धसका
धसका
निसर्ग नियमानुसार ऋतूचक्रामध्ये बदल झाला. गुलाबी थंडी संपून ग्रीष्माचे चटके जाणवायला लागले. ऋतूचक्रातील बदलाप्रमाणे माझ्या आयुष्यातही मोठी उलथापालथ होणार आहे याची यत्किंचितही कल्पना मला त्यावेळी नव्हती.
मला आजही तो दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाप्रमाणे आठवतो. तसा तो विसरता येण्यासारखाही नाहीच म्हणा. आम्ही राहायला सोलापूरमध्ये. आम्ही नवरा बायको दोघेही शिक्षक. माझ्या सासरचे गाव आणि माझ्या मिस्टरांच्या शाळेचे गाव एकच आणि मी त्याच्या
अलिकडच्या गावातील शाळेत नोकरीला. माझी मुलगी सिया तिची नववीची परीक्षा नुकतीच संपल्यामुळे आमच्यासोबत गावी येणार होती.
पहाटे लवकर उठून मी सर्व कामे उरकली त्या दिवशी सकाळपासूनच मला अस्वस्थ वाटत होत. मन बेचैन होत होतं. जणू काही पुढे घडणाऱ्या गोष्टींचा मला संकेत मिळत होता. सकाळचे सव्या सहा वाजले होते. मुलग्याची रिक्षा आली आणि तो शाळेसाठी निघून गेला.
आमची शाळेला जाण्याची नेहमीची वेळ झाली होती. सिया सुध्दा तिचे सगळे आवरून खाली आली. आणि मी तिच्याकडे बघतच राहिले. कोणचीही नजर तिच्यावर खिळून राहील इतके तिचे अनुपम सौंदर्य. तिचा जन्म झाला त्यावेळी माझी आजी सगळ्या नातेवाईकांना
सांगायचीकी, प्रियाच्या पोटी नक्षत्रासारखी मुलगी जन्माला आली आहे.
तेवढ्यात मिस्टरांनी आवाज दिला त्यामुळे मी भानावर आले. माझे लक्ष सियाच्या कानातील छोट्या रिंगांकडे गेले. मी तिला त्या बदलून मोठ्या रिंगा घालायला सांगितल्या. पण तिला त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे ती दुसरे नकली कानातील घालून आली. मला ते
आवडलं नाही. मी तिला ते बदल असं म्हणणार होते, पण उशीर व्हायला नको म्हणून मी गप्प
बसले. आणि तोच क्षण मला आयुष्यभर अस्वस्थ करणारा ठरला. मनाला बोचणी लावणारा
ठरला. मी तिला ते कानातील डूल का बदलायला सांगितले नाही. याची खंत आजही माझ्या
मनाला लागून राहिली आहे. आमचा प्रवास सुरु झाला मिस्टर गाडी चालवत होते. मी त्यांच्या शेजारील सिटवर
बसले होते. आणि मुलगी मागच्या सीटवर खिडकीजवळ बसली होती. बऱ्याच दिवसांनी आम्ही असा एकत्रित प्रवास करत होतो. त्यामुळे हास्यविनोद करत आमच्या गप्पा सुरु होत्या.
पण त्या दिवशी का कोणास ठाऊक मिस्टर थोडे शांत-शांत वाटत होते. नेहमी प्रमाणे हसतखेळत बोलत नव्हते.
बघता-बघता आमचा निम्मा प्रवास संपला. आम्ही घाटात येऊन पोहचलो. माझे लक्ष डोंगराकडे गेले. सूर्योदयाचे ते मनोहारी दृश्य क्षणभर मी पाहतच राहिले, सियासुध्दा तो सुंदर नजारा पाहून खुश झाली. नंतरच्या काही क्षणातचं आमचा हा आनंद मावळणार आहे हे
तिलाही माहित नव्हते आणि मलाही.
पुढच्याच क्षणी गाडी एका मोठ्या वळणावर आली आणि तिचा वेग खूपच जास्त वाढला. आम्ही दोघीही खूप घाबरलो. मिस्टरांना ओरडून सांगू लागलो की, गाडीचा वेग कमी करा. पण त्यांच्या कानापर्यंत आमचे शब्दच जात नव्हते बहुधा. काहीतरी विपरीत घडत होत.
गाडी रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हेलकावे खात होती. आमच्या सुदैवाने त्यावेळी समोरून कोणतेही वाहन आले नाही. पण दुर्देव पुढे मांडूनच ठेवले होते. गाडी काही क्षणातच चार-पाच पलट्या खात खोल दरीत कोसळली .शेवटच्या पलटीला गाडी पुन्हा सरळ झाली आणि तिच्या मागच्या चाकात एक मोठा दगड अडकल्यामुळे ती तिथेच स्थिर राहीली.
थोड्यावेळाने मी शुध्दीवर आले. डोळ्यांना ताण देऊन मी ते उघडले आणि समोरचे दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडाला. गाडी तीस फूट दरीत कोसळली होती. गाडीची पुढची काच पूर्ण फुटली होती. सगळीकडून गाडी चेपली होती. मी समोरच्या सीटवरून सिया ज्या
ठिकाणी बसली होती तिथे आले होते. म्हणजे ड्रायव्हरच्या सीटच्या बरोबर मागे. आणि ड्रायव्हर सीटवर मिस्टर स्टेअरिंगवर डोके टेकून पडले होते. गाडीच पत्रा कापून त्यांच्या सर्वांगाला जखमा झाल्या होत्या. एकदम माझ्या काळजात धस्स झाले. आम्ही दोघं गाडीत
आहे आणि सिया कोठे आहे. ती कोठेच दिसत नव्हती. माझ्या हाता-पायातील त्राणचं निघून गेलं. सर्वांगाला दरदरून घाम फुटायला लागला. काळजाचं पाणी-पाणी झालं. माझी नजर तिला शोधू लागली. तेवढ्यात माझ्या कानावर तिचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेनं बघितलं तर ती गाडीपासून आठ ते दहा फूटावर जाऊन पडली होती. मग माझ्या लक्षात आले की ती बसली होती तो गाडीचा दरवाजा शेवटच्या पलटीवेळी निसटला होता त्यामुळे ती जोरात गाडीतून बाहेर फेकली गेली होती. ती धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होती. माझे पाय दोन सीटच्या दरम्यान अडकल्यामुळे मला जागचे हलताच येत नव्हते. मी मिस्टरांना हाका मारू
लागले ते काहीच बोलत नव्हते. मग मी त्यांना जोरजोराने हलवले अचानक झोपेतून जागे झाल्यासारखे उठले. तेवढ्यात मुलगीही गाडीजवळ तिच्याकडे बघितले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या उजव्या कानातून रक्त वाहत होतं. तिनं जे कानातल
घातलं होत त्याचा पत्रा तिच्या कानात घूसून तिचा कानचं चिरला होता. काय बोलावं मला सुचेना. भितीने माझी बोबडीचं वळली. तिचा तो रक्ताळलेला कान, चेहऱ्याला ठिकठिकाणी खरचटलेल्या जखमा पाहून मी गोठल्यासारखी झाले. एव्हाना रस्त्यावरून जाणारी माणसे
आमच्या मदतीसाठी धावून आली होती. मी स्वतःकडे बघितले तर मला साधा एक ओरखडाही उठला नव्हता. देव इतका निष्ठूर का झाला तेच कळत नव्हते.
माझ्या सियाच्या जखमा त्याने मला का दिल्या नाहीत असे त्याला ओरडून विचारावे वाटत होते. आपल्याला
एवढी मोठी जखम झाली आहे. याची सियाला जाणीव नव्हती. मग मी ही मन घट्ट केले आणि तिला एवढ्यात काही कळू द्यायचे नाही असे ठरवले. पण आम्ही दरीतून रस्त्यावर आल्यानंतर गर्दीतील एक बाई मोठ्याने म्हणाली अगं बाई पोरगीचा कानच फाटला की, हे
ऐकल्यावर मात्र सियाने मोठ्याने रडायला सुरवात केली. मला त्या बाईचा खूप राग आला होता. कारण धीर द्यायचं सोडून ती जखमेवर मीठ चोळायचं काम करत होती. पण यावेळी त्या बाईपेक्षा मला माझी सिया खूप महत्त्वाची होती. मी तिची समजूत घालू लागले.
तेवढ्यात ओळखीच्या एका सरांनी आम्हाला दवाखान्यात नेलं. गाडीतून जाताना सिया स्वतःच्या वेदना विसरून आम्हालाच धीर देत होती याचं मला आजही कौतुक वाटत.
दवाखान्यात गेल्यानंतर मिस्टरांना आय.सी.यू. मध्ये ठेवलं आणि सियाचं कानाचे ऑपरेशन करण्याचं ठरल तेव्हा मात्र माझ्या दोन्ही पायातील शक्तीच कोणीतरी काढून घेतल्यासारखं झालं. मला स्वतःच्या पायावर उभे राहता येईना. मला आणि सियाला एकाच रुममध्ये ठेवलं होतं. सकाळपासून काहीच खाल्ले नसल्यामुळे तिला भूक लागली होती. आणि त्याहीपेक्षा जास्त तहान लागली होती पण
ऑपरेशन करायचं असल्यामुळे काहीच देऊ नका असे डॉक्टरांनी सांगितलं होतं. तिची ती
अवस्था मला बघवत नव्हती. मला जागेवरून हलता येत नसल्यामुळे तिची तगमग लांबून बघण्यावाचून माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता.
शेवटी तिला ऑपरेशनसाठी नेले सुमारे दोन तास ऑपरेशन चालले. ऑपरेशन यशस्वी झाले होते. पण जोपर्यंत कानाची पट्टी निघत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. पंधरा दिवसांनी डॉक्टरांनी कानाची पट्टी काढली. माझ्या सियाचा कान पूर्ववत झाला होता. मी
डॉक्टरांचे अक्षरश: पाय धरले. त्यांचे लाख-लाख आभार मानले. मात्र या सर्वामध्ये माझ्या मुलगीला जो त्रास सहन करावा लागला ,यातना भोगाव्या लागल्या,वेदना सहन कराव्या लागल्या ,त्याची अस्वस्थतता मी आजही अनुभवत आहे.
ही घटना माझ्या जीवनातील सत्य घटना असून ती मी स्वतः लिहिली आहे.
