Komal Mankar

Tragedy

3  

Komal Mankar

Tragedy

चार दिवसाची रात्र

चार दिवसाची रात्र

5 mins
545


मंजिरी अगं ये मंजिरी.......


रूममध्ये सत्याचा आवाज घुमत होता. तशी सत्या जवळ येतच मंजिरी म्हणाली, "काय झालं एवढं ओरडायला इथेच आहे मी..."


"बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी...." हातातला गजऱ्याचा विडा तिच्या समोर ठेवतं सत्या म्हणाला.


त्याच्या हातातला गजऱ्याचा विडा सोडत मंजिरी म्हणाली, "किती सुंदर, मला खूप आवडतो गजरा वेणीला माळायला...पण , तुम्हाला कोणी सांगितलं मला गजरा आवडतो म्हणून??"


मंजिरीच्या हातातला गजरा मोकळा करत सत्या आपल्या हातानी तिच्या वेणीला गजरा लावून देत म्हणाला, "त्यात कोणी काय सांगावं लागतं राव आता हक्काची बायको तुम्ही आमची तुम्हाला काय आवडत काय नको जाणून घ्यायला नको का ते? हं...."


"हो..... पण तुमच्या आवडी निवडीबी मला कळू द्या की." गालातच हसत मंजिरी म्हणाली.


"एका दिवसातच कळणार व्हय तुला आजच्यानं माझ्या आवडी निवडी जरा सबरी ठेव... " तिच्या खांद्यावर हात ठेवत

सत्या म्हणाला. पहिल्यांदा सत्याच्या हातचा स्पर्श अनुभवून मंजिरीचं अंग शहारलं. सत्याकडे वाकडी मान करून ती

गालातच हसली... तिचं लाजणं बघून सत्या तिला म्हणाला, "तू म्हणशील तर आज रात्री होऊन जाऊ देऊ... आणि तू नाही

म्हणालीस तर तुझ्या केसाला बी मी धक्का लावणार नाह्य..."


त्याचं बोलणं ऐकून मंजिरी म्हणाली, "राहूद्या राहूद्या म्हणूनच हक्काची बायको म्हणालात... नऊ दिवस नवऱ्याचे म्हणतात ते काह्य खोट नाही... तुमचं आपलं आताच बोलणं मग तुडवान की लातेनं..."


तिच्याकडे आसुसल्या नजरेनं बघत सत्या म्हणाला, "नाही मंजिरी, ह्या फुलाला मी चुरगळून घेणार नाही माझ्या तळहातच्या फोडागत सांभाळ करीन तुझा... आणि व्हयं गं सारेच नवरे सारखे नसतात!"


"आता उशीर होतो तुम्हाला कंपनीत जायला निघा की बाहेर मंडळी आवाज देत उभी आहे.." बाहेर दाराच्या दिशेने जात मंजिरी सत्याला म्हणाली.


सत्या पण रूमच्या बाहेर निघाला आपला न्याहारीचा डब्बा बांधत तो गावातल्या चार-दोन माणसांसोबत गेला...

तिकडं वहिनी वहिनी करून सत्याच्या बहिणीनं मंजिरीभोवती पिंगा घातला...

त्याच्या सोबत गप्पा मारता मारता सूर्य क्षितीजाच्या पल्याड जाऊन कसा मावळला तेच मंजिरीला कळले नाही..


सत्या आज खुशीने कावराबावरा झाला लग्न आणि नुकतीच कथा आटोपून पाच दिवस झाली आणि आज सत्या

मिलन रातेच्या प्रतीक्षेत होता... पाच दिवस पावण्याच्या वर्दळीत त्याला काही करता नाही आलं आणि तो

आतुरतेनं त्या रात्रीसाठी झुरत होता... शेवटी उपभोगायला हक्क्काची बायको आली म्हटल्यावर पुरुषाचा आनंदच गगनात

मावेनासा होतो... माणसाचं शरीर ते...


मंजिरी स्वयंपाक घरात पोळ्या लाटत होती... सर्व पावणे गेली तरी मंजिरीची मोठी नणंद रेश्मा तिचा नवरा मुलं होतीच.

रीमा आणि अपर्णा सत्याच्या दोन पंधरा सोळा वर्षाच्या लहान बहिणी त्याही मंजिरीला स्वयंपाकात मदत करू लागत होत्या.

रेश्मानं सर्व पुरुष मंडळींसाठी ताटं बनवली.... सर्व पंगतीवर जेवायला बसली..... पोळ्या करताकरता मंजिरीला पोळ्या वाढायला

पंगतीत जावं लागे.... स्वयंपाक वाढणं अर्ध्यापेक्षा अति कामाचा भार तिच्या एकटीवरच दिवसभर तिला अंग टाकायला

तर मिळालंच नाही तिच्याकडे बघून सत्यालाही वाटायचं इथे तिला सर्व राबवून तर नाही घेत आहे?


आईईईई गगगगगssssss ..... म्हणून मंजिरीचं किंचाळणं सर्वच्या कानी पडलं सत्याही धावत स्वयंपाक घरात 

गेला.... मंजिरी चक्कर येऊन पडलेली होती...


काय झालं असावं तिला?? लग्न होऊन फक्त पाच दिवस झाली होती... 

त्या रात्री मंजिरी उपाशीपोटीच झोपी गेली... 


दुसऱ्या दिवशी मंजिरी उठली अंगात त्राण नसतानाही तिला साडीचा पदर खोचून आंगणात शेणाचा सडा टाकावा लागला... 

सकाळची न्याहारी करत तिने सत्याला डब्बा बांधून दिला तो कामावर निघून गेला... 

आज पहाटेपासून मंजिरीच्या पोटात भलतंच दुखणं सुरु झालं नवरा तर कामावर गेला पण सत्याला सांगायचीही तिची हिंमत झाली नाही...


दिवा लावायच्या वेळी सत्या येताच तिने त्याला न राहून सांगितले माझं पोट खूप दुखतंय आज... पण, सत्या मनावर न घेता तिला म्हणाला, "तुमचं आपलं नेहमीचंच बायकी दुखणं असतं हे..." 


त्याची समजूत काढत मंजिरी म्हणाली, "खरंच हो जेवण पण नाही होत आहे माझ्याने.." तिचं हे सांगणंच त्याला खोटं ठरलं असावं..

 

त्याने त्या रात्री आपली गोधडी उचलत बाहेर खाटेवर नेऊन अंथरली... तो तिथेच झोपी गेला. 

मुलाला खोलीच्या बाहेर झोपताना बघून सत्याची आई मंजिरीच्या खोलीत जात तिच्यावर बोखरलीच... 

"काय गं लग्न झाल्यावर नवऱ्याला खुश ठेवायचं असतं माहिती नाही का तुला माझ्या मुलाला खोलीच्या बाहेर पाठवून

उताणी इथं निजलीया... " मंजिरीला काय बोलावं सुचतं नव्हतं सत्या पण तिला समजून घेत नव्हता म्हणजे 

त्या नव्या घरात तिला समजून घेणारं कोणीच नव्हतं... रात्रभर विचाराच्या गर्दीत पोटाच्या वेदनेने ती विव्हळतच राहिली.... 


पहाटेचा गारवा अंगाला भेदत होता म्हणून सत्याने आपली खाट टेकत खोलीत प्रवेश केला तर त्याच्या डोळ्यासमोर

मंजिरी पोटाच्या दुखण्यानं त्याला तडफडताना दिसली. तिचा आक्रोश बाजूच्या खोलीत झोपलेल्या सासू-सासऱ्यांनाही कंटाळ्या देत असावा...


मंजिरीची ती हालत बघून सत्याने सरळ ऍम्ब्युलन्सला कॉल केला दारात भल्या पहाटे ऍम्ब्युलन्सची गाडी बघून मंजिरीची सासू तावातावात रूममध्ये येत सत्याला म्हणाली, "नाटकी रे तुझी बायको लय नाटकी, अजून लग्नाला दहा दिवस होत नाही तर नाटक लावले अवदसेनं... आणि तू इस्पितळाची गाडी बोलवली ह्या महाराणीसाठी..." आईचा एक शब्दही ऐकून न घेता तो मंजिरीला त्या गाडीत घेऊन गेला... मंजिरी वेदनेच्या आकांताने ओरडत होती...


तिचा तो आवाज सम्पूर्ण हॉस्पिटलच्या भिंती आरपार चिरत गुंजत होता... सत्याने लगेच फोन करून तिच्या घरच्यांना बोलवून घेतले....

 

डॉक्टरने सत्याला आपल्या रूममध्ये एकट्यालाच बोलवून घेतले...


"डॉक्टर... डॉक्टर काय झालं माझ्या मंजिरीला सांगा ना??" त्याच्या रूममध्ये जातच सत्या डॉक्टरांना कळकळ दाखवत होता...


"त्यांना हा पोटाचा त्रास कधीपासून होत आहे.... तुम्ही एक दोन दिवस आधी आणलं असतं तर आम्ही काही निदान केलं असतं पण, आता काहीच शक्य नाही." त्यांच्याकडे रागाने बघत सत्या म्हणाला, "शक्य नाही म्हणजे काय डॉक्टर अहो तुम्हाला लागेल तेवढे पैसे मोजून देतो मी पण माझ्या बायकोला वाचवा... " दोन दिवसापूर्वी हा तोच मंजिरीचा नवरा होता जो तिला बोलला होता.. तुमचं आपलं नेहमीचंच बायकी दुखणं असतं हे... आणि आज तोच सत्या तिला वाचवा म्हणून डॉक्टरांना गळ घालत होता... डॉक्टरही विचारतच पडले एवढा मोठा आजार हा माणूस तिला वेळेवर घेऊन न येता आता तिला वाचवण्यासाठी पैसा मोजून द्यायला तयार आहे डॉक्टर सत्याला म्हणाले...


"अहो, समजून घ्या! मंजिरीला गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे आणि तो शेवटच्या स्टेजवर आहे तिला वाचवायला साक्षात आता परमेश्वरही येणार नाही... ती मृत्यूची शेवटची घटका मोजत आहे." डॉक्टरचे बोलणे ऐकून सत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो जागेवरच टेबलावर डोकं आपटत रडायला लागला.... ही बातमी सम्पूर्ण परिवारात पसरली... मंजिरीला गर्भाशयाचा कॅन्सर झालाय.... 


घरच्यांचा चेहऱ्यावर भयाण चिंतातुर अवस्था पसरली.... काहीच न खाता रात्री सारे डॉक्टरला काही करा म्हणून विनवू लागली 

कारण तेव्हा ती जिवंत होती... सत्या तिच्या पायथ्याशी जाऊन पाय पकडत तिला माफी मागत होता पण मंजिरी आपल्याच 

वेदनेत जगत होती त्याची माफी याचनाही तिच्या कर्णापर्यंत पोहोचली नाही.... 


रात्र झाली काळोख दाटला.... रातकिड्याचा किर्रर्रर्रर्र आवाज घोंघावत होता त्या वेळी हॉस्पिटलच्या त्या एका खोलीत शेवटचं बोलायलाही मंजिरीजवळ कोणीच नव्हतं सारे मंजिरी जीवित आहे या आशेत झोपी गेले पण मंजिरी मात्र.... कायमचीच झोपी गेली पुन्हा कधी न उठण्यासाठी....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy