बीज अंकूरे अंकूरे
बीज अंकूरे अंकूरे
“विशाल, अरे स्कूल बॅग भरली का?”
विशालची आई ,सावित्रीने विचारले.
"वाॅटर बॅग घेतली का?, शुज घातले का?" हे रोज विचारून सावित्री त्याला शिस्तीचे धडे द्यायची. एकच मुलगा पण त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट घ्यायची. मुलाने उच्च-शिक्षण घ्यावे. चांगली नोकरी मिळवून खूप मोठ व्हावं.
विशालच्या आईवडिलांची परिस्थिती तशी बेताचीच. दादर सारख्या ठिकाणी चाळींमध्ये रहाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. घर चालवण्यासाठी दोघांनीही काम कराव लागायच. विशाल एकुलता एक मुलगा. सावित्री विशालची आई, विशालवर खूप जीवापाड प्रेम करायची. तिने विशालवर सुंदर संस्काराच बीजरोपण लहाणपनीच केल होते.
त्या दिवशी सकाळीच सर्वांचे डबे भरून सावित्रीने पण आॅफिसला जायची तयारी केली. प्रथम वडिल सकाळी ७ वाजता कामासाठी घराबाहेर पडायचे. विशालची स्कूल बस ८ वाजता दारात हजर असायची. हे दोघही घराबाहेर पडले कि मग सावित्री घरातील सर्व आटोपून आॅफिसला दहा वाजता निघायची.
साधारण दहा वर्षापुर्वीची गोष्ट...
विशालच्या जीवनाला एक वेगळच वळण मिळाले. विशालच्या आयुष्यातील तो एक काळाकुट्ट दिवस होता.
ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट. धो..धो.. पावसाची सुरुवात होती ती. रस्त्यावरची पाण्याची पातळी वाढायला कधी सुरूवात झाली हे कळलंच नाही. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व मुंबईत पसरली. धोक्याची सूचना महानगरपालिकेन सर्वांना द्यायला सुरूवात केली. सर्व न्युज चॅनलवर एकच बातमी व नागरिकांना सतर्क रहायचे आवाहन करण्यात येत होते. तसं पहायला गेल तर दरवर्षीचा मुंबईचा पाऊस असा. गटारे - नाले तुंबून, सर्व रस्त्यावर पाणीच पाणी पसरलं जाते. येणार्या जाणार्या लोकांची खुप पंचाईत होई. घरी कधी सुखरूप पोहोचतोय अस वाटायच.
विशाल व त्याचे वडिल दुपारी तीन वाजायच्या आतच घरी यायचे, मात्र सावित्रीला यायला तब्बल सात वाजायचे. दुपारनंतर पावसाचा वाढलेला जोर, अन् सावित्री आॅफिसमधून बाहेर पडली होती. पण.. पावसामुळे रस्त्यावर पाण्याची पातळी खूपच वाढली होती. अग्निशामक दलाच वेगाने मदत कार्य चालूच होते. विविध सामाजिक संस्था मदतीसाठी धावून आल्या होत्या. पण सावित्रीच्या बाबतीत एक वेगळाच डाव नियतीने रचला होता. ती स्वताच्या बचावसाठी खुप प्रयत्न करीत होती. पण बर्मुडा ट्रॅंगलसारख एका खोल खड्ड्यांत पाणी वेगाने जात होते. सावित्री एकदम गोंधळून गेली.सावित्रीला समजलेच नाही कि ती कधी वाहून गेली.
विशाल व त्याचे वडिल घरीच होते. संध्याकाळचे सात वाजले तरी सावित्रीचा पत्ता नव्हता. पाऊस बाहेर डोक काढू देत नव्हता. काय करावे दोघांनाही समजत नव्हत. मोबाईल फोनचा पूर्ण संपर्क तुटला होता. वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हातात कुठलाच पर्याय नव्हता. जसजसा उशीर व्हायला लागला तसे मात्र दोघेही हवालदिल . झाले. काय करावे हे समजेना. न राहवून विशालचे वडील पोलीस स्टेशनवर गेले व शोधमोहीम पथकाकडे चौकशी अर्ज दिला. पोलासांनी त्यांना धीर दिला. आम्ही शोध लागताच लगेच कळवू, असा पोलीसांनी त्यांना धीर दिला.
