तिच्या समाधानाची शिदोरी
तिच्या समाधानाची शिदोरी
सर्वसामान्य आपल्यातलीच ती. तीच आणि त्याच लग्न झालं आणि बऱ्याच वर्षांपासूनच्या नात्याला नाव मिळालं . लग्नानंतर नवरा,बायको ,सासू ,सासरे अगदी सुखी कुटुंब. सकाळी ती सगळं घर , स्वयंपाक आवरून आणि तो नुसता आंघोळ आवरून ऑफिसला जात. छान इस्त्री केलेले कपडे, हातात बॅग, सुंदर लांब केस पण नीट विंचरलेले अशी ती आणि तो एकत्रच ऑफिसला निघत , ऑफिस वेगली होती पण स्टेशन पर्यंत एकत्र. तितकाच वेळ सोबत. नोकरीताही दोघांचीही चांगली प्रगती झाली होती. ऑफिस घर तिने उत्तम सांभाळले.
काही महिन्यातच एका गोड परीच्या बातमीने घर खुलून गेले होते. पण आता मेडिकल कॉम्प्लिकेशन ने ट्रेन चा प्रवास करता येणार नव्हता. त्यावेळी काही महिन्यांचाच प्रश्न म्हणून तोडगा आता नोकरी सोडावी आणि मग वर्षभराने परीहि मोठी होईल मग नवीन नोकरी मिळेल यावर तिने विचार केला. आणि या विचारामागे तिचा आत्मविश्वास होता. इतक्या वर्षांचा नोकरीचा अनुभवही होता गाठीला . परीचा विचार करून एका चांगल्या मोठ्या कंपनीची मोठ्या हुद्द्याची नोकरी अखेर सोडली. आता तिला परी शिवाय काहीच महत्वाचे वाटत नव्हतं. कुठल्याच आईला आपल्या मुलांशिवाय काहीच महत्वाचे नसते. नौकरी अगदी शुल्लक होती तिला आपल्या येणाऱ्या गोड परीपुढे. परीच्या जन्मासाठी घरातील सगळेच आतुर झाले होते.काही दिवसातच परीचा जन्म झाला. घरातील सगळ्यांचा आनंद अगदी ओसंडत होता. सगळेच काय करू आणि काय नको या आविर्भावात होते. सुरवातीचे काही दिवस माहेरी गेले. मग सासरी आल्यावर परी आणि घर असा दिनक्रम सुरु झाला.
पाळण्यातील परी मग रांगणारी परी आणि मग दुडूदुडू चालणारी परी आता शाळेत जाऊ लागली कळलेच नाही. दिवस अगदी भुर्रकन उडून गेले. घरातील सगळे आपल्या कामात व्यस्त होते. आणि ती मात्र परी ,घर , घरचे आणि येणारे जाणारे यातच व्यस्त होती.परीचाहि दिनक्रम बदलला पण आईचा दिनक्रम तोच राहिला.
खरतर परी एक वर्षाची झाल्यावर तिला वाटले घरातील वडीलधारी परीला थोडं सांभाळतील म्हणजे तिला नोकरी साठी पुन्हा जोमाने सुरवात करता येईल. पण आधी परीसाठी काय करू आणि काय नको अशा आविर्भावात वावरणारी मंडळी आता भलत्याच आविर्भात वावरू लागली. दिवसाचे चार ते पाच तास सांभाळायला कोणीच तयार नव्हते आणि पाळणाघर हा पर्याय तिला मान्य नव्हता. एकत्र कुटुंब असताना पाळणाघरात मुलं राहणे यापेक्षा दुर्देव ते काय ?एकत्र कुटुंबाची गरज नक्की काय हेच तिला कळेनासं झालं कारण तिच्या बरोबरच्या काम करणाऱ्या अजूनही काम करत होत्या त्यांनाही मूल झाली. काही आधीच एकत्र कुटुंबातून बाहेर आल्या तर काहीच्या एकत्र कुटुंबात वेगळ्या चुली होत्या पण नातवंड मात्र आजी आजोबाच्या सावलीत होती.घरकामला तिची कधीच काचकूच नव्हती. आधीही नोकरी आणि घर तीच उत्तम सांभाळत होती. सासरचे टोमणे तिने हसत सोडून दिले आणि कुटुंब कधीच तुटू दिल नाही.
खूप परवानगी घेऊन महिन्यातून कोणीतरी एक दिवस परीला सांभाळत असे मग बाहेर पडून मुलाखत देत असे.पण कधीकधी तर मुलाखत अर्धवट सोडून घरी बोलावणे येत असे. मग शेवटी तिने मुलाखत देणेच बंद केले. आता मुलाखतीच्या फोनवरच ती "नाही" म्हणू ल
ागली.
"नाही " हा शब्दच तिच्या शब्दकोशात नव्हता. आजवर अपयश आले तरी त्यातून नवीन मोठं यश गाठायचं हेच माहिती. नौकरीतहि ज्युनिअर ते सिनिअर टप्पा
तिच्यातल्या हुशारीने आणि कर्तबगारीने सहज पार झाला. पण आता हा नवीन टप्पा तिला पार होत नव्हता. निवृत्ती नन्तर काहीच जमत नाही. वाचनवेडी असणारी ती साधा वर्तमानपत्र हि वाचत नव्हती. रोज घराबाहेर पडणारी ती कित्येक महिने बाहेर पडत नव्हती. स्वयंपाक करताना खिडकीतून दिसणाऱ्या चार गोष्टींपलीकडे तिचा बाह्य विश्वासही काहीच संबंध राहिला नव्हता. रोज रोज छान इस्त्रीचे कपडे हि एका बॅगेत जाऊन बसले होते. कारण आता रोज घरात लागणाऱ्या चार कपड्यांशिवाय बाकी कपड्यांची गरजच वाटेनाशी झाली होती.लांब सुंदर नीट केसांचं घरटं झालं होत. सकाळी उठा आंघोळ, स्वयंपाक आणि झाडलोट, आणि एक गोड परी इतकंच विश्व. घरातील बाकीच्यांचं सोडा तिच्या नवऱ्यालाही तिला यातून बाहेर काढाव असं कधीच वाटलं नाही. त्याच करिअर त्याच मित्रांसोबत फिरणं अगदी सुंदर चालू होत. आणि तिच्यासाठी घरच्या चार भिंती मैत्रिणी राहिल्या होत्या. कधी कोणाकडे पैसे मागायची वेळच आली नव्हती पण आज एका एका रुपयांसाठी अवलंबून राहू लागली. आणि तिने आपल्या मातृसंस्कृतीला शोभेल असा सगळा त्याग केला .
परी मोठी झाली. हळूहळू स्वतःच्या गोष्टी करू लागली. हीच वेळ होती जेव्हा जिद्दीने करीरवर चढलेली धूळ झटकायची. आता तिने परत जोमाने सुरुवात करायची ठरवलं.शिक्षण घेण्यासाठी तिने केलेली मेहनत ,इतके वर्ष नौकरी साठीचे कष्ट आणि महत्वाचे म्हणजे शिक्षणासाठी आई वडिलांचे कष्ट तिला वाया जाऊ द्यायचे नव्हते. आज परीसाठी , तिच्या शिक्षणासाठी ती मेहनत घेत होती . उद्या परीच शिक्षण असं वाया जाऊ नये. मुलाच्या शिक्षणाला जी मेहनत असते तीच मुलीच्या शिक्षणाला आणि फक्त मुलगी म्हणून ती मेहनत वाया तिला जाऊ द्यायची नव्हती. कारण हाच आदर्श तिच्या परीसाठी ती बनवत होती. तीने मनाशी ठरवलं वाटेत येणार प्रत्येक अडथळा पार करायचा. पण आपल्या समाजात स्त्री ने करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणार्यापेक्षा मागे खेचणारेच जास्त असतात.पण सगळ्या विरोधाला न जुमानता ती परी शाळेत गेल्यावर मुलाखतीसाठी बाहेर पडू लागली. परी स्कूलबसने घरी येईपर्यंत घरी जाऊन परीचा खाऊ तयार असे. पण आता मुलाखतींना "नाही" म्हणणारी ती काही घरकामाना मात्र "नाही" म्हणू लागली. स्त्री हि ऊर्जेचा स्रोत आहे पण त्या स्रोताला हि मर्यादा असते. घरकाम करो अथवा न करो सासरचे टोमणे हे मुलीच्या पाचवीला पुजलेले असतात ते सोडून द्यावं आणि घर बांधून ठेवावं.
बऱ्याच वर्षांनी सुरवात करणे थोडं कठीण होत. बऱ्याच मुलाखतीच्या अपयशांन्तर तिला चांगली नोकरी मिळाली. ती परत आपल्या पायावर उभी राहिली. काहीच वर्षात ती बढती होऊन मोठ्या पदावर पोहोचली. कदाचित आता ती आदर्श सून नसेल, घरकामात पटाईत नसेल पण यापेक्षा तिने आपल्या छोट्या परीसाठी निर्माण केलेला आदर्श महत्वाचा होता आणि त्याही पलीकडे तिच्या आई वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत तिने वाया जाऊ दिली नाही या समाधानाची शिदोरी तिच्यापाशी होती.