Prachi Vinayak

Inspirational

5.0  

Prachi Vinayak

Inspirational

जाळे सुरांचे...

जाळे सुरांचे...

7 mins
1.0K


त्या वर्षी दुष्काळाने लाहीलाही झाली होती. जून महिना अर्धा उलटला तरीही पावसाचे चिन्ह काही दिसत नव्हते. अशा उकाड्याने हैराण परिस्थितीत एक शास्त्रीय गायक पंडित जोशींच्या घरी नातवाचा जन्म झाला पण बाळ काही केल्या रडेना, बऱ्याच प्रयत्नांनी बाळाने काहीसा रडका सूर धरला आणि पावसाने दमदार हजेरी लावली. जसा राग दीपक गायल्यानंतर तानसेनांची झालेली तप्तता थंड करण्यासाठी मल्हार राग गायक धावून आले तसेच काहीसे झाले. तप्त झालेली धरणी पहिल्या पावसाच्या आगमनाने थंड झाली आणि बाळाचे नाव ठरले 'मल्हार'. पंडितजी रियाजाला बसले की छोटा मल्हारही बसत असे. त्याची इवलीशी बोटे पेटीवरून पंडितजींच्या बरोबर फिरत. लहानपणीच मल्हारचे 'सा रे ग म ..' पंडितजींचा रियाज ऐकूनच पक्के झाले होते. पंडितजी नेहमी बोलत मुले माझ्या

रियाजाने कानसेन झाली पण नातू मात्र तानसेन होईल. आणि अगदी तसेच झाले लहानपणीच मल्हारने एका मराठी वाहिनीची स्पर्धा जिंकली. पंडितजींचं गाणं त्याच्या रक्तात तर आलं होतंच पण हृदयातही आलं होतं. मनापासून संगीतावर त्याची प्रीती जडली होती पण यामुळे अभ्यास कधीच थांबला नाही इंजिनिअरिंग आणि संगीत अगदी हसतखेळत झाले. शेवटच्या वर्षाला असतानाच कॉलेज कॅम्पसमधून उत्तम नोकरी लागली. आईनेही बँकेतून ऐच्छिक निवृत्ती घेतली. बाबांची बदली पुण्याला झाली मग कुटुंबाने मुंबई सोडून पुणे गाठले. स्वराचे कॉलेज आणि मल्हारची नोकरी उत्तम सुरु झाली पुण्यात.


 नोकरी आणि संगीत कार्यक्रम उत्तम चालू होते, मग त्याला अनेक चित्रपटात पार्श्वगायक म्हणून संधी मिळाली आणि नोकरी सोडून मल्हारने संगीत क्षेत्र 

निवडले. आई वडिलांनी प्रचंड विरोध केला पण मल्हारच्या हट्टापायी त्यांचे काहीच चालले नाही. मल्हार एकटाच मुंबईत जुन्या घरी राहायला आला. गाणं रेकॉर्ड झालं. मल्हारला पहिल्या रेकॉर्डिंगचा अनुभव थोडा वेगळा होता. शास्त्रीय संगीत आणि सिनेमा एकमेकांशी जुळवू पाहत होते. सिनेमा प्रदर्शित झाला

मल्हार, आई-बाबा आणि स्वरा सहकुटुंब सिनेमा पाहायला गेले. मल्हार आपले गाणे ऐकण्यासाठी फार आतुर झाला होता. आपण एका रेकॉडिंग रूममध्ये गायलेले गाणे आज पडद्यावर कसे दिसेल त्याची उत्कंठा त्याला लागली होती. सिनेमागृह जवळजवळ रिकामं होत. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. कदाचित असा सिनेमा मल्हार आणि कुटुंबाने कधीच सिनेमागृहात जाऊन पहिला नसता कारण सिनेमाला १ स्टार होता. सिनेमा सुरु झाला. मल्हारची उत्कंठा

आता शिगेला पोहोचली होती. मल्हारने गाण्याची वाट सिनेमा संपेपर्यंत पाहिली. पण गाणं काही दिसलं नाही. सिनेमागृहात गाणं दाखवल नाही असा मल्हारचा समाज झाला. घरी आल्यावर मल्हारने संगीतकारांना तक्रारीसाठी फोन केला की सिनेमागृह गाणी दाखवत नाहीत. पण संगीतकारांचे बोलणे ऐकून मल्हारच्या पायाखालची जमीन सरकली, तो अगदी सुन्न झाला. निर्मात्याच्या सांगण्यावरून गाणं काढून टाकावं लागलं. आजकाल अशी गाणी कोण ऐकतं, त्यात नवीन गायक. असे निर्मात्यांचे म्हणणे होते. त्यांनतर काही गाणी गायली पण काही सिनेमे चित्रपटगृहात पोहोचलेच नाहीत तर काही गाण्यांना दुसऱ्याच गायकांची नावे आली. नंतर संगीतकार म्हणूनही अपयश आले. खरंतर शास्त्रीय सूर चित्रपट संगीताशी जुळत नव्हते. आता त्याच्याकडे फक्त रिकामा वेळच शिल्लक होता. बऱ्याच विनवण्या करूनही पुण्यात राहण्यास त्याने नकार दिला. अपयशाने पार खचून गेलेला, नैराश्याने ग्रासलेला एकाकी राहू लागला. ना कुठे जाणे ना येणे. रियाजही बंद झाला होता.


शास्त्रीय संगीताचा वरदहस्त असलेल्या घरात आता मूलभूत गरजेच्या वस्तू आणि धूळ बसलेला एक तबला आणि हार्मोनियमशिवाय काहीच उरले नव्हते.

बरेच दिवसात घरात कोणाचं बाहेर जाणं नाही आणि मावशीशिवाय कोणाचं येणं नाही. कोणत्याही मोबादल्याशिवाय मावशी अधूनमधून येत असे घराचा अस्ताव्यस्त ते नीटनेटके प्रवास होत असे. खरंतर मावशी म्हणजे लहान मुलांची आया होती. मल्हारचे आई-बाबा नोकरी करत. त्यात बाबांची नोकरी म्हणजे सतत नवीन शहरी बदली पण आईची बँकेची नोकरी, मुलांच्या शाळा त्यामुळे मल्हार आणि लहानगी स्वरा मुंबईतच लहानाचे मोठे झाले. मल्हारला तिचा खूपच लळा लागला होता. मावशी रोज सकाळी येई. तरीही संध्याकाळी निघताना मल्हार तिच्या मागे लागत असे आणि मग तो झोपी जाईपर्यंत मावशीचा पाय निघत नसे. पण कितीही रात्री उशीर झाला तरी मावशी सकाळी ८ ला घरात हजर. 


बऱ्याच वर्षांनी मावशी घरी येऊ लागली. मल्हार आणि स्वरा मोठी झाल्यावर मावशीचे येणे हळूहळू कमी झाले आणि मग बंदच झाले. लहानपणापासून जीव लावलेल्या मल्हारला आज असे बघावे लागेल, असा मावशीने विचारही केला नव्हता. मल्हारच्या खोलीत जणू वादळच येऊन गेलं असावं, अशी अवस्था झाली होती. सगळीकडे स्वरलिपी म्हणजेच म्युझिक नोटेशनच्या कागदांचा वर्षाव. मावशीने सगळी जळमटं झाडायला सुरुवात केली. मल्हार सारे बेडवर बसून शांतपणे पाहात होता. एका कोपऱ्यात भिंतीवर कोळ्याने छान घर केल होतं, त्याच्या इवल्याश्या घरकुलात मधोमध जणू छान झोपाळा टांगला होता त्यात अगदी तो कोळी निवांत झोके घेत होता आणि मावशीने झाडूरुपी बुलडोझर फिरवला, झोपाळ्यासह कोळी खाली कोसळला. मावशी थोडी झाडलोट करून मल्हारच्या जेवणाची सोय करून निघून गेली. आता त्या घरात मल्हारला सोबत झाली एका बेघर झालेल्या कोळ्याची. कोळ्याने जोमाने नवी सुरुवात केली. तो कोळी कित्येकदा पडत होता पण परत लढत होता. आणि दुसऱ्या दिवशी मावशीला साफसफाईसाठी एक छोटं तरी जाळं तयार ठेवत होता. मावशी अधूनमधून येई आणि झाडलोट करी. मावशी आणि कोळ्याची स्पर्धा मल्हार रोज पाहत होता.


दिवसामागून दिवस जात होते. मल्हार दिवसभर कोळ्याचा विचार करू लागला. आता त्याला जणू कोळ्याचे मन कळू लागले होते. सकाळी घर मोडणार म्हणून बांधायचेच नाही, असा विचार त्याला येत नसेल का? कोळ्याला नाही का बेघर झाल्याचे नैराश्य येत असेल? पडायची भीती नसेल का? इवलासा कोळी पण काय चिकाटी. कोणतं च्यवनप्राश घेत असेल इतका उत्साह कसा असेल? सकाळी घर मोडणार पण रात्री तर नीट झोप लागेल आपल्या घरट्यात. सकाळी घर मोडल्यावर परत बांधू उद्या रात्रीचा निवारा... असाच विचार कोळी बहुदा करत असावा. कित्येकदा पडणे, कधीतरी जीवावर बेतणे पण रोज त्याच जोशाने, त्याच उमेदीने काम सुरु करणे, हेच त्या कोळ्याला ठाऊक. कोळ्याचे प्रयत्न मल्हार अगदी जवळून पाहत होता. आता त्याला प्रेरणा होती एका रात्रीच्या निवाऱ्यासाठी झटणाऱ्या कोळ्याची. इवल्याश्या कोळ्याकडून तो बऱ्याच गोष्टी शिकला होता. दुसऱ्यांनी आपले काम मोडीत काढले म्हणून आपण आपले काम सोडायचे नसते. नव्याने सुरुवात कधीही करायची हिम्मत त्याला कोळ्याने दिली. आयुष्यात सगळे संपले असे म्हणून रडण्यात वेळ न घालवता नव्याने सुरुवात करायचा धडा कोळ्याने दिला. रिकाम्या वेळेचा उपयोग करून नवीन काहीतरी करावं असं त्याने ठरवलं. सकाळी मावशी आली पण चित्र वेगळेच होते. मल्हार छान तयार होऊन स्वतःसाठी कॉफी करत होता. मावशीसाठी त्याने कॉफी केली. घरात आज मावशीला काही कामच ठेवले नव्हते. घर अगदी नीटनेटके. सरस्वतीला नमन करून मल्हारने परत पेटी हाती घेतली खूप दिवसांनी रियाज सुरु केला. पहिला सा लागताच त्याला जो आनंद मिळाला तो त्याला आणि फक्त त्यालाच माहीत. खूप दिवसांनी मल्हारला असे पाहून मावशीला खूप आनंद झाला. मावशी आज गोडाचा स्वयंपाक करून निघून गेली. आता मल्हारने सिनेमासाठी नाही तर स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी गायचे ठरवले. नव्या जोमाने त्याने सुरुवात केली. आता त्याला कोळ्याप्रमाणे पडण्याची भीती वाटत नव्हती, कितीदा पडावे तरीही उठावे. शास्त्रीय संगीत पुढच्या पिढीकडे पोहोचावे या हेतूने घरात कमी दरात संगीत शिकवणी सुरु केली. यातून अर्थार्जन कमी पण पुढच्या पिढीकडे संगीत वारसा जपल्याचा आनंद जास्त होता. एका सोशल मीडियाच्या व्हिडीओ अँपमार्फत संगीत विद्या आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू लागला. खूप छान प्रतिसाद त्याला मिळू लागला. लोक नवीन व्हिडीओची वाट आतुरतेने बघत. संगीत एक विद्या, एक शास्त्र, एक मानसिक उपचार, संगीताचा गर्भावर होणारा परिणाम असे अनेक विषय त्यातून सुरु झाले. त्यातून पहिल्या संगीत ऑडिओची निर्मिती झाली 'संगीत गर्भसंस्कार' .


प्रयत्न करण्याची प्रेरणा कोळ्याने मल्हारला दिली. संगीत विद्या तर होतीच पण त्याला प्रेरणेची जोड मिळाली. एकेकाळी अपयशातून खचून गेलेल्या, नैराश्याच्या जाळ्यात अडकलेल्या मल्हारला एका छोट्या कोळ्याने बाहेर काढले. ताकद असते, तयारीही असते पण गरज असते प्रेरणेची. प्रेरणा एक उमेद असते पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणते. प्रेरणा एक अदृश्य बळ असते जे आपल्याला यशाच्या जवळ ढकलत असते. नवीन काहीतरी सुरु करण्यासाठी आई बाबांशी बोलून थोडे भांडवल उभे केले. शास्त्रीय संगीताचा 'दिवाळी पहाट' नावाचा कार्यक्रम करायचे ठरवले. दिवाळीच्या पहाटे हा कार्यक्रम खूप छान रंगला आणि रसिकांच्या आग्रहाखातर कार्यक्रम नुसता दिवाळीपुरता मर्यादित राहिला नाही. मग 'संगीत मल्हार' नावाने त्याचे प्रयोग होऊ लागले. कार्यक्रमाला बऱ्याच मान्यवरांची हजेरी होऊ लागली. दिवाळी पहाट, दसरा असे मोजके होणाऱ्या कार्यक्रमाने बघताबघता विक्रम केला. शास्त्रीय संगीत आणि कॉलेजची मुले असे समीकरण जुळू लागले. कॉलेजच्या तरुणांचा लाडका गायक झाला होता. देशविदेश सगळीकडे दौरे सुरु केले. घरगुती संगीत शिकवणी आता मल्हार संगीत विद्यालय म्हणून नावारूपाला आली. बऱ्याच वाहिन्या मुलाखतीसाठी निमंत्रणे देऊ लागल्या. 'संगीत विक्रम' ; 'शास्त्रीय संगीत साता समुद्रापलीकडे' अशा ठळक बातम्या येऊ लागल्या. एके काळी चित्रपटातून वगळलेली मल्हारची गाणी बाजारात कॅसेट म्हणून विक्रीस आली. खरेतर मल्हारला हे पटत नव्हते पण इलाज नव्हता. वितरणाचे हक्क निर्मात्यांकडे होते. नवीन गायक म्हणून नाकारलेल्या मल्हारला आता रोज त्याच निर्मात्यांचे फोन येत होते. पण मल्हारने पक्के ठरवले की ज्यातून आपल्याला आनंद मिळत नाहीत असे काम करायचेच नाही. काही दिवसांनी एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि पंडितजींचे गंडाबांध शिष्य भैरवजींचा मल्हारला फोन आला. काहीतरी काम असल्याचे सांगितले. कसलाही विलंब न करता मल्हारने होकार दिला. एका जुन्या संगीत नाटकाचे रंगमंचावर पुनरागमन करण्याचे ठरवले. त्यासाठी काही गाणी गाण्यासाठी मल्हारची निवड करण्यात आली. नाटकाचे जास्त काही प्रयोग झाले नाहीत पण समाधान खूप मिळाले. नवीन करण्याचा, नवीन शिकण्याचा, भैरवजींचा सहवास या गोष्टीतून आनंद प्रचंड होता. आता कोळ्याप्रमाणे पडल्यावर उठायलाही मल्हार शिकला होता. त्यामुळे अपयशाने खचला नाही. त्याने अनुभवाचा उपयोग करून अजून एका जुन्या संगीत नाटकाचे रंगमंचावर पुनरागमन केले. त्याचे फक्त २५ प्रयोग करायचे त्याने ठरवले. आणि २५ च्या २५ प्रयोग हाऊसफुल झाले. नाटकाला मिळालेल्या भरघोस यशामुळे एका नवोदित निर्मात्याने नाटकाचे सिनेमात रूपांतर करायचे ठरवले. मल्हारला संगीतकार म्हणून विचारण्यात आले पण मल्हारने साफ नकार दिला. पण संगीत नाटकाचा सिनेमा. एक नवीन प्रयत्न, आणि एक दिग्दर्शक जो नवोदित निर्माता होतोय असा विचार करून मल्हारने होकार दिला. बरेच प्रयोग झालेल्या नाटकाची गाणी पुन्हा नव्याने संगीतबद्ध करण्यात आली. एक गाणे गाण्यासाठी बरेच रिटेक झाले पण जागा आणि हरकती मल्हारच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या. मग मल्हारने ते गाणे स्वतःच गायचे ठरवले. सिनेमा प्रदर्शित झाला. पहिला संगीत नाटकाचा सिनेमा म्हणून खूप चर्चा सुरु झाली. सिनेमापेक्षा नवीन संगीतबद्ध गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. कॉलेजच्या मुलांच्या इअरफोनमध्ये मल्हार हिट्स सुरु झालं. त्या वर्षी सिनेमाला बरीच नामांकने मिळाली. बरेच अवॉर्ड मिळाले आणि उल्लेखनीय म्हणजे त्या वर्षीचा सर्वोत्कुष्ट संगीतकार आणि गायक राष्ट्रीय पुरस्कार मल्हारला मिळाला. त्यावेळी त्याला पत्रकारांनी विचारले ह्या पुरस्काराचे श्रेय कोणाला द्याल? मल्हारने हसतच उत्तर दिले "पंडितजी, आई बाबा आणि भिंतीवरच्या कोळ्याला..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational