STORYMIRROR

satish kharat

Classics

4  

satish kharat

Classics

चांदणंचुरा...

चांदणंचुरा...

3 mins
213

   चांदण्याचा चांदण्यातच चांदणचुरा

      चांदण्याचा चंद्र वनात उत्सव सारा


      निळ्या नितळं नभात, चंद्राच्या गोलाकार खळ्यात, चांदण्याचा उत्सव सुरू झाला की, चांदणचुऱ्याचा शुभ्र निर्मळ खळाळं अगदी मनमोहक भासणारा... अल्हाददायक वाटणारा...! आकाशातील चंद्राने आपलं लोभस रूपडं दाखविल की, चांदण्यांनी आपल्या अलौकिक सौंदर्याची मुक्त उधळण केलेली... चंद्राच्या वाढत जाणाऱ्या शितल प्रतीबिंबा बरोबर चांदण्याची ही अल्लड लुकलुक आभाळभरं वाढत जाणारी... धुंद फुंद चंद्र, मंद मंद प्रकाश, आसमंतभर पसरलेला चांदणचुरा, अगदी उत्सवच जणू...! शरद ऋतूच्या चांदण्यात, स्वाती नक्षत्रात पाऊस थेंबाचे मोती शिंपल्यात जमा होऊन, लुकलुकणारे चांदणमोती आभाळभर लटकलेले... हा नितांत सुंदर निरंतर सोहळा मनाला खूप खूप भावणारा...!


      रंगाचा उडुनीया पंखा सांज कुणी ही केली

      काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

      सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे.


      आकाश निळे, ढग पांढरे, हवेत गुलाबी गारवा, कोवळी प्रसन्नं सकाळ, भोवती हिरवी राई, पाण्यावर डोकावणार्‍या झाडांच्या सावल्या, डोहात पडलेला चांदण्याचा खचं, वेगवेगळ्या ऋतूंचा वेगवेगळा सोहळा, निसर्गाचे असे पारदर्शक, नितांत सुंदर वैभव मनाला भुरळ घालत राहणारे...!


      सांज क्षितिजावर उतरलेली, चांदण्याचा सडा अंगणात पडलेला, रातराणीच्या सुगंधाने रात्र गंधाळून गेलेली... दुधाळ रंगात आभाळं न्हाऊन निघालेलं. काळोखाच्या पडद्यावर नक्षत्रांच्या वेली खाली उतरलेल्या, सगळं भान हरवून टाकणारे...!


      कधी अस्वस्थ झालयं की, आकाशाच्या विस्तीर्ण कॅनव्हासवर पाहतोय तर, वेगळीच रंगसंगती रंगलेली... रात्रीची निरव शांतता, लख्ख चांदणे, चंद्र गडद ढगातून डोकावत असणारा... दारातला निशीगंध बहरून आलेला. आकाशातला चांदणचुरा जणू त्यावर फुले होऊन लदबदलेला... वार्‍याच्या मंद झुळूकेवर सुगंधाबरोबरच उल्हास आणि आनंदाची लकेर सर्वदूर पसरलेली...!


      शरद ऋतूत एका लख्ख चांदराती येणारी पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी... चंदेरी रात,बोचरी थंडी, हिरवे गवत, त्यावर दवं थेंबाची चादर, लिंबोनी झाडामागे लपलेला चंद्र कडेकडेने वाढत जाणारा, तसा कोजागिरीचा उत्सव शिगेला पोचलेला...!लोखंडी कढईत दूध काठोकाठ भरलेले... कडाक्याच्या थंडीत चुलीच्या पिवळसरं जाळाखाली दुध खळखळ उकळू लागलेलं... वाऱ्याच्या हलत्या झावळ्यांवर त्याचा सुगंधी घमघमाट सर्वत्र पसरलेला... बाजूला हस्यांच्या फवाऱ्याबरोबर गप्पांना ऊत आलेला... त्याबरोबरच खलबत्त्यात कुटली जातात वेलचीचे दाणे, बदाम, किसमिस, चारोळी, कुणी एकजण केसराची डब्बी घेऊन तयार असतो. चंद्र साक्ष देतो. सर्व जिन्नसं दुधात टाकले जातात. चांदणचुऱ्याबरोबरच चंद्र दूधात घोटला जातो.आणि ''शरद सुंदर चंदेरी रात" मसालेदार केशर दुधाच्या गोडव्याने अवर्णनीय होऊन जाते...


      आभाळात नितळंस चांदणं दिसू लागलेलं... गाव नदीच्या काठावरून येणाऱ्या गारठ्याने हुडहुडी भरू लागलेली... चढत जाणाऱ्या रात्रीच्या संगतीन चंद्र हसत-खिदळत ढगाआडून लपंडाव खेळत असलेला... अशातच काही दुखऱ्या, बोचऱ्या वेदना डोळ्यापुढे तरळून जाणाऱ्या... तिच्या सहवासातले काही तकलादू क्षण हिंदोळू लागलेले मन डहाळीवर...! तिच्या भेटीसाठी अतुरलेले मन आणि सोबतीने घातलेले अनोखे क्षण सैरभैरपणे दरवळून जातात अवतीभोवती...! ती चांदण्यांनी मंतरलेली रात्र, आणि चंद्रोत्सवात रोमांचित झालेलं गात्र... बेहोष होऊन रंगत गेलेलं... ती संपूर्ण रात्र तिच्या चांदणं संगतीन चंद्र उजेडात न्हाऊन निघालेली असतांना, पहाट केंव्हा डोकावली कळलंही नाही? वाऱ्याच्या हळूवार झुळकेनं भानावर आलेलो तर, वर आकाशात चांदणचुरा तल्लीन होऊन उजेडाचा गीत गात असलेला...!


      आताशा मानव निर्मित कृत्रिम प्रकाशात निसर्गाचा लावण्यपूर्ण चांदणचुरा हरवल्यागत झालेला.‌‌.. सतत बदलत्या ऋतूमुळे अगणित चांदण्याची आकाश गंगा, मनामनाला भुरळ घालणाऱ्या अनोख्या चंद्राची रया लयास गेलेली... खरंतर निसर्गाला समजण्यासाठी हवं संवेदनशील मन परंतु धावपळीच्या आयुष्यात आपण कळत-नकळत विसरलेलो हे सारचं ...!


     परंतु एक मात्र खरंय चांदणचुऱ्याचा सुरम्य स्निग्धप्रकाश आयुष्याला सुखद क्षणांची उमेद देत राहतो.मग कधी अमावस्येच्या अंधारात ही उमेद जगण्याचं बळ होवून जाते कळतही नाही...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics