चोराची फजिती
चोराची फजिती


आमच गाव खडकवाडी. नावाप्रमाणच खडकावर वसलेल.आमच्या घरात आई बाबा, मी आणि माझी लहान बहीण सोनू राहायचो. आमच घर म्हणजे खेडयातल सपार.
आई -बाबा मजूरीने कामाला जात. मी पाचवीला तर सोनू पहिलीत होती. नेहमी प्रमाणे आम्ही रात्रीचे जेवण करुन थोडयाशा गप्पागोष्टी केल्या आणि बत्ती फुकून सर्वजण झोपी गेलो.
रात्रीचे २ वाजले असतील. चोराने चौकटीजवळचा दगड काढून दरवाजाची आतील कडी काढून घरात प्रवेश केला. सर्व जण गाढ झोपेत होते. चोराने आता अंधारामध्ये घरात प्रवेश करून आतल्या खोलीकडे जायला निघाला.
आमचे बाबा आतल्या घरात झोपले होते. चोराचा पायाचा धक्का बाबांना लागला, पण झोपेत असल्याने बाबांना फारशी जाणीव झाली नाही. चोराने हळू हळू घरातील सामानाच्या पेट्यांकडे आपला मोर्चा वळवला. काही तरी खुडबूड खुडबूड वाजल्या सारखा आवाज झाला. रात्रीच्या अंधारात कानोसा घेतला तर कुणीतरी असल्याची जाणीव झाली.
घरातले तर सर्वजण झोपी गेले. म्हणजे नक्कीच कुणीतरी घरात घुसून चोरी करायला आलय.
आता मात्र बाबा सावध झाले . कुणी तरी घरात घुसल्याची खात्री झाली . बाबा अंधारात हळूच उठून बसले. चोर मात्र अधारात सामानाची उचकापाचक करण्यात गुंग होता. बाबांनी अंधारात चोराची हालचाल पाहिली व हळूच पाय न वाजवता चोराच्या दिशेने वाटचाल केली. आता मात्र चोर बाबांच्या टप्प्यात आला. क्षणाचाही वेळ न दवडता बाबांनी चोरावर झडप घालून चोराला पकडला.
चोराने सुटण्याची धडपड केली पण छे! बाबांच्या तावडीतून सुटणे अशक्य. बाबांनी आईला आवाज दिला. आई आणि आम्ही जागे झालो. आईने काडी पेटवून बत्ती लावली, आणि बत्ती घेऊन आतल्या घरात गेलो. आणि पाहिल तर बाबांनी चोराला पकडलेल.
आता मात्र सर्वजण चोरावर तुटून पडले. लाथाबुक्यांच्या माराने चोर गयावया करू लागला. मी गरिब आहे, मी पुन्हा नाही चोरी करणार म्हणू लागला. मला सोडून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही .
आम्हाला चोराची दया आली. आणि त्याला सोडून दिल.