Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Poonam Tavkar(Patil)

Inspirational


3  

Poonam Tavkar(Patil)

Inspirational


कातरवेळ

कातरवेळ

12 mins 16.7K 12 mins 16.7K

संद्याकाळचे ६ वाजले होते. हळूहळू सगळीकडे अंधार पडत चालला होता. रमेश त्याच्या आई बाबांबरोबर गावी चालला होता. पुण्यापासून ८ तासाच्या अंतरावर त्यांचे गाव होते. सकाळी सुरु झालेला प्रवास आता काही अंतराचा उरला होता. जसजसे त्याचे गाव जवळ येऊ लागले तसा त्याचा प्रवासातला क्षीण दूर होऊ लागला. गावाच्या दिशेने रमेशने गाडी वळवली आणि गाडी धूर उडवत वेग घेऊ लागली. गावाच्या कच्या रस्तावर म्हणावी तशी रहदारी नव्हती. साधारण ३ वर्षे रमेश गावाकडे फिरकला नव्हता. इंजिनीरिंग संपल्यावर लंडनला २ वर्षे तो नोकरीला होता. आज बऱ्याच दिवसांनी गावाकडे येण्यासाठी त्याचे मन आतुर झाले होते. गावाचे बदलेले स्वरूप तो बारकाईने बघू लागला. गार वारा आणि सभोवतालचा हिरवागार पसरलेल्या परिसराने वातावरण प्रसन्न झाले होते. गाडी चालवत असताना त्याचे लक्ष रस्त्याच्या बाजूने लांब चालत जात असलेल्या मुलीकडे गेले. डोक्यावर काठ्यांची मोळी घेऊन चालत जात असलेल्या त्या पाठमोऱ्या आकृतीने त्याचे मन वेधून घेतले. कमनीय बांधा आणि पाठीवर भुरभुरणारे तांबूस केस इतके मोहक होते कि जणू एखाद्या चित्रकाराने रेखाटलेले दृश्यच ते भासत होते. त्या दृश्याकडे रमेश इतका गुंतून गेला कि गावाची वेश ओलांडून तो गावात कधी शिरला ते कळलंच नाही. आता मात्र ती आकृती दिसेनाशी झाली. रमेश त्याच्या गावातल्या घरासमोर पोचला तसे दारात काही घरातली मंडळी स्वागतासाठी उभीच होती. रमेशच्या चुलत भावाचे लग्न होते. घरात लग्नकार्य असल्याने सगळीकडे लग्नाची तयारी सुरु होती. बायकांची आदबीने लगबग सुरु होती.

रमेश थोड्याच वेळात फ्रेश होऊन गच्चीत जाऊन बसला. सगळी भावंडे त्याच्याभोवती घोळका करून बसले. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. रमेश त्याचे लंडनमधले किस्से सांगत होता. त्या सगळ्या भावंडांची मस्ती सुरु होती. रमेशही त्यांच्यात सामील होता पण मधेच त्याचे मन कुठेतरी अजूनही त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीमागे भरकटत होते. थोड्या वेळानी सगळी भावंडं जेवण आटपून गल्लीत फेरफटका मारायला निघाले. पोरांनो जास्त लांब जाऊ नका, आबांनी हुकूम सोडला. आबा पाटील म्हणजे रमेशचे काका, गावचे पाटील असल्याकारणाने गावात त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. सगळी भावंडे गप्पा मारत खिदळत चालली होती. एक गल्ली सोडून ती दुसऱ्या गल्लीत शिरली. रमेश चांदण्या रात्रीतल्या गावाचा नजराणा अनुभवत चालला होता. चालत असताना त्याची नजर लांब गावातल्या वेशीपाशी असलेल्या घराकडे गेली. लांबून तरी घर अगदी छोटे भासत होते. तिकडे फारसं बघू नको भूत राहतंय तिथं,जितू बोलला. जितू रमेशचा चुलत भाऊ होता. गावातच राहत असल्याने त्याने रमेशला सावध केले. भुताचेपण घर असत का मला तर वाटले भूत फक्त झाडावरच राहते, रमेश हसत हसतच बोलला. त्यावर जितू मात्र चिडला. थोड्या रागाच्या स्वरातच रमेशला त्या घराबद्दल सांगू लागला. त्या घरात खरंच भूत हाय म्हणून तिकडं कोणीबी जात न्हाय. गावानं त्यांना टाकून दिलाय. रात्रीचं तर अजाबात तिकडे फिरकायचं न्हाय. जे पण तिकडं जातंय त्यांचं वाईट होतंय बघ. जितू मोठया आवेशाने रमेशला सगळे सांगत होता आणि बाकीचे भावंडेपण त्याच्या बोलण्यात सामील होत होती. रमेश मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्या घराकडे बारकाईने बघत होता. ते बघून जितूने सगळ्यांना परत फिरण्याचा इशारा केला तसे ते सगळे घराकडं परतले. घरी येऊन बाकी सगळेजण झोपी गेले पण रमेश मात्र घडल्या प्रकारचा विचार करत होता. गावात शिरताना पाठमोरी दिसलेली ती आकृती आणि ते वेशीजवळचे घर त्याच्या नजरेसमोरून जात नव्हते. प्रवासात दमून गेल्याने थोड्या वेळातच त्याचा डोळा लागला.

सकाळच्या सूर्यनारायणाच्या आगमनाने रमेशला जाग आली. पक्ष्यांची किलबिल आणि सूर्याची किरणे त्याच्या मनाला आल्हाद देणारे होते. सकाळी नाश्ता करून रमेशचा शेतावर जाण्याचा बेत होता. जितू आणि रवी त्याच्यासोबत जाणार होते. रवी जितूचा खास दोस्त होता. जितूच्या लग्नासाठी तो शहरातून गावात परतला होता. शेताची वाट तशी छोटी होती. वेडीवाकडी वळणाची वाट तुडवत सगळेजण गावाचे किस्से रंगवत चालले होते. वाटेवरूनच लांब ते भुताचे घर दिसत होते. रमेशची नजर काहीकेल्या त्या घराचा पाठलाग सोडत नव्हती. त्या घरात कोण राहतं, रमेशनं विषयाला सुरवात केली तसा जितूचा चेहरा पडला. तूला कशाला पाहिजं ते सगळे? तू फक्त मजा कर इथं, जितूने रमेशची समजूत घातली. पण रमेश ते जाणून घेण्याचा अट्टाहास करू लागला. शेवटी जितूने त्या घराबद्दल सांगायला सुरवात केली. त्या घरात एक पोरगी राहते. कोमल तिचं नाव. दोन वर्ष झालं तिच्याशी कोणीबी बोलत न्हाय. एका कातरवेळी सम्दे गावकरी घरात परतलं व्हतं आणि अचानक त्या घरातून जोरात ओरडायचा आवाज आला. गावची लोकं त्या दिशेने पळाली. विमलिची बहीण कोमल जोरजोरात रडत व्हती. तिथं जाऊन बघितलं तर घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत विमालिचं प्रेत तरंगत होतं. त्या दिवसापासून तिच्या भुताचा वास हाय बघ तिथं. कोणीबी तिकडं गेलं कि त्याचं वाटोळं व्हतंय. तिच्याकड बघायच पण न्हाय नाहीतर भूत पछाडतंय. समद्या गावाला झपाटलंय त्या भुतानं. जितू जे बोलत होता ते रमेश शांतपणे ऐकत होता. शेतात थोडा वेळ घालवून सगळी जेवायला घरी परतली. रमेशच्या डोक्यात भुताचे विचार सुरु होते. संध्याकाळच्या वेळेला रमेश एकटाच गल्लीत भटकायला निघाला. फिरत फिरत तो त्या घराजवळ पोचला. रमेशनी एकवार तिकडे नजर टाकली आणि घराबाहेर असलेल्या झाडाजवळ त्याला पाठमोरी आकृती बसलेली दिसली. तो तिच्याजवळ जाऊ लागला तसे ती मुलगी स्पष्ट दिसू लागली. नाजूक चेहऱ्याची गोंडस दिसणाऱ्या तिची रमेशला दया आली. मनातून त्याला वाटले तिच्याशी जाऊन बोलावे म्हणून बाकी कसलाही विचार न करता तो तिच्याजवळ गेला. त्याला बघून ती उठली आणि घराकडे जात असताना रमेशने तिला आवाज दिला. तिने रागाने मागे वळून बघितले. मला तुझ्याशी बोलायचं आहे, रमेश म्हणाला. तसे ती जोरात चिडून म्हणाली निघून जा इथून. रमेश पुन्हा तिच्याजवळ जाऊ लागला पण अचानक त्याचा पाय घसरून तो खाली पडला. स्वतःला सावरून तो उभा राहिला पण क्षणभर त्याला काहीच सुधरेना. आपल्याला कोणीतरी मागून ढकलले म्हणून त्याने मागे वळून बघितले तर कोणीच नव्हते आणि समोर ती मुलगीही नव्हती. मग आपल्याला धक्का कोणी दिला? या विचारात असतानाच त्याला मुलीच्या आवाजातली किंकाळी ऐकू आली. तो आवाज त्या घराजवळच्या विहिरीमधून आल्यासारखा भासला. आता मात्र रमेश जरा बिथरला आणि काळोखही खूप झाला होता. त्याने झपाझप आपली पावले घराच्या दिशेने वळवली. चालताना त्याला जितूचे शब्द आठवत होते, तिकडे जाऊ नको असंही तो म्हणाला होता. काहीतरी विचित्र घडत होते हे नक्की पण नेमके काय ते कळायला मार्ग नव्हता. वाटेत त्याला रवी भेटला. रमेशच्या पायाला रक्त आलेले बघून रवीने विचारपूस केली पण आपण सहज फिरत असताना पाय घसरून पडलो आणि पायाला लागले एवढच रमेश बोलला. त्याचा चेहरा बघून रवीला थोडी शंका आली पण काही न बोलता रमेशचा हात धरून तो त्याला घरी घेऊन गेला. ती रात्र नेमके काय घडले याचा विचार करतच सरून गेली.

रात्री झोपेत अचानक रमेशला स्वप्नात त्या मुलीच्या किंकाळीचा आवाज आला आणि तो हडबडून जागा झाला. रात्रीचे ३ वाजले होते. ते घर आणि ती मुलगी काही त्याचा पिच्छा सोडत नव्हते. तो उठला आणि सरळ त्या घराच्या दिशेने चालू लागला. काळोखात आजूबाजूचे काही स्पष्ट दिसत नव्हते पण त्या घरात मात्र एक मिणमिणता दिवा पेटत होता. त्या दिव्यात कोणाच्या तरी सावलीची हालचाल होत असल्याचे भासले. रमेश अगदी सावध होऊन त्या दिशेने वाटचाल करत होता. घराजवळ पोचताच त्याला एक भयाण शांतता जाणवली. तो आता घराचे दार वाजवणार इतक्यात विहिरीमधून पुन्हा ती किंकाळी ऐकू आली. रमेश क्षणभर थोडा घाबरला पण आता या सगळ्याचा आपण सोक्षमोक्ष लावायचा असे त्याने ठरवले. तो त्या विहिरीकडे गेला आणि हळूच वाकून बघितले तर त्याला कोणीच दिसले नाही. तो घराकडे वळला इतक्यात पुन्हा त्याच कर्कश आवाजाने त्याला कानठळ्या बसल्या. थोडा वेळ थांबून विहिरीत बघितले तेव्हा झाडाची सावली सोडली तर काहीच दिसत नव्हते. इतक्यात आपल्या मागे कोणीतरी उभा असल्याचा भास त्याला झाला म्हणून मागे वळून बघितले तर तिथेही कोणीच नव्हते. आता मात्र त्याला घाम फुटू लागला. भीतीने अंग थरथरत होते. त्याने एकदा सभोवताली नजर फिरवली पण आजूबाजूला कोणीच नव्हते. तो परत फिरला तेव्हा घरात कोणाचीतरी हालचाल जाणवली. रमेश ते बघायला घराकडे वळला. घराचं दार आता उघडले होतं. आत मध्ये एका भिंतीला टेकून डोके खाली घालून ती बसली होती. त्याने तिला हाक मारली. मला तुझ्याशी बोलायचे आहे, प्लिज तू ऐकून घे अशी तो विनंती करू लागला. इतक्यात त्याला कोणीतरी घरात ढकलले आणि दार बंद झाले. आता घरात फक्त रमेश आणि ती असे दोघेच होते. रमेशची भीतीने पळता भुई झाली. ती शांत बसून होती. आपल्या अंगातले सगळे बळ एकटवुन तो उठून बसला आणि त्याने घाबरतच तिच्याशी बोलायला सुरवात केली. तू नक्की कोण आहेस आणि हे सगळे काय होतंय असे रमेश बोलला इतक्यात तिने मान वर करून रमेशकडे बघितले. तिचे ते भयानक रूप बघून तो प्रचंड घाबरला. त्याचे हात पाय लटपटत होते. सगळ्या अंगाला घाम फुटला होता. ती विचित्र आवाजात बोलत होती. तू परत इथे आलास, आता तुला मी सोडणार नाही म्हणत ती जोरात ओरडली. तो आवाज त्या विहिरीतल्या किंकाळीसारखा होता. रमेशला आता कळून चुकले होते कि जे जितू बोलत होता ते खरे होते. तो कसाबसा धीर धरून तिला बोलला, मी तुला मदत करायला आलोय. ती मात्र डोळे वटारून त्याच्याकडे पाहत होती. त्याने बोलणे सुरु ठेवले. काही करून आपला जीव वाचवायचा प्रयत्न तो करत होता. ती रमेशजवळ येऊ लागली तितक्यात त्याने तिला विचारले, तुला काय हवंय? मी मदत करेन तुला. ती मात्र त्याच्या अजून जवळ आली आणि मान वाकडी करून तिने रमेशला दाराच्या दिशेने जोरात ढकलले. तिच्या तावडीतून रमेशला कसे सुटायचे काहीच सुधरत नव्हते आणि आता तर त्याच्या शरीरालाही इजा पोचली होती. आता घाबरून काही चालणार नाही, बेडरपणे तिचा सामना केला तरच आपण जिवंत राहू हे त्याला उमगले. मी तुला खरंच मदत करेन पण तु मला काय घडले ते सांग. या घरात नेमके काय घडले? तुझ्या बहिणीन विहिरीत उडी का टाकली? हे ऐकून मात्र ती खूप चिडली. मी उडी नाही टाकली, मारून टाकले मला विहिरीत. तू काय मदत करणार मला, एका कातरवेळी माझी अब्रू लुटली. रमेशला हे ऐकून मात्र धक्का बसला. तीचा आवेश घडला प्रकार सांगू लागला. त्या वेळेला मी घराबाहेर कसलातरी आवाज झाला म्हणून घरातून बाहेर पडले तर मला या घरामागच्या आमच्या शेताची तीन मुलं नासधूस करताना दिसली. त्यांना जाब विचारायला म्हणून मी तिथे गेले तर त्या क्रूर मुलांनी मला घेरून माझा छळ करायला सुरवात केली. त्यांनी मला घराबाहेर काढण्यासाठी तो डाव रचला होता. सारे गाव घरात असताना त्यांनी माझी अब्रू लुटली. माझ्या किंकाळ्या कुणालाही ऐकू जाऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली. नंतर त्यांची हवस पूर्ण झाल्यावर माझा गळा दाबून मला मारून टाकले. नुसते यावर न थांबता त्यांनी माझे प्रेत विहिरीत फेकून दिले.

इतका धक्कादायक प्रकार ऐकताना रमेश स्वतःच्या वेदना पूर्णतः विसरून गेला. तो काही बोलणार इतक्यात ती भोवळ येऊन खाली पडली. रमेशनि तिला पटकन सावरून उठून बसवले. ती काही क्षणातच भानावर आली. आपल्याला काय झाले आणि अचानक हे कोण आपल्यासमोर उभे आहे हे तिला सुधरत नव्हते. रमेशनि काय झाले ते व्यथित केल्यावर ती स्वतःच्याच ओंजळीत डोके घालून रडू लागली. तिला आता रमेशच्या आधाराची गरज होती. काय चूक होती माझ्या बहिणीची? केवळ दिसायला सुंदर असणे हा कुणाला शाप ठरू शकतो का? आणि इतका अन्याय होऊनही ती मुले गावात मोकाट हिंडत होती. त्यांच्यापैकी दोघांना त्याची शिक्षा मिळाली पण एक अजूनही मोठेपणाचा आव आणून भटकतोय. त्या देशमुखाचा पोरगा आहे तो. त्याच्या बापाने हे प्रकरण पैशाच्या जोरावर गुंडाळून पोरांना मोकळे केले. गावातल्या कुणालाच याची खबरबात नाही. सगळीकडे विमल विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याचे नाटक रंगवले. कोमलला बोलता बोलता रडू कोसळले. बाकीच्या दोघांचे काय झाले? रमेशनि तिला विचारले. विमलचा आत्मा ती मेल्यापासून भटकतोय इथेच. त्यांच्यातल्या एकाला ती आमच्या शेताला लागून असलेल्या झाडाखाली बसलेली दिसायची. त्याचे शेत आमच्या शेतजवळच होते. एक दिवस कातरवेळी पाणी घालायला म्हणून तो शेतात आला आणि तिथे तिच्या भुताला बघून त्याची बोबडी वळाली. तिथून पसार होताना भुताला जवळ आलेले बघून जागीच खल्लास झाला. आणि दुसरा घराजवळून जात असताना कातरवेळी विहिरीत किंकाळी ऐकून घाबरून पळून जात होता. जाताना रस्त्याच्या बाजूला दगडावर जोरात आपटून तिथेच मेला. पण तो हरामखोर रवी अजूनही जिवंत आहे. हे असे बघून देशमुखाने त्याला गावाबाहेर शहरात पाठवले. त्याचा बदला घेतल्याशिवाय विमल शांत होणार नाही. तिच्यावर अन्याय झालाय म्हणून ती माझ्याजवळही कुणाला येऊ देत नाही आणि कुणी जर इथे भटकलेच तर तो संपलाच म्हणून समजायचे. ती गेल्यापासून माझे सगळे जगच हरवलंय. गावाने वाळीत टाकले, बोलायला कोणी नाही, दुःख हलके करायलाही कोण नाही. फक्त शरीराने आता मी जिवंत आहे नाहीतर मनाने तर विमल गेली तेव्हाच मेले मी. कधीतरी तिला न्याय मिळेल आणि मीहि यातून मुक्त होईल एवढ्याच आशेवर मी जिवंत आहे. आज तू जर मदतीचा हात पूढे केला नसता तर तिने तुलाही सोडले नसते.

रमेशला कोमलच्या डोळ्यातले दुःख पाहवत नव्हते. काही करून आपण तिला मदत करायची असे त्याने ठरवले. त्याने त्याबद्दल तिला आश्वासन दिले आणि तिथून तो जखमी अवस्थेतच निघाला. एव्हाना पहाटेचा सूर्य आकाशात डोकावत होता. वाटेत थोड्या अंतरावरच त्याला जितू आणि रवी भेटले. रमेश खोलीत नाही हे बघून ते त्याला शोधायला निघाले. संध्याकाळी पायाला लागलेला प्रकार रवीने जितूला सांगितला होता आणि त्यावरूनच त्यांनी पुढचा अंदाज बांधला. त्यांना शंका आलीच होती कि रमेश त्या भुताच्या घराजवळ जाणार म्हणून ते लागलीच तिकडे निघाले. रमेश आणि त्यांची गाठ पडली तेव्हा रमेशची अवस्था बघून जितू दचकलाच. कुठं गेला व्हतास आणि हे कसं काय झालं, जितूने जाब विचारला. मी त्या भुताच्या घरात गेलो होतो. विमलबरोबर जे काही घडलं ते सगळे मला आता कळलंय. हे ऐकताच रवी घामाघूम झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे चिंतीत हावभाव रमेशनी ओळखले. काय कळलंय तुला? जितूने विचारले तसे रमेश म्हणाला रवीच सांगेल आपल्याला आता काय घडलंय ते. रवी आपल्याला यातले काहीच माहित नाही असंच वागत होता पण रमेशनी त्याला बजावले. जे काही असेल ते खरे सांग आणि तुझा गुन्हा कबूल कर नाहीतर ते भूत तुला सोडणार नाही. मी स्वतःच्या डोळ्याने बघून आलोय ती तुझ्या शोधात आहे. बाकीच्या दोघांना तिने तेव्हाच शिक्षा दिली पण तुझ्या वडिलांमुळे तू वाचलास. या वेळेला ती तुझा सूड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणूनच तू स्वतःच तुझा गुन्हा कबूल कर. जे काही घडले ते पोलिसांना सांग. जितू हे सगळे ऐकत होता पण त्याला यातले सगळेच विचार करण्याच्या पलीकडे होत. रमेशच्या बोलण्यावर रवी घाबरून रडायला लागला. ती मला मारून टाकणार, मी आता संपलो. उगाचच मी त्या दोघांच्या नादी लागून तिची अब्रू लुटली. हे ऐकून जितू भयानक उचकला. त्याने रव्याची कॉलर पकडली आणि त्याला ओढत घराकडे नेलं. रवी त्यांच्यासमोर रडत गयावया करत माफी मागत होता. जितूने रव्याला आबांच्या समोर नेऊन उभे केले. घरातली सगळी मंडळी जागी झाली होती. रमेशला जखमी अवस्थेत बघून घरचे भलतेच घाबरले. पोरांनो कुठं गेला व्हता? आणि हे काय लागलय रमेश तुला? आबांचा रोष दिसून येत होता तेव्हड्यात जितू रव्याला उद्देशून म्हणाला, याला विचारा हाच सांगेल सगळं. रवीने लगेच आबांचे पाय धरले आणि विमलबरोबर जे काही घडले ते सर्व कबूल केले. आपल्या बापाने गावच्या पोलिसाला पैसे देऊन हे प्रकरण मिटवलाच्ये त्याने सांगितले. सगळं ऐकून आबा प्रचंड खवळले आणि त्यांनी ताबडतोब पंचायतीची बैठक बसवली. देशमुखहि त्यामध्ये हजर होतेच. रमेशने सगळ्यांसमोर जे काही घडले ते निर्धास्तपने सांगितले. आबांनि रवीच्या कबुलीवरून सगळ्या प्रसंगाची शहानिशा केली. आबा गावाचे पाटील असल्याने त्यांच्या पुढे देशमुखाचे फासे फिके पडले आणि त्यांनीही आरोपाची कबुली दिली. देशमुख आणि रवीला अटक झाली. सगळा प्रकार गावकऱ्यांना कळल्यावर त्यांनी कोमलची माफी मागितली. तिच्या डोळयात आनंदाश्रू वाहत होते. तिने रमेश आणि आबांचे आभार मानले. आता विमलला न्याय मिळाला होता. त्या दिवशी रात्रभर रमेश कोमलचा विचार करत होता. कधी एकदा सकाळ होते आणि आपण कोमलला भेटतो असे त्याला झाले. तिला या सगळ्यांमधून मुक्त होऊन हसताना त्याला बघायचे होते.

सकाळ झाली तशी तो कोमलला भेटायला तिच्या घरी निघाला. वाटेत फक्त नि फक्त कोमलचा गोंडस चेहरा त्याच्या नजरेसमोर फिरत होता. तो तिच्या घरापाशी गेला तेव्हा घर बंद होते. त्याने कोमलला आवाज दिला पण तिने काही दार उघडलेले नाही म्हणून त्याने खिडकीतून डोकावून बघितले. आत कोमलला त्या अवस्थेत बघून तो बिथरला. क्षणभर तसाच उभा राहिला. काय करायचं काहीच सुचले नाही. त्याला खूप मोठा धक्का बसला होता आणि त्यामुळे त्याची वाचा अडखळत होती. तो तिथेच बसून विचार करू लागला, कोमलने असे का केले? आता कुठे सगळे काही नीट झाले असताना तीने स्वतःला गळफास का लावून घेतला. अनेक विचारांनी त्याचे मन बधिर झालं होते. तो तसाच फिरला आणि शांतपणे घराच्या दिशेने चालू लागला. आजूबाजूला गावाची बरीच लोकं जमली होती. सगळीकडे तिच्या मृत्यूची खबर पसरली. दोन दिवसांनी घरातले लग्नकार्य आटपून तो पुण्याला जायला निघाला. सगळ्यांचा निरोप घेऊन गावाबाहेर पडत असताना त्याने कोमलच्या घरावर नजर टाकली. ते आता कायमचे बंद होते. आता तिथे कुठल्याही भुताचा वास नव्हता ना विहिरीतली किंकाळी ऐकू येत होती. विमलच्या मृत्यूचे रहस्य तर रमेशनी उलगडले पण कोमल मात्र त्याच्या आठवणीत एक रहस्य बनून राहिली.


Rate this content
Log in

More marathi story from Poonam Tavkar(Patil)

Similar marathi story from Inspirational