STORYMIRROR

shashank surve

Horror

3  

shashank surve

Horror

धोका

धोका

22 mins
211

"She is not worthy of your love..Kill her"

"She is not worthy of your love..Kill her"

"ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाही..मारून टाक तिला"

"ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाही..मारून टाक तिला"


अशी वाक्ये पूर्ण पानभर लिहलेली दोन कागदे ह्या टेबलावर होती...आता माझा तिसरा कागद इथे जमा होईल....पहिला कागद ज्यावर तारीख आहे 23 june 1941.....ह्या कागदावरचा मजकूर इंग्लिश मध्ये हाताने लिहला होता....."She is not worthy of your love..Kill her" अस पूर्ण पानभर लिहल गेलं होतं.....दुसरा कागद 23 june 1976.....ह्या कागदावर "ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाही..मारून टाक तिला" अस पूर्ण पानभर टाईपरायटने टाइप केलं होतं आणि हा मजकूर मराठीत लिहला गेला होता.....ह्या दोन कागदावर एक मानवी कवटी पेपरवेट स्वरूपात ठेवली होती.....तिथे कोपऱ्यात पांढऱ्या गाऊन मध्ये पडलेल्या जीर्ण झालेल्या सांगाड्याची ही कवटी असावी कदाचित.....इथे ह्या तळघरात एकूण दोन मानवी सांगाडे पडले आहेत.....एक पांढऱ्या इंग्रजी उंची गाऊन मध्ये तर दुसऱ्या सांगाड्याभोवती जीर्ण झालेली साडी आहे....ज्यांनी ज्यांनी ह्या टेबलावर तो मजकूर लिहून कागदे ठेवली त्यांच्या संबंधित ह्या महिला असाव्या कदाचित.....एक सांगाडा 1941 चा तर दुसरा 1976 चा असू शकतो.....एक कमालीचे गूढ वातावरण आहे ह्या तळघरात.....एक लांबलचक हॉल त्यात एक टेबल....दोन्ही बाजूला पडलेले दोन मानवी सांगाडे.....टेबलाच्या वरती लावलेले हे "सेटैनिक" ह्या सिक्रेट सोसायटीचे भले मोठे पेंटिंग....टेबलावर काही जुनी पुस्तके एक तीक्ष्ण धारेची सामुराई जपानी तलवार आणि ही दोन पूर्ण पानभरून मजकूर लिहलेली कागदे......न राहून माझं लक्ष सतत त्या सेटैनिक पेंटिंगवर जाते अस वाटत की हा भलामोठा डोळा मलाच बघत आहे.....डोळ्यांचे हावभाव ओळखणारा मी जरी रसिक किंवा मनोविश्लेषक नसलो तरी ह्या पेंटिंग मधील त्या डोळ्याच्या बुबुळाचे रंग मला स्पष्ट दिसतात......मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या रात्री इथे आलो आहे तेव्हा ह्या डोळ्याच्या नसा लालभडक झालेल्या असतात.....मला आठवत की तासन्तास मी ह्या पेंटिंग मधील डोळ्याकडे बघत राहतो.....जादूगार जसे डोळ्यात बघायला लावून समोरच्या व्यक्तीला संमोहित करतो तसा हा भलामोठा डोळा मला नरक दाखवतो....तिथली आग तिथला दाह मी कित्येकदा ह्या खोलीत उभं राहून अनुभवला आहे....तिथल्या आर्त किंकाळ्या....तिथल्या नरक यातना भोगणार्या भाजून निघालेल्या मानवी देहाचा उग्र दर्प मी ह्या खोलीत अनुभवला आहे.....मला त्या नरकात नाही जायचं.....म्हणून तर मी सुद्धा माझा कागद इथे टेबलावर ठेवत आहे.....हा कागद मी आताच लॅपटॉप वर प्रिंट केला आहे......मी सुद्धा त्या धोकेबाज बाईला म्हणजे माझ्या पत्नीला मारून टाकीन त्याशिवाय ह्या त्रासातून माझी सुटका नाही....मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिला कुण्या परपुरुषाच्या बाहुपाशात नाही बघू शकत....संपवणार आहे मी तिला...ओहहह ही तलवार ह्याचसाठी ठेवली आहे तर......आताच जाऊन त्या धोकेबाज बाईचा खेळ खल्लास करतो......


असा मनोमन विचार करणारा मयंक एक इंजिनियर आहे.....अनेक भलेमोठे मॉल्स,आपर्टमेंट तसेच सरकारी इमारती,बंगले बांधून मयंक हा भारतातील एक टॉपचा इंजिनियर बनला होता.....त्याच्या एका पार्टनरने त्याला ह्या जुन्या बंगल्यात आणले होते.....मयंक साठी हा प्रोजेक्ट खूपच चॅलेंजिंग होता.....पिटर्सव्हॅली नावाच्या एका उंच आणि थंड हवेच्या ठिकाणी "सर व्हील्सन पॅलेस" नावाच्या एका भक्कम चिरेबंदी 3 मजली बंगल्याला पाडून तिथे एक मोठा मॉल बांधण्याची जबाबदारी मयंकने घेतली होती......तसा व्हील्सन पॅलेस 1920 च्या दरम्यान बांधला गेला होता.....एखाद्या किल्ल्यासारखा भक्कम आणि उंच ठिकाणी असलेला हा बंगला आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यास मदत देखील करत होता.....पूर्वी इंग्रजांच्या काळात पिटर्सव्हॅली वर किंवा आसपास जास्त वस्ती नव्हती....पण आता पिटर्सव्हॅली मधील जागेला सोन्याचा भाव होता....महाबळेश्वर प्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त नयनरम्य असा हा डोंगर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होता......मानवी अतिक्रमण अजून तरी व्हील्सन पॅलेस पर्यंत आले नव्हते...पिटर्स व्हॅलीची मुख्य बाजारपेठ,हॉटेल्स व्हील्सन पॅलेस पासून लांबच होते..तरीही ती जागा खूप महत्त्वाची होती....मयंकचा एक बॉस राकेश मराठे ह्याच्या चार पाच पिढ्यापासून व्हील्सन पॅलेसची जबाबदारी,हक्क सगळं काही त्यांच्याकडे होतं....राकेशच्या पूर्वजांनी इंग्रजी साहेबांची चाकरी इमानेइतबारे केली होती त्याचे फळ म्हणून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1957 साली इथल्या इंग्रज अधिकाऱ्याने सगळी मालकी मराठे कुटुंबाकडे दिली......पण हा भक्कम असा पॅलेस 60 च्या दशकापासून बंदच होता....."ती जागा राहण्यालायक नाही आहे" असे राकेशचे पूर्वज म्हणत असत...राकेशला ह्या सगळ्या भाकडकथा वाटत होत्या..राकेशने एवढी मोलाची प्रॉपर्टी वापरण्याचा निर्णय घेतला तेव्हा कधी नव्हे ते राकेशच्या वडिलांची डोळ्यातून पाणी काढले होते.....

"आर पोरा....जागा बेक्कार आहे ती....श्राप हाय त्या जागेला" अस बोलून राकेशला रोखलं होत.....एका पार्टीमध्ये राकेशने आपलं हे दुःख सगळ्यांसमोर बोलून सुद्धा दाखवलं होतं.....हे सगळं ऐकून आयुष्यात नेहमी आव्हान स्वीकारणारा मयंक ताडकन उभा राहिला आणि तो बंगला पाडून तिथे मॉल बांधण्याचा विचार बोलून दाखवला.....आणि झटक्यात तो विचार सगळ्यांना पटलाही......राकेशच्या वडिलांच्या शब्दाचा मान राखत तिथे न राहता ती वास्तू तोडून तिथे नवीन बांधकाम शक्य होतं....दुसऱ्या दिवशी पासून राकेशने व्हील्सन पॅलेस पाडून मॉल बांधण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया असते ती करायला सुरुवात केली आणि काही दिवसातच पिटर्स व्हॅली मध्ये नवीन मॉल बांधण्याची परवानगी मिळवली सुद्धा.....महिन्याभरात मयंक पिटर्स व्हॅली मध्ये त्या जुन्या घराची पाहणी करायला निघणार होता.....पिटर्स व्हॅली हे नाव ऐकताच त्याची बायको राजश्रीने देखील तिथे सोबत येण्याचा हट्ट करू लागली.....पिटर्स व्हॅली बघायची तिचीही इच्छा होती आणि तिची इच्छा मयंक अपुरी ठेवूच शकत नव्हता.....कारण मयंक जो काही होता तो फक्त आणि फक्त राजश्रीमुळे होता..त्याच्या आयुष्यातली प्रेरणा होती ती....सफलतेच्या तिजोरीची जणू किल्लीच.....मयंक आणि राजश्रीचं कॉलेज मधलं प्रेम होतं .....दोघांनीही सोबत जगण्या मरण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या.....सुरवातीला मयंकची परिस्थिती तशी बेताची होती.....राजश्रीचे वडील सरकारी अधिकारी होते.....साहजिक घरून विरोध होणार हे फिक्स होतं....त्यावर मयंकला स्वतःच्या पायावर उंच उभं राहण्यावाचून पर्याय नव्हता.....अभ्यासात तो हुशार होता पण राजश्रीच्या प्रेमाखातर त्याने मन लावून अभ्यास करून टॉप केला आणि यशस्वी इंजिनियर झाला.....समाजात आपले स्थान कमावून तो राजश्रीच्या वडिलांकडे गेला.....राजश्रीच्या वडिलांनी देखील आपल्या मुलीच्या सुखासाठी लग्नाला परवानगी दिली आणि दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला.....एकूणच मयंक जो काही होता तो राजश्रीला मिळवण्याच्या संघर्षातुन बनला होता.....त्याचं प्रेम त्याला एक यशस्वी उद्योजक बनवून गेलं.....त्यामुळे राजश्री म्हणजे त्याची एक प्रकारे मालकीनच झाली होती.....तिचा हुकूम मयंकने पुरा केला म्हणूनच समजा......


जुनचा महिना होता....पावसाला नुकतीच सुरवात झाली होती.....पिटर्सव्हॅलीच्या डोंगरांनी हिरवी चादर ओढून घेतली होती....आजूबाजूचा निसर्ग बघत दोघांची जोडी पिटर्स व्हॅली कडे निघाली.....राकेशने जी श्रापाची गोष्ट सांगितली होती ती गोष्ट मयंकने राजश्रीला सांगितली नव्हती वास्तविक असल्या भाकड कथांवर त्याचाही विश्वास नव्हता.....ड्राइव्ह करत त्यांची गाडी व्हील्सन पॅलेसच्या बाहेर आली.....तो दगडी चिरेबंदी बंगला अगदी नवीन वाटत होता.....त्या बंगल्याबद्दल आणि आपल्या प्लॅन बद्दल मयंकने राजश्रीला काहीच सांगितलं नव्हतं......त्याने फक्त एवढंच सांगितलं होतं की हा बंगला माझा मित्र राकेशच्या मालकीचा आहे.....राजश्रीला जुन्या वास्तू,मंदिरे प्रचंड आवडायच्या त्यामुळे व्हील्सन पॅलेसची भव्यता बघून राजश्रीने जवळजवळ मयंकच्या हातातून चाव्या हिसकावूनच घेतल्या आणि ती त्या बंगल्याचे भव्य दार ढकलून आतच शिरली.....

"आता आपण ह्या घरात राहणार आहोत...."

हाच विचार तिला सुखावत होता....आणि "हा दगडी बंगला आपण पाडून मॉल बांधणार आहोत" अस सांगून राजश्रीचा आनंद मयंकला हिरावून घ्यायचा नव्हता....तो तिच्याबरोबर आत शिरला.....राजश्री खूप खुश होती.....उंच भिंती आत लावलेली झुंबरे....काही इंग्रजांच्या पेंटिंग हे सगळं काही बघून हरकून जात होती आणि तिकडे मयंक तिच्या मागे मागे चालत कुठून पडायला सुरुवात केली तर हा दगडी वाडा लवकर पडेल??सोबत मॉल साठी त्याच्या डोक्यातल्या कल्पना रंगवत पुढे पुढे चालला होता......एका सुंदर अश्या खोलीवर राजश्रीची नजर पडली....त्या खोलीच्या भिंतीवर सुंदर नकाशी काढल्या होत्या आणि बरोबर मध्ये एक मखमली बेड अगदी सुस्थितीत जश्याच्या तसा धुळीचा एकही कण नसलेला होता.....एकदम सुंदर जुन्या वस्तूंची ती खोली सजली होती....तिथे काय बघू आणि काय नको अस राजश्रीला झालं होतं लॅपटॉप मध्ये काहीतरी करत असलेल्या मयंक कडे बघत म्हणाली की

"मयंक आपण ह्या खोलीत झोपायचं.....ओके??"


आपला अंगठा दाखवून मयंकने परवानगी दिली.....राजश्री खुश होती....मयंकला अजून काय हवं होतं.....तो पॅलेस बघायला दोघांना तब्बल 2 तास लागले.....कुणीतरी जसा सोडला होता तसाच तो अजूनही होता......एकप्रकारे राजवाड्यात राहण्याचा फिल राजश्रीला येणार होता.....मयंक फक्त पाहणी करून एखाद्या हॉटेल मध्ये राहणार होता.....पण ह्या दगडी बंगल्याची भव्यता बघून तो थक्क झाला 1920 चे बांधकाम म्हणजे सगळीकडून पडझड झालेलं,कुबट,कोंदट अस काहीसं असेल अस त्याला वाटलं होतं....पण इथं चित्र वेगळं होतं....इथं तर राजवाडा होता.....ब्रिटिश बांधकाम शास्त्राचा अद्भुत नमुना.....त्यामुळे त्याने इथेच रहायचं ठरवलं......पिटर्स व्हॅली तिथून 4,5 किलोमीटर अंतरावर होती त्यामुळे तिथे जेवण करून दोघे इथे वस्तीला आले.....त्या बंगल्यात लाईटची सोय होती त्यामुळे काही अडचण नव्हती.....रात्री त्या काचेच्या झुंबरात लाईट लागली की मंद लाईटीच्या उजेडात तो दगडी बंगला उजळून निघायचा......राजश्री अगदी रमली होती त्या बंगल्यात दोन दिवस फक्त आणि फक्त फिरत होती...फोटो घेत होती......आणि मयंक आपला तिथला प्रोजेक्ट बनवण्यात व्यस्त होता.....त्या दिवशी हॉल मध्ये एका टेबलावर लॅपटॉप ठेवून मयंक काम करत होता....थोडा थकला होता....अचानक त्याचे डोळे जड होऊ लागले आणि त्याला झोप येऊ लागली.....तो तसाच झोपी गेला......अचानक त्याला दिसलं की हॉलच्या डाव्या बाजूला एका मोठ्या आलिशान खोलीत असलेल्या मोठ्या पेंटिंगमधली व्यक्ती बाहेर येऊन राजश्रीशी बोलत उभी आहे....तो एक उंचापुरा इसम इंग्रज वाटत होता.....तो राजश्रीशी बोलत उभा होता....राजश्री देखील हसत त्याच्याशी बोलत होती.....मयंक ताडकन तिथून उठला आणि हॉल मधून त्या डाव्या बाजूला असलेल्या रूम कडे धावला.....तिथे पोहोचल्यावर त्याने बघितलं की राजश्री तिथे थोडी सफाई करत आहे....हे बघून त्याने निश्वास सोडला.....त्याने त्या खोलीत लावलेल्या पाचफुटी पेंटिंगकडे बघितले.......त्याच्याखाली मोठ्या अक्षरात लिहल होतं......सर विलियम विंसलेट....एक देखणा रुबाबदार इंग्रज अधिकारी....त्या पेंटिंगमध्ये अगदीच जिवंत वाटत होता....त्या पेंटिंगकडे आणि एकवार सफाई करणाऱ्या राजश्री कडे बघून मयंक मनोमन बोलला


"ओहहहह हे एक स्वप्न होतं तर"


मागून मारलेल्या घट्ट मिठीमुळे राजश्री थोडी गोंधळली....पण मयंक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता.....राजश्रीची तिथली सुट्टी आणि मयंकचे काम एकदम मस्त चालू होते.....एकेदिवशी मयंक लॅपटॉप वर काम करत होता..राजश्री त्याच्यासाठी चहा बनवत होती...मयंकची बोटे लॅपटॉप वर वेगाने फिरत होती......अचानक त्याचा लॅपटॉप बंद पडला बंद पडलेल्या लॅपटॉपच्या काचेत मागे कुणीतरी उभं असल्याचा भास मयंक ला झाला त्याने ताडकन मागे बघितले....मागे कुणीच नव्हते.....त्याने आसपास नजर फिरवली त्याला लॅपटॉपच्या काचेत दिसलेली ती आकृती कुठेच दिसत नव्हती......त्या रात्री मात्र मयंकला अस्वस्थ वाटू लागलं.....त्याला ताप चढला होता.....राजश्री त्याची काळजी घेऊ लागली.....राजश्रीने त्या रात्री जवळच्या एका डॉक्टरचा नंबर शोधून त्याला व्हील्सन पॅलेस मध्ये बोलावून मयंक वर ट्रीटमेंट केली.....राजश्रीला मयंकची खूप चिंता वाटत होती पण तो आता सामान्य होत होता त्याचा ताप सुद्धा आता उतरला होता पण राजश्री त्याच्या बाजूला खुर्चीवरच झोपी गेलेली.....मध्यरात्री जवळपास 3 च्या सुमारास मयंक ताडकन उठला आणि धावत हॉलच्या दिशेने जाऊ लागला....त्यांची रूम दुसऱ्या मजल्यावर होती....तो धावत खालच्या प्रशस्त हॉल मध्ये आला त्याला घाम फुटला होता दम लागल्यामुळे छाती उडत होती.....त्याने समोरच्या सोफ्यावर बघितले तिथे कुणीच नव्हते त्याने वेगाने नजर सगळीकडे फिरवली तिथे तर कुणीच दिसत नव्हतं

"अजून एक स्वप्न"


तो मनोमन उच्चारून परत आपल्या खोलीकडे जाऊ लागला.....खोलीत राजश्री खुर्चीवर झोपली होती तिच्याकडे बघत मयंक थोडा सामान्य झाला.....त्याला स्वप्नात तोच पेंटिंगमधला सर विलियम आपल्या सरकारी पोशाखात हॉल मध्ये फिरताना दिसला होता त्याच्या हातात एक मोठी बंदूक होती.....स्वप्नात ती बंदूक त्याने मयंक वर रोखली होती आणि आपल्या उग्र स्वरात तो बोलला होता

"She is not worthy of your love..Kill her"

हे स्वप्न त्याला एवढं खर वाटलं की तो धावतच त्या हॉल मध्ये आला होता....पण ते एक स्वप्न होतं.....त्यामुळे त्याने निश्वास सोडला....आणि खुर्चीवर झोपलेल्या राजश्रीला अलगद उचलून बेड वर झोपवून तिच्या कुशीत तो शांतपणे झोपी गेला.....दुसऱ्या दिवशी मयंक एकदम सामान्य झाला होता त्याला अस बघून राजश्री कमालीची खुश झाली....जून महिन्यात पिटर्स व्हॅली मध्ये बहरलेल्या निसर्गाप्रमाणे ती देखील आज खुश दिसत होती तिकडे मयंक मात्र वरून फिट वाटत असला तरी आतून मात्र पुरता हादरून गेला होता......त्या पेंटिंगमधल्या सर विलीयमची सलग दोन स्वप्ने.....दुसरं स्वप्न तर एकदम भयानक होतं....पण आपल्या तत्वावर तो खंबीर होता "असलं काही नसतं....सगळे मनाचे खेळ असतात" अस तो स्वतःच्या मनाला वारंवार बजावून सांगत होता.....त्याच्या आयुष्यात सगळं काही एकत्र सुरू होत.....राजश्रीला खुश ठेवणं,आपलं काम सांभाळण,आणि हा चालु झालेला नवीन स्वप्नांचा खेळ.....पण ह्या सगळ्यात त्याने राजश्रीला खुश ठेवण्याला प्राधान्य दिलं आणि काही दिवस काम थोडं बाजूला ठेवून तो सुद्धा पिटर्सव्हॅली मधील निसर्ग,पावसाळा,धबधबे एन्जॉय करू लागला....पण न जाणो त्या व्हील्सन पॅलेस मध्ये आलं की दिवसभर केलेला एन्जॉय आणि प्रसन्नता सगळं काही गळून पडे.....मयंकच्या मनावर एक मळभ,अपराधी भावना,डोकं जडजड होणे असले काही प्रकार होत असत पण ते सगळं तो राजश्री समोर कधीही दाखवत नव्हता.....तिचा मूड राखण्यासाठी तो त्या पॅलेसमध्ये आल्यावर सुद्धा खुश राहण्याचं नाटक करत होता.....आता इथे येऊन त्यांना आठवडा झाला होता...


त्या रात्री जोराचा पाऊस झाला होता.....पॅलेसच्या बाजूने डोंगरातून एक धबधबा खळखळ आवाज करत वाहत होता....विजांचा कडकडाट होत असल्यामुळे राजश्री मयंकला घट्ट मिठी मारून झोपली होती.....रात्रीचे 3:00 वाजले होते.....अचानक मयंकचे डोळे उघडले तो बेडच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता.....बेडवरचे दृश्य बघून त्याचे डोळे विस्फारले.....डोक्यात आणि डोळ्यात संतापाची आग उसळत होती.....राजश्री त्याच्यासमोर पूर्णपणे नग्न होऊन एका परपुरुषाबरोबर प्रणयक्रीडेत मग्न होती.....ती मयंक कडे बघून कुस्सीतपणे हसत होती....त्या पुरुषाचा हात तिच्या नग्न देहावर फिरत होता आता तो देखील मयंक कडे बघून स्मितहास्य करत होता....त्याच्यासमोर राजश्रीचे चुंबन घेत होता.....राजश्रीचा मादक आवाज मयंकचे डोके बधिर करत होता....प्रणयसुखाच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहचून तो बेड वर शांत पडली होती....आणि तो तगडा नग्न पुरुष मयंक समोर हसत उभा होता.....परत तोच पेंटिंगमधला इंग्रज सर विलियम.....मयंक कडे बघत हसत म्हणाला

"I told you...she doesn't deserve your love"


मयंक प्रचंड संतापला होता....राजश्रीने त्याच्या खऱ्या प्रेमाचा अपमान केला होता....तो खुर्चीवरून उठला आणि राजश्रीचा गळा धरला.....राजश्री जोरात किंचाळली तसा मयंक भानावर आला.....त्याने आजूबाजूला बघितलं.....समोर नाईट ड्रेसमधली राजश्री दिसली.....त्याचा हात तिच्या गळ्याभोवती आवळला होता....आपली चूक लक्षात येताच त्याने झटकन हात मागे घेतला.....घामाने भिजलेल्या मयंकच्या कपाळावर हात फिरवत राजश्री म्हणाली


"मयंक....मयंक....अरे काय झालंय....तब्बेत ठीक आहे ना तुझी??....डॉक्टरांना बोलावू का??"


राजश्रीच्या ह्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हे मयंकला काहीच कळत नव्हते....आणि आपल्या त्या विचित्र स्वप्नाबद्दल तिला सांगणे म्हणजे....ह्याची तर तो कल्पनाही करू शकत नव्हता


"क...क....काही नाही ग.....वाईट स्वप्न होत"


राजश्रीने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला


"ओहहहह....तुला ताप आलेला ना....त्यामुळे झालं असेल कदाचित....झोप तू...म्हणजे आराम मिळेल"


राजश्रीचे प्रेम होतं जे परत मयंकला सामान्य करत होत.....पण त्या स्वप्नातील ते दृश्य राजश्रीच्या देहावर फिरणारे सर विलियमचे हात त्याला आतून त्रास देत होते.....दुसऱ्या दिवशी दुपारी तो असच लॅपटॉप वर बसला होता....काल रात्रीचे स्वप्न परत त्याच्या डोक्यात घुमत होतं....."खोटं आहे....खोटं आहे" अस मनाला कितीही सांगितलं तरी ती दृशे मयंकचे रक्त सळसळवत होती.....सर विलियम बरोबर सेक्स मध्ये रंगून मयंक वर हसणारी स्वप्नातली राजश्री मयंकला राग देत होती परिणामी त्याने दुपारी एका क्षुल्लक कारणावरून राजश्री बरोबर पहिले भांडण केले....राजश्री शांत राहून सगळं काही ऐकत होती.....मयंकचा हा रागीट अवतार ती पहिल्यांदा बघत होती पण पालटून एकही शब्द उलट बोलत नव्हती

"असेल काही कामच टेन्शन.....माझ्यामुळे तो इथे आलाय....काम पेंडिंग असेल त्याचे"

अशी मनाची समजूत घालून संध्याकाळी तिने इथून परत निघण्याची विनंती केली....तोपर्यंत मयंक थोडा सामान्य झाला होता....त्याने तिला जवळ घेत आधी तिची माफी मागितली


"सॉरी राजश्री.....जरा जास्तच बोललो....पण खरं सांगू का....आपण इथे अजून काही दिवस राहणार आहोत"


"अरे मयंक....पण तुझं काम??"


"तू नको टेन्शन घेऊ ग.....माझं काम पण चालू आहे आणि सुट्टी पण...."


परत एका दीर्घ चुंबनाने सगळ्या वादावर पडदा पडला....ते रात्रीच स्वप्न मयंकच्या काळजावर घाव घालणारं होतं तरी तो ते विसरू पाहत होता....जवळपास विसरला सुद्धा होता....जणू त्या भयानक स्वप्नावर त्याने विजय मिळवला होता.....त्याचे लॅपटॉप वरचे काम सुरू होते..जवळपास इथला प्रोजेक्ट संपलाच होता....आता तो रात्री झोपताना काही झोपेच्या गोळ्या घेत होता.....अजून काही दिवस आनंदात गेले...पण इथल्या ज्या काही शक्ती होत्या त्यांना हे मान्य नव्हते..आणि एकेदिवशी अचानक रात्री 3:00 च्या सुमारास परत तो चालू लागला.....हॉल मध्ये एक लाकडी कपाट होतं....त्याच्यादिशेने मयंक चालत होता.....ते कपाट त्याने उघडले कपाटाच्या आत डाव्या बाजूला एका अंधाऱ्या कोपऱ्यात कसला तरी लाकडी ट्रिगर होता तो त्याने खेचला.....लगेच समोर असलेले लाकडी पुस्तकाचे कपाट एखाद्या दरवाज्याप्रमाणे उघडले...समोर पायऱ्या दिसत होत्या....खाली बहुतेक तळघर असावे....अचानक मयंकला जाग आली.....राजश्रीचा हात त्याच्या छातीवर होता....."परत एक स्वप्न" नकारात्मक मान हलवून छताकडे बघत तो विचार करू लागला


"एवढे दिवस मी इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जवळपास नाकारलच आहे.....पण खरोखर इथे काहीतरी गूढ आहे.....कुणीतरी मला आपल्या कडे खेचत आहे....आपण इथे येऊन चुकी केली का??.....परत जावं का इथून??.....छे...छे....सगळ्यांच्या समोर मी हे आव्हान स्वीकारले होते....आणि मागे हटणारा मी तरी नाही.....इथे जे काही घडत आहे त्याचा सोक्षमोक्ष एकदाचा लावला पाहिजे.....कदाचित मला त्या तळघरात माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.....मला जाऊन बघितलं पाहिजे"


अस मनोमन ठरवून हलक्या पावलांनी मयंक बेड वरून उठला....राजश्री गाढ झोपली होती.....त्याने बाजूच्या टेबलावर पडलेला आपला लॅपटॉप आणि मोबाईल उचलला आणि खोलीच्या बाहेर पडला.....मयंक आता खालच्या हॉल मध्ये पोहोचला स्वप्नात जे लाकडी कपाट दिसले होते ते समोर होते....त्याने ते कपाट उघडले आणि डाव्या बाजूला अंधारात चाचपडणारा हात घुसवला....अंधारात हात फिरवत फिरवत त्याच्या कपाळावरच्या आठ्या सरळ झाल्या त्याच्या हाताला तो लाकडी ट्रिगर लागला होता....तो ट्रिगर त्याने क्षणार्धात खेचला आणि समोरचे पुस्तकाचे कपाट एखाद्या दरवाज्याप्रमाणे उघडले.....हॉलच्या मर्यादित उजेडात समोर चार पायऱ्या दिसत होत्या....बाकीच्या अंधाराने गिळून टाकल्या होत्या.....त्याने मोबाईल मधील टॉर्च सुरू केला आणि त्या तळघराच्या पायऱ्या हळुवार उतरू लागला.......

मयंकने मोबाईलचा टॉर्च ऑन केला तश्या त्या अंधारात गडप झालेल्या पायऱ्या आता दिसू लागल्या.....मयंक हळूहळू त्या पायऱ्या सावधपणे उतरू लागला....बाजूच्या भिंतीला एक जुने स्विच दिसले ते त्याने ऑन केले आता त्या तळघराच्या हॉल मध्ये 70-80 च्या दशकातील त्या लाईट बल्ब दिव्याचा उजेड झाला.....लालसर उजेडाने त्या पायऱ्या स्पष्ट दिसत होत्या....त्या पायऱ्या उतरत मयंक हॉल मध्ये येऊ लागला.....आत येता येता एक उग्र दर्प त्याच्या नाकाला स्पर्श करत होता नाकाभोवती हाताचा पंखा चालवत तो आता ह्या तळघराच्या हॉल मध्ये आला.....एकच दिवा तरीही ती खोली अंधुक प्रकाशाने उजळत होती.....ते तळघर बहुतेक स्टोअर रूम असावं....पण रिकामं दिसत होतं.....समोर एक टेबल दिसत होता आणि डाव्या कोपऱ्यात कसला तरी पांढरा ड्रेस दिसत होता....मयंक सावध झाला....तिथे कुणीतरी बसलं होत.....पण कोण??....मयंक ने आवाज दिला तसा तो आवाज पूर्ण तळघरात घुमला


"कोण....कोण आहे तिकडे???"


काहीच हालचाल होत नव्हती.....मयंक हातातील मोबाईल पुढे करत सरसावला.....जवळ जाता जाता त्याचे डोळे विस्फारले.....एक शीर नसलेले धड जीर्ण होऊन पडले होते.....त्या देहाबरोबर ते कपडे देखील जीर्ण झाले होते.....जीर्ण झालेले मास अगदीच हाडाला चिटकले होते....ते दृश्य बघून मयंक घाबरला मागे सरकला..त्याला हे दृश्य बघून घाम फुटला होता....घाबरतच त्याने मोबाईलचा टॉर्च त्या टेबलाच्या दिशेने फिरवला.....एक मानवी कवटी त्याखाली दोन कागद ठेवले होते......खूपच भयानक होत हे.....समोरच्या भिंतीवर दोन तीन स्विच दिसत होते ते मयंकने ऑन केले 4 बल्बच्या उजेडात ती खोली आता पूर्णपणे उजळून निघाली होती.....घाबरलेल्या मयंकची नजर आता त्या तळघरात फिरू लागली.....उजव्या कोपऱ्यात अजून एक जीर्ण झालेला मानवी सांगाडा दिसत होता....कुठल्यातरी महिलेचा सांगाडा होता तिचं शरीर सुद्धा जीर्ण झालं होतं....साडी फाटून चिंध्या झाल्या होत्या.....मयंक घाबरून मागे सरकला.....हत्याकांड घडलं होतं इथे....त्या साडीवाल्या बाईच्या कवटीवर वर्मी घाव दिसत होते.....मयंकने स्वतःला सावरले तसही इथे आल्यापासून त्याने चित्रविचित्र गोष्टी बघितल्या होत्या.....समोर जो टेबल ठेवला होता त्यावर त्या पांढऱ्या शुभ्र गाऊन मधल्या महिलेची कवटी ठेवली होती त्या कवटी खाली दोन कागद होते....पहिल्या कागदावर 23 जून 1976 ही तारीख होती आणि


"ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाही....मारून टाक तिला"


असा मजकूर पानभर टाईपरायटर टाइप केला होता....ह्या मजकुराचा मयंकला काहीच अर्थ लागत नव्हता....तो कागद त्याने बाजूला ठेवला आणि दुसरा कागद हातात घेतला त्यावर तारीख होती 23 जून 1941 तो कागद थोडा जुना वाटत होता त्यात इंग्रजी रनिंग लिपी मध्ये

"She is not worthy of your love..Kill her"

अस हाताने लिहलं होतं....कमाल आहे एकच आशयाचा मजकूर....दोन कागद....दोन डेडबॉडी....असे अनेक प्रश्न मयंकच्या मनात उठू लागले

"पोलिसांना बोलावू का??"

"नको....जर पोलीस आले तर हा बंगला एक क्राईम सिन बनेल....मग माझ्या ह्या प्रोजेक्टच काय??"


स्वतःशी संवाद साधून काही प्रश्न मयंकने निकाली लावले.....पण मुख्य प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नव्हते......"नेमकं काय घडलं इथे??"


पण ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी एक शंका त्याच्या मनाला शहारून गेली की...."आमच्याबरोबर अस झालं तर??"


त्याच्या मनात अश्या शंका येणे रास्त होते कारण काही दिवसांपासून त्याच्यासोबत असे चमत्कारिक प्रसंग घडत होते

अचानक मयंकची नजर समोरच्या भिंतीवर गेली....त्या लाल रंगाच्या भिंतीवर एक भलंमोठं पेंटिंग लावलं होतं....मयंकला गूढ,भुताच्या गोष्टी वाचायची सवय होती त्यामुळे ते पेंटिंग त्याने लगेच ओळखलं...भलामोठा त्रिकोण आणि त्यात मोठा डोळा....आजूबाजूला नरकाचे चित्रण असलेले ते चित्र त्याने आधीही कुठल्या वेबसाईटवर वर बघितलं होतं..."सेटैनिक"...एक सिक्रेट संगठना जी सैतानाची पूजा करते आणि सैतानाचं राज्य आणण्याचा सतत प्रयत्न करते.....जगातील अनेक मोठ्या एवढंच काय अनेक युद्ध घडवण्यात सेटैनिक संघटनेचा हात आहे असं मयंकने कुठेतरी वाचलं होतं.....त्या पेंटिंगच्या खाली सर विलियम हे नाव सोनेरी अक्षरात कोरलं होतं......म्हणजे खाली ज्या आलिशान खोलीत भलंमोठं ज्या सर विलियमचे चित्र लावले होते तो ह्या सिक्रेट सोसायटीचा मेम्बर होता.....मयंकने लॅपटॉप उघडला आणि सेटैनिक  बद्दलचे आर्टिकल वाचू लागला.....आर्टिकल वाचत वाचत स्क्रोल करत करत त्याची नजर एका पॅराग्राफ वर खिळली....त्यात अस लिहल होत की


"ह्या सिक्रेट संस्थेचा सदस्य झाल्यानंतर सगळी सुखं तुम्हाला मिळतील....तुमचा कुणीही विरोधक राहणार नाही पण जर ह्या संघटनेशी गद्दारी केली तर तुमच्या आत्म्याला प्रचंड यातना दिल्या जातील सैतान तुमच्या प्रिय व्यक्ती तुमच्यापासून हिरावून घेईल आणि असा श्राप तुमच्या मागे लागेल त्यामुळे तुमचं आणि तुमच्या पुढे तुमच्या घरात राहणाऱ्या सगळ्यांच आयुष्यात बरबाद होईल"


असा हा बराच मोठा आर्टिकल होता तो...पण हा छोटा पॅराग्राफ त्याला विचार करावयास भाग पाडत होता....मयंकच्या डोक्यातील चक्रे फिरू लागली.....त्याला स्वप्नात सतत सर विलियम दिसत होता म्हणजे ह्या सिक्रेट सोसायटीशी त्याने गद्दारी केली होती..त्याचा आत्मा अजूनही इथे फिरत आहे...कदाचित हा जो इंग्लिश गाऊन मधल्या महिलेचा मृतदेह आहे तो त्याच्या बायकोचा असू शकतो.....म्हणजे....म्हणजे ह्यात लिहल आहे ते खरं आहे.....सर विलियमने कदाचित ह्या संघटनेचा हुकूम मानला नाही त्यामुळे त्याच्याबरोबर ही वास्तू सुद्धा श्रापीत आहे....म्हणून तर तो मला स्वप्नात दिसतो त्याचा इथे वावर आहे.....मला इथून आताच्या आता गेलं पाहिजे.....


असा विचार करत असताना अचानक मयंकची नजर समोरच्या सेटैनिक पेंटिंगवर गेली.....एखाद्या 3D मुव्ही प्रमाणे त्या पोस्टरमध्ये जीव आल्यासारखं वाटत होतं.....त्या भल्यामोठ्या त्रिकोणातील डोळ्याची उघडझाप होत होती आजूबाजूला त्या त्रिकोणाभोवती पेटलेल्या ज्वाळानी संपूर्ण खोली उजळून निघाली होती.....तो भलामोठा डोळा अगदी जिवंत वाटत होता.....त्या डोळ्यात बघताच मयंक जागेवर स्तब्ध झाला....एक मंद कर्कश स्वर त्या खोलीत घुमत होते आणि त्या स्वराच्या तालावर मयंक मान फिरवत होता.....हात वर करून त्या पेंटिंगकडे बघत जागेवर उभं राहून डोलत होता......त्याचे डोळे सताड उघडे होते आणि पोस्टर मधील डोळ्यात बघत होते......त्या पेंटिंग मध्ये जो लाल भडक नरक दाखवला होता त्यातला ज्वालामुखी त्याचा दाह मयंकचे शरीर गरम करत होता....अचानक तो मंत्रोच्चार तो मंद कर्कश आवाज थांबला आणि मयंकचे डोळे बंद झाले तसाच बंद डोळ्यांनी तो चालू लागला....त्याचे डोळे जेव्हा उघडले तेव्हा तो त्याच्या बेड वर होता....राजश्री त्याला झोपेतून हलवून उठवत होती.....सकाळ झाली होती......राजश्रीचा चेहरा दिसताच मयंकला तो सर विलियम बरोबरचा तिचा प्रणयप्रसंग आठवला तो कपाळावर आठ्या आणून रागाने तिच्याकडे बघत होता त्याची नजर आता तीक्ष्ण होती....नेहमी दिसणारे प्रेम त्याच्या डोळ्यातून गायब होते.....त्याच्या चेहऱ्यावरच्या संतापाचे कारण राजश्रील समजत नव्हते.....मयंक तिच्याकडे बघत दीर्घ श्वास घेत होता त्याच्या तोंडून अचानक


"धोकेबा............"


पुढचे अक्षर बोलण्याआधी मयंकने स्वतःला आवरले त्याने शुद्धीत येण्यासाठी आपली मान हलवली आणि परत तो राजश्रीकडे आपुलकीने बघू लागला.....राजश्री प्रचंड गोंधळली होती.....त्या दिवशी मयंक थोडा शांत शांत वाटत होता.....काहीतरी विचार करत मधेच हाताच्या मुठी आवळून रागाने राजश्री कडे बघत होता....राजश्री बरोबरचे त्याचे हे वागणे अनपेक्षित होते.....राजश्री न राहून राहून त्याच्यासमोर वेगवेगळे विषय काढत होती पण मयंक मोजकेच बोलत होता.....राजश्रीने सुद्धा त्याला जास्त डिस्टर्ब न करण्याचे ठरवून त्याच्याशी बोलणं थोडं कमी केलं.....रात्र झाली परत रात्रीचे 3:00 वाजले आणि मयंकचे डोळे उघडले तो परत त्या तळघरात चालत चालत पोहोचला.....पेंटिंग मधील तो डोळा परत उघडला होता.....मंद कर्कश मंत्र परत सुरू होते आणि त्या तालावर मयंक डोलत होता आता त्याला पेंटिंग मध्ये नग्न राजश्री आणि सर विलियम ह्यांचा प्रणयप्रसंग दिसत होता.....तो बघून मयंकने मुठी आवळल्या होत्या पण स्वतःला सावरत तो ते अपरिचित मंत्र पुटपुटत होता.....सर विलियमचे त्याच्याकडे बघून कुस्सीत हसणे त्याला भडकवत होते......त्या शापित बंगल्याने आणि त्या शक्तींनी मयंकचा ताबा घेतला होता दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास 11 च्या दरम्यान राजश्रीने मयंकला उठवले तेव्हा मयंकने तिला मिठीच मारली.....तो राजश्रीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.....कुणीतरी त्याला रोखत होते....तरीही त्याने आपल्या घट्ट मिठीतुन आपले प्रेम दर्शविले......राजश्रीला त्याच्या भावना समजत होत्या.....तिने खिडकीतून बाहेर बघितलं त्या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता..23 जूनचा तो दिवस होता...रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते....मुसळधार पावसाने समोरचे दिसनेही अवघड झाले होते.....घट्ट मिठीत असलेल्या मयंकच्या पाठीवर हात फिरवत राजश्री त्याच्या कानात बोलली


"आपण इथून उद्याच जाऊ"


त्या दिवशी मयंक दिवसभर झोपूनच होता.....प्रचंड पावसामुळे घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे घरातील शिल्लक सामानापासून राजश्रीने जेवण बनवले.....रात्री जेवायला मयंक उठला तेव्हा मात्र तो एका वेगळ्याच अवतारात होता.....तो रागाने एकटक राजश्री कडे बघत होता....राजश्री त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती


"तुला काही होतंय का मयंक??"


अस न राहून विचारत होती पण मयंक एकही शब्द न बोलता तिच्याकडे बघून हसत होता....काट्याचा चमचा टेबलावर सतत मारत होता.....क्षणार्धात मान झटकून त्याचा स्वभाव बदलायचा.....काहीतरी विचित्र अस राजश्री अनुभवत होती पण सांगणार कुणाला??......आजची एक रात्र कशीबशी काढून उद्याच मयंकला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू ह्या उद्देशाने ती मयंक सोबत झोपी गेली.....बाहेर मोठा पाऊस पडत होता.....विजांचा कडकडाटा सोबत वरून कोसळणाऱ्या पावसाने सुद्धा थैमान घातले होते......आज वातावरण शांत नव्हते ते विजेच्या कडकडाटाने आणि पावसाच्या अविरत सरींनी चवताळले होते.....अजून एक थैमान बाकी होते त्याला अजून सुरवात झाली नव्हती.....ते एकदा सुरू झालं की बाहेर वाहणाऱ्या पाण्यात रक्त मिसळणार होतच.....आणि परत घड्याळात 3:00 वाजले.....ह्यावेळी मात्र तळघरातून येणारे ते आवाज ते कर्कश मंत्र आता मयंकला त्याच्या रूम पर्यंत ऐकू येऊ लागले.....त्याचे डोळे खाडकन उघडले एखाद्या यांत्रिक मानवाप्रमाणे तो कशाचाही आधार न घेता बेड वरून उठला त्याने एकवार राजश्रीकडे बघितले ती अगदी शांत झोपली होती.....मयंकने बाजूचा लॅपटॉप उचलला आणि मुख्य हॉल मध्ये आला...हॉल मध्ये प्रिंटर ठेवला होता....तो हॉल मध्ये बसला आणि लॅपटॉप मध्ये


"ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाही.....मारून टाक तिला"


अस अविरत टाइप करू लागला....त्याची बोटे अविरत चालत होती.....त्याने तो कागद प्रिंट काढून घेतला आणि पायऱ्या उतरून तळघरात पोहोचला आज त्या तळघरात वातावरण काही वेगळेच वाटत होते दबक्या आवाजला ऐकू येणारे ते अघोरी मंत्र स्पष्ट ऐकू येत होते.....त्या पेंटिंग मधील तो डोळा लालभडक झाला होता...सगळीकडे लाल भडक प्रकाश..पेंटिंग मधून रक्त वाहत मयंकच्या पायाला भिजवत होतं.....हे घर आपलं काम करत होत.....आता इथे रहायला आलेल्या मयंकच्या प्रिय व्यक्तीला हिरावून घ्यायला सज्ज होतं....कदाचित ह्यामुळेच मयंकची सुटका होणार होती....त्याला जो मानसिक शारीरिक त्रास होत होता तो बंद करण्याचा एकच मार्ग होता...तो स्वतःला त्या पेंटिंग मधील नरकात बघत होता....तिथला दाह त्याला नको होता...कदाचित ह्या घराला मानवी रक्ताची चटक लागली असावी आणि ती पूर्ण केल्याशिवाय मयंकची सुटका नव्हती......मयंकने टेबलावर ठेवलेली धारदार सामुराई तलवार उचलली त्याने ती तलवार म्यानेतुन बाहेर काढली तिला रक्त लागलं होतं जे काळं पडलं होतं.....हिचा एक घाव राजश्रीचा खेळ संपवणार होता


पाऊस थांबला होता पण व्हील्सन पॅलेसच्या बाहेर एका दगडी फरशीवर एक मृतदेह अस्ताव्यस्त पडला होता.....फरशीवर जे पाणी साठले होते त्यात रक्त मिसळल्यामुळे व्हील्सन बंगल्याच्या दाराजवळचा परिसर लालेलाल झाला होता.....पोटात ती सामुराई तलवार घुसल्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला होता....आजूबाजूला पोलीस पंचनामा करत होते आणि बाजूला काही नातेवाईकांच्या वर्तुळात राजश्री बेशुद्ध पडली होती.....तिला दवाखान्यात नेण्यासाठी नुकतीच ऍम्ब्युलन्स भोंगा वाजवत आली होती त्यातून तिला दवाखाण्याकडे रवाना केले होते.....मयंक गेल्यामुळे जिवाच्या आकांताने रडून ती बेशुद्ध पडली होती.....मयंक गेल्याचा धक्का ती सहन करू शकत नव्हती.....पोटात तलवार घुसून पडलेला तिचा प्रिय नवरा बघून तिची बोलतीच बंद झाली होती.....मयंकचे आईवडील आक्रोश करत होते पोलिसांची टीम त्यांना काठीने अडवून उभी होती.....सिनियर ऑफिसर गायकवाड साहेब सगळा क्राईम सिन बघत होते.....नुकतेच ते पिटर्सव्हॅली मध्ये बदली होऊन आले होते......त्यांची नजर वरच्या मजल्यावर गेली..हा बंगला उंच असल्यामुळे दुसऱ्या मजल्याचे अंतर जास्त होते...वरच्या दुसऱ्या मजल्याची एक काच फुटली होती.....बरोबर त्याच्या खालीच मयंकचा मृतदेह पडला होता..काही काचाही अवतीभवती पसरल्या होत्या..गायकवाड साहेब वरती गेले काच फुटलेल्या जागी त्यांनी बघितलं की तिथे रक्त सांडलं होतं.....बाजूला उभ्या कॉन्स्टेबल शिंदेंच्या कडे बघत ते म्हणाले


"शिंदे.....सुसाईडची केस वाटते ही....आधी त्याने पोटात ती तलवार घुसवली आणि इथून खाली उडी घेतली....सो ह्याच्या मिसेस.....काय नाव त्यांचं??....हा....राजश्री.....आपण आलो तेव्हा त्या बाजूच्या रूम मध्ये लॉक झाल्या होत्या....बाहेर लावलेले ते कुलूप तोडून आपणच त्यांना बाहेर काढलं.....बरोबर??"


नवीन साहेबांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कॉन्स्टेबल शिंदे लगेच सरसावले


"होय साहेब..मीच कुलूप तोडून त्यांना बाहेर काढलं...आणि खरं सांगू का हा बंगला एवढा बदनाम आहे की इथे कुणी येत सुद्धा नाही.....मला पण ही केस सुसाईडचीच वाटते"


शिंदेंचे बोलणे थांबवत गायकवाड साहेब म्हणाले


"नो नो....वेट.....तपासात घाई करून चालणार नाही....कदाचित हा प्रिप्लॅन मर्डर सुद्धा असू शकतो"


इतक्यात ज्यांना मयंकच्या डेडबॉडीची तपासणी करायला लावली होती ते कॉन्स्टेबल थोरात तडक गायकवाड साहेबांच्या जवळ आले....


"साहेब....ही चिठ्ठी मला बॉडीच्या पँटच्या खिश्यात सापडली"


गायकवाड साहेबांनी हातात रबरी हातमोजे घातले आणि रक्ताचे डाग पडलेला तो कागद वाचायला सुरवात केली....त्यातले अक्षर वेडेवाकडे होते....काही अक्षरे लहानमोठी होती....जबरदस्ती लिहल्यासारखी वाटत होती


प्रिय राजश्री

मी तुला सांगू शकत नाही माझ्याबरोबर काय झालं आहे ते....पण एक सांगतो माझं तुझ्यापासून दूर जाणेच ठीक आहे....नाहीतर तो राक्षस माझ्याकडून तुला मारून टाकीन....पण मी हे होऊन देणार नाही.....मला माहित आहे तो माझा पिच्छा कधीच सोडणार नाही...आणि जोपर्यंत तो माझ्यात आहे तोपर्यंत तुला धोका आहे....त्याची शक्ती मी अनुभवली आहे....हे सगळं अमानवी आहे....सांगण्यापलीकडंच आहे....त्याने कधी न कधी तुझा जीव घेतलाच असता....म्हणून मी स्वतःला संपवत आहे.....तो तुला धोकेबाज ठरवत होता ना....पण तुला खरा "धोका" मी दिला आहे....आपलं आयुष्यभराच साथ निभावण्याचं वचन मी तोडत आहे.....पण हे सगळं तुझ्यासाठी आहे.....बाकी.........क.....स......."


ते सगळं वाचून गायकवाड साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.....त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुसाईड नोट वाचल्या होत्या पण ही सुसाईड नोट काही वेगळीच होती....मयंक लिहता लिहता थांबला होता.....त्याला पुढे काहीतरी लिहायचं होत पण त्याने ते लिहल नव्हतं....जणू कुणीतरी त्याला रोखत होतं...गायकवाड साहेबांनी त्या कागदावर हात मारला 


"छे.....काहीच अर्थ लागत नाहीय"


ते लेटर आता तिथे उपस्थित प्रत्येक टीम मेम्बर वाचत होता.....सगळे जण अर्थ न उमगल्यामुळे सुन्न उभे होते......कॉन्स्टेबल शिंदेंचे वाक्य शांतता भंग करून गेले


"सर मला वाटते हा मानसिक रोगी असेल"

मयंकच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले.....मयंक एक प्रतिष्ठित इंजिनियर असल्यामुळे तपास वेगात चालला होता.....गायकवाड साहेबांनी विशेष लक्ष घातलं होत....मयंक बद्दल त्यांनी सगळी माहिती गोळा केली होती.....तो एक हुशार आणि सुटसुटीत असा व्यक्ती होता त्यामुळेच त्या सुसाईड नोटवर ते बारीक अभ्यास करत होते.....सगळी पोलीस टीम चहा पित होती सहज गायकवाड साहेबांनी विषय काढला

"हे बघा त्या व्हील्सन बंगल्यावर मी जी रिसर्च केली आहे...सुदैवाने काही जुन्या नोंदी पण मला सापडल्या..इंग्रज अधिकारी सर व्हील्सन यांनी तो दगडी बंगला बांधला होता त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा सर विलियम आणि त्यांची बायको एलिझाबेथ इथे राहू लागले....मला ना विलियमची बायको एलिझाबेथ मिसिंग झालेची सुद्धा एक नोंद आढळली....एक 15 जणांची इंग्रज तुकडी तिचा तपास करत होती....पण ती नाही सापडली....त्यानंतर इंग्रजांनी हा बंगला इनाम स्वरूपात मराठे कुटुंबीयांकडे दिला......पण तिथे कुणीच राहत नव्हतं.....पण 1976 साली मराठे कुटुंबीयांनी हा बंगला पुण्याच्या कुणी तळवलकर नामक व्यक्तीला भाड्याने दिला.....धक्कादायक गोष्ट ही आहे की त्या तळवलकरची पत्नी सुद्धा इथूनच गायब झाली आणि तिचाही तपास अजून लागला नाही....कमाल आहे ना??"

शिंदेंनी चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाले


"खर सांगू का साहेब....ती जागा बेक्कार आहे बघा....ते मराठे कुटूंबीय त्या बंगल्याला श्रापित म्हणते....आणि बघा ना किती भकास बंगला आहे त्यो.....तिथे गेल्यावर कस नको नको वाटत"

शिंदेंच्या ह्या वाक्यावर गायकवाड हसले


"काय शिंदे....असल्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवता का??....अहो पोलीस आहोत आपण.....बघा एक ना एक दिवस मी ह्या केसचा तपास करतो की नाही....आणि तुमच्या म्हणण्यानुसार तिथलं भूत जरी दोषी असलं तरी त्याचं कॉलर धरून लॉकअप मध्ये बंद करीन.....बर ते मयंकचा पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आला की नाही??"

"व्हय साहेब आज सकाळीच रिपोर्ट आलाय"

शिंदेंनी तो लिफाफा गायकवाड साहेबांच्या हातात ठेवला....तो वाचत वाचत गायकवाड साहेब आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वतःशी संवाद साधत बोलू लागले

"ओहहह मयंकच्या पोटात कुलपाची किल्ली???....म्हणजे त्याने राजश्रीला खोलीत लॉक केलं आणि ती किल्ली गिळून टाकली...आणि काय?? ह्याच्या पोटात एक कागदाचा गोळा पण आढळला....त्यावर काहीतरी "ती तुझ्या प्रेमाच्या लायक" अस काही लिहल होतं....फॉरेन्सिक टीमला नीट वाचता आला नाही तो कागद...ओके..कमाल आहे...नेमका काय प्रकार घडला आहे तिथे??..तलवारीवर सुद्धा त्याचेच फिंगरप्रिंट आहेत म्हणजे त्याने स्वतःहून ती तलवार पोटात खुपसली....दोन्ही हातावर अनेक कट्स.....नक्कीच सुसाईड आहे ही.....पण ती सुसाईड नोट काय होती??.....ह्याचं उत्तर ह्याची पत्नी राजश्री देऊ शकेल का??......तिच्याकडून काहीतरी माहिती मिळेल......नक्की मिळेल.... पण का केलं असेल अस एका सुशिक्षित माणसाने???"

का केलं??......ह्या प्रश्नाचे उत्तर गायकवाड साहेबांना मिळेल नाही मिळेल काही सांगता येत नाही...कोर्टात ते काय सिद्ध करतील माहीत नाही....पण मयंकने आपलं खर प्रेम सिद्ध केलं होतं....त्या श्रापीत बंगल्यातील शक्ती त्याच्यावर हावी होत असताना त्या संमोहनातून शुद्धीत येण्यासाठी त्याने आपल्याच हातावर तलवारीने घाव केले होते....आपल्या अंगात जो काही सैतान घुसला होता त्याच्यापासून राजश्रीला दूर ठेवण्यासाठी त्याने राजश्रीला एका खोलीत लॉक केलं होतं आणि ती किल्ली गिळून टाकली होती.....त्या बंगल्याच्या सैतानाला राजश्रीपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःला संपवलं होतं ते ही अगदी कायमचं...

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror