच होता इतक्यात वेटरने दोन कॉफीचे कप त्यांच्या टेबलवर आणून ठेवले. तिने कॉफीचा एक घोट घेतला पण तो मात्र तिच्याकडे एकटक बघत बसला. तिचं ते गोजिरवाणे रूप खुलून दिसत होते. कपाळावर नाजूक टिकली शोभून दिसत होती, मंजुळ वारा आणि तिच्या केसांच्या बटांचे अल्लड खेळ सुरु होते. लाल लिपस्टिकनी रंगलेले ओठ तितकेच रसरशीत आणि आकर्षित होते. सौन्दर्याच्या वेलीवर जणू एक नाजूक हसरी कळी फुलली होती. तिचं ते सुंदर प्रतिबिंब निनादच्या डोळ्यात चमकत होते. तू पण घेना कॉफी, रितू बोलली तसे तो अचानक भानावर आला आणि कॉफी पिऊ लागला. कॉफीचा एक एक घोट त्या प्रत्येक क्षणाचा आल्हाद देणारे भासत होते. मला तू खूप आवडतेस, तो तिला म्हणाला. ती त्याच्याकडे
चकित नजरेने बघत होती. रितूच्या चेहऱ्यावर आकर्षक मुद्रा उमटली. लाजेने पुरती चूर होऊन ती त्याच्याकडे बघत राहिली. तुला आवडतो का ग मी? त्याच्या या प्रश्नाने तिची धडधड अजूनच वाढली. नेमकं काय आणि कसं बोलायचं हेच तिला सुचेना. मनात प्रेमाच्या लाटा आनंदी गगनात उसंडी मारू पहात होत्या. एक दीर्घ श्वास घेऊन तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, मलाही तू खूप आवडतोस. तुला पहिल्यांदा बघितले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले पण कधी तसं बोलायची हिम्मत नाही झाली. ऑफिसमध्ये रोज तुला मी मनभरून पाहते. तुझ्या त्या डॅशिंग अदांची दिवानी आहे मी. तुझ्यासोबत टी ब्रेअकला जायची तर नुसती वाटच पाहत असते. कितीतरी दिवस नुसताच हा नजरेचा खेळ चालू होता. तुझ्या मनातले माझ्याबद्दलची भावना जाणून घ्यायची खूप इचछा होती. खरं तर तुला हे सगळं विचारण्याची मी संधीच शोधत होते आणि आज तू स्वतःच मला प्रपोज केलंस. बस्स यार अब और क्या चाहिये? मला नक्कीच आवडेल तुझी प्रेयसी बनायला. तिच्या होकाराने तोही सुखावला. आता दोघांच्या नजरेत प्रीतीचा पाऊस बरसू लागला. चल निघुयात आपण, मस्त एक लॉन्ग ड्राईव्हला जाऊ, तो बोलला तसे रितू लागलीच हो बोलली.
दोघेही निनादच्या गाडीत बसून प्रेमाच्या वाटेवर सवार झाले. अचानक मेघ दाटूनी मल्हार बरसावा आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसावे तसे ते दोघे आता प्रेमाच्या दुनियेत वावरत होते. तिची ती मोहक झलक निनादच्या काळजांत कट्यार वार करत होती. वाटेत एका निवांत ठिकाणी निनादने गाडी थांबवली. रितुने निनादच्या मनाचा अंदाज बांधला होता. तीही गाडीतून उतरली आणि दोघेही गाडीच्या बाजूला टेकून उभे राहिले. आजूबाजूला एक चिटपाखरूही नव्हते. समोर दूरवर पसरलेली हिरवळ, नुकतेच मावळतीला झुकलेले आकाश, उनाड उड्या मारत सुटलेला सैराट वारा आणि प्रेमाच्या नशेत धुंद झालेले ते दोघे. सांजवेळी रोमांचक घडीला वातावरण कसं अगदी जुळून आलं होते. त्याने हळुवार रितूचा हात हातात घेतला. निनादचा तो कोमल स्पर्श रितूच्या अंगावर रोमांच फुलवत होता. तिने त्याच्या खांद्यावर अलगद डोकं ठेवलं आणि त्याला मिठी मारली. त्याचा हात आता तिच्या कमरेशी घट्ट झाला. रात्रीच्या चांदण्यात अल्लड चंद्राने ढगांमागे लपून चाळे करावे तसे ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले. रितुने मान वळवून निनादकडे नजर फिरवली. त्याने तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटा सावकाश बाजूला करून तिच्या गालावर चुंबन दिले. हळूहळू गालावरचे ओठ तिच्या ओठांवर टेकले तसे दोघांची धडधड वाढली. त्याचा मिठीतला स्पर्श तिच्या सर्वांगावर बहरू लागला. हवेतला गारवा त्या सुंदर क्षणांना थंडावत होता. हा क्षण इथेच थांबावा आणि कधी संपूच नये असा एक विचार रितूच्या मनात डोकावून गेला. इतक्यात तिचा फोन वाजला आणि ती त्या रोमँटिक विचारांतून जागी झाली. फोन उचलून बघितलं तर निनाद कॉलिंग लिहून आलं होतं. ती एकदम घाबरली आणि तिने पुन्हा नीट डोळे उघडून बघितले तर तेच दिसत होते. तिने तो कॉल उचलला तर तिकडून निनादचाच आवाज. अगं तू कुठे आहेस? माझा अक्सिडेंन्ट झालाय. फार काही सिरीयस नाही पण पायाला थोडे फ्रॅक्चर आहे. आता सध्या मी घरी जातोय आपण उद्या भेटू, चालेल ना? काहीतरी बोल ना प्लीज. रितूला काय घडतंय काहीच कळेना. आता तर ते दोघे ड्राईव्हला गेले होते. त्याचा तो स्पर्श, ते चुंबन काहीच सुधरत नव्हतं. काही क्षणातच ती भानावर आली आणि निनादला उद्या भेटू आपण म्हणून फोन ठेवून दिला. मघाशी पलंगावर पडून त्याचा विचार करत असताना तिचा डोळा लागला होता आणि तिने स्वप्नातच निनादचे प्रेम अनुभवले होते. अजूनही त्या चुंबनाचा स्पर्श तिच्या ओठांवर रेंगाळत होता. कपाटाकडे नजर फिरवली तेव्हा तो निळ्या रंगाचा चुडीदार तसाच हँगरला लटकत होता. रितुने स्वतःच स्वप्नाच्या दुनियेत निनादच्या प्रेमाची अशी एक रोमँटिक डेट रंगवली होती.