रात्रभर दोघंही काळजीत होते. विशालनेही रडून रडून गोंधळ घातला. दुसऱ्या दिवशी दुपारी बातमी हाती आली त्यानुसार कालच्या पुरामध्ये वाहून गेलेले मृत व्यक्ती हाॅस्पिटल मध्ये आणण्यात आल्या होत्या. तक्रारदारांना पोलिसांनी ओळख परेडसाठी हाॅस्पीटलमध्ये बोलावले होते. हि माहिती मिळताच ते विशालला घेऊन तत्परतेने हाॅस्पीटल मध्ये पोहचले.
पहातो ते काय?.. सात नंबरच्या बेडवर सावित्रीच होती. विशालचे वडिल अक्षरशा: कोलमडून गेले. काय करावे काहीच सुचत नव्हते. काळाने सावित्रीवर घाला घातला होता.
विशाल तर एकदम गांगरून गेला होता. आईच्या नावाने जोरात हंबरडा फोडला. पण हे सत्य स्विकारण्याशिवाय त्या दोंघाकडे काही गत्यंतर नव्हते.
सावित्रीच्या जाण्याने घर सुन सुन झाले होते....
विशालला फारच दुःख झाले होते.
बरेच दिवस गेले. सावित्रीच्या गैरहजेरीत दोघांचीही ससेहोलपट होऊ लागली. पहिले चार दिवस शेजारीपाजार्यांची मदत झाली. पण नंतर काय?.. वडिलांना विशालची शाळा, त्याचा डबा व स्वतःच काम या सर्व गोष्टींचा मेळ घालता येत नव्हता.
मग बऱ्याच मित्रांनी त्यांना दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला. बरीच स्थळ सुचवली. पण वडिलांना विशालची काळजी पडली होती. पण एका बाजूला जेवण खाण्याचे हाल होते.
विशालच दहावीचे वर्ष, अशातच वडिलांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशालला मान्य नसलं तरी दुसऱ्या ( सावत्र ) आईचा स्वीकार करावा लागला. काही दिवस ती काळजी घेते असं वाटत होते. पण नंतर धुसफूस व्हायला लागली. त्यात विशालचे दहावीचे वर्ष, अभ्यासावर पण लक्ष केंद्रीत करता येत नव्हते. विशालचे वडिल यासर्वांपासून अनभिज्ञ होते. ते आपल्या विंश्वात रममाण होते. दररोजची आईबरोबरची भांडणे आता विशालला सहन होत नव्हते. कधी कधी बिचाऱ्याला दोन दोन दिवस उपाशी रहायला लागायच. अगदीच वैतागून गेला होता.
विशालला आता हे सहन होत नव्हत.आता मात्र विशालने मनोमन ठरविले कि पुढच्या वर्षी आकरावीला आपण वसतिगृहावर जायचे. घरी आजिबात रहायचे नाही. त्यासाठी आतापासूनच छोटीमोठी कामे करून पैसे जमवायला सुरूवात केली.
विशालची दहावी झाली. चांगल्या मार्काने पास झाला. त्याला अकरावी काॅमर्स साठी प्रवेश भेटला. काॅलेजच्या प्रवेशाबरोबरच त्याने होस्टेलला पण प्रवेश घेतला. नविन मित्र नविन सवंगडी भेटले. तसा विशाल बोलका, कुणाशीही लगेच मैत्री करणारा. आई वडिलांपासून दूर राहिल्याने, सतत असणारे ताण तणाव जरा कमी झाले होते. पण काॅलेज, होस्टेल व खाणावळ या सगळ्यांचा खर्चाची जुळवणी करता करता नाकीनऊ यायचे. पण जिद्द नावाचा प्रकार त्याच्याकडे ओतप्रत भरला होता. आजिबात मागे हटला नाही.
विशालने हाॅटेल मध्ये पार्टटाईम वेटरची नोकरी धरली होती. यामुळे एक वेळच्या जेवणाचा खर्च तरी मिटला होता. पण दररोज संध्याकाळी सहाला जाऊन रात्री बारा वाजता यायचा. त्यानंतर अभ्यास त्यामुळे उशीरा झोपायचा. केशव विशालच्याच वर्गातील विद्यार्थी, दोघेही एकाच बेंचवर बसायचे. विशाल एवढ्या व्यापातूनही अभ्यास नियमित करायचा. केशवच्या घरी त्याचे आई वडिल होते. वडिल दिलीप बॅंकेत शिपायाची नोकरी करायचे. दिलीप नार्वेकर खुप विश्वासू अशी बॅंकेत त्यांची ख्याती होती.आई यशोदा गृहिणी असली तरी संसााराला हातभार म्हणून शिलाईकाम करायची. कुरवडे पापड करून विकत. तशी नार्वेकर कुटूंबाची परिस्थिती बेताचीच होती. पण कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती निर्मळ मनाची होती. एकुलता एक मुलगा, त्याने भरपूर शिकाव ही त्यांची ईच्छा. केशव सुद्धा अभ्यासात हुशार होता. त्याचे बी.काॅम. करून सी. ए. व्हायचं स्वप्न होते.
विशाल व केशवची मैत्री खुपच छान झाली होती. विशालची धडपड तो जवळून पहात होता. विशाल सकाळचे जेवण भुक नाही म्हणून टाळायचा. हे मात्र चाणाक्ष केशवने ओळखले होते. त्याने आपल्या आईला विशाल बद्दल वेळेवेळी सांगितलं होते. पण आज न राहवून त्याने आईला विचारले, “आई, अग तो विशाल दुपारी जेवतच नाही. त्याच्यासाठी दोन जास्तीच्या पोळ्या देशील का? माझ्या डब्यात.”
आई म्हणाली, “अरे, त्यात काय एवढ? देत जाईन मी.”
केशवला एवढा आनंद झाला त्याने तडक आईला मिठीच मारली. मग त्यादिवसापासून विशालचे दुपारचे जेवण केशवच्या डब्यात असे. दोघेही अभ्यासात एकमेकांना मदत करीत. विशालला लागणारी पुस्तके केशव देत असे. दोघेही एकमेकाला कधी विसरत नसत.
एके दिवशी अचानक विशालला ताप आला. ताप उतरायच नावच घेत नव्हता. त्यावेळी त्याला केशवची खुप आठवण आली. न रहावून केशवच्या वडिलांना त्याने फोन केला. केशवने ते ऐकले अन् तडक पायात चप्पल सरकवून निघाला. रात्रीचे आकरा वाजले असले तरी तमा न बाळगता होस्टेलवर पोहचला. केशव आल्याने विशालला बरे वाटले. रात्रभर पाण्याच्या पट्ट्या विशालच्या कपाळावर ठेवत होता. पहाटे पहाटे विशालला झोप लागली. पण ताप काही उतरत नव्हता, मग केशवने त्याला जवळच्याच हाॅस्पीटल मध्ये नेले. विशाल दोन दिवस अॅडमिट होता. त्याकालावधित केशवने विशालची सेवा सुश्रुषा केली. दोन दिवसानी डिसचार्ज मिळाला. दवाखान्याच बिल नार्वेकर कुटूंबानीच भरले. त्यानंतर मात्र केशव विशालला आपल्या घरी घेऊन आला. आईला सांगितले कि आजपासून विशाल येथेच राहिल. आईने त्याला होकार दिला. नावाप्रमाणेच यशोदा होत्या, अन् आता या कान्हाच्या यशोदा. जी जन्मदात्री असते ती आई. जी आपल्या मुलावर प्रेम करते ती आई, पण जी जीव लावून दुसर्याच्या मुलाचा संभाळते करते ती माऊली. त्यांनी विशालला जीवापाड प्रेम दिले. केशवचा मित्र म्हणून नाही, तर आपला दुसरा मुलगा म्हणून संभाळ केला. इतकच काय चाळीतील लोक आक्षेप घेतील म्हणून नार्वेकरानी विशालचे नाव आपल्या रेशनिंग कार्डवर पण घातले होते.
विशालनेही त्यांना जीव लावला होता. सतत गप्पा मारायच्या. आणि हो, विशालची किचन मधील लुडबूड वाढली होती. स्वयपाकाची आवड असल्याने बरेच पदार्थ बनवायचा. केशवच्या आईला खुप आवडायचे. आता तर त्या मधेआधी दोन चार दिवस विशालकडे घर सोपवून बहिणीकडे पण राहून यायच्या. विशाल अन् केशव दोघेही घरी असल्याने एकमेकांच्या संगतीने दोघांचाही अभ्यास छान चालला होता.
दोघांनीही बी.काॅम. ची परीक्षा पास केली व पदवी प्राप्त केली. दिलीप नार्वेकर आता रिटायर झाले होते. घरखर्चाची ओढाताण होत होती. विशालला हे जाणवत होते. विशालने नोकरी न करता व्यवसाय चालू करायचं ठरविले. थोडक्या भांडवलात चहाची टपरी टाकली. केशवला मात्र त्याने पुढील शिक्षणासाठी प्रेत्साहित केले. सुरूवातीपासूनच किचनची आवड त्यामुळे त्याच्या चहाला फक्कड चव होती. नियमित चहा प्यायला येणार्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच होती. विशाल चाय!!.. हा ब्रॅंडच झाला होता. खुप प्रसिध्दी मिळत होती. विशालला पण आज समाधान वाटत होते, आपण नार्वेकर कुटूंबाला आज आधार देत आहोत. कारण मी जो आहे ते या कुटूंबा मुळेच याची विशालला वेळोवेळी जाण होती. केशवला मात्र त्याने या व्यवसायापासून दूर ठेवले होते. त्याला सी.ए. साठी विशालने त्याला क्लास लावून दिला. तू सी.ए. व्हायचे आहे त्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्याला काय हवं नको ते पहायचा. विशालने पण आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. एकापाठोपाठ एक अशा त्याच्या शाखा काढतच होता. “विशाल चहा एकदा प्याल तर वेळेवेळी याल.” हे त्याच्या दुकानच ब्रिदवाक्यच झाले होते.
त्याच्या या व्यवसायात स्वःता यशोदा व दिलीप लक्ष घालत होते. त्याला लागेल ती सर्वतोपरी मदत हे कुटुंबीय करत होते.
व्यवसाय वाढीसाठी विशाल खुप मेहनत घेत होता. त्याच्या आता दहा शाखा झाल्या होत्या. अल्पावधीतच अवघ्या मुंबईला वेड लावले होते विशाल चहाने. आता तर त्याने आपला ब्रॅंड विकायला चालू केल होते. खुप ठिकाणहून डिलर मिळत होते. या कालावधीत केशवने आपले पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले होते. तो परिक्षेच्या अभ्यासाची जोरदार तयारी करत होता. अखेर तो दिवस उजाडला, विशालने केशवला घट्ट मिठीच मारली. जोरात ओरडला, “नाव राखलय भावा!!... अभिनंदन केशव.” आज विशालचा आनंद गगनात मावत नव्हता, त्याचा भाऊ आज सी. ए. झाला होता. यशोदाला पण खूप आनंद झाला. तिचे डोळे पाणावले. आपण जरी विशालला माया दिली असली तरी आज तो आपला आधारवड बनलाय. खर सांगायच तर आज पूर्ण महाराष्ट्र भर विशाल चहाच्या शाखा आहेत. केशवची पण विशालला साथ आहे. दोघेही आज हा व्यवसाय समर्थपणे करतात. आता ते चहा बनवत नसून फक्त कार्पोरेट आॅफीस संचलन करतात. विशाल चहा म्हणून महाराष्ट्रभर शाखा कार्यरत आहेत.
यशोदा तर किती कौतुकाने विशालकडे पहायची. कारण त्याच्यावर संस्कार जरी आईचे असले तरी त्याला बीजाला खतपाणी घालण्याचे काम यशोदाने केले होते. बीज अंकुरे अंकुरे.... !