Poonam Tavkar(Patil)

Romance

2.8  

Poonam Tavkar(Patil)

Romance

आज्जीचा मित्र

आज्जीचा मित्र

8 mins
16.1K


रेवा अगं उठ लवकर, किती वेळ झोपणार आज? आईला रेवाला उठवायला आज जास्त प्रयत्न नाही करावे लागले नाहीत. कारणही तसे खासच होते. रेवा काही क्षणातच उठून तयार झाली. आईने गरम गरम नाश्ता तयार ठेवलाच होता टेबलवर तो खाऊन ती निघाली. आई येते ग म्हणून रेवाने स्कुटीला किक मारली. हळू जा ग, खूप जोरात पळवू नको ह गाडी, आईचे बोलणं पूर्ण होईपर्यंत रेवाची स्कुटी धूर सोडत निघून गेली. रेवा एका कॅफेमध्ये पोचली. तिकडे तिचा ग्रुप तिच्याआधीच येऊन बसला होता. रेवाही लगबगीने त्यांच्यात जाऊन सामील झाली. चला मॅडम आज लवकर पोचल्या, ग्रुपमधील एकाने टोमणा मारला आणि सगळे खिदळू लागले. हम्म! रेवा एक कटाक्ष टाकत त्यांना म्हणाली, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे यार. चला कामाला लागूयात. वेळ वाया नको घालवायला. चल बोल मग आता काय काय करायचं बाकी आहे?, समीरने विचारलं. मी केकची ऑर्डर दिलीये, मी डेकोरेशनचे सगळे बघितलंय, मी केटरिंगचे बघतो, ग्रुपमधले प्रत्येकजण काही ना काहीतरी कामगिरी बजावत होते. अरे वाह्ह सगळी तयारी झालीच ना मग, रेवा खूष झाली आणि म्हणाली. ग्रेट मी सरप्राईज गिफ्ट आणले आहे. संध्याकाळी फुल्ल धमाल करूयात आपण. तुम्ही सगळे वेळेवर पार्टीला हजर राहा. मी पण आज्जीला घेऊन येतेच त्या वेळेला. आज्जी किती खूष होईल सरप्राईज पार्टी बघून. आय एम व्हेरी डेस्परेट टू सी हर हॅपी फेस, रेवा आनंदाने पार्टीच्या विचारांत रमली होती. ए पण तू काहीतरी विसरतीयेस, तू आम्हाला प्रॉमिस केले होतंस ना कि तू आज्जीची स्टोरी सांगणार म्हणून, ग्रुपमधील कानन रेवाला उद्देशून बोलली. हो आहे लक्षात माझ्या, आज मी तुम्हाला सांगतेच ती स्टोरी असं म्हणत रेवाने त्यांना स्टोरी सांगायला सुरवात केली.

आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. माझ्या आज्जीची अनिव्हर्सरी आहे ना. पण हि काही टिपिकल वेडिंग अनिव्हर्सरी नाही. यामागची कहाणी जरा वेगळीच आहे. माझी आज्जी म्हणजे सुधा दिवेकर एक प्रेमळ आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व आहे. ती जरी जुन्या जमान्यात जन्मली असली तरी विचारांनी मॉडर्न आहे, अगदी आपल्यासारखीच. तीचे विचार खूप प्रभावशाली आहेत. आमच्या घरात ती म्हणजे एकदम हटके आहे यार. आज्जीचे वडील खूप कडक आणि शिस्तप्रिय होते. त्यांनी आज्जीला त्यांच्या जमान्यात वावरताना चांगले शिक्षण दिले पण प्रेम करण्याची मोकळीक काही दिली नाही. आज्जी कॉलेजला होती बीएच्या शेवटच्या वर्षाला तेव्हा ती सायकलवर जायची कॉलेजला. कॉलेजला जायचा रस्ता तसा चांगला नव्हता. एक दिवस आज्जी कॉलेज सुटल्यावर घरी येत असताना त्या रस्त्यामधेच तिची सायकल पंक्चर झाली. नेमके आजूबाजूला तेव्हा कोणी मदतीलाही नव्हते. एव्हाना अंधारही पडत चालला होता. आज्जीला वेळेत घरी पोचणे जरुरी होते नाहीतर तिच्या वडिलांचा राग तिला माहित होताच म्हणून सायकल तिथेच बाजूला ठेवून ती चालत निघाली. घर तसे अजून बरेच लांब होते. थोडा वेळ तसाच गेला आणि एक मुलगा तिथून जाताना दिसला. त्याला थांबवून मदतीसाठी विचारावे असं एकदा तिला वाटलं पण असं कुणा परक्याबरोबर जाणं योग्य वाटत नव्हते. तिने त्याच्याकडे वळून बघितले तर तो स्वतःच तिच्या दिशेने येताना आज्जीला दिसला. त्याने तिला मदतीसाठी विचारले. दिसायला तरणाताठा उंच असा तो पाहताक्षणीच आज्जीला भारी वाटला. काही क्षण आज्जी भांबावली पण नंतर मनाचे धाडस करून ती परक्या मुलाबरोबर निघाली. सुरवातीला तोही एका हातात सायकल धरून तिच्यासोबत चालत निघाला. नंतर जसा आज्जीला तो विश्वासू भासला तसे ती त्याच्याबरोबर सायकलवर मागच्या बाजूला डबलसीट बसून निघाली. पहिल्यांदाच आज्जी एका मुलाबरोबर जात होती, असं सायकलवर आणि तेही डबलसीट. एकाद्या सिनेमाचे दृश्य दिसावे तसे ते दोघे भासत होते. वाटेत आज्जी आणि त्या मुलाची ओळख झाली. तो तिच्याच कॉलेजमध्ये तिच्याच वर्गात शिकत होता. त्याने आज्जीला घराबाहेर सोडले आणि तो निघाला. जाताना एकदा वळून आज्जीकडे बघून हसला. बस्स आज्जी तिथेच फिदा झाली त्याच्यावर. ही आज्जीची आणि त्याची पहिली भेट पुढे मैत्रीची वाट सरत सरत प्रेमाच्या गावी जाऊन वसली. पुढे कॉलेजमध्ये दररोज त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. रस्त्यात येता जाता दोघेही एकमेकांना प्रेमाचे इशारे करत. हळूहळू दोघेही प्रेमात गुंतत गेले. आज्जी कधीतरी सायकलवर त्याच्या पुढे डबलसीट बसून जायची. दोघांनाही एकमेकांची इतकी ओढ़ लागली होती कि एक दिवसही त्यांना एकमेकांपासून करमेना. माझी आज्जी तर त्याला लव्ह लेटर लिहायची आणि तोही आज्जीवर प्रेमाच्या कविता करायचा. असेच त्यांचे रोमँटिक किस्से रंगत असताना आज्जीचे एक लव्ह लेटर तिच्या वडिलांच्या हाती लागले. तिथेच त्यांच्या प्रेमकहाणीत व्हिलनची एन्ट्री झाली. त्यांनी आज्जीचे कॉलेज बंद केले आणि तिच्या विरोधात जबरदस्ती माझ्या आजोबांशी लग्न लावून दिले. आज्जीचे हे प्रेमप्रकरण त्यांनाकाही पटले न्हवते. तिच्या लव्हस्टोरीचा त्यांनी दि एन्ड करून टाकला. त्या मुलाने आज्जीला भेटायचा खूप प्रयत्न केला पण त्याला आज्जी भेटू नये याची खबरदारी तिच्या वडिलांनी घेतली होती. तो बिचारा रोज आज्जीच्या घराजवळ फिरकत होता पण आज्जीला काही त्याला भेटता आले नाही. नंतर आज्जीच्या एका मैत्रिणीकडून त्याला घडल्या प्रकारचा तपास लागला. अचानक अंगावर वीज चमकावी तसा तो शहारला. सुधा आता आपल्या आयुष्यात नाही हेच त्याला पचले नाही. प्रेमाच्या विरहात तो इतका खचला कि कॉलेजला जाणं बंद करून घरातच स्वतःला बंदिस्त केले. इकडे आज्जीचा नवीनच संसार सुरु झाला. ती अजिबात खूष न्हवती पण परिस्थितीसमोर तिचा नाईलाज होता. पुढे त्या मुलाचीही काही खबर कळली नाही. तिला रोज त्याची आठवण यायची. विरहाचे क्षण आज्जीच्या मनात काट्यासारखे रुतत होते. पण माझी आज्जी खरंच खूप समजूतदार होती. तिने त्याही परिस्थितीत स्वतःला सावरले. मुलांबरोबर नातवंडानाही भरभरून तिने वात्सल्य दिले. जुन्या वळणावर चालताना नवीन विचारांचा पाया तिने आमच्यामध्ये रोवला.

संसाराच्या वाटेवर चालताना आज्जीच्या आयुष्याच्या गाडीने एक वर्षांपूर्वी वेगळेच वळण घेतले. त्या दिवशी ती आमच्या स्वराच्या शाळेत ग्रँडपेरेंट्सडेला गेली होती. सगळ्याच छोट्या मुलांचे आज्जी आजोबा तिथे उपस्थित होते. सुरवातीच्या आयोजित कार्यक्रमानंतर आता उपस्तिथ सगळ्या आजी आजोबांची ओळख करून देण्याची घोषणा एका शिक्षिकेने केली. एक एक करून सर्व आजी आजोबा आपली ओळख सांगू लागले. आज्जीनेही स्वतःबद्दलची माहिती दिली होती. त्यांनतर थोडे उशिराच हजर झालेले एक आजोबा बोलू लागले. त्यांचा आवाज ओळखीचा वाटला म्हणून आज्जी कान देऊन ऐकू लागली. तिने तो आवाज ओळखला. तिच्या जुण्या आठवणी डोळ्यासमोर तरंगू लागल्या. काही क्षणातच ती भानावर आली. शाळेने स्नेहभोजन ठेवले होते तिकडे सगळेजण वळू लागले. आज्जी जेवणाच्या ठिकाणी जाताना त्या यजमानांची आणि तिची नजरानजर झाली. दोघेही काही क्षण एकमेकांकडे बघत होते, तितक्यात आजोबा म्हणून एक छोटा मुलगा त्या यजमानांना येऊन बिलगला. ते भानावर आले आणि आज्जीच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांची बोलताना शब्दांची होत असलेली गडबड तिला जाणवली. ते आजोबा म्हणजेच आज्जीचा मित्र वसंतराव. तिचे पहिले प्रेम 'वसंत'. कित्येक वर्षानंतर तिचा वसंत तिच्यासमोर परत आला होता. दोघेही त्यांच्या प्रेमाच्या आठवणींत चिंब भिजले होते. त्या दिवशी त्यांच्यात खूप काही संवाद घडला नाही. दुसऱ्या दिवशी वसंतरावांनी तिला त्यांच्या घरी भेटण्यासाठी बोलावले. दारावरची बेल वाजली आणि त्यांनी आतुरतेने दार उघडले. दारात आज्जीला बघून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले. दोघांनीही नजरेतूनच एकमेकांना आलिंगन दिले. ये आत ये, तू बस मी आलोच. वसंतराव बोलले तसे आज्जी आत जाऊन बसली. तिने आजूबाजूला घरात नजर फिरवली. घर अगदी टापटीप ठेवले होते. वसंतरावांनी चहा आणला तसे आज्जी बोलली, तुला चहा येतो बनवायला! मला हे आधी माहीतच नव्हते. बरीच प्रगती दिसतेय तुझ्यात. आज्जीच्या बोलण्यावर ते मिश्कीलपणे हसले. आता बोल कशी आहेस? तब्येत बरी आहे ना तुझी?, आणि काल तुझे यजमान दिसले नाहीत. त्यांच्या प्रश्नावर आज्जीचा चेहरा थोडा पडला. नाराजीच्या सुरातच ती बोलू लागली. आता २० वर्षे होतील ते जाऊन. त्यांना बऱ्याचदा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जावे लागे. असेच एकदा ते बाहेरगावी गेले आणि परत आलेच नाही. कार अकॅसिडेन्टमध्ये मरण पावले. ते लवकर गेल्याने मी नोकरी करून घराची आणि मुलांची जवाबदारी संभाळली. आता नातवंडांना सांभाळण्यात दिवस निघून जातो या म्हातारीचा. वसंतराव डोळे भरून आज्जीकडे बघत बोलले, छे तू आणि म्हातारी! अजूनहि तारुण्याची छबी टिकून आहे चेहऱ्यावर तुझ्या. तू इकडे कसा?, आज्जीने त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, मी मुंबईला होतो कित्येक वर्षे नोकरीला. एक महिना झाला मला निवृत्त होऊन. माझी मुलगी इथे पुण्यात असते त्यामुळे निवृत्तीनंतर मी तिच्याकडे आलो. आता कायमचे इथेच राहणार. हे ऐकून आज्जीला आनंद झाला. ती म्हणाली, अर्रे वाह्ह म्हणजे आता आपल्या भेटीगाठी होतील. बरं झालं तू इथे तुझ्या मुलीकडे आलास ते आणि तुझी बायको कुठे आहे? वसंतराव तिच्या या प्रश्नावर काही क्षण मौन बाळगून होते. सगळे ठीक तर आहे ना? तिने पुन्हा विचारले तसे ते बोलते झाले. हि माझी स्वतःची मुलगी नाही. मुळात मी लग्नच केले नाही. हे ऐकून आज्जी एकदम चकित झाली. ती पुढे काही विचारणार इतक्यात वसंतरावच बोलू लागले. त्या दिवशी मी तुला भेटायला आलो होतो तेव्हा कळलं कि तुझं लग्न झालं आणि तू आता गाव सोडून निघून गेलीस. ते ऐकून माझ्या शरीरातलं सगळं अवसानच गळून पडलं. मेल्याहून मेल्यासारखं झालं ग मला. तसाच उलट पावलांनी फिरलो आणि घराची वाट धरली. ती रात्र खूप रडलो, बैचेन झालो. काय करू काहीच सुचेना. रात्रभर डोक्यात विचित्र विचारांनी थैमान घातले होते. सकाळी उठलो आणि पहिले गाव सोडले. घरच्यांच्या विरोधात मी गावाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आणि निघालो. काही दिवस नुसताच प्रेमाच्या आठवणींत झुरत गेलो. पुढे मुंबईला जाऊन उरलेले शिक्षण पूर्ण केले आणि तिथेच नोकरीला लागलो. पुढे भरपूर मुली मला सांगून येत होत्या पण माझे मन काही आता दुसऱ्या मुलीला स्वीकारायला तयार नव्हते. मग मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांनी माझ्याशी संबंध तोडले. काही दिवस तसेच गेले आणि अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात दुसरी सुधा आली. मी कामावर जाताना रस्त्याच्या बाजूला रडत बसली होती. तिचा चेहरा बघून जणू काही तूच पुन्हा माझ्या समोर आल्याचे मला भासले. ती चिमुरडी हरवली होती. बरेच दिवस चौकशी केली पण काहीच पत्ता लागला नाही तिच्या घरच्यांचा. मग मीच तिला दत्तक घेतले आणि तिचे नाव सुधा ठेवले. तिच्या निरागस रूपात मला तुझं प्रतिबिंब झळकल्याचे जाणवले. आजपर्यंत मी फक्त नि फक्त तुझ्यावरच प्रेम केलं. तू सोबत नव्हतीस पण तुझ्या आठवणी माझ्या सोबत राहिल्या. त्यांना कुशीशी घेऊन मी आजपर्यंतचे आयुष्य जगत आलो. आयुष्यात पुन्हा कधी तू भेटशील याची अपेक्षा न करता नुसतंच तुझ्या प्रेमात इथवर हि वाट चालत आलो. काल तुला परत डोळ्यासमोर पहिले आणि मी पुन्हा एकदा तुझ्यात हरवलो. वसंतरावांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला आणि डोळ्यातले पाणी पुसले. आज्जीच्या डोळ्यात तर अश्रूंचा सागर ओघळत होता. वसंतरावांच्या डोळ्यात ती स्वतःला बघत होती. रडत रडतच ती म्हणाली, वसंत अजूनही आपल्या दोंघांच्या आठवणी तितक्याच ओल्या आहेत. तुझ्यावरच प्रेम अजूनही मी हृदयात जपून ठेवलंय. माझ्यावरच्या प्रेमामुळे तू स्वतः लग्नही केलं नाहीस. काय करणार?, वसंतराव बोलले. तू गेल्यानंतर मन गुंतलच नाही कुणामध्ये.

त्यादिवशी दोघेही प्रेमाच्या भेटीत पुन्हा जवळ आले. त्यांनी आता पुढील आयुष्य एकमेकांच्या मैत्रीच्या सोबतीने जगायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी काही लग्न केले नाही. आज्जी आणि ते आजोबा आता रोज भेटतात. दिवसभराचा वेळ ते आनंदाने एकमेकांना देतात. त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगतात. संध्याकाळी ते दोन पक्षी पुन्हा आपापल्या घरट्यात परततात. कधीतरी फिरायलाही जातात बाहेर. आज त्या दोघांच्या परतभेटीला एक वर्षे पूर्णे झाले आणि म्हणूनच मी आज्जीला सरप्राईज पार्टी देणार आहे. तिथे तिचा वसंत पण असेल तिचा आनंद द्विगुणित करायला. आज्जी आणि तिच्या मित्राची ही स्टोरी सांगताना रेवाच्या डोळ्याच्या पापण्या अलगद ओलावल्या. तिचा सगळा ग्रुप भान हरपून आज्जीची स्टोरी ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हावभाव होते. चला उठा आपण निघुयात आता नाहीतर संध्याकाळी पार्टीला उशीर होईल, रेवाने सगळ्यांना तिथून हालवले आणि तीही घरी जायला निघाली. संध्याकाळी पार्टीच्या ठिकाणी सगळे वेळेत हजर झाले. ठरल्या प्रमाणे सगळ्यांनी आज्जीला सरप्राईज पार्टी दिली. आज्जी आणि वसंतराव दोघेही हे सगळे बघून भारावून गेले. सगळेच जण त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. आज्जीची ही अनिव्हर्सरी जोरदार हिट ठरली. आज्जी आणि वसंतराव आता वेगळ्याच जगात हरवले होते. म्हातारपणाच्या वाटेवर पुन्हा नव्याने तरुण झालेली हि फुलपाखरे आता जीवनाच्या बंधनातून मुक्तपणे स्वैर करत होती. बाकी सगळेजण पार्टीचा आनंद लुटत असताना ते दोन जीव मात्र वेगळ्याच प्रेमाच्या संवादात गुंतून गेले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance