झाली अबोल ती...
झाली अबोल ती...


योगीनीच्या वडिलांची बदली नुकतीच बडोद्याहून पुण्याला झाली होती. दर पाच वर्षांनी बदली म्हटलं की योगीनीला याचा नेहमीच त्रास व्हायचा. आई-बाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. बदली झाली की नवीन गाव व नेहमीच नव नवीन मित्र मैत्रीणी मिळायच्या.. लहान असताना याची तिला मजा वाटायची. पण आता काॅलेजमध्ये जायला लागल्यापासून तिला हा चेंज म्हटलं की, त्याचा त्रास व्हायला लागला होता. मित्र-मैत्रिणींबरोबर एक बाँडीग व्हायचे, एकमेकांच्या सहवासात मैत्री बळकट होऊन जायची. आता मात्र पुण्याला आले होते. आता इथून वडिलांची बदली होणार नाही, जरी झाली तरी तिला होस्टेलला ठेवायचा निर्णय पक्का झाला होता...
बदली झाल्याने तिचे काॅलेजमध्ये ऍडमिशन लेटच झाले. आज काॅलेजचा पहिला दिवस.. नेहमीप्रमाणे मस्त आवरून काॅलेजला गेली. अन् तिची भेट किरणबरोबर झाली..
"धुंदलेसे वातावरण, सोसाट्याचा वारा.. अन अचानक आलेली पावसाची सर.. अगदी.. अगदी तशीच तिची एंट्री. किरणच्या जीवनात आलेली योगिनी, अगदी पावसाच्या सरीसारखी.. किरणला नेहमीच तो दिवस आठवतो. नाहीच कधी विसरणार ती पहिली भेट.. नवीनच ऍडमिशन घेतले होते काॅलेजला तू... वीज चमकावी तशी गेलीस समोरून... कोणता सेंट वापरला होता हे नाही सांगता येणार. पण... पण.. त्या लांबसडक केसांमध्ये माळलेला मोगरा.. अन् त्या मोगऱ्याचा सुगंध अजूनही विसरता येत नाही मला.. हो अगदी तसाच आजही हुंगावासा वाटणारा. अन् ते केवड्याचे पान कोठे मिळाले गं!!... अवघा परिसर धुंद करून टाकला ना!!.. माझंच नाही तर सर्वांचेच लक्ष वेधलं होते तुजकडे... अन् तुझा तो तोरा पाहून घ्यावा.. चाफेकळीसारखं नाक जरी असलं ना तरी सर्वांच्याकडे पाहून नाकाच्या शेंड्यावर राग जमा झाला होता. पण तू टाकलेला नजरेचा कटाक्ष, अहाहा.. मार डाला!!.. ही अवस्था माझीच नाही तर माझ्याबरोबर इतरांची पण तशीच झाली होती. मी कसा विसरेन तो दिवस??" किरण योगीनीचा हात पकडून आठवणीत रमला होता.
पुढे म्हणाला, "अगदी साधीच होतीस असं नाही.. हाय हिल्स, ती लटकत लटकत चालणे, चालताना सँडलचे टकटक वाजणे, स्मित हास्याने लाजणे!!... अन् हो हातात कंगन नव्हते पण एक चमकदार घड्याळ मात्र होते... हो..घड्याळावरून आठवलं... तुला पाहूनिया चुकला तो काळजाचा ठोका.. मनोमनी वेडा झालो.. ठार वेडा झालो. चुडीदार पेहराव्याची फॅशन होती त्यावेळी.. त्यामध्ये तर, अधिक उंच शोभून दिसत होतीस. त्या ड्रेसची रंगसंगती लाल पिवळी अशी होती. तुझा सुंदरपणा अधिकच खुलवत होता.. तुझ्या गोऱ्या रंगाला अधिकच गोरा करत होता. पण क्षणभराची ती भेट मैत्रीमध्ये कशी बदलली हे समजलंच नाही.
कारण तुलाही बॅडमिंटन खेळायला आवडायचं."
उंची पुरी देहयष्टी, नेहमीच व्यायाम त्यामुळे खेळात लवचिकता होती. अन् तिथूनच योगिनी नकळतपणे किरणच्या प्रेमातच पडली होती. कारणही तसेच.. दोघांचाही आवडता खेळ 'बॅडमिंटन...' कॉलेजच्या पहिल्या दिवशी झालेली भेट चांगलीच लक्षात होती. आणि आता नेमकी बॅडमिंटन कोर्टवर गाठ पडली होती. नेहमीच सोबत खेळणे, बाहेर प्रॅक्टीससाठी एकाच कोर्टाला जात. किरणचे सफाईदार खेळणे आवडायचे, विशेष करून किरणच्या स्नॅश शाॅटची फॅनच होती. दोघेही बरोबर प्रॅक्टीसला जायचे. दररोज तो योगीनीला तो लिफ्ट देत होता.
आता हे नेहमीचंच झाले होते. ती घरातून चौकातील झाडापाशी येऊन उभी रहायची. तेथून तो आला की बाईकवरून तिला घेऊन जात असे. परत येताना मात्र तिला घरापर्यंत सोडत असे. कधी कधी तिच्या घरी थांबून काॅफीदेखील घ्यायचा.
आई-वडिलांना त्यांच्यातील निखळ मैत्रीची कल्पना होती. एक दिवस आईने वडिलांना विचारले पण, "काय हो, किरण कसा वाटतो जावई म्हणून?" दोघांचीही मान्यता होती पण जर योगीनीने याचा विषय काढला तर बघू आपण, असं दोघांनीही ठरवलं होते.
एक दिवस पाऊस येत होता. वारा पण सुटला होता. योगिनी रस्त्याच्या कडेला उभी होती. अचानक वाऱ्याने छत्री उलटी झाली. सरळ करायचा किती प्रयत्न केला तरी ती सरळ झाली नाही. ती तशीच भिजत किरणची वाट पाहात होती. चौकातील सुशा एक छक्का तिथे झाडाखाली उभा होता. त्यालाही माहित होते, ही नेहमी इथे उभा रहाते व किरण आल्यावर बाईकवर बसून निघून जाते.
तो तिला म्हटला, "अगं मुली, तिथे कशाला भिजत उभा आहेस?? ये इकडे झाडाखाली, पाऊस लागणार नाही."
योगिनी त्याला उत्तरली, "नको, मी इथंच ठीक आहे. मी तिथे उभा राहिले तर त्याला कशी दिसेन?"
अन् किरण येताना तिने पाहिले.. अन् इतक्यात एक भरदाव येणारा ट्रक.. डोळ्यांचे पाते लवण्याच्या आत किरणच्या गाडीला धडकला... अन्.. किरण जोरदार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. त्या अपघातात शिकार झाला.
धावतच योगिनी तिथे पोहोचली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किरणला पाहून तिने जोरात किंचाळायचा प्रयत्न केला. पण घशातून आवाजच फुटला नाही. ती तेथेच चक्कर येऊन पडली. तिच्यामागे धावत गेलेल्या सुशाने तिला पकडले. त्याने तिला तिच्या घरी आणून सोडले.
त्या धक्क्यातून योगिनी कधी सावरलीच नाही... झाली अबोल ती!!...