Shrikant Dixit

Tragedy

3.0  

Shrikant Dixit

Tragedy

आभास हा...

आभास हा...

2 mins
536


आज आप्पासाहेब गॅलरीमध्ये आराम खुर्चीवर पहुडले होते. खुर्ची पुढे मागे करत निवांत झोका घेत होते. विचाराची तंद्री कधी लागली हे कळलेच नाही. अचानक...


"आलेले, अलेच्चा, लबाड कुठली??.." असा आवाज व धडधड झाली. 


जणू पाठशिवणीचा खेळ चालू असल्यासारखे...आवाज ओळखीचा होता.. अर्धांगिनी रजनीचा तो आवाज. पण रजनीला जाऊन आज ३ वर्षे उलटली... हा भास कसा मज झाला? आपला धोतराचा सोगा हातात घेऊन धडपडत खुर्चीवरून उठले, डोळ्यावर चष्मा चढवत हॉलमध्ये धावत आले. पाहातात तर कोणीच नाही. डाॅली टीपाॅयवर वही घेऊन स्केचपेनने रेघोट्या मारत होती. कालच डाॅलीला घेऊन किरण व वीणा पुण्याहून आले होते. एकुलता एक मुलगा आय टी कंपनीत इंजिनीयर होता. वीणा पण जाॅब करत होती. डाॅलीला पाळणाघरात ठेवत होते. आप्पांना सोबत चला म्हटलं तरी ते जाण्यास राजी नव्हते. मग सुट्टी असेल तेव्हा तेच गावी यायचे. 


जसे किरण व वीणा डाॅलीसोबत यायचे तेव्हा तेव्हा रजनीचा वावर घरात वाढत असे. क्षणोक्षणी तिचा भास आप्पासाहेबांना व्हायचा. तिला शोधण्यास सारखे विचित्रासारखे घरभर फिरायचे. असं का होतंय? ती जाऊन तीन वर्षे झाली तरी मला हा आभास का होतोय?.. स्वतःशीच पुटपुटायचे. कारण ३५ वर्षातील या संसारात हातात हात देऊन सोबत केली होती. मनांगणात सारं राज्य तिचंच होते. दोघांचा एक विचाराने संसारातील प्रत्येक निर्णय घेतला होता. एकुलता एक मुलगा किरण त्याला योग्य शिक्षण दिले होते. किरण आय टी इंजिनियर झाला. त्याला नोकरी लागल्यानंतर यथावकाश वीणाशी लग्न लावून दिले होते. काही दिवसांनी वीणा डिलीव्हरीसाठी घरी आली होती. 


रजनीने वीणाची डिलीव्हरी किती हौसेने केली होती. वीणाला आई नाही याची जाणीव सुद्धा करू दिली नाही. आता घरात एक छकुली आली होती. दिवसभर अलेले, अलेच्चा..किती गोड सारे बोबडे बोल रजनीच्या तोंडी असायचे. अगदी जीव लावला होता छकुलीने.. अवघ्या घरभर पसारा छकुलीने करायचा आणि रजनीने तो आवरायचा. हा दिवसभर दोघींचा पाठशिवणीचा खेळ चालायचा.. 


एक दिवस डाॅली खेळत खेळत जिन्यावरुन गडगडत खाली येऊ लागली. रजनी खाली झाडू मारत होती. तिची नजर वर गेली..ते पाहाताच एकदम पळत सुटली. "डाॅली..डाॅली" म्हणत होती. पण.. नियतीला हे मान्य नव्हते.. उलट रजनी जोरात खाली पडली..डोक्याला मार लागला. किरण, वीणा, आप्पासाहेबांनी खूप प्रयत्न केले. डाॅक्टरांनी खूप प्रयत्नांची शिकस्त केली पण.. रजनी हाताला लागली नाही.. पण जाईपर्यंत तिच्या डोक्यात छकुलीचा विचार करत होती.. अन् आता डाॅली घरी आली की आप्पांना रजनीचा भास होतो.. मग ते अधिकच बेचैन होते.. असा छळतो आभास हा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy