Poonam Tavkar(Patil)

Tragedy

3  

Poonam Tavkar(Patil)

Tragedy

बुरखा

बुरखा

8 mins
16.3K


सकाळचे ९ वाजले तरी अजून स्टेशनची बस आली नव्हती. मिहीर बराच वेळ बसस्टॉपवर वाट बघत थांबला होता. ८ ची स्टेशनची बस गेली का?; एक नाजूक आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने बाजूला बघितले तर काळ्या बुरख्यामध्ये झाकलेली एक मुलगी त्याला प्रश्न करत होती. नाही, मी पण कधीची वाट बघतोय. ओह्ह गॉड आज पण उशीर, साला आज पण त्याचे ऐकवले लागणार, ती स्वतःशीच बडबडत होती. मिहीरचे सगळे लक्ष आता तिच्यावर केंद्रित झाले होते. बुरख्यामुळे तिचे फक्त डोळे सोडले तर काहीच दिसत नव्हते. तिच्या डोळ्यामध्ये मात्र एक वेगळीच नशा होती. तिची नजर मिहीरला आकर्षित करत होती. बस आली, ती ओरडली. मिहीर एकदम दचकला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने बसकडे धाव घेतली.

गर्दीतून ढकलत का होईना मिहीरला एका पाठीमागच्या सीटवर जागा मिळाली. तो जरा निवांत होऊन बसला. बाजूला वळून बघितले तर तीच बुरख्यातली मुलगी बसली होती. ति मिहीरकडे बघत हसली आणि ती तिच्या मोबाईल मध्ये गुंतून गेली. त्याला तिच्या नजरेवरूनच जाणवले ती हसल्याचे. इकडे तिकडे बघत असताना हळूच एक नजर मिहीर तिच्याकडे बघायचा. उंच बारीक बांधा असलेली ती, त्याला मात्र वेगळीच भासत होती. इतक्यात बसचा जोरात आवाज झाला. ड्रायव्हरने जोरात कचकचून ब्रेक दाबला. कुणीतरी आडवे आले असेल बहुधा. सगळे मागचे लोकं सरसकट पुढच्या लोकांवर आदळले. तिचा मात्र तोंडाला बांधलेला बुरख्याची गाठ सुटली आणि तिची गोरीपान, सुंदर डोळे, टोकेदार नाकाचा शेंडा आणि केशरी लिपस्टिक लावलेले ओठ अशी एक झलक पाहायला मिळाली. मिहीरने त्या वेळेची संधी साधली होती. तिने पुन्हा तोंडाला बुरखा होता तसा नीट बांधला आणि मोबाइलला मध्ये नजर वळवली. मिहीर आता पूर्णतः तिच्या विचारांमध्ये अडकत चालला होता. तितक्यात दोघांनाही एकाच ठिकाणी उतरायचे होते तो स्टॉप आला. कंडक्टरने बेल वाजवली आणि बस थांबली. ती उतरली आणि तिच्या मागून मिहीरहि उतरला. दोघे रस्त्याच्या बाजूने घाईघाईने चालत होते. ती समोरच्या IT पार्क मध्ये असलेल्या पहिल्या बिल्डिंगमध्ये शिरली. मिहीरला पण तिथेच तिसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचे होते. तो तिच्या मागेच चालत होता. हि इकडे कुठल्या कंपनी मध्ये जात असेल या विचारात असताना त्याचे लक्ष घड्याळाकडे गेले. एव्हाना खूपच उशीर झाला होता.

धावत धावतच मिहीरने ऑफिस गाठले. आपल्या ठरल्या जागेवर लॅपटॉप उघडला आणि स्वतःचा दिनक्रम सुरु केला. इमेल्सची मोठी यादी बघून त्याने कॉफीकडे पाठ वळवली. गरम कॉफी चा कप घेऊन पुन्हा जागेवर आला. एकेक घोट घेऊन दिवसभराच्या कामाचे स्वरूप ठरवत होता, पण अचानक नजरेसमोर बुरखावाली मुलगी आठवली. तिचा चेहरा काहीकेल्या डोळ्यासमोरून जात नव्हता. ती खूपच सुंदर होती. कुणीही तिच्या कोवळ्या रूपाच्या जाळ्यात अडकेल इतकी मोहक होती. ती आपल्याला परत दिसायला हवी, लेट्स सी असा मनाचा समाज घालत मिहीरने पुन्हा कामाकडे लक्ष वळवले. दुपारच्या लंच ब्रेकला तो खाली कॅन्टीन मध्ये गेला. जेवण आटपून कॅन्टीनच्या बाहेर फेरफटका मारत असताना त्याचे लक्ष समोरच्या कट्यावर बसलेल्या मुलीकडे गेले. तो आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला. ती तीच बुरखवाली मुलगी होती. निवांत एक सिगारेट फुकत ती उभी होती. तोंडावरचा बुरखा उघडून सिगारेट शिलगावून बेधुंदपणे तो धूर आसमंत सोडत होती. धूर सोडला कि बुरखा झाकून घ्यायची कि थोड्या वेळाने पुन्हा बुरखा उघडून परत पुढची सिगारेट शिलगावयाची. आजूबाजूची पर्वा न करता तिचे फुंकणे सुरु होते. मिहीर हे दृश्य बघून पुरता खजील झाला. त्याचे तिच्याबद्दल असलेले मत आता बदलले. आपल्याला पहिल्यांदा पाहता क्षणीच आवडलेली मुलगी हि अशी सुट्टा मारते हे त्याला कुठेतरी पचायला अवघड जात होते. तो तिथून नाराजीने निघाला आणि पुन्हा स्वतःच्या कामात डोके घालून बसला.

ऑफिसचे सगळे काम आटपून मिहीर घरी जायला निघाला तेव्हा घड्याळाचा काटा ९ वर जाऊन पोचला होता. पुन्हा एकदा रांगेत उभे राहून बस पकडायची आणि घरी जायचे म्हणजे भरपूर उशीर होणार. शी कंटाळा आलाय या रोजच्या रगडलेल्या जीवनाचा, काही वेगळे घडतच नाही इथे. मिहीर मनातच बडबडत निघाला. वैतागलेल्या मनस्थितीत बसची वाट पाहण्याच्या पलीकडे त्याला दुसरा काही इलाज नव्हता. तितक्यात समोरून बुरखावाली लगबगीने येताना दिसली. बस गेली का कुठली आता? तिने मिहीरला विचारले तसे त्याने नकारार्थी मन डोलवली आणि शांत उभा राहिला. तू कुठल्या कंपनी मध्ये काम करतोस. दोघेही समवयीन असल्याने तिने अरेतुर्रेनिच सुरवात केली. काय बिनधास्त पोरगी आहे हि, सिगारेट काय फुंकते, ओळख नसताना माझ्याशी बोलते काय, मिहीरला तिचा हा बेधडकपणा जरा खटकतच होता. थोड्याच वेळात त्यांना अपेक्षित असलेली बस आली. पुन्हा एकदा त्यांना एकाच सीटवर जागा मिळाली होती. त्या दोघांमध्ये वरवरचा वाटणारा संवाद सुरु होता. मिहीर हळुवारपणे तिच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. तिने त्याला स्वतःचे नाव सिमरन असे सांगितले. कुठे राहतो, काय करतो या टिपिकल प्रश्नांची त्यांच्यात देवाणघेवाण झाली. तू सिगारेट ओढतेस? न राहून मिहीरने तिला विचारले. ती क्षणभर बोलायची थांबली. मग त्याला स्मित हास्य करून म्हणाली, मी ओढते पण तू ओढत नाहीस वाटतं. मला हे असलं सगळं नाही आवडत, मिहीरच्या या बोलण्यावर ती मात्र खदखदून हसली जणू काही मोठा जोक झाला असावा. हम्म इनोसंट guy हां, नुसताच शो ऑफ! तिच्या अश्या प्रतिक्रियेवर मिहीरच्या भुवया उंचावल्या. तो रागाने म्हणाला, मी तसा मुलगा नाही. तो भलताच तिच्यावर उचकला. ती मात्र शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली. बस स्टॉप आला आणि ते दोघे उतरले. जाताना एकवार दोघांची नजरानजर झाली आणि आपापल्या वाटेला ते चालते झाले.

ती आता बऱ्याचदा मिहीरला दिसायची कधी बस मध्ये तर कधी कॅन्टीनच्या भोवती. सिमरन स्वभावाने त्याला जरी खटकत असली तरी मनाने हवीहवीशी वाटत होती. कधीतरी वाटायचे बोलावे तिच्याशी पण तिची सिगारेट त्यांच्या मध्ये धूर पेटवत होती. अचानक एका दिवशी त्यांची पुन्हा बसमध्ये गाठ पडली. दोघेही एकाच सीटवर नुसतेच बसून होते, तितक्यात मिहीरला ती सॉरी बोलली. त्या दिवशी मी तुला तसे बोलायला नको हवे होते. माझीच चूक झाली. मिहीर पण आता बोलता झाला. इट्स ओके, खरे तर मीच तो विषय काढायला नको होता. दोघेही नजरेतूनच हसले. त्यांच्या मैत्रीला आता नवीन पालवी फुटू लागली. ऑफिस आणि बस यापलीकडे असलेली त्यांची मैत्री आता सोसिअल मीडिया, फोन मेसेजवर रुजू लागली. मिहीरला सिमरन आवडत होती. तिलाही त्याची साथ हवी होती. एक दिवस त्यांनी ऑफिसनंतर कॅफेमध्ये भेटायचे ठरवले. ठरल्या ठिकाणी दोघेही भेटले आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. सुरवातीला इकडंतिकडच्या गप्पानंतर टॉपिक पर्सनल लेवलवर वळला तसा सिमरनचा मूड बदलला. गोंडस चेहऱ्यावर आता नाराजीची छबी उमटली. मिहीरने त्याच्या बद्दलची सगळी माहिती तिला दिली. आता सिमरनची वेळ होती तेव्हा मात्र तिने टॉपिक बदलायचा प्रयत्न केला. सिमरनची दुखरी नस मीहिरला शोधून काढायची होती आणि म्हणूनच त्याने तिला विश्वासात घेऊन बोलते केले. सिमरनला सगळीच मुले एकसारखी मतलबी वाटत असली तरी मिहीरबद्दल वेगळाच आपलेपणा जाणवत होता. कदाचित हा मुलगा आपल्याला खरंच समजू शकेल असे तिला वाटत होते आणि म्हणूनच तिने त्याला सगळं खरा काय ते सांगायचे ठरवले.

मी इथे पुण्यात एकटीच पेयिंग गेस्ट म्हणून राहते. नवीनच आहे हे शहर मला. गावाकडे फक्त माझी अम्मी असते एका छोट्याश्या घरात. घर कसले, ते तर एक कैदखाना आहे. कित्येक वर्ष त्या बंद खोलीच्याआत अम्मीच्या किंकाळ्या बंदिस्त आहेत. माझ्या अम्मीने घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन एका मुलाबरोबर लग्न केले. त्याने या गावात अम्मीबरोबर संसार थाटायचे खोटे स्वप्न तिला दाखवले. लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस ती मनसोक्त जगली. तो दिवसभर घरीच असायचा तिच्या शरीराचा आनंद लुटत. तिलाही त्याचा स्पर्श हवाहवासा वाटे. अम्मीने घरातून पळताना स्वतःबरोबर काही पैसे घेतले होते त्यावर त्यांचे पोट कसेबसे भरायचे. अम्मीने कामाचा विषय काढला कि तो खोटी करणे देऊन तिला विश्वासात घ्यायचा आणि पुन्हा त्या दोन शरीरांचा खेळ सुरु व्हायचा. एक दिवस मात्र सगळे पैसे संपले आणि तो कामासाठी म्हणून घराबाहेर पडला. जाताना त्याने अम्मीला खोलीत ठेवून बाहेरून कुलूप लावून गेला. आजूबाजूची वस्ती तशी चांगली नसल्या कारणाने तिनेही स्वतःला आत बंद करून घेतले. २-३ दिवस झाले तरी तो काही परतला नाही. अम्मी वेड्यासारखी त्या खोलीच्या दाराकडे डोळे लावून वाट बघत होती. पोटात अन्नाचा घास नव्हता त्यामुळे भुकेनी पुरती व्याकुळ झाली होती. नुसतीच पलंगावर अंग टाकून त्याच्या खोट्या आशेवर जिवंत होती. त्या एका रात्री तिचा डोळा लागला असताना अचानक खोलीचे दार उघडण्याचा आवाज झाला. तिने आवाजाच्या दिशेने नजर फिरवली असताना त्या काळ्याकुट्ट अंधारात एक पुरुषी आकृती तिच्याजवळ येताना दिसली. तिला वाटले तिचा असीम परत आला म्हणून ती वेडी त्या आकृतीच्या मिठीत सामावली. पण दुसऱ्याच क्षणी तिला कळून चुकले कि तो असीम नव्हता, कोणीतरी दुसरा पुरुष तिला घाणेरडा स्पर्श करत होता. कोण होता तो? ती घाबरली आणि जोरात ओरडू लागली पण घश्यातुन आवाज फुटत नव्हता.

अशक्तपणानी तिच्या शरीराची हालचाल होत नसल्याने ती त्याला झिडकारू शकली नाही. तो नराधम तिला नको नको त्या ठिकाणी स्पर्श करत तिच्या अंगाची लक्तरे तोडत होता. त्या स्पर्शाची तिला घृणा वाटत होती पण काहीकेल्या ती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवू शकली नाही. वासनेच्या आहारी गेलेला तो राक्षस तिच्या सर्वांगाशी खेळत होता. होत्याचे नव्हते झाले आणि त्याने तिची अब्रू लुटली. आता आपली यातून सुटका नाही या विचाराने ती नुसतीच पडून राहिली. त्याच्या हिंसेला बळी पडलेली ती अनंत यातनांनी विव्हळत होती पण त्याने स्वतःची हवस पूर्ण होईपर्यंत तिच्या शरीराचा खुळखुळा केला. त्याचे काम झाल्यावर तो हसतच तिथून निघून गेला. जाताना मात्र तिला बोलला, माल अच्छा दिया सालेने पुरा पैसा वसूल. अम्मीला खूप मोठा धक्का बसला जणू काही तिच्या पायाखालून जमीन सरकावी आणि आकाश फाटून वीज कोसळावी तसाच भास झाला. तिच्या अस्तित्वाचे धिंडवडे उठले होते. एका क्षणात हे इतके विपरीत घडले कि तिच्या कोवळ्या देहाची आणि नाजूक मनाच्या लाह्या झाल्या होत्या. सगळं शरीर वेदनांनी जड झालं होतं. स्वतःचे शरीर कसेबसे सावरून ती उठली आणि पलंगाच्या बाजूला असलेली खिडकी उघडली. आजूबाजूला खूप विचित्र लोक दिसत होते, पैश्यानी शरीर विक्री करणारे. अम्मी रोज तिथून बाहेर पडायला मार्ग शोधत होती पण कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून होते. नंतर तिला दिवस गेले आणि पोटातल्या बाळासाठी तिने हा मार्ग स्वीकारला. तीचा असीम तिला धंद्याला लावून स्वतः फरार होता. रोज कोणीतरी परका पुरुष त्या खोलीत येऊन तिच्या शरीरावर पैसे मोजत होता. अम्मीने हे सगळं माज्यासाठी सहन केले. मी त्याच खोलीत लहानाची मोठी झाले. तिला मनुष्यरूपी गिधाड आपल्या मुलीवर कधीही झडप घालेल कि काय अशी भीती वाटायची, म्हणून जशी मी मोठी झाले मला सगळ्या गोष्टीत कळू लागल्या तसे तिने मला कॉलेजच्या हॉस्टेल वर ठेवण्याची सोय केली. तिला मला या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर ठेवायचे होते. एक दिवस बुरख्याचा सहारे तिने मला खोलीतून बाहेर काढले आणि गावाबाहेर असलेल्या कॉलेज हॉस्टेलवर रवाना केले. त्यानंतर मी गावी कधीच परतले नाही, अधून मधून अम्मीच मला भेटायला यायची. मी न डगमगता परिस्थितीशी झुंजले पण अम्मीची आठवण आली कि खूप रडायचे. हातातल्या सिगारेटनि मनातल्या जखमेवर फुंकर मारायचे.

सिमरनच्या शब्दांची जागा आता डोळ्यातल्या अश्रुनी घेतली होती. मिहीर एकटक तिच्याकडे पाहत होता, तिची कहाणी ऐकून त्याच्याही डोळ्यात पाणी आले. बोलायला तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते. तीचा हात आपल्या हातात घेऊन त्याने तिला धीर दिला. बुरख्याच्या आत त्याला आता वेगळीच सिमरन दिसत होती. त्याने विचार केलेल्यापेक्षाही वेगळी. सिमरनच्या बाबतीत त्याचा अंदाज चुकला होता. ती मात्र आता खंबीर वाटत होती. डोळ्यातल्या अश्रूंमध्ये अन्यायाची चीड होती. मिहीरने दिलेल्या धीराने ती सावरली. चेहऱ्यावरचे हावभाव नीट करून म्हणाली, आता मला चांगली नोकरी करून खूप पैसा कमवायचा आहे. त्या भयाण वासनेच्या जगातून अम्मीला बाहेर काढायचय. स्वतःचे घर घेऊन अम्मीला तिथे खूप सुखी ठेवायचे आहे. सिमरनच्या डोळ्यात आता नवीन झलक दिसली. बाजूला ठेवलेला बुरखा पुन्हा अंगावर चढवून ती म्हणाली, चल निघुयात आपण उशीर होतोय घरी जायला. मिहीरही तिच्याबरोबर निघाला. दोघेजण आता मैत्रीच्या एका वेगळ्या वाटेवर एकत्र चालत होते.


Rate this content
Log in