Prachi Vinayak

Inspirational

4.7  

Prachi Vinayak

Inspirational

फडफड

फडफड

5 mins
362


    नेहमी प्रमाणे सकाळी माझ्यासाठी न्याहारी माझ्या खोलीचे दार उघडून आत आली. घरातल्या बाकीच्यांप्रमाणे मला चहाची सवय नव्हती. माझी न्याहारी पण सगळ्यांपेक्षा निराळीच होती. खिडकीतून बाहेर डोकावत न्याहारी करतानाची मज्जा वेगळीच असते. समोरच्या इमारतीतील कोणी आपल्या व्हरांड्यात मस्त आराम खुर्चीत चहाचा झुरका घेत दिसतं तर कोणी वर्तमानपत्राआड चहाचा आस्वाद घेत. दोन इमारतीच्या मध्ये अगदी छोटासा रस्ता. रस्त्यात एक बस स्टॉप.त्यामागे चहाची टपरी आणि पानपट्टी हे त्या बस स्टॉपचे आधारस्तंभ.बस मधून कंडक्टरची " लास्ट स्टॉप..." आरोळी मला दुसऱ्या मजल्यावर अगदी स्पष्ट ऐकू येई. आरोळी ऐकून बरेच जण धावत खाली जात आणि रांगेत उभे राहत. बस रस्ता ओलांडून पलीकडे विश्रांती घेई.काही मिनिटांच्या अवधीतच परत आवाज येई "चला स्टेशन.. स्टेशन ". इतक्या वर्षांच्या काळात या सकाळ मध्ये काहीच बदल झाला नाही. काही चेहरे बदलले पण सकाळ चर्या तीच. बस कंडक्टर किती बदलले पण आरोळी मात्र तीच. रांगेतील काही चेहरे बदलले. आधी दोघे वेगळे रांगेत लांब लांब उभे राहणारे कित्येक आता जोडीदार झाले. काहींची पिल्ले पण आता रांगेत येऊ लागली. सुरुवातीला आम्ही दोघे हे सगळं खूप आवडीने बघत असू.दिवसाची सकाळ एकदम उत्साही होत असे.हि सकाळ म्हणजे आमच्यासाठी एका टीव्ही मालिकेसारखी होती. रोज तेच पण रोज नवीन एपिसोड पाहण्याची मज्जा. पण अलीकडे काही महिन्यांपासून या सकाळचे रूपच पालटून गेले.

    

लॉकडाऊन नावाचं काही तरी सुरु झालं आणि बाकी सगळं बंद झालं. क्वचितच कोणीतरी रस्त्यावर दिसतं. इमारतीही खाली होऊ लागल्या. शहर, रस्ते यांना शिक्षा केल्यासारखे शांत झाले. क्वचितच एखादी ऍम्ब्युलन्स किंवा पोलिसांची गाडी या शांततेचा भंग करताना दिसते. काही जण गावी जाऊ लागलीयत तर काहींचे पाय कधी नव्हे ते घरात टिकू लागलेत. 

    

आपल्याच घरात आपल्याच माणसांसोबत वेळ घालवता येण्याचा आनंद लोकं मालिका ,वेब सिरीसमध्ये घालवतात. सोशल मीडिया ने तर खूप आधीच आपल्याच माणसांशी सोशल डिस्टन्स राखला होता. पण लॉकडाऊनमध्ये बाहेरील दुनियेच्या डिस्टन्सने घरातील माणसांमधील अंतर नक्कीच कमी झाले. बाहेरील चमचमीत जेवण मिळेनासे झाले आणि घरच्या अन्नाची रुची वाढली अन किंमतही. दुकांनाना वेळेचे निर्बंध आले आणि घरातील उपलब्ध सामग्रीतही उत्तम स्वयंपाक होऊ लागले. खऱ्या अर्थाने जीवनावश्यक वस्तूची व्याख्या कळली. बऱ्याच लोकांनी घरातच चमचमीत पक्वान्न शिकून बनवले. जेवणाआधी एक फोटो नक्कीच! अशी जेवणाची सजावट होऊ लागली. एकत्र जेवणे, गप्पा मारणे या आणि अशा अनेक छोट्या गोष्टीतील हरवलेला आनंद पुन्हा बऱ्याच लोकांना गवसला. मला चांगलं आठवतं बऱ्याचदा आमच्या आवडीचं जेवण नसेल तरीही एकमेकांशी बोलण्याच्या नादात नावडीचं जेवण पोटात कधी गेलं कळतंच नसे. सहजीवन म्हणजे कदाचित हेच असावं. मेनू काहीही असला तरी आपल्या माणसाच्या सोबतीने जेवणाची रुची वेगळीच असते. म्हणूनच प्रेमाची सुरुवात छोट्याश्या कॉफी शॉप ने होते.कॉफीची चव कधीच महत्त्वाची नसते. महत्व असतं ते सोबत असण्याऱ्या व्यक्तीचं. लग्नसोहळेही पालटले. पूर्वी हजारो ताटं कमीच म्हणणारे आणि भरमसाठ अन्न वाया घालवणारे आता पन्नास माणसात सोहळे आनंदाने करू लागले.एकंदरीत लॉकडाऊनने जेवण आणि जवळच्या माणसांची किंमत नक्कीच शिकवली.

    

सुरुवातीला अगदी साधंसुधं वाटणारं लॉकडाऊन आता काहींच्या खिशाला आणि मनाला परवडणार नाही असं वाढलं. खरतर लॉकडाऊन मनालाच जास्त परवडणार नाही.ऑर्डर करून जेवण दारापाशी येतं पण मेजवानीची रुची सोन्याच्या पिंजऱ्यातही कोणाच्याच मनाला रुचत नाही.

    

काही महिन्यांच्या लॉकडाऊनला कंटाळलेली लोक पाहून आमचे सुरुवातीचे दिवस आठवतात.या घरात अनोळखी आम्ही दोघे राहायला आलो आणि आम्हा दोघांच्या आयुष्यभराचं लॉकडाऊन सुरु झालं. नवीन शहर, नवीन चेहरे ,सगळं जगणंच नवीन होतं आम्हा दोघांसाठी.सुरुवातीला लॉकडाऊन शिथिल होईल असं वाटायचं पण मग कळून चुकलं यातून सुटका नाही. एकमेकांना अनोळखी असलो तरी या दुनियेत एकमेकांचाच आधार वाटायचा. घर अगदी उत्तम होतं. पण शहरातल्या घरात राहायची सवय नव्हती. थोडं आखडून राहावं लागत असे. असं वाटत असे जणू काही स्वातंत्रावरच बंधन. 

    

पण हळूहळू सवय झाली एक दार आणि खिडकी यात दोघांचंही मन रमून गेलं. घरात दोघांच्याही आवडीचा म्हणजे झुला. पूर्वीसारखं जंगली जनावरांचं भयही या शहरात नव्हतं. इतकी सुखसोयींयुक्त आरामदायी जीवनाची कल्पना कधीच केली नव्हती. आरामात दोघांचा संसार सुरु झाला.ऑर्डर न करता दार उघडून जेवणाचं ताट घरात येई तेही अगदी वेळेवर. आता शहर आवडत नसलं तरी जुळवून घेतलं होतं.

    

गोंडस पिल्ले झाली.पण रात्रीच्या काळोखात राक्षस पिल्लांना उचलून नेई. आम्ही लॉकडाऊन जन्मतःच पिल्लांना जन्मभरासाठी गिफ्ट केलं होतं. आम्ही पिल्लांसाठी खूप कासावीस व्हायचो पण हळूहळू त्याचीही सवय झाली.एकमेकांच्या सहवासात दिवस भुर्रकन उडत होते पण आम्हाला बाहेर भुर्रकन उडून बरेच दिवस किंबहुना वर्षे झाली.आम्हाला रोज सकाळी शुभ्र आकाश आणि त्यातील उडणारे थवे चिडवत असतं पण आम्हीही त्यांना फडफड करून उत्तर देत असू. पंखांची नुसती फडफड म्हणजेच काय तो उडण्याचा आस्वाद होता आमच्यासाठी. जन्मतःच अपंग असलेल्याच दुःख जास्त कि अपघाताने अपंगत्व आल्याचं दुःख अधिक हे ठाऊक नाही. पण अपंग नसताना अपंगासारखे राहण्याचे दुःख आम्हाला जास्त टोचत होते. नुकतीच एकटीने भरारी घ्यायला लागलेली मी कशी कुठे अडकली कळलेच नाही आणि काही समजले तेव्हापासून समोर फक्त लोखंडी जाळ्या. आयुष्यात फक्त एकदाच आम्हा दोघांना एकत्र बाहेर फिरायला जायचं होत. पण ते स्वप्न राहीलच.

    

एक दिवस घरातील सगळे पहाटेच लग्नासाठी बाहेर गेले.आमच्यासाठी जेवणाचं ताट मात्र न चुकता ठेऊन गेले. त्यादिवशी यांची तब्येत बरी नव्हती, मी एकटीनेच थोडं खाऊन घेतलं.मध्यान्ह झाली तरी तब्येतीत काहीच सुधार नाही झाला.अन्न पाणी जाईना.वेदना दिसत होत्या. मी मदतीसाठी ओरडत होते पण...हळूहळू पंख पसरले फडफडू लागले, डोळे आकाशाकडे लागले.हि शेवटची उंच भरारी घेऊन पंख कायमचे निस्तेज झाले.क्षणात माशा घोंगावू लागल्या. हे सारं मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. पण मग काळजात दुःख घेऊन माशांपासून दूर, जरा वर झुल्यावर जाऊन बसले. घरातील सगळ्यांनीच मनाला खूप लावून घेतलं.छोट्या पिंकी ने रडून जेवण सोडलं. पण काही दिवसातच सावरली, मग कारण कळलं घरात एका छोट्या पपीचा लॉकडाऊन सुरु झाला होता. 

    

घरच्यांच्या छंदाने आमचा स्वछंदीपणा हिरावून घेतला हे जरी खरं असलं तरी या घराचे अनंत उपकार आहेत माझ्यावर हेही तितकेच खरे .या घराने खूप काही दिले. खूप लाड पुरवले, भरभरून प्रेम दिले, खूप काळजी घेतली. जाळ्यात अडकून, पशुबाजार ते हे घर हा प्रवास खूप वेदनादायी होता. या घराने आणि घरातील माणसांनी या सर्व वेदनांवर फुंकर घातली. मी ज्या परिस्थितीत अडकले होते त्याचा एकमेव पर्याय लॉकडाऊन होता.

    

'सर सलामत तो पगडी पचास !'.. सध्या परिस्थिती अशीच आहे ज्याला काही काळाचा लॉकडाऊन योग्य पर्याय आहे. फक्त काही काळाच्या आणि तेही स्वतःच्याच आरोग्यासाठी असलेल्या लॉकडाऊनने बरेच लोकं नैराश्याकडे झुकलेत. कुटुंबातही एकाकी वाटू लागलंय. कमकुवत मनाची दोर लोक गळ्याला आवळू लागलीत. पण लॉकडाऊन संपल्यानंतर भरारी घ्यायची तयारी कोणीच करत नाहीय. मला तर त्या सकाळची बस आणि त्यातील आरोळी कधी एकदा परत ऐकू येईल असं झालंय. आता राहिले मी एकटी आणि फडफड करून पंखही उडणे गेले विसरून.खरतर पंखात उडण्याचं बळ कधीच नसतं ,ते उडणाऱ्याच्या मनात असतं. त्या मनाला स्वप्नाच्या आशेने बांधून ठेवावं लागतं मग ते निराश होऊन नैराश्याकडे न जाता स्वप्नाच्या दिशेने वेग घेतं. आज माझ्या पिंजऱ्याचं लॉक थोडंजरी डाऊन होऊन उघडं राहिलं तर त्याच जिद्दीने मी भरारी घेईन; मस्त चौपाटीवर, निळ्याशार समुद्रावर आणि निळसर आभाळाखाली एक भरारी माझीही असेल !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational