Bhikaji Bhadange

Thriller

3.9  

Bhikaji Bhadange

Thriller

चमत्कार म्हणावा का साक्षात्कार?

चमत्कार म्हणावा का साक्षात्कार?

8 mins
412


25 डिसेंबर1968 रोजी चाळीसगांव तालुक्यातील कळमडू येथील माध्यमिक विद्यालयाची सहल मध्यप्रदेशला जाण्यासाठी निघाली - त्यात पंचविस विद्यार्थी तीन शिक्षक आणि एक शिपाई सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन परत घरी सुरक्षित आणून सोडण्याची जबाबदारी शाळेची. पर्यायाने सहभागी शिक्षकांची होती. धुळे चाळीसगाव रेल्वेने सायंकाळी पाच वाजता आम्ही चाळीसगावी पोहचलो. तिथुन रात्री सात वाजता मुंबई-भुसावळ पॅसेंजर गाडीने रात्री अकरा वाजता भुसावळला. नंतर बारा वाजता भुसावळ खंडवा पॅसेंजरने निघालो सगळा प्रवास पॅसेंजर गाडीचाच कारण तेव्हा विद्यार्थ्यांना सहलीसाठी भाडे सवलत फक्त पॅसेंजर गाडीनेच मिळत होती. जरी झोपेची वेळ झाली होती तरी सहलीच्या उत्साहाने मुलं गप्पांत रंगली होती. मधूनच हसण्याच्या उकळया फुटत होती. झोप तर येत नव्हती म्हणून गाण्यांच्या भेंडया खेळायला सुरूवात केली. गाडी जशी पुढे जात होती तस-तसे हळुहळु पेंगायला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी. सहा वाजता खंडवा स्टेशनवर गाडी थांबली. स्टेशनवरील हमालांचा आवाज ऐकायला येत होता. 

सगळे खडबडून जागे झाले आपापले साहित्य घेऊन सर्वांना बरोबर घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. इंदौरकडे जाण्याच्या गाडीला दोन तास वेळ होता. सर्वांनी सकाळचा विधी आटोपून मुखमार्जन करून तयार झाले. सर्वांनी चहा घेतला. जरा वेळाने खंडवा - इंदौर गाडी प्लॅटफार्मला लागली. प्रत्येकाने आपलं साहित्य घेऊन सर्व एकाच डब्यात बसले. सर्वांना व्यवस्थित जागा मिळाली. गाडी निघाली तसे डब्यात मिठाई, शेव चिवडा विकणारे शिरले. त्यांनी आपल्या नेहमीच्या आवाजात ओरडायला सुरूवात केली. मुलांनी घरून येतांना सोबत खाण्याचे पदार्थ आणले होते; परंतु ते फेरीवाल्याजवळचे पदार्थ घेण्यासाठी विद्याथ्र्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लपले नव्हते. आम्ही मुलांना सूचना दिलेली होती. शक्यतोवर फेरीवाल्या जवळचे पदार्थ घेऊ नका. काही वेळा ती शिळे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ शकतो. सहल राहील बाजूला आम्ही विद्यार्थ्यांना सांगितले तुम्ही सोबत आणलेलेच खायचे. मुलांनी आपापले डबे उघउले. सोबत आणलेले पदार्थ ऐकमेकांत वाटून खाण्याचा जो आनंद होता तो काही औरच होता. खंडवा- इंदौर गाडी ही मीटर-गेज. तिचा वेग बेताचा. आम्ही आजुबाजुला नजर टाकली. तो प्रदेश काही अलौकिकच वाटत होता. काही वेळाने कालाकुंड स्टेशन आलं. काळाकुंड हे ‘कलाकंद’ या मिठाईसाठी प्रसिद्ध. गाडी तिथे थांबल्यानंतर कलाकंद घेणार नाही असा प्रवासी आगळाच. पळसाच्या पानात कलाकंद प्लॅटफार्मवरील फेरीवाले जोरजोरात ओरडत होते. आम्ही मुलांना सांगितले सगळयांनी कलाकंद घ्या दोन आण्यात. त्या पानातील कलाकंद (बावन्न वर्षांपूर्वी दोन आण्याची किंमत काय होती कल्पना करा) कलाकंद खाऊन सर्व एकदम खुश झाले. ‘मामाच्या गावाला जाऊ या-पळती झाडे पाहू या’ या लहानपणच्या गाण्याचा अनुभव घेत-घेत मुलं गाण सुद्धा गुणगुणत होते. मध्यप्रदेश म्हणजे माळवा सगठा पठाराचा प्रदेश - टेकडी नाही की कुठे डोंगर नाही. मन आनंदाने आणि आश्चर्याने न्हाऊन निघत होतं. स्टेशनमागून स्टेशन जात होती. दुपारी दोन वाजता भुकेची कुणकुण जाणवायला लागली.

सगळयांनी आपापले डबे काढले आणि धावत्या गाडीत जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. त्या भागातील सर्व प्रवासी हिंदी भाषा बोलणारे-मध्यप्रदेशची भाषाच हिंदी. मराठी बोलण्याची सवय त्या प्रवाशांसी हिंदीतून बोलतांना - मोठया गमतीजमती होत होत्या. वेळ कसा गेला समजलेच नाही. चार वाजता इंदौर स्टेशनला गाडी थांबली. प्लॅटफार्मवर एकच गोंधळ हमाल, मिठाईवाले, चहावाले मोठ-मोठयाने ओरडत होते. आम्ही विद्यार्थ्यांना सांगितले - थांबा घाई करू नका प्रत्येकाने आपलं साहित्य व्यवस्थित चेक करून मगच खाली उतरा. सगळेजण खाली उतरले. सगळे बरोबर आहेत का याची खात्री केली. बाहेर आलो. त्यावेळी तिथे घोडयांचेच टांगे होते. पाच टांग्यात बसलो. जिथे राहण्याची जवेणाची सोय होती अशा एका मोठया हॉटेलवर थांबलो. आपआपल्या खोलीत साहित्य ठेवून सगळयांनी हातपाय धुवून बसले. रात्री थोडं बाहेर फिरायचं होतं,  म्हणून आठ वाजताच जेवायला बसलो. जेवणं झाली. प्रवासाचा थकवा अजिबात जाणवला नाही. तिथे ‘सराफा’ म्हणून एक परिसर आहे,  आपल्या भाषेत ती ‘खाऊगल्ली’ तिथे गेलो सगळीकडे गॅसबत्त्या होत्या खाणाऱ्या शौकीनांची बरीच गर्दी होती. आम्ही त्यात सामील झालो. तिथे दुधाचे पदार्थ प्रसिध्द. त्यातल्या त्यात तिथली रबडी. सर्वांनी मस्तपैकी रबडी आणि आवडीच्या पदार्थावर यथेच्छ ताव मारला. पोटात जागा नव्हती तरी खाण्याचा मोह आवरत नव्हता. रात्री अकरा वाजता हॉटेलवर आलो, अंथरूणावर पडल्यापडल्या सर्व डाराडूर झोपलो.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जाग आली. सकाळी लवकर तयारी करून नऊ वाजता तयार झालो. दहा वाजता मांडवगडला जायचे होते. मांडवगडाला जाऊन सायंकाळी इंदौरला परत आणून सोडण्याच्या बोलीवर एक बस ठरविली. ठरलेल्या वेळेप्रमाणे बसमध्ये बसून मांडवगडच्या रस्त्याने बस धावू लागली. आजूबाजूच ते सुंदर दृश्य पाहून डोळयांचं पारणं फिटलं. साडेअकराच्या सुमाराला मांडवगडला पोहचलो. तिथे एक वाटाडया ठरवला. त्याने आम्हाला सुरूवातील सूचना दिल्या. ‘इथे माकडं खूप आहेत. ते आपल्या हातातल्या वस्तू हिसकावतात एवढंच नाही तर खाण्याच्या वस्तूसाठी ते तुमच्या खिशात हात घालायलासुद्धा घाबरत नाहीत. तिथे माकडांचे वेगवेगळे टोळके होते. प्रत्येक टोळके वेगळे असते. त्या टोळक्याचा एक म्होरक्या असतो. तो जिकडे धावेल त्याच्या मागे इतर माकडे धावतात. आम्ही त्या माकडांसाठी चणे, शेंगा विकत घेतले होते. त्यांना खाऊ घालतांना आम्हाला होणारा आनंद त्याची कल्पनाच करता येत नाही. ती सगळी दृश्यं आम्ही कॅमेरात टिपली होती. विधाता खरोखरचं कमालीचा किमयागार आहे. प्रत्येक भागाचं आगळ-वेगळच वैशिष्ट्य निर्माण केलेल. तिथली ती वेगवेगळी झाड-वेली वेग-वेगळे पशूपक्षी. त्यांचे रंग-रूप सौदर्यं? खरोखरच अतिशय विलोभनीय होतं. अस वाटत होत इथून निघूच नये.

सायंकाळी पाच वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. पाहिलेल्या त्या सृष्टीसौंदर्याच्या गप्पाच आपसात रंगल्या होत्या. जाण्यापेक्षा यायला कमी वेळ लागला. सात वाजता बस थांबली. आपापलं साहित्य घेऊन हॉटेलमध्ये आलो. दिवसभरात तिथे थकवा अजिबात जाणवत नव्हता. पण परत आल्यावर थोडं जडत्व जाणवलं. रात्री नऊ वाजता जेवणाचा आस्वाद घेऊन रात्री दहा वाजता अंथरूणावर पडल्यापडल्या सर्व गाढ निद्रेच्या अधीन झाले. 


पहाटेच्या किलबिलीने सकाळी सात वाजता उठलो. खरंतर उठायला उशीर झाला होता. लगबगीने सकाळचा कार्यभार आटोपूर तयार झालो. इंदौरमधली महत्त्वाची ठिकाणं पाहायची होती. नाश्ता आटोपून नऊ वाजता बाहेर पडलो. अगोदर पाहिला तो राजवाडा- होळकरांचा तो राजमहाल त्याचं ते वैभव एवढया वर्षांतही जपून ठवलेले तो राजमहाल. वास्तुशास्त्राचा एक आदर्श नमुना त्या राजमहालाचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा! केवळ इंदौरच किंवा होळकर घराण्याचं ऐश्वर्य नव्हे तर संपूर्ण भारताच एक आदर्श पुण्यानं सामावलेले अद्वितीय व्यक्तिमत्व त्यात सामावलेले होतं. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ म्हणून भारतभूमीला लालामभूत ठरलेलं हे भारतीय इतिहासातील सुवर्णअक्षरांनी कोरलेलं नाव. भारतातील पवित्र नद्यांना या माऊलीने बांधून दिलेले घाट आजही त्याची साक्ष देत आहेत.

दुपारची जेवणं झाल्यावर ‘ओंकारेश्वर’ हे पवित्र तीर्थक्षेत्र पाहायला निघालो. सगळीकडे हिरवीगार गव्हाची शेतं डोळयाचं पारणं फिटावं अस हे दृष्य म्हणजे एक निसर्गाचा विलोभनीय चमत्कारच. ‘नर्मदा’ या पवित्र नदीच्या तीरावर वसलेलं अप्रतिम मंदिर. नदीच्या पैलतीरी जातांना होडया, नावांचा उपयोग केला जात होता. दोन नावांमध्ये आम्ही बसलो. नावाडयाने अगोदरच कल्पना दिली होती. ‘तुम्ही ज्या ठिकाणी बसलात तिथून पैलतीरी जाईपर्यंत आपल्या जागेवरून अजिबात हलायचं नाही. आपापल्या भागाकडे पाहू शकता. इथे नदीत लहान-मोठे खूप मासे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही चणे-शेंगदाणे पाण्यात टाकू शकता. आपल्या बसल्या जागेच्या बाजूलाच बघायचं. जागेवरून उठून दुसऱ्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे नाव उलटी होऊन अपघात होऊ शकतो. आम्ही माशांसाठी चणे-शेंगदाने घेतले. नाव जसजशी पुढे जात होती, तसतसे मासे पाण्यातून वर येण्यासाठी डोकावत होते. आम्ही त्यांना चणे-शेंगदाणे टाकत होतो. तसतसे ते मासे पाण्याच्या पृष्ठभागावर उडया मारत होते. दिलेल्या सूचनांचं पालन करून आम्ही ते दृश्य पाहात होतो. खाण्यासाठी बरेच जगतात पण जगण्यासाठी खाणाऱ्या  माशांच दृश्य पाहून आमच्या ‘आत्म्याला’ मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. त्या पवित्र नदीच्या घाटावर सर्वांनी पुन्हा आंघोळी केल्या. ओंकारेश्वराचं मंदिर म्हणजे पौराणिक इतिहास जतन केलेला ठेवा. सर्वांनी देवाच दर्शन घेतलं. सभोवतालच्या परिसराच निरीक्षण करून ते आम्ही कॅमेऱ्यात टिपलं. त्या ठिकाणी मिळणारी मिठाई म्हणजे ‘रतलामी शेव’ आणि बडवाहचा ‘चिवडा’. जिभेचं पारण फेडणारी चव सर्वांनी आवडीने अनुभवली. नावेतून परत येताना सुचनांचं पालन करून त्या माशांचं दृश्य आम्ही आमच्या अंतःचक्षुत सामावून ठेवलं.

सायंकाळ व्हायला बराच अवधी होता. आम्ही पुराणवास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेलं ठिकाण म्हणून भर्तरीनाथाची गुफा पहायला निघालो. एकेका टांग्यात पाच-पाच याप्रमाणे अंधार पडायचा सुमारास भर्तरीनाथाच्या गुफेजवळ पोहोचलो. तिथल्या पुजाऱ्याला आम्ही ती गुफा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने दहा-बारा वर्षाचा एक मुलगा आणि एक मुलगी पेटती मशाली घेऊन आमच्या सोबत पाठविले. त्या गुफेत अंधार होता पुजाऱ्याने आपल्या मुलांना आतील माहिती सांगण्यात तरबेज केलेले होते. त्याप्रमाणे आम्ही त्या मुलांच्या मागे-मागे गेलो त्यांनी गुफेचा दरवाजा उघडला. दरवाजा अतिशय लहान होता. त्याची उंची जेमतेम तीन-साडेतीन फुट आणि एका वेळेला एकाच व्यक्तीला जाता येईल अशी त्याची रचना. त्या मुलांनी आत प्रवेश केला आम्ही त्यांच्या मागे एक-एक असे प्रवेश करीत होतो. मी एक शिक्षक आणि काही आत शिरलो. आत प्रवेश करत असतांना एका मुलाच्या हाताला त्या प्रवेशद्वाराचा थंडगार स्पर्श झाला तसा तो ओरडून मागच्या मागे पळाला. पाहतो तर काय एक भला मोठा नाग आपलं वेटोळं करून आणि फणा वर करून सारखी मान फिरवत होता. एवढा मोठा नाग आम्ही कधीच पाहिला नव्हता. आपली मुलं फारच घाबरली. काही मुलं तर रडायला लागली. आम्ही घाबरलो, मनाचा थरकाप होत होता. पण प्रसंगावधान राखून आम्ही मुलांना धीर देत होतो.

माझ्याजवळ बॅटरी होती. तो नाग जिकडे फणा वळवेल त्याच्या फण्यावर मी त्या बॅटरीचा झोत टाकत होतो. काय करणार आतला माणूस बाहेर जावू शकत नव्हता. तो नाग त्या गेटमध्येच वेटोळे घालून बसला होता. मी असे ऐकलं होतं की साप एका ठिकाणी कधीच थांबत नाही पण हा नाग बसल्याजागचा हलत नव्हता. फक्त फणा इकडेतिकडे फिरवीत होता. आता जाईल, तेव्हा जाईल असं वाटत होतं. पण कसलं काय? हृदयात नुस्ती धडधड होत होती. मनात नको ते विचार येत होते त्याची ती अवस्था पाहून तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हता. त्याचं ते अवसान पाहून अंगाचा नुसता थरकाप होत होता. मुलांची अवस्था पाहवेना. दरदरून घाम फुटला हे सगळं घडत असूनही बाहेर असलेला एक शिक्षक खुशाल हसत होता. प्रसंग काय? मी त्याच्यावर चिडलो आणि ओरडलो, अहो दात काय काढता आहात, लवकर जा आणि त्या पुजाऱ्याला वस्तुस्थिती सांगून लवकरात लवकर बोलावून आणा. तसा शिक्षक गेला. नाग मात्र तिथेच बसलेला. आमचा धीर सुटत होता. तो पुजारी एका हातात पेटती मशाल आणि एका हातात मोठा दांडा घेवून आला. तो आम्हाला धीर देत होता ‘डरो मत -डरो मत’ आणि त्याने हातातील दंडा दोन-तीन वेळा जमिनीवर आपटला आणि म्हणाला ‘जाव महाराज जाव’ आणि काय आश्चर्य, तो नाग तिथून निघाला आणि अंधारात कुठे गेला ते आम्हाला दिसलंच नाही. आम्ही सर्व बाहेर पडलो. ती गुफा पाहण्याचा विचार आम्ही मनातून काढून टाकला. तो पुजारी अगदी ठामपणे आम्हाला म्हणत होता ‘अरे आप भाग्यवान हो की आपको भर्तरीनाथ महाराजने दर्शन दिया’ मी मनात विचार केला जर विपरित काही घडलं असतं तर आमचं भाग्य लयाला गेलं असतं. तशात तो पुजारी आत्मविश्वासाने आम्हाला धीर देऊन सांगत होता ‘चलो-चलो मैं आपको गुफा बताता हूँ।’ भीत-भीतच आम्ही आत गेलो.

तो पुजारी तिथल्या मूर्तींची माहिती सांगत होता. सर्व पाहून झाल्यावर आम्ही बाहेर आलो. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मी खूश होवून त्या पुजाऱ्याला पन्नास रूपये देऊ केले पण त्या प्रामाणिक पुजाऱ्याने पैसे घेतले नाही. आम्ही त्याचे आभार मानून तिथून निघालो. हॉटेलवर गेल्यावर तीच चर्चा. सुटकेचा निश्वास सोडून सर्वांनी जेवण केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने परतीचा प्रवास सुरू झाला. रात्री दहा वाजता सुखरूप घरी पोहचलो. तो प्रसंग अजून जरी आठवला तर मनाचा थरकाप होतो पण आपण त्यातून सहीसलामत सुटल्याचा आनंद होतो. पण तो प्रसंग अजूनही स्मरणात आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller