एक ओझरती भेट अशीही
एक ओझरती भेट अशीही


आज सकाळपासुनच दाटून आलं होत, त्यामुळे त्याने आज ऑफिसला न जाता घरूनच काम करायचे ठरवले. महत्वाचे कॉल आणि काम संपवून बायकोकडे चहा आणि गरमागरम भजीची मागणी करून तो खिडकीजवळ आला. खिडकीतून पाऊस पाहतापाहता त्याच्या काळजात शिरला आणि जणू पाणी शिंपडून झोपलेल्या आठणींना जागे करू लागला. दशकांपूर्वीची तिची पहिली भेट जणू या पावसानेच हिरवीगार केली होती.
खरं तर एकच शाळा, एकच वर्ग पण एकमेकांचे नाव माहिती असणे इतकीच शाळेपासूनची ओळख. बाकी संवाद शून्य. जणू ओळखीचे अनोळखी. त्यानंतर दोघेही आपल्या पुढल्या शिक्षणात आणि नवीन कॉलेजच्या घोळक्यात सामावून गेलेले.
असेच घोळक्यातून चालताना एक ओझरती भेट झाली आणि प्रेम देवतेच्या बाणाने निशाणा साधला .त्याच्या मनात जणू एखाद्या चित्रपटातला प्रसंग शोभावा अशी व्हायोलिन वाजू लागली. पहिल्या प्रेमाची फुलपाखरं त्याच्या सोबत बागडू लागली. ही भेट त्याच्या मनात तिची जागा करून गेली. ही काही क्षणांची भेट त्याच्यासाठी आयुष्यातील एक स्मरणीय आठवण होती.
सोशल मीडियाच्या पिंजऱ्यात दोघेही कैद झाले. प्रेम म्हणजे काय असावं हे उमगायच्याही आधी होत तेच पहिले प्रेम. इंद्रिय सगळी मनाच्या अधीन झाली होती. चित्रपटाची नायिका कोणीही असो त्याच्या डोळ्यांना मात्र त्याचीच नायिका दिसत होती. आता तो एकांतातही एकटा नव्हता. सावलीसारखे तिचे आभास त्याच्या सतत सोबत होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि अगदी रात्री स्वप्नावरसुद्धा तिचेच अधिराज्य झाले होते. थोड्या महिन्यांच्या अवधीतच दोघांचेही स्टेटस कमिटेड झाले. दोघंही त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या रोपट्याला पाणी घालीत होती आणि मोबाइलचे खत तर होतेच जोडीला.
आता त्या रोपट्याबरोबर दोघेही समजुतदार झाले होते. दोघेही नोकरी करू लागले. नवीन नोकरी नवीन मैत्री नवीन जीवनशैली यात रमून गेले.पण रोपट्याची काळजी जमेल तशी घेत होते.
हळूहळू दिवस जाऊ लागले तसे नवीन मैत्रीत संवाद वाढू लागले. सुट्टीच्या दिवशीच्या सहली वैगरे सगळेच नवीन मैत्रीत होऊ लागले. "मैत्री हे प्रेमाचे पहिले पाऊल" की "पहिले प्रेम हेच खास" या द्विधा मनस्थितीत तो अडकला. सोशल मीडियावरही नव्या मैत्रीला अंगठ्याने प्रतिसाद मिळत होता. लहानपणी जो अंगठा चिडवायला वापरायचो आता त्याचे वाढते आकडे त्याला आवडू लागले होते.
दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्ष गेली. आता जुन्यापेक्षा नवीन गोष्टीत तो जास्त रमू लागला. नव्या मैत्रीनेही नात्याला दुजोरा दिला होता. रोपटे मात्र आता सुकू लागले आणि नव्या मैत्रीच्या बांडगुळाने त्याला संपूर्ण वेष्टून टाकले होते. पण त्याचे त्याला काही वाटेनासे झाले होते. "मैत्री हाच प्रेमाचा पाया" यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता.आयुष्यात दुरावणारे कधीच आपले नसतात आणि जे आपले असतात ते आपल्याला कधीच दुरावा देत नाहीत.
आजही त्याला सगळे स्पष्ट आठवत होते. आज त्याच्यासमोर चहा आणि भजी घेऊन उभी होती त्याची लग्नाची बायको आणि त्याचे दुसरं प्रेम म्हणजेच त्याची चिमुरडी. त्याने सहज तिला विचारले, आठवते का आपली ती ओझरती पहिली भेट ..ती क्षणिक भेट म्हणजे जणू नियतीने रचलेले एक गोड चक्रव्युह होते त्यात ते दोघेही प्रेमाने अडकले.कधी कधी एक क्षण आयुष्यातील सुंदर आठवण होते आणि आयुष्यभरासाठी नाते देऊन जाते हेच खरे.
पहिल्या प्रेमाने आपली मुळे हृदयात घट्ट घरून ठेवली. आता तर तो वृक्षच झाला होता आणि त्याच्या सावलीत दोघांचा छान संसार बहरला होता. आयुष्याच्या पहिल्या पानावर भेटलेली व्यक्ती शेवटच्या पानावरही सोबत असल्यास, मधली काही पाने गहाळ झाली तरी गोष्ट सुंदर होते.