STORYMIRROR

shashank surve

Horror Fantasy Thriller

3  

shashank surve

Horror Fantasy Thriller

बेड

बेड

8 mins
186

हा जो लाकडी बेड आहे ना तो मला एका ऑनलाइन खरेदी विक्री वेबसाईटवर वर अगदी कमी दरात मिळाला होता..तशी मला बेडची काही गरज नव्हती...पण ज जाणो कस?? ह्या बेडचा फोटो बघून काय झालं मी लगेच त्या मालकाला कॉल करून भेटायची इच्छा व्यक्त केली..जेव्हा मी हा बेड बघायला गेलो तेव्हा ह्या बेडचा मालक "काहीही करून हा इथून घेऊन जा" ह्या आंतरिक भावनेने माझ्याशी बोलत होता.....त्याने वेबसाईटवर रक्कम टाकली नव्हती....तिथे गेल्यावर तो एवढा अस्वस्थ होता की मी फुकट जरी मागितला असता तरी त्याने दिला असता...असत कुणाचं काही..तो बेड मी तिथेच नीट चेक केला.....पुढील बाजूला कसले तरी जबरी ओरखडे दिसत होते जणू कुणी हा बेड मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता पण हा जाड आणि नक्षीदार बेड तोडण्यात तो अयशस्वी झाला असावा असा अंदाज मी बांधला.....काहीतरी वेगळेपण होते त्या बेड मध्ये राखाडी रंगाचे लाकूड मी पहिल्यांदा बघत होतो....त्यावरच्या नक्षीसुद्धा कमालीच्या गूढ वाटत होत्या....त्या नक्षी बघून मला ना इजिप्तच्या भित्तिचित्रांची आठवण झाली......त्या बेड वर एक लाल वेलवेटची गादि होती जी एकदम रॉयल वाटत होती.....असे फर्निचर मी ह्याकाळात तरी बघितले नव्हते.....ते राखाडी रंगाचे लाकूड त्यावर कोरलेल्या गूढ आकृत्या ते लालभडक वेळवेट काहीसं वेगळं वाटत होतं म्हणून त्या बेडच्या मालकाला मी


"कुठे मिळाला हा अनोखा बेड??"


असा प्रश्न केला....तर त्याने इटलीच्या एका मित्राने पाठवला असे सांगितले....आधीच अस्वस्थ असलेल्या मालकाला जास्तीचे प्रश्न विचारणे मला अवघड वाटत होते तरी मी शेवटचा महत्वाचा प्रश्न केलाच


"किती द्यायचे ह्याचे??....तुम्ही साईट वर किंमत मेंशन केली नव्हती"


त्या बेड वरच्या लाल वेलवेटच्या गादीकडे एकटक बघणाऱ्या मालकाला मी दुसऱ्यांदा तोच प्रश्न थोड्या चढ्या आवाजात केला तेव्हा तो शुद्धीवर येऊन माझ्या एकूण अवताराकडे बघत म्हणाला......


"द्या 5000....नको.....2000 चालतील....हा....तेवढेच द्या"


हे ऐकून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.....कदाचित माझ्या वेंधळ्या अवताराकडे बघून मळक्या कपड्याकडे बघून त्याने ही रक्कम सांगितली असावी....पण मला त्याच्या उदारपणाशी काही देणंघेणं नव्हतं....माझा फायदा झाला हे महत्वाचे.....हा मोठा आणि मजबूत बेड माझ्या घरी येणार होता.....मी लगेच त्याच्या हातावर त्याचे 2000 टेकवले आणि टेम्पोवाल्याला भाडे देऊन हा बेड घरी उतरवून घेतला.....


वास्तविक मला बेड ची काहीच गरज नव्हती....मला तशी जगायची सुद्धा गरज नव्हती.....सततच्या वादामुळे बायको सोडून गेल्यामुळे डिप्रेशन मध्ये गेलेला परिणामी नोकरी गमावलेला आकाश देवरे समाजात असून नसल्यासारखा होता.....माझ्या दृष्टीने आताच्या काळात नाती भलतीच व्यवहारी झाली आहेत तीन चार दिवस जॉबवर न गेलेला पुरुष लोकांच्या डोळ्यात खुपत राहतो....त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार होतो....वास्तविक माझ्या दृष्टीने आताच्या काळात एखाद्या व्यक्तीची किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत त्याला एखादा पर्याय भेटत नाही....एकदा का पर्याय भेटला की हेटाळणी सुरू होते.....नोकरीच्या जागी माझी जागा एका मुलीने घेतली आणि घरात माझी जागा माझा भाऊ.....कारण तो माझ्यापेक्षा जास्त कमवता होता.....साहजिक मला सततचे टोमणे पडू लागले....आधीच मानसिक संतुलन हललेला मी....त्या दिवशी जवळपास रडतच घरातून बाहेर पडलो.....ओळखीच्या स्वार्थी लोकांत अनोळखी राहून वावरल्या पेक्षा अनोळखी जगात वावरणे पसंद केले आणि ताडकन घर सोडलं आणि ह्या शहरात आलो.....तशी माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि ह्या अनोळखी जगात मला खूप बरं वाटत होतं.....नवीन लोक चांगलं वागत होते....इथे येऊन एक छोटीशी नोकरी स्वीकारली पगार आधीपेक्षा निम्मा होता पण पुरेसा होता....एक चांगली रूम भाड्याने घेतली आणि थोड्या वस्तू जमवल्या....वास्तविक मला ह्या बेडची गरज नव्हती पण न जाणो ती जाहिरात आणि तो नक्षीदार बेड बघून मला घ्यायची इच्छा झाली....हे सगळं पूर्वनियोजित होत का??.....असेल ही.....ह्या बेड बद्दल सांगायचं झालं तर एकप्रकारे दुसऱ्या जगात जाण्याचे द्वार आहे हा बेड......माझं हे वाक्य ऐकुन तुमच्या मनात प्रश्न पडला असेल किंवा तुम्ही सुद्धा मनोमन म्हणत असाल


"परत ह्याला वेडाचा झटका वैगेरे आला की काय??"


तस तुम्ही बोलू शकता कारण मी आता तुमच्या दुनियेत परत येणार नाही कदाचित.....आता मी कायमचा इथला झालो आहे......कुठला??......तर ही एक अशी दुनिया आहे की जिथे सगळे आनंदी असतात.....आता त्या दुनियेत माझ्या रूमच्या शेजारी असणारी रोझी आंटी जी मी इथे आल्यावर माझं हसतमुखाने स्वागत करते.....दक्षिण आफ्रिकेची आहे ती....अरे हो हे सांगायचं विसरलोच की इथली भाषा सुद्धा वेगळी आहे हं.....पण जास्त त्रास पडत नाही तुम्ही इथे आला तर ती भाषा आपोआप तुम्हाला येते..आपोआपच...इथली एकसारखी घर अगदी दोन मजली पांढऱ्या रंगाची सुंदर आणि लाखो एकर दूरवर पसरलेली......इथे आला तर आपोआप तुम्हाला इथे एक घर मिळते....रस्ते संगमरवरी...आजूबाजूला एका रांगेत असलेली हिरवी,पिवळी रंगीबेरंगी झाडे...घराच्या बाल्कनीतून डोकावणारी सुवासिक फुले...सगळं कसं एकसारखं आहे इथे.....समोरच्या उंच डोंगरावर ह्या सगळ्या रचनेचा निर्माता राहतो म्हणे.....त्याचा आलिशान बंगला तेवढा नजरेस पडतो.....अनेक वर्षे तो इथे राहतोय इथे आलेल्या सगळ्यांना आनंदी ठेवायचे कामच त्याने हातात घेतले आहे.....भविष्यात त्याची भेट होईल कारण इथल्या प्रत्येक जनतेला प्रत्येकाला तो भेटतोच.....मी तर सरळ त्याच्या पायावर लोटांगण घालणार आहे.....तुमच्या दृष्टीने देव म्हणजे काय??तर सगळ्यांना आनंदित ठेवणारा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा मग इथल्या झोर्थिश नावाच्या निर्मात्याला देव म्हणायला काय हरकत आहे.....इथे बघा सगळे कसे सगळे आनंदी आहेत....खऱ्या आयुष्यात भले लोक ताणतणावात असतील पण इथे आल्यावर सगळे कसे आनंदी आहेत.....ते किसिंग करणारे कपल,समोर गप्पा मारणारे वृद्ध लोक,ओळख नसतानाही हसून स्वागत करणारे आनंदी लोक....सगळ्यांनी इथे आपला आपला जोडीदार शोधला आहे आणि त्यांच्याबरोबर ते आनंदी आहेत....कुणी चांगला मित्र,मैत्रीण,भाऊ बहीण,पत्नी अशी नवीन नाती बनवून सगळे खुश राहतात....इथे ईर्षा,द्वेष,राग अश्या नकारात्मक गोष्टीना थाराच नाही त्यामुळे सगळे कसे आनंदाने राहतात....हे झालं लोकांचं.....तस इथलं वातावरण पण कमाल आहे इथे कधीही रात्र होत नाही ना कधी कडक उन्हाच्या झळा बसत नाहीत एक गुलाबी थंडी अस वातावरण कायम असत इथे...कमालीची आल्हाददायक हवा आहे इथली....इथे कधीही तहान भूक लागतच नाही त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्नच नाही.....मानवी गरजांना नाकारून ही वेगळी दुनिया स्वर्ग समान आहे.....बर हे लोक माझ्यासारखे डिप्रेशन मध्ये असलेले आहेत ज्यांना आयुष्यात कुठेना कुठे काही खटकत होतं आणि जगायची इच्छा नसूनही ते जगत होते.....त्यामुळे समविचारी वैगेरे लोकांचे एक वेगळे जग आपण ह्या जगाला म्हणू शकतो....ते इथे कसे आले मला माहित नाही...कदाचित असे बेड किंवा दुसऱ्या वस्तूंच्या माध्यमाने आले असतील...काही कल्पना नाही..पण मलाही इथं खूप बरं वाटत.....माझ्या झोपेचा काळ मी काही दिवसांपासून इथेच घालवत आहे.....झोपेचा काळ इथे?? म्हणजे नेमका कसा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सुरवातीला जो व्यक्ती त्या बेड पासून आपला जीव सोडवू पाहत होता त्याच्याकडून हा बेड मी खरेदी केला एकदम राजेशाही असा हा आरामदायक बेड माझ्या रूम मध्ये आणून ठेवायला त्या हमाल लोकांना देखील खूप कष्ट पडले होते हा बेड 2000 चा आणि हमाली 3000 झाली.....ते हमाल अक्षरशः वैतागले होते....पण शेवटी कसा बसा हा बेड माझ्या रूम मध्ये आलाच.....जेव्हापासून माझ्या आयुष्यात दुःखद घटना वेगाने मला उचलून उचलून आपटत होत्या त्या काळात झोप हा प्रकार माझ्या आयुष्यातून जवळपास गायबच झाला होता.....फक्त पडून राहणे हेच काम झोपेच्या नावाखाली होत होते आणि कधी कधी रडून रडून अश्रूंनी उशी ओली करणे हेच चालू होतं.....कधी कधी वाटत होतं का मी हा बेड विकत घेतला??.....पण हा समज पहिल्या रात्रीत खोडून काढला गेला....त्या रात्री मला अगदी शांत झोप लागली.....दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्या गाढ झोपेतून उठलो तेव्हा कसं अगदी पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं...कदाचित ह्या मऊशार गादीमुळे असेल.... पण दिवस कसा अगदी आनंदित गेला.....हळूहळू त्या बेड वर झोपून मला एक वेगळं आंतरिक समाधान मिळू लागलं.....झोप शांतपणे होऊ लागली....त्या मऊ वेलवेटच्या लालभडक गादीवर झोपल्यावर अगदी हवेत तरंगल्यासारखे वाटे.....पण तरीही भूतकाळातल्या काही वाईट आठवणी होत्याच.....त्या अश्रूंनी मोकळ्या करायच्या होत्या.....ज्या मोकळ्या झाल्यावर शांत झोप लागली.....मला आठवतंय की त्या दिवशी एका हालचालीने मला जाग आली....काहीतरी माझ्या पाठीखाली वळवळत होत त्या स्पर्शाने मला जाग आली.....बघितलं तर एक मिट्ट काळोख पसरला होता खोलीतली एकही वस्तू दिसत नव्हती.....त्या गादिखाली काहीतरी वळवळत होते.....मी घाबरलो....अचानक कुणीतरी माझा हात पकडला मी चाचपडत तो हात कुणाचा आहे हे बघण्यासाठी त्या हाताला धरलं तर तो हात त्या गादीखालून आला होता.....अश्या दोन तीन हातांनी मला घट्ट पकडले होते....अचानक त्या गादिवर एक हलकासा प्रकाश दिसू लागला एखाद्या अंधाऱ्या खोलीचे दार जसे उघडते तस काहीसं....आणि त्या हातांनी जवळपास मला ओढलेच होते....त्या अंधाऱ्या रात्रीतून झटक्यात मी ह्या दुनियेत आलो....एक दरवाजा एका प्रकाशमय रूम मध्ये उघडत होता.....सगळं काही स्वप्नवत होतं.....त्या टापटीप सुंदर अश्या रूमचा दरवाजा उघडून मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा काय आश्चर्य?? बाहेर एका पांढऱ्या शुभ्र संगमरवरी रस्त्यावर लोक वावरत होते.....मला बघून त्यांनी माझे स्वागत टाळ्या वाजवून केले.....शेजारीच उभ्या असलेल्या एका आज्जीबाईने माझ्या हातात एक गुलाबाचे फुल देऊन माझे स्वागत केले....कमालीची आनंदी लोकं होती ती.....सगळे हसतमुख चेहरे.....हॅट घालून आलेल्या पीटरने त्याची गोल हॅट माझ्या डोक्यावर घातली आणि म्हणाला


"दुःखातून सुखी जगात स्वागत आहे मित्रा"


हे सगळं काही अनपेक्षित होतं....मी थोडा गोंधळलो होतो पण ह्या लोकांच्यात क्षणार्धात मिसळूनच गेलो....जसा काही मी इथलाच एक रहिवासी आहे....सगळ्यांना आपली ओळख करून दिली त्यांनी आपली ओळख करवून दिली....सगळ्यांचे कपडे पांढरे शुभ्र होते....अगदी चमकदार त्यातून येणारा मंद प्रकाश डोळ्यांना सुखावत होता तसाच पांढरा कुर्ता माझ्याही अंगावर आला होता.कसा?? माहीत नाही....वेळ जात होता तसा त्या आनंदी गर्दीतून एक काळ्या कोट मध्ये आलेला हसतमुख माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला


"सर तुमची जायची वेळ आली आहे....तुम्ही परत येऊ शकता"


त्याचे प्रसन्न रूप बघून मी त्याच्याबरोबर आलो त्याने मला त्या लाईट पिवळ्या रंगाच्या घराजवळ आणले जिथून मी इथे आलो होतो....त्याने मला त्या प्रकाशमय रूम मध्ये आणले आणि दरवाज्याजवळ उभं राहून हसत मुखाने दरवाज्याकडे हात केला मी दरवाज्यातून बाहेर आलो डोळे उगडले ते सरळ ह्या बेड वर होतो.....मनात प्रश्न पडला की


 "काय मस्त स्वप्न होत यार....किती मस्त लोक होते ते"


पण पुढचा धक्का तेव्हा बसला जेव्हा माझ्या एका हातात ते गुलाबाचे फुल आणि दुसऱ्या हातात तिथल्या पीटरची हॅट होती....दोन्हीतून मंद असा सुगंध येत होता.....मी त्या दोन्ही वस्तू घाबरून खाली टाकल्या आणि बेड पासून दूर झालो....काहीतरी वेगळा प्रकार होता हा....घाबरत घाबरत गादी दाबून खाली वाकून बघून मी तो बेड चेक केला पण काहीच नव्हतं.....घाईघाईने आवरून जॉब वर गेलो.....पण अंगाला तो मंद सुगंध तसाच होता....तिथल्या हसतमुख लोकांच्या आठवणी डोक्यात तश्याच फिरत होत्या.....एक आणि एक क्षण गोड आठवण बनून डोळ्यासमोर फिरत होता....थोडं चमत्कारिक होतं हे सगळं....कुणाला सांगणे म्हणजे माझी डिप्रेशनची जखम त्यांनी ओरबाडून काढल्यासारखी होती.....दुसऱ्या दिवशी त्या बेड वर न झोपण्याचे ठरवून घरात आलो खरा पण ते गुलाब जे अजून टवटवीत होते त्याच्याकडे बघून परत त्या बेड वर झोपी गेलो.....काही काळ भूतकाळातील दुःख आठवले आणि परत त्या हातांनी मला इथे ओढले...जणू कुणाला माझे दुःख सहन होत नव्हते आणि तो मला ओढू पाहत होता..परत ते हसतमुखाने स्वागत.....सगळीकडे आनंद....म्हणजे ह्या लोकांना मी जुना,बोरिंग वाटतच नव्हतो....ते माझ्याबरोबर अगदी हसतखेळत प्रेमाने बोलत होते.....प्रेमाने....."प्रेम" हे माझ्या आयुष्यातील अडगळीत पडलेले शब्द परत ह्या दुनियेत मिळत होते....न इथे कुठला स्वार्थ होता ना हेवा ना जगण्यासाठीची जीवघेणी धडपड....अनेकांचे किस्से ऐकले.....मरतात इथे पण लोक....पण आपला कार्यभाग आनंदात संपवून.....वास्तविक इथे करायला काहीच नाही.....इथे माणसाला एकच काम आहे ते म्हणजे आनंदित रहायचं


म्हणून तर मी इथे कायमचं स्थायिक व्हायचं ठरवलं आहे.....काळ्या कोटवाल्या जेसन ने सांगितल्याप्रमाणे मी आता बेडच्या खाली माझी सही केली आहे....इथे शेकडो सह्या केल्या आहेत....वरती काहीतरी वेगळ्या भाषेत मजकूर लिहला होता....त्या शेकडो सह्या खाली आता माझी एक सही ऍड झाली....आणि त्या रात्री बेड वर झोपून मी इथे आलो....अगदी कायमचा.....कारण ह्या प्रकाशमान खोलीत येताच खऱ्या आयुष्यातून इकडे यायचा आणि परत जायचा दरवाजा जणू गायबच झाला.....म्हणजे मी आता इथला कायमचा रहिवासी झालो.....खऱ्या जगात माझं प्रेत त्या लोकांना सापडेल किंवा नाही सापडेल कल्पना नाही.....पण त्या खऱ्या दुनियेची सगळी दुःखे तिथेच सोडून मी आता आलोय तो ही कायमचा.....ओहहहह बाहेर तर माझ्या स्वागतासाठी अनेक हसरे चेहरे गोळा झालेत....आता त्या आनंदी चेहऱ्यात मी ही एक जण असेन...

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror