STORYMIRROR

shashank surve

Horror

3  

shashank surve

Horror

चित्रकार

चित्रकार

8 mins
193

एखाद्या चौथीच्या प्राथमिक वर्गात असलेल्या मुलाकडून अस काही ऐकणे तुम्हाला नवल वाटेल पण हो करतो मी जास्ती विचार...माझी आज्जी पण नेहमी म्हणते "पुष्कर लहान आहे पण एखाद्या मोठ्या व्यक्ती पेक्षा जास्त समज त्याच्यात आहे" आता ह्याला वरदान म्हणावे की श्राप??.....श्रापच....अवेळी आलेली गोष्ट तशी धोकादायकच....मग ते अवेळी आलेलं प्रौढत्व का असेना.....असो.....ह्या सगळ्या दुनियादारी गप्पा तुमच्या सोबत ह्यासाठी मारतोय कारण हे जग सोडण्याचा मी निर्णय घेतला आहे.....कारण??..... मी स्कॉलर ITP परीक्षेत जिल्ह्यात 9 वा आलो म्हणून?? अजिबात नाही.....कारणे खूपशी आहेत....ती सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईन.....माझ्याबद्दल विचाराल तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत रमणारा मी आहे...मी रोज पेपर वाचतो...तो पेपर तिथल्या मोठ्यांच्या गोष्टी.....पण पेपर मधल्या न समजणाऱ्या गोष्टी शेजारच्या काकांना विचारतो ते सगळं समजावून सांगतात मला....त्यात किनी बातम्या येतात बघा "मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या".....आता मी युवक तर नाही.....शाळकरी मुलगा आहे....पण खरं सांगू का लहान मुले सुद्धा विचार करतात....त्यांना सुद्धा मानसिक त्रास येतो ह्याचा विचार कदाचित पालक करत नसतील पण ते खरे आहे...लहानमुले म्हणजे मातीचा गोळा...मातीचा गोळा....त्यांना आकार देण्यासाठी एवढं बदड बदड बदडलं जातं की हे मडकं तुटू शकतं ह्याचा कुणी विचारच करत नाही...लहान मुलांना पण मन असत...त्यांच्या सुद्धा मनावर परिणाम होत असतो..कोण करणार विचार??...बरं..ते सगळं जाऊ द्या..कुठे होतो आपण.....हा तर ITP स्कॉलर परीक्षेत माझा 9 वा नंबर आला....बाकी हा सगळा नंबर्सचा खेळ माझ्या डोक्या बाहेरचा आहे......इथे फक्त 1 ह्या नंबरलाच मानाचे स्थान आहे.....कारण मागच्या वेळी ITP परीक्षेत मी 4 नंबर वर होतो तरीही बाबांचा मार खाल्ला आणि आता ह्या वर्षी तर थोडा जास्तच.....पप्पा आणि मी शाळेत गेलो निकाल हातात आला आणि तिथेच लक्षात आलं की घरी गेल्यावर फुल्ल धुलाई होणार आहे आणि तसच झालं...पप्पांनी अगदी हात दुःखेपर्यंत मला धोपटून काढलं.....साहजिक मार खाताना ओरडायच नाही हा एक कायदा आमच्या घरी होता त्यामुळे हुंदके देत सगळा मार खाऊन घेतला.....मम्मी कोपऱ्यात उभी राहून बघत होती.....दिवस सगळा रडण्यात गेला....रात्री पप्पा आले काहीवेळ त्यांनी मोबाईल बघितला आणि परत येऊन धोपटून काढलं......नक्कीच त्यांनी बाजूच्या प्रतीकच्या वडिलांचे स्टेटस बघितले असेल.....प्रतीक 3 रा आला होता.....बाकी माझ्या पप्पांना स्टेटसचे जाम वेड आहे.....पण आपल्या मुलाचा प्रथम 3 क्रमांकात येणाचे स्वप्न मी काही पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे ते एक दुःख त्यांच्या मनात सलत असावं परिणामी माझी बारीकसारीक गोष्टीसाठी होणारी धुलाई, शिव्या देणे हे सगळं चालूच असायचं.....पण पप्पांच्या मारापेक्षा जर कोणती गोष्ट मला जास्त वेदना देते ती म्हणजे मम्मीचा अबोला.....माझा रिझल्ट लागला की माझी पप्पांच्या कडून येथेच्छ धुलाई होणार हे मला माहित होतं आणि त्याची जराही भीती वाटायची नाही कारण मार खाऊन खाऊन मी पुरता धीट झालो होतो पण मम्मीचा अबोला??.....तो मात्र अगदी आत मनापर्यंत वेदना द्यायचा....वास्तविक मी प्रथम 3 क्रमांकात नाही आलो तर आई अबोला धरेल कित्येक दिवस बोलणार नाही ह्या विचाराने मी अभ्यास करायचो.....माराचं काही विशेष वाटत नव्हतंच.....पण काय करू?? अभ्यासात माझं मनच लागत नाही.....मला चित्रे काढायला खूप आवडतात.....मला आजूबाजूचा निसर्ग रेखाटायला जाम आवडतो....शाळेत देखील माझं लक्ष बाजूच्या बगीच्यात असत.....म्हणून तर वर्गातल्या मुलांशी भांडून मी खिडकी कडेची जागा घेतली.....बगीच्यातले पक्षी,खारुताई,फुलझाडे सगळं काही मला आनंदित करून सोडत....ती फुले,खारुताई वैगेरे मी वहीच्या मागच्या बाजूला रेखाटायचो...माझ्या चित्रकलेच्या मॅडमांना माझी चित्रे खूप आवडायची....त्यांनी पप्पाना किती वेळा सांगितलं की ह्याची चित्रे खूप चांगली आहेत ह्याला चित्रकलेची आवड आहे तर चित्रकलेच्या क्लासला घाला.....पण त्या दिवशी घरी आल्यानंतर मात्र पप्पांनी माझी सगळी चित्रे जाळून टाकली......परत तीच धुलाई.....त्यांनी दमच भरला...."परत चित्र काढताना दिसलास तर तंगड मोडीन"........म्हणून तर वहीच्या मागे पेन्सिलने चित्र काढून खोडून घरी जात होतो.....खर सांगू का.....माझं मन नाही लागत अभ्यासात......मला चित्रे काढायला आवडतात.....शाळेतली मुले जेव्हा एकत्र जमून अभ्यासाच्या चर्चा करतात तेव्हा खूप वेगळं वेगळं वाटत..कमीपणाचा भाव येतो....म्हणून तर मी एकटा राहण्याचा प्रयत्न करतो......आजूबाजूचा निसर्ग पशु पक्षी माझे मित्र बनले आहेत.....आता मला समजून घेणारं कुणीच नाही एवढंच काय तर माझे आई वडील सुद्धा मला समजून घेत नाहीत....कधी कधी अस वाटत की त्यांनी मला एका मिशन साठी जन्माला घातलं आहे.....मिशन कलेक्टर.....मला ते झालंच पाहिजे असं ते सतत बोलतात.....ते त्यांचं स्वप्न आहे म्हणे पण मग माझ्या स्वप्नांचे काय??......मला जगप्रसिद्ध चित्रकार व्हायचं आहे......ज्याचा ह्या वास्तविक जगाशी काहीही संबंध नसेल तो आपल्याच काल्पनिक जगात हरवून वेगवेगळ्या रंगानी चित्र रंगवत जाईल.....पण असो....आजकल मुलांच्या स्वप्नांना कुठे किंमत आहे म्हणा......पालकांनी शाळेत अभ्यासात एवढं गुंतवून टाकलं आहे की आधीच्या पिढी सारखं फिरावं,खेळावं,पोहवं हे सगळं आमच्यासाठी स्वप्नवत आहे..आमच्या उन्हाळी सुट्या सुद्धा क्लासेस आणि स्कॉलर परिक्षमध्येच जातात....उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील आमच्या कडून एखादा पेपर किंवा पुढच्या वर्षीची तयारी ते क्लासेस सुरूच असत.....पालकांच्या स्वार्थात आमच्या स्वप्नांचा बळी जातोय ह्याचा विचार कोण करणार आहे??......मी तरी त्या दप्तराचे आणि घरच्यांच्या स्वप्नांचे ओझे वाहून अक्षरशः थकून गेलो आहे.....खरंच


अजून दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सगळेच लोक माझ्या विरुद्ध किंवा माझ्यावर ओरडणारे नाहीत बरं.....काही लोकांना माझे जाम कौतुक देखील आहे....आता तिला "लोक" ह्या कॅटेगरी मध्ये गणले जाऊ शकत नाही...ती फक्त जाणवते तिचा आकार नेहमी बदलत असतो एखाद्या कंपना सारखा तिचा घोगरा आवाज समजण्यासाठी थोडे कष्ट पडतात पण ठीक आहे ना......अशी ती जरी जिवंत नसली तरी माझ्या आयुष्यात जेवढी जिवंत माणसे आली त्यांच्यापेक्षा ह्या कमला काकूंनी मला खूप प्रेम दिलं आहे.....इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे.....भूत ही संकल्पना किती क्रूर,नकारात्मक रंगवली आहे ना लोकांनी??....कदाचित ते कधी कमला काकूंना भेटले नसतील....त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती आजूबाजूला फिरून गोळा केली....त्या एकट्याच ह्या बंगल्यात राहत होत्या....सुधाकर काका 60 व्या वर्षीच कमला काकूंना एकटे सोडून देवाघरी गेले होते....ह्या आधी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना एका अपघातात सोडून गेला....काकू अगदी एकट्या ह्या घरात राहत होत्या...ह्यातच एका दिवशी त्यांना ह्रदयविकाराने गाठले आणि हे घर अगदीच रिकामे झाले.....सुधाकर काका आणि कमला काकूंनी मोठ्या मेहनतीने हे घर बांधले होते ते त्यांनी जिवंतपणी कुणालाही विकलं नाही त्यामुळे अजूनही कमला काकूंचा वावर ह्या घरात आहेत असे आजूबाजूचे लोक म्हणतात...त्यामुळे हे घर कुणी विकत घेत नाही..आणि हे खरेच आहे....खरोखर त्या इथे वावरतात....माझ्याशी बोलतात......मलाही त्या खूप आवडतात.....


त्या दिवशी शाळेतून मी घरी येत होतो तर वाटेत हा बंगला होता....गेटच्या आतल्या बाजूला एका झाडावर एक पोपट बसला होता.....मला तो पोपट निरखून रेखाटायचा होता त्यामुळे विचार न करताच मी आत गेलो आणि इथल्या एका धुळकट पायरीवर बसून तो पोपट रेखाटू लागलो....मी एकदा चित्र काढायला बसलो की माझं कशात लक्ष नसत.....काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला सांगितले होते इथे जास्त उशीर थांबू नको ही जागा भूतीया आहे.....भूत हा शब्द ऐकून घाबरून मी इथून काढता पाय घेतला होता पण आता त्या पोपटाच्या मागे मी इथे कसा आलो मला कळलंच नाही.....मी चित्र काढू लागलो पण न राहून अस वाटत होतं की मागे कुणीतरी उभं आहे....अचानक कानात एक कुजबुज ऐकू आली....


"खूप छान चित्र काढलं आहेस बाळा"


मी थबकून मागे बघितलं....मागे कुणीच नव्हतं.....नंतर लक्षात आलं आपण तर त्याच भूतीया घरात आहोत....अगदी धावत पळत तिथून आलो.....खूप घाबरलो होतो तेव्हा.....पण नंतर त्या बाळा शब्दाने मला विचार करायला भाग पाडलं.....खूप दिवसांनी तो शब्द ऐकत होतो......कुणीतरी माझ्या चित्राचीही तारीफ केली होती....एकेदिवशी शाळेतून येताना अचानक एक नजर त्या बंगल्याकडे गेली.....आज तो बंगला कमालीचा स्वच्छ आणि नीटनेटका वाटत होता....मी येताच तिथल्या गार्डन मध्ये मंद वाऱ्याची झुळूक वाहू लागली न जाणो अस वाटत होतं कुणीतरी आपल्याला त्या घरात बोलवत आहे....आज्जीच्या घरी आल्यावर जसा आनंद होतो तस काहीसं मनात वाटत होतं त्यामुळे थोडा धीर एकवटून बंगल्यात शिरलो.....परवा कुलूप असलेले दार आज उघडे दिसत होते.....दारात उभं राहून आत जाऊ की नको?? हाच विचार मनात चालू होता.....दारातून मला आतली हॉल मधली मोठी तैलचित्रे स्पष्ट दिसत होती.....ती चित्रे बघून आत शिरलो.....कमालीचा जिवंतपणा होता त्या चित्रात जणू प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उभे आहोत असं वाटत होतं.....सगळी चित्रे फिरून फिरून बघत होतो....चित्राच्या खाली कमला असे नाव आणि सही होती 1996 हे साल देखील होते आपण एका भूतीया घरात आहोत हे जणू विसरूनच गेलो....अचानक थोडी सळसळ जाणवली चमकून तिकडे बघितले तर एका पॅड वर एक कोरा कागद अडकवला होता बाजूला पेन्सिल,ब्रश काही रंग आणि समोर एक खोटे सफरचंद ठेवलेले दिसत होते.....जणू सगळा सेटअप माझ्यासाठीच होता अस वाटत होतं.....कोणताही विचार न करता समोर ठेवलेल्या सफरचंदाचे चित्र रेखाटू लागलो.....ह्या वेळी मला ती भीती नव्हती जी इतर वेळी चित्र काढताना असायची.....माझी चित्रे आगीत फेकणारे माझे पप्पा पाठीत धपाटा मारणारी माझी मम्मी सगळ्यांच्या विसर पडला होता.....माझ्या पेन्सिल पकडलेल्या हातात एक वेगळेच बळ आले होते....समोरच्या सफरचंदाचे हुबेहूब चित्र,आउटलाईन वैगेरे माझ्याकडून रेखाटली जात होती....कानात कुणीतरी मला मार्गदर्शन करत होते....त्या दिवशी पहिल्यांदा मी मुक्तपणे जगल्याचा भास मला झाला.....मन अगदीच प्रसन्न झाले होते.....माझे आवडते काम करायची संधी मला मिळाली होती.....मग काय शाळा सुटल्यावर ITP च्या क्लास ना जाता भूतीया बंगल्यावर जाऊन चित्रे रेखाटू लागलो....रोज रोज माझ्यासाठी नवीन पेपर समोर एखादा नवीन ऑब्जेक्ट आपोआप तयार असायचा.....त्या कमला काकू मला मार्गदर्शन करीत होत्या....त्याची अगदी काळसर आकृती दिसत होती....वाऱ्याबरोबर हलणारी....पण त्यांचा खरवरीत मोठी नखे असलेला हात जेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाने फिरायचा तेव्हा मायेचे एक वेगळीच अनुभूती येत होती.....तिथे भय,किळस असले भाव गळून पडत असत....मग त्या मायेच्या स्पर्शासाठी घरी येऊन पप्पांचा मार सुद्धा अगदी किरकोळ वाटत असे......कमला काकू माझ्या चित्रांची खूप तारीफ करायच्या माझं जिथं चुकत असे तिथे आपोआप एखादी आउटलाईन यायची.....माझ्या चुकीच्या वेळी त्यांच्या सांगण्यात कुठेही आरडाओरडा नव्हता....त्यांचा इतरांच्यासाठी भयानक दिसणारा काळा हात माझ्या पाठीत बसत नव्हता.....उलट तो हात माझ्या डोक्यावरून फिरवून त्या मला प्रोत्साहन देत होत्या.....जवळपास महिनाभर इथे आलो....आईचा अबोला नको म्हणून ITP चा दिवसरात्र जागून अभ्यासही केला तरी जिल्ह्यात 9 वा आलो......साहजिक मार तर पडणारच होता.....आईनेही अबोला धरला होता पण मी जेव्हा भूतीया बंगल्यात आलो आणि कमला काकूंना रिझल्ट बद्दल सांगितलं तर त्यांनी टाळ्याच वाजवल्या....आपल्या खरवरीत हातात माझा हात घेऊन अभिनंदन देखील केले......खूप बर वाटलं.....दिवसरात्र केलेली मेहनत सफल झाल्याची अनुभूती आली.....दोन वेगवेगळ्या टोकाच्या मध्ये मी होतो....एक माझे जन्मदाते असून सुद्धा मला त्यांची पुढची पैसे कमावण्याची मशीन बनवू पाहत होते आणि एक जी काकू माझी कुणी नसून सुद्धा माझ्या आवडत्या कामात मला साथ देत होती....मुलांनी मोठं व्हावं हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते हे मान्य आहे पण मुलांचे छंद,त्यांच्या कला,त्यांची स्वप्ने ह्याचा विचार कोण करणार??.....त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे....कायमच कमला काकूंच्या बरोबर रहायचं.....पण त्यांच्या जगात जाण्यासाठी मला हे जग सोडावे लागेल.....हरकत नाही.....तसही ह्या जगात ते वजनदार दप्तर,अभ्यासावरून मारझोड करणारे माझे आईवडील,शाळेचा निकाल टॉप ला रहावा म्हणून मुलांच्यावर सक्ती करणारे दिवसभर शाळेत बसवून घेणारे ते शिक्षक,ज्यादाचे क्लासेस अजून बरच काही माझी वाट बघत असतील......नकोच ते सगळं....आताच मी कमला काकूंचे ते त्यांच्या अमानवी रूपातले चित्र रेखाटले आहे ते बघून त्यांच्या विद्रुप चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत आहे....त्यांनी जवळपास मला प्रेमाने मिठीच मारलीय.....हेच प्रेम मला हवं आहे म्हणून आता त्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारणार आहे.....ह्या दुनियेतली शेवटची उडी.....सरळ कमला काकूंच्या दुनियेत......तिथे गेल्यावर मला त्या प्रेमळ स्त्रीचे खरे रूप बघता येईल...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror