satish kharat

Others

2  

satish kharat

Others

जीवनदायिनी : नदी माय

जीवनदायिनी : नदी माय

3 mins
113


     एका उंच माळरानातला एक खाच खळगा अडखळतं, अडखळतं छोटासा प्रवाह होऊन पुढे पुढे धावत राहतो. रुंद-अरुंद होत अवखळपणे तो गढूळ जलप्रवाह ओढाळ होऊन, सागर भेटीच्या आशेने वाहत राहतो. आपल्या अंतरंगातली सारी गढूळता संपवून, स्वच्छ, पांढर्‍याशुभ्र, नितळ पाण्यात रूपांतरित होऊन, ती निर्मळ धार उल्हास, आनंद व पावित्र्य, कळत-नकळत आपल्या वाट्याला देत असते. ती अविरत वाहणारी धारा म्हणजे जीवनदायिनी लोकमाता नदी!


     नदी आपला प्रवास शांत, निवांतपणे करत, अनेक गावे,शहरे, जंगले, खोल दऱ्या खोऱ्यातून अखंडपणे धावत राहणारी... ना कधी दमणारी... ना कधी थकणारी... नितळ निळ्या नभाने तिला भुरळ घातली तरीही, कधी न अडखळणारी...! दाट झाडी- झुडुपांनी किंवा दगड,धोंड्यांनी तिच्या मार्गात अडथळा घातला तरी त्यांना वळसा घालून आपली परिक्रमा न थांबविणारी...! हिरव्या मखमली तृणांकुरांना ती न भाळणारी... तर वैशाखातल्या धगधगत्या उन्हातं आपली काया शीतल गार ठेवून, अविश्रांत वाहत जाणारी...!


     पहाटे-पहाटे नदी फेनीलकांत तुषार उडवीत रुणझुण नाद करीत वाहत राहते. पांढऱ्याशुभ्र जलधारांनी कडेकपारीतून वाहतांना दोन्ही काठावरची दाटीवाटीने उभी वृक्षवल्लरी, त्यावर विसावलेले बारीक-सारीक जीव, गुरा-पाखरांचे चैतन्य सुखाने नांदते पाहून नदी प्रेमळपणाने, शांतपणाने नादमधुर खळखळाट करीत पुढेच धाव घेते... कधी प्रसन्न सकाळी जीवनदायिनीच्या शुभ्र काच पाण्यात धुंद बेधुंद होऊन हळव्या रान पाखरांचे थवे करतात दंगामस्ती अल्लडपणे...! सोनवर्खी सूर्याचं ऊन नदी पाण्यावर उतरले की नदी अधिकच देखणी झालेली... लाटेवर वाहत येणाऱ्या थंडगार झुळुकांचा आस्वाद घेता-घेता, नदी काठावरच्या हिरवागार गालिच्यासमान रानफुलांच्या रानभरी सुगंधाने मन उचंबळून आलेलं. नदी मात्र आपल्याच तंद्रीत तिच्या निःस्वार्थ सेवेचे दर्शन देत असलेली...!


     दुपार संथावलेली. उन्हं उतरू लागलेलं. वारा दडून बसलेला.नदी मात्र नागमोडी वळणे घेत रानावनातून निघालेली मांगल्याच गीत गात... तिच्या प्रवासात कुणीही येवो, तिनं प्रत्येकाला समर्पित भावनेने भरभरून दिलेलं... ती मुक्त होत नाही आपल्यापासून...! वसंत असो,ग्रीष्म असो, वर्षा असो किंवा शिशिर असो ती नुसती धावत असते... कधी खवळून उठणारी, कधी नि:स्तब्ध भासणारी, कधी सूर्यालाच आपल्यात सामावून घेणारी... कधी तापणारी... काठावरच्या वाळूकडे पाहत, कधी झाडांच्या ओळीतून निमुळती होत निघालेली... वाटेत आलेल्या वाड्या-वस्त्या तीन मायेने कुशीत घेतलेल्या... आज पर्यंत अनेकांना प्रसन्नता, मांगल्य, भव्यता, उदात्तता ह्या जीवनदायिनीने दिलेल्या...!


     कधी-कधी सांजवेळी ही जीवनदायिनी अधिकच मनमित झालेली... मनकवडी होऊन तिने मनातील अनेक गुपित स्वतःहूनच उलगडलेले... क्षितिजावरचा सूर्य अडोश्याला जाऊ लागलेला... पाऊल वाटा अंधारात बुडू लागलेल्या... रानातल्या गाई परत निघालेल्या वासरांच्या ओढीने गोठ्याकडे... पाखरांचे थवे परतायला लागलेले घरट्याकडे... नदीच्या डोहातले चांदणे सावळे झालेलं... असं लोभसवाणं नदीचं एकांतपण न्याहाळताना मन गहिवरून आल्यासारखं होतं... नदीच्या रुपेरी वाळूत आनंदाने हरवून जावसं वाटतं... स्वप्नांच्या पायवाटेने समुद्राकडे निघालेली नदी आपल्या समृद्ध जीवनात गर्वोन्नत ग्वाही आणि द्वाही देत आलेली...फुलांना, पानांना, तृणांना, ताऱ्यांना, निर्झरांना नांदवणारी ही नदी सकवार ऋतूंचा ठेवा जणू जपत आलेली...!


     कुठे कुठे नदी तीरावर वसलेली देवादिकांचे मंदिर देतात प्रसन्नतेची चार-दोन क्षण...! पावित्र्याच्या परिमळाने सुखावणारे मन भक्तिभावनेने देहभान विसरवणारे... मंदिरातली वर्दळ वाढत जाणारी... मंदिराचा गाभारा अनोख्या जल्लोषात दंगून जाणारा... दिप,धुप,अगरबत्तीच्या सुवासानं नदीकाठ तेजाळून जाणारा... बेला,फुलांनी,गुलाल ,शेंदूरांनी नदीचे पाणी प्रसन्नं होऊन चमकु लागलेलं...!


     खरंतर नदी म्हणजे जीवनदायिनी शुचिर्भुतपणे प्रत्येकाच्या मनामनातून वाहणारी... अवघ्या विश्वाची सखी... जवळ येईल त्याला आपुलकीनं कुशीत घेणारी... आपल्या सुख-दुःखात सहजी समरस होणारी... नेत्रातून व्याकूळणारी... अधीर, हळवी, नादलुब्धा... विश्वास देणारी, विश्वास घेणारी, विश्वास जागवणारी... प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी... माणूसपणाचं प्रेमळ गाणं गाऊन, ही जीवनदायिनी नदी सर्वांचीच माय झालेली...!


Rate this content
Log in