Prachi Vinayak

Others

4.8  

Prachi Vinayak

Others

खडतर आयुष्याची सुंदर संध्याकाळ

खडतर आयुष्याची सुंदर संध्याकाळ

5 mins
2.7K


आज आजींचा वाढदिवस होता सकाळपासूनच आजोबांची लगबग सुरु होती.मित्रमंडळीही तयारीत होती. काहीतरी कारण सांगून आजींना बागेत पाठवायचं आणि सरप्राईझ द्यायचं. आजींनाही सारं कळत होत पण त्याही फिरकी घेत होत्या आणि अखेर कारणाशिवाय आजी बागेत गेल्या. त्या काही अवधीत आजींच्या खोलीचा कायापालट झाला .अगदी खोलीसुद्धा आजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तयार झाली होती आणि आजींचे आगमन झाले. साधी सुताची नववारी आणि डोक्यावर पदर, पण त्यातही आजी इतक्या गोड दिसत होत्या कि न राहवून काही बायकांनी सुरकुतलेल्या चेहऱ्यामागे काजळ लावले. आजींचाही चेहरा खुलला; सुरकुतलेल्या गालावर खळी उठून दिसत होती. सत्तरी उलटले आजी आजोबा पण आजोबांचं आजीला "सवि" म्हणणं आणि आजींची आजोबांना "राव" हाक मारणं म्हणजे चाळीस वर्ष मागे गेल्यासारखं होत.

पार्टी मनाच्या श्रीमंतीत चालू होती आणि तितक्यातच कोणीतरी निरोप घेऊन आलं. दीनानाथराव तुमच्यासाठी फोन आहे. आजोबांचा हॅलो पूर्ण होतो न होतो तोच समोरून आवाज आला " बाबा, तुम्ही जमीन विकलीत मला साधं सांगितलं पण नाहीत. कितीला विकलीत ? घेतले का सगळे पैसे ?आणि ....... ? ....? अहो आता बोलणार आहात कि नाही? " आजोबा सगळं शांतपणे ऐकून घेत होते आणि मिश्किलपणे हसले आणि बोलले "अरे मी थोडा कामात आहे नंतर करतो" आणि हसतच फोन ठेवून थेट आजींच्या खोलीकडे गेले. आजोबांनी आज हिरोचा डायलॉग हिरोलाच ऐकवला होता अगदी त्याच्याच सुरात.

दीनानाथराव , बायको आणि एकुलता एक मुलगा ; सुखी त्रिकोणी कुटुंब पण दीनानाथरावांच्या बायकोला ऐन तारुण्यात कर्करोगाने ग्रासले. दीनानाथराव जमेल त्यापलीकडे जाऊन सेवा करत होते पण त्यांना यश आले नाही.तिच्यामागे त्यांनी मुलाला कधीच प्रेम कमी पडू दिल नाही.शिक्षण ते लग्न सगळी जबाबदारी प्रेमाने केली. रिटायरमेंट नंतर अगदी सगळं मुलाला देऊन ते निवृत्त झाले. पण काही दिवसातच चित्र बदलले. अलीकडेच त्यांनी गावाकडील जमीन विकून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला पैसे दिले. नास्तिक असूनही ताटामधील अन्नपूर्णेची पूजाच जणू त्यांनी केली होती आणि त्यासाठीच सोडून गेल्यापासून कधी नव्हे ते आज चिरंजीवांचा फोन आला होता.

पण आता आजोबांना त्यांच्या सवि च्या वाढदिवसाशिवाय काहीच महत्त्वाचे नव्हते. म्हणतात ना स्रीचे पहिले प्रेम अन पुरुषाचं शेवटचं प्रेम विशेष;आणि दोघेही त्याबाबतीत अगदी नशीबवान. सावित्री आजींचे दीनानाथराव हे पहिले प्रेम. आणि दीनानाथरावांचे सावित्री हे शेवटचे प्रेम.

सावित्री आजी सुद्धा आज अगदी खुलल्या होत्या. वाढदिवस म्हणजे काहीतरी खास असू शकतं असा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. लहानपणी आईने ओवाळलं आणि गोडाचा स्वयंपाक केला असाच काहीसा वाढदिवस त्यांना शेवटचा आठवत होता. मोठी बहीण अक्का गेल्यानंतर अक्काचा संसार....संसार कसला तिच्या मुलांची आया आणि दाजींच्या जेवणाची सोय म्हणून लग्न झाले. थोरल्या भावांनी शेंडीफळाच्या लग्नाला विरोध केला खरा पण वडिलधाऱ्यांसमोर काही चालले नाही .उलट "चार पुस्तके वाचून साहेब झाल्याने काही होत नाही . कुटुंब बांधून ठेवावं लागतं." हेंच सगळ्या प्रश्नांचे निरसन. कालपर्यंत परकर पोलक्यात गावभर उडणारे सुरवंट, फुलपाखरू होण्याआधीच आई आणि पत्नी झाले. सुरुवातीला आई आणि लेकरं एकत्र शाळेत जात पण काही दिवसातच जबाबदारीने आईची शाळा बंद केली.आजारी नवऱ्याची सेवा आणि भरलेल्या घराचं स्वयंपाकघर हेच धोक्याच्या वयातील प्रेम. आई ,पत्नी ,सून, मामी,काकी आयुष्यातले सगळेच रंग एका क्षणात तिचे झाले .मात्र या रंगात प्रेमाचा रंग सफेदच राहिला.नववारी कशी नेसावी हे येते न येते तोच नवावरीनेही सफेद रंग आपला केला.

ऐन बालपण गेलं त्यामागून तारुण्य सरल पण हे दुसरं बालपण काही सरत नव्हतं. स्त्री क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. बालपणीच ज्यांची आई झाली ती बाळ पण हळूहळू रांगत दूर गेली होती. आता शरीर तितकं साथ देत नव्हतं म्हणून असेल किंवा कदाचित आता घरकामही जमत नव्हतं पाहिल्यासारखं म्हणून असेल पण भरलेल्या घराची अडगळ कमी करण्यासाठी नवीन घरात स्थलांतर झालं. नवीन घर अगदी साधे आणि सुटसुटीत. आजींना एक खोली देण्यात आली. त्यांचा बेड आणि थोडे त्यांचे सामान त्या खोलीत ठेवण्यात आलं. घराच्या आजूबाजूला सुंदर बाग , नानाविध फुलझाडं , बागकाम आवडण्याऱ्याला तर पर्वणीच होती.आजींनाही आनंद झाला. सकाळची संध्याकाळ झाली तशी पिल्लं घरट्याकडे निघाली.आई मात्र तिथुनच पिल्लांना घरट्याकडे भरारी घेताना पाहत राहिली. सुरुवातीचा काही काळ अवघड गेला.आजी खोलीतून सहसा बाहेर येत नसत. अगदीच भूक असेल तर जेवणासाठी कधीतरी बाहेर येत. खरं तर त्या घरातील बाकी लोकांप्रमाणे बाहेरच्या जगात आजींचे काहीच नव्हते. अक्का गेली तरी सगळे तिचेच होते ते सावित्रीचे झालेच नाही.आता आईची ओळख सावत्र आई झाली होती.गरज सरो वैद्य मरो असच काहीसं. पंख फुटल्यावर पिल्ले कधीच उडून गेली होती. फक्त पिल्ले स्वबळावर झेप घेऊन आपले घरटे बांधतात त्याऐवजी आईला नवीन घरटे दिले होते इतकेचं .जे आजींना सोडून गेले त्यांनी आज सावत्र मुलांचे कर्तव्य बजावले. त्यावेळी आजींना मात्र वाटलं बरं झालं अक्का गेली. नाहीतर आज तिला इथे आणलं असत तर मेल्याहून मेल्यासारखं झालं असतं .

हे नवीन घर जादूचच होतं. नवीन-नवीन म्हणता म्हणता ते सुरकुतलेले चेहरे अलगद आपल्यात सामावून घेत होतं. हळूहळू आजीही रुळलया.ओळखी झाल्या. कधी नात्यापलीकडेही लोक असतात आणि त्यांच्यात गप्पा असू शकतात, मैत्री असू शकते हे सार नवीन होत आजींसाठी.आजी लाफ्टर क्लब , बागकाम यात मन रमवू लागल्या .दीनानाथरावसुद्धा बागकाम करीत.बागकाम आणि गप्पा यात मंडळी रंगून जात. कित्येकदा दोघेच गप्पांमध्ये गुंग होत आणि बाकी मंडळी केव्हाच निघून गेलेली असत.कधीकधी दोघेच बागेतल्या बाकावर तासन् तास सूर्यास्त पाहत बसत.

दीनानाथराव आयुष्यात आल्यापासून आजींचे जीवन बदलून गेले. बागेत आजींच्या मागे गुपचूप उभे राहून दीनानाथरावांनी डोळ्यावर हात ठेवणे सारेच आजींना नवीन होते. सुरवातीला हे सारे थोडे विचित्र वाटत असे आजींना ; पण नंतर त्यातील गोडी त्याही अनुभवू लागल्या. लाफ्टर क्लब मध्ये खोटे हसता हसता त्या मनसोक्त हसू लागल्या होत्या .खरे हसताहसता खोटे रुसू लागल्या होत्या. वयाच्या उत्तरार्धात जिथे पुढच्या क्षणाची ग्वाही नाही तिथे त्या जगणे शिकत होत्या.रंगहीन आयुष्य पहिल्या प्रेमाच्या रंगांनी सप्तरंगी झाले होते . न्याहारी असो वा जेवण दीनानाथरावांशिवाय अशक्य.दीनानाथरावांनाही आजींची मस्करी केल्यावाचून घास जात नसे.

आजपर्यंत आजींना प्रेम वाटावे असे कोणीच भेटले नव्हते. लग्न झाले संसार झाला पण प्रेम नाही झाले . बहिणीच्या नवऱ्याशी ऋणानुबंध तरी कसा जुळवावा. ऋणानुबंध जुळावा असे वय येते न येते तर संसाराचा गाडा एकट्यानेच हाकायाची जबाबदारी आली . आयुष्य पाखरांमध्ये भुर्रकन उडून गेले आणि प्रेम करायचे राहूनच गेले.बऱ्याच दिग्गजांनी लिहिले आहे -" एकदा तरी प्रेम करावे","मरण्यापूर्वी प्रेम करावे " पण प्रेम करण्यापेक्षा ते आपसूकच होण्यात खरी मज्जा. पण तसा योग काही आजींच्या वाट्याला आजवर आलाच नव्हता.

दीनानाथरावांचे मात्र थोडे वेगळे होते. प्रेमविवाह म्हणजे काहीतरी गुन्हा अशा काळात त्यांनी प्रेम विवाह केला. बायकोवर त्यांचे नितांत प्रेम पण काळाने तिला ओढून नेले. काही काळाचा संसार पण त्याच्या ओझ्याने दबून गेलेले हे दोन जीव..

या दोन अंधारमय आयुष्यात प्रेम काजव्याप्रमाणे चमकू लागले. जे निरपेक्ष भावनेने नकळत घडते तेच प्रेम. मनातले सगळे बोलता येणे आणि बोलण्यासाठी दिवस अपुरा वाटावा म्हणजे प्रेम. एकमेकांची काळजी घेणं म्हणजे प्रेम. गोळ्या औषध वेळेवर आठवणीने देणे म्हणजे प्रेम. एकमेकांच्या आनंदासाठी काहीही करायची तयारी असण म्हणजे प्रेम.

मन हे नेहमी तरुणच असते ,शरीराचे वय वाढते. मन गुंतत जाते आणि प्रेम हे मनापासून होते. प्रेमाला काही वय नसते, ना कुठले बंधन असते ,ना काही मर्यादा ,ना काही अट असते . प्रेम कधीही कोणावरही होऊ शकते. बऱ्याच लोकांना प्रेम हे शाळा, कॉलेज , नाहीतर लग्नानंतर जोडीदारात गवसते .पण जिथे उद्याच्या सूर्योदयाची शाश्वती नाही तिथे हे प्रेम फुललं होतं. त्या नात्याला ना कुठल्या संसाराची अपेक्षा , ना कोणत्या सप्तपदींची शिक्कामोर्तब करायची गरज नसली तरी आयुष्याच्या संध्याकाळी हे सुंदर नाते थकलेल्या हातातील काठी मात्र झाले होते.


Rate this content
Log in