STORYMIRROR

निलेश मुंढे

Horror Crime Thriller

3  

निलेश मुंढे

Horror Crime Thriller

भयाण वास्तू

भयाण वास्तू

18 mins
17

आश्लेषा चा नवरा अचानक अपघाताने वारला... मागे दोन मुले आणि कर्ज सोडून गेला होता... अजून हि तिचे इतके काही वय झालेले नव्हते .. अवघ्या बत्तीस वर्षाची ती... दिसायला छानच म्हणावी लागेल.. अचानक नवऱ्याच्या जाण्याने ती आणि तिची मुले उघडी पडली होती... थोडी फार शेती होती आणि एक पडायला झालेले घर होते... आणि नवऱ्याने ठेवलेला कर्जाचा डोंगर... तिचे दूरचे एक दोन नातेवाईक सोडले तर तिचे म्हणावे असे कोणीच नव्हते.. ती आणि तिची दोन मुले... 

नवऱ्याचे दिवस झाले... तसे घेणेदारानी तिचा उंबरा झिजवण्यास सुरुवात केली होती... 

खरे तर सर्वांना पैसा पेक्षा तिच्या शरीराचा आणि जमिनी चाच जास्त मोह पडला होता... 

तिला येणाऱ्या प्रत्येकाची ती वासनेने डबडबलेली नजर कळत होती.. खोट्या सहानुभूती मध्ये त्यांचे होणारे ते किळसवाणे स्पर्श तिला नकोसे होत होते... पण परिस्थिती मनुष्याला सहनशील बनवते हेच खरे... 


एक दिवस मात्र सर्व गोष्टींनी सीमा गाठली... गावातील सावकाराच्या मुलाने तिच्या वर तिच्याच घरात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला... बाहेर खेळणाऱ्या मुलांनी तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकला आणि कांगावा केला.. त्यामुळे ती बचावली होती... तीने मग ते गावच सोडण्याचा निर्णय घेतला.. तिला मशीन काम येत होते... एक दोन दूरच्या नातेवाईकांच्या मदतीने तिने राहते घर आणि शेती सर्व काही विकून टाकले... नवऱ्याचे पूर्ण कर्ज फेडले... उरलेल्या मोजक्या पैशात एका एजंट च्या मार्फत शहरात अतिशय कमी किमती मध्ये एक घर मिळवले.... 

शहरातच राहून मशीन काम करून घर चालविण्याचा तिचा मानस होता ..


खरेदीच्या अगोदर बघण्यासाठी आली तेव्हाच तिला ते घर बघता क्षणीच आवडले होते...शहराच्या गर्दीच्या भागात असून सुद्धा त्याचा वेगळे पना अबाधित होता... तो इंग्रज कालीन बांधणी असलेला कौलांचा दोन मजल्याच्या छोटासा बंगलाच होता... आजूबाजूला गुंठाभर जागा रिकामी पडलेली होती... त्या मध्ये बरीचशी मोठी मोठी झाडे उभी होती.. बऱ्याच वर्षांपासून त्याचा वापर नसल्याने घराचा कधीकाळी भव्य असणारा देखावा आता धूळखात होता.. भिंतींवरचे रंग उखडून गेले होते, बाहेरून भिंतीवर गवत उगवलेले होते. खिडक्या जणू रिकाम्या डोळ्यांसारख्या घराच्या आत बघत होत्या.. अगोदर त्याचा हा अवतार तिला बोचला होता... तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच पण एवढ्या कमी किमतीमध्ये तिला शहरामध्ये घर मिळणे शक्य नव्हते... या विचाराने घरात पाऊल ठेवल्यानंतर तिच्यातील त्या नकारात्मक भावना थोड्या प्रमाणात कमी झाल्या.. स्वतःच्या मुलांसह आयुष्याच्या नवीन सुरुवातीसाठी ही जागा तिला खूपच योग्य वाटत होती... 

त्या घराचा जुना मालक कुठे तरी परदेशात होता... घर खरेदीचे सर्व व्यवहार एजंट नेच पूर्ण केले....


घर खरेदीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर.. आश्लेषा ने एक दिवस स्वतः येऊन पूर्ण घर साफ करून घेतले होते... 

पुढच्या दोनच दिवसात आश्लेषा तिच्या दोन मुलांना सोबत घेऊन त्या घरासमोर उभी होती. नवरा अचानक वारल्या नंतर तिने उभ्या राहिलेल्या परिस्थितीला धीराने तोंड दिले होते..

गेल्या काही महिन्यात तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या असंख्य संकटांना तोंड देत ती नेहमीच पुढे चालत आली होती. आता तिला एक ठिकाण मिळाले होते.. जे ती तिच्या घरात रूपांतर करू शकत होती. ज्या घरामध्ये ती तिच्या मुलांचे चांगले भविष्य पाहू शकत होती...


ज्यावेळी त्या तिघांनी घरात पाऊल टाकले, त्यावेळी जुन्या लाकडी दरवाजाचा उघडताना होणारा आवाज खोलीभर घुमला. आश्लेषा ला त्या क्षणी घरातल्या शांततेत एक विचित्र अशांतता जाणवली. तरी तिने त्या भावनेला दूर सारले. ती आधीही खूप कठीण परिस्थितीत राहिली होती, आणि हे घर तिच्या आणि तिच्या मुलांसाठी एक सुरक्षित निवारा होऊ शकेल, असे तिला वाटत होते..

दोन्ही मुले नवीन घर नवीन जागा बघून थोडीशी बावरलेली होती... संपूर्ण दिवस सर्वांचे सामान त्या घरामध्ये नीटनेटके ठेवण्या साठी त्यांनी घालवला... झोपण्यासाठी निवडलेल्या खोलीमध्ये तिने बरोबर आणलेले देवघर स्वच्छ धुऊन पुसून ठेवले... त्यामध्ये तिच्या पिढी जात चालत आलेल्या सर्व देवांच्या प्रतिमांची स्थापना केली, आणि सायंकाळच्या वेळेला छान अंघोळ करून देवांची विधिवत पूजा केली.. 

मुले आली तशी बाहेरच्या परिसरात खेळत होते... पहिलाच दिवस होता किचनमधले बरेचसे सामान लावणे बाकी होते... त्यामुळे तिघांसाठी तिने थोडीशी खिचडी टाकली... तयार झाल्यानंतर मुलांना हाक मारून जेवू घातले होते... येथे खेळण्यासाठी बाहेर भरपूर मोकळा परिसर मिळाल्यामुळे दुपारी बावरलेली मुले आता खूपच आनंदा मध्ये होती.. 

बघता बघता रात्र झाली... सर्व दरवाजांच्या आणि खिडक्यांच्या फळ्या व्यवस्थित बंद करून ती मुलांना घेऊन झोपण्याच्या खोलीत आली...

त्यांची त्या घरामधील पहिली रात्र होती..

त्या रात्री जेव्हा ते सर्व झोपले होते, तेव्हा एक भयंकर, रक्त गोठवणारी आर्त किंकाळी घरभर घुमली. आश्लेषा जागी झाली, तिचे हृदय जोरात धडधडत होते... तीने घाबरून मुले झोपलेल्या ठिकाणी नजर टाकली.. मुलांचे अंथरुन रिकामे होते... मुले खोलीमध्ये नसलेले बघून भीतीने तिची गाळण उडाली होती.. मात्र तिच्या मधील आई कोणताही मागचा पुढचा न विचार करता बाहेरच्या दिशेने धावली... हॉलमध्ये आल्यावर तिने चौफेर नजर टाकली... तिला एका कोपऱ्या मध्ये मुले एकमेकाला चिकटून बसलेले दिसले... त्यांचे चेहरे घाबरलेले होते..

त्यांच्याकडे घाईघाईने जात त्यांना मिठीमध्ये घेत.. "तुम्ही इथे काय करताय आणि एवढे कशाला घाबरलेले आहात?" तीने विचारले...

मुलांनी काहीही न बोलता फक्त जिन्याच्या दिशेने बोट केले... तिने वळून जिन्याकडे बघितले... जिन्यामध्ये एक स्त्रीची अस्पष्ट आकृती त्यांच्याकडे नजर रोखून उभी होती.. आश्लेषा ची आणि तिची नजरा नजर झाली... तिच्या चेहऱ्यावर एक केविलवाने हास्य होते... बघता बघता ती आकृती अस्पष्ट होत दिसेनाशी झाली... ती आकृती पूर्ण गायब झाल्यानंतर तिच्याच मागे असलेला एक काळा डाग भिंतीवर स्पष्ट दिसू लागला होता...

आश्लेषा ने मुलांना धीर दिला... त्यांनी जे बघितले तो एक भास असल्याचे त्यांना ठसवून सांगितले... त्या अजान मुलांनी तिच्या शब्दावर लगेच विश्वास ठेवला... पण तिच्या मनात ती जाणून होती की, ते काही साधे नव्हते. या घरात काहीतरी वेगळे होते.. असे काहीतरी जे त्यांच्या समजण्याच्या पलीकडे होते... मुलांना घेऊन ती झोपण्याच्या खोलीमध्ये गेली... सगळ्यांचे अंथरूण तिने देव्हार्‍याच्या जवळ ओढले... मुलांना देवाच्या गोष्टी सांगून त्यांना झोपवले... ती मात्र रात्रभर देव्हाऱ्या समोर हात जोडून बसली होती..

तिच्याकडे शिल्लक असलेले सर्व पैसे जवळ जवळ संपल्यातच जमा होते... त्याच घरात राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता... रात्रभर देवा समोर बसून तिच्या डोक्यामध्ये हाच विचार घोळत होता... सकाळ होता होता तिने मनाशी ठाम निश्चय केला.. हे तिचे घर होते आणि ती ह्याच घरात राहणार होती... आता कोणतीही भीषण परिस्थिती आली तरी ती त्या परिस्थितीला पाठ दाखवून पळणार नव्हती..

सकाळी नित्य नियमाप्रमाणे तिने आंघोळ करून देवपूजा केली... पूजे मध्ये वापरलेल्या अगरबत्त्यांची राख तिने घरभर भिंतींवर लावली... राख लावत असताना तिला जिण्यातील भिंतीवर असलेला तो डाग दिसला... रात्री गडद दिसणारा डाग आता खूपच अस्पष्ट झालेला होता... तीने त्या कडे दुर्लक्ष केले.. 

दुपारी सर्व कामे अवरल्या नंतर ती मुलांना घेऊन आजूबाजूच्या परिसरात काही शिवण काम मिळते का हे बघण्यासाठी गेली होती... काही कापड दुकानदारांना भेटल्यावर तिला ती राहत असलेल्या घरा विषयी बऱ्याच घाबरवणाऱ्या गोष्टी ऐकण्यास मिळाल्या होत्या.. पण तिथे राहण्या वाचून तिच्या कडे दुसरा पर्याय पण नव्हता... मिळालेली एक दोन कामे घेऊन ते पुन्हा घरी परतले... तो पर्यंत सायंकाळ होऊन गेली होती... पूजा आटोपून तिने छानसा स्वयंपाक केला आणि मुलांना खाऊ घालून परत एकदा झोपण्याच्या खोलीत जाऊन पडली... मुले शांत झोपली होती... 

परत एकदा अर्धी रात्र सरल्यावर एक आर्त किंकाळी तिच्या कानावर पडली... तीने घाई ने मुलांना कवेत घेतले... मुले पण जागी झाली होती... दोघे जण भीतीने तिला बिलगून झोपलित... त्या रात्री दरवाजे स्वतःच बंद होऊ लागले उघडू लागले... बाहेर हॉल मध्ये वस्तू जमिनीवर पडल्याचे आवाज होऊ लागले होते... आश्लेषा ने मुलांसह स्वतःच्या अंगावरून पांघरून ओढून घेतले आणि देवाचे नाव घेत तसेच झोपून राहिली... आता लाकडी जिन्यात पावलाचे आवाज येत होते... कोणीतरी जिना उतरत खाली येत होते .. हळू हळू आवाज ते झोपलेल्या खोलीच्या दिशेने जवळ जवळ येताना ऐकू येवू लागला... अगदी खोलीच्या दरवाजा जवळ कोणी तरी येऊन उभे आहे असे तिला जाणवले... नक्की च जे कोणी होते ते आता त्यांनाच बघत असणार याची तिला खात्री पटली होती.. बराच वेळ निघून गेला काहीच हालचाल होत नव्हती.. नक्की कोणत्या तरी शक्ती ने त्याला मध्ये येण्यापासून थांबवले होते... मोठ्या हिमतीने आश्लेषा ने पांघरुणा ला असलेल्या छिद्रा मधून दरवाज्याकडे बघितले... एक कपाळावर छिद्र पडलेली एक स्त्री दरवाज्याच्या बाहेरून त्यांच्या कडे च रोखून बघत होती... तिचा पूर्ण चेहरा निस्तेज होता... कपाळावर मधोमध एक मोठी जखम होती.. डोळ्यांभोवती गर्द काळी वर्तुळे होती.. आतली बुबुळे मात्र एकदम सामान्य व्यक्ती सारखी होती... त्या डोळ्यांमध्ये आश्लेषा ला कोणतेच भाव जाणवले नाहीत.. आश्लेषा ने डोळे गच्च मिटून घेतले.. किती तरी वेळ ती तशीच पडून होती... 

थोड्या वेळाने पावले परत दूर जाताना ऐकू आलीत.. परत एकदा जिना वाजू लागला... आणि एकदम सगळी कडे शांतता पसरली...


ती रात्र तशीच सरली... रात्र भर आश्लेषा चा डोळ्याला डोळा लागला नव्हता... पहाटे बाहेरील झाडांवरील पक्षांची किलबिल कानावर पडली तेव्हाच तिने पांघरून बाजूला केले होते... बाहेर चांगलेच उजडलेले होते त्यामुळे ती उठून बाहेर आली आणि एक नजर जिण्याकडे टाकली... काल दिवसापेक्षा आता तो डाग स्पष्ट दिसत होता... त्यात एक स्त्री ची आकृती तयार झाल्याचा तिला भास झाला... तीने घाईने तिथून नजर हटवली..

 

रात्रीच्या घटनेने आश्लेषाला समजले की, तिला आता काहीतरी करावे लागणार होते.. ते जे काही होते त्याने काही त्रास जरी दिला नसला तरी ते रात्री अगदी दरवाज्याच्या उंबऱ्या पर्यंत आले होते... त्या येणाऱ्या स्त्री च्या मनात नक्की काय आहे हे आश्लेषा ला माहीत नव्हते पण तिला आता रिस्क घ्यायची नव्हती..

ती त्या घराचे नियंत्रण गमावू शकत नव्हती. तिच्या मुलांचे, तिच्या घराचे संरक्षण करने तिचे कर्तव्य होते... पण ती एकटी काही करू शकणार नव्हती.. म्हणून तिने मदतीसाठी कोणी मिळते आहे का हे शोधण्याचे ठरवले आणि स्वयंपाक आणि जेवण आवरून मुलांना घेऊन बाहेर पडली... आजू बाजूला चौकशी केल्या नंतर तिला त्या शहरात असलेल्या हनुमान मंदिरातील जोशी गुरुजी बद्दल माहिती मिळाली... तीने तडक हनुमान मंदिर गाठले... मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यावर मुलांना मंदिरातच बसायला सांगून ती मंदिराच्या मागेच असलेल्या एका जुनाट लाकडी बांधकाम असलेल्या घराकडे गेली... तेच घर जोशी गुरुजींचे होते... घराच्या बाहेर पडवी मध्येच एक कृश पण चपळ हालचाली असणारी व्यक्ती, काथ आणि चुना लावलेले पान मांडीवर घेऊन अडकित्त्याने सुपारी कातरत बसलेले दिसले... हेच गुरुजी असावे असे आश्लेषा ने मनोमन ताडले... गळ्यात रुद्रक्षाच्ची माळ, एका कानाच्या वरच्या पाळी मध्ये मोती असलेली सोन्याची तार... अंगावर पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर... डोळ्यावर सोनेरी फ्रेम चा चष्मा... कोनीतरी आल्याची चाहूल लागताच गुरुजींनी पाना वरून नजर हटवत समोर बघितले... 

त्यांनी आश्लेषा चे स्वागत अगदी मनःपूर्वक केले .. त्यांच्या कडे कायम अडलेले नाडलेले येत असत... त्यामुळे त्यांना अश्या अचानक आगमनाची सवय च होती... 

सुरुवातीला सर्व औपचारिक गप्पा झाल्या .. गुरुजी नी आश्लेषा ला येण्याचे कारण विचारले... तीने अगदी तिच्या पतीच्या निधना पासून तर सकाळी दिसलेल्या भिंतीवरील डागा पर्यंत सर्व घटना तपशील वार सांगितल्या.. 

गुरुजी ना आश्लेषा च्या कहाणी ने हबकून टाकले होते...


“माझ्या कानावर इथून मागे पण या घरा बद्दल अनेक गोष्टी आल्या होत्या. मी चौकशी साठी गेलो होतो.. पण त्या घराचा मालक ते घर काय देशच सोडून निघून गेला आहे असे कळले आणि जो पर्यंत मला त्या घरातील मालक किंवा तिथे राहणारा येण्याचे आवाहन करत नाही, तो पर्यंत मला पूर्ण शक्ती ने तिथे जाणे शक्य नव्हते.. म्हणून मी ते प्रकरण मागे टाकले.. तसे मी त्यावर लक्ष ठेऊन होतो.. पण त्या घरात आज पर्यंत कधी कोणाच्या जीवावर बेतलेले मी ऐकले नाही..” बोलणे बंद करत त्यांनी पानाची घडी करून पान बोटात दुमडून धरले...आणि पुन्हा पुढे बोलू लागले,“माहिती काढताना एक गोष्ट फक्त कानावर आली की तिथे खूप वर्षांपूर्वी एका स्त्री चा खून झाला होता आणि तिचाच आत्मा आजही त्या जागेत अडकला असावा असे मला वाटते.”


"तुम्ही काही करू शकता का?" आश्लेषाने घाबरलेल्या आवाजात हात जोडत त्यांना विचारले...

“होय नक्कीच करू शकतो, मुली तू त्या घराची मालकीण आहेस... तू मला निमंत्रण दिले आहेस म्हणजे मला तिथे हक्काने येता येईल... पण आपल्याला त्या घरात जो शुद्धीकरण विधी करायचा आहे तो सहज साध्य नाही.. किती दिवस लागतील सांगता येत नाही, आणि हे काम धोकादायक असणार आहे.” गुरुजी गंभीरपणे म्हणाले...

तेवढ्यात तिला मंदिराकडून तिची दोन्ही मुले तिच्या कडे आई आई हाका मारत येताना दिसली..

"पण गुरुजी माझी दोन मुले आहेत, त्यांना त्या धोक्याच्या ठिकाणी कसे न्यायचे.. इथे कुठे ठेवावे म्हटले तर माझे कोणीच नातेवाईक नाहीत इथे.." आश्लेषा ला मुलांच्या रक्षणाचा प्रश्न भेडसावत होता..

"मुली हे प्रकरण मिटे पर्यंत मुलांना इथेच माझ्या घरीच राहूदे..." असे म्हणत गुरुजींनी घरात बघून आवाज दिला, " नलिनी ओ नलिनी या बच्चे कंपनीला जरा आत घेऊन जा. चहा खारी द्या खायला यांना आणि हो हे दोन्ही बाळकृष्ण काही दिवस आपल्या कडे पाहुणचार झोडपण्यास आलेले आहेत, तेव्हा त्यांना तृप्त करता येईल असे काही तरी बनवा.." गुरुजी एका दमात बोलले... 

नलिनी काकू तो पर्यंत बाहेर येऊन त्यांच्या कडे बघत मिश्किल हसत उभ्या होत्या... 

दोघे ही खूपच गोड स्वभावाचे जोडपे होते...

नलिनी काकू आश्लेषा ला मुलांची काहीही काळजी करू नकोस असे सांगून त्यांना आतमध्ये घेऊन गेल्या.. मुले आजी मिळाल्या सारखे त्यांच्या मागे धावत गेले.. दुपारी पर्यंत हाबकलेली आश्लेषा आता खूपच निवांत झाली होती.. 

"गुरुजी घरातील शुद्धीकरण विधी ला कधी सुरुवात करायची? तिने धाडस एकवटत गुरुजींना विचारले... .

"तू आता आराम कर हवे तर, मी विधी साठी लागणारे सर्व साहित्य घेऊन येतो." असे म्हणत गुरुजींनी इतकावेळ बोटात धरलेले पान तोंडात टाकले.. त्यांनी पायात कोल्हापुरी चपला अडकवल्या,आणि पडवीत टांगलेली कापडी पिशवी हातात घेऊन ते बाहेर च्या दिशेने चालते झाले ... ते जाताना आश्लेषा कृतकृत्य नजरें ने त्यांच्या पाठमोऱ्या कृश आकृती कडे बघत होती... गुरुजी दिसेनासे होई पर्यंत त्यांचा," हनुमंता शक्ती देरे, शक्ती दे" असा आवाज कानावर पडत होता.. 

ती तशीच मागे फिरली आणि घरात प्रवेश केला.. नलिनी काकू तिने विचार केल्या पेक्षा ही किती तरी जास्त प्रेमळ होत्या... 


सायंकाळ होण्याच्या आतच गुरुजी घरी आले होते... त्यांनी बरोबर नेलेली पिशवी नलिनी काकूकडे देत ती देवघरात ठेवण्यास सांगितली... त्यांनी स्वतः जाऊन घाई घाई ने अंघोळ करून घेतली... देवघरात जाऊन मनोभावे हनुमंताची पूजा केली,आणि पिशवी उचलत आश्लेषा ला निघण्यास सांगितले... 

मंदिरा समोरून एक रिक्षा पकडली. थोड्याच वेळात ते दोघे बंगल्याच्या गेट समोर होते... गेट च्या बाहेरच पिशवीतून रुद्राक्षाची माळ हातात घेत त्यांनी हनुमान चालीसा म्हणत आत मध्ये प्रवेश केला...

त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरले होते... 

आश्लेषा ने त्यांच्या कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले.. 

"आश्लेषा ही जी शक्ती इथे आहे ती अमानवी जरी असली तरी तिच्या मध्ये हिंसक पना नाही.. ती बिचारी मेल्यानंतर ही या फेऱ्यात अडकून पडलेली आहे... तिला या जगातून मुक्ती हवी आहे..." असे म्हणत गुरुजींनी बांगल्या मध्ये पावूल टाकले... 

त्यांच्या आगमनाने घराचे पूर्ण वातावरण ढवळून निघाले होते... कशी ही असली तरी ती एक अमानवी शक्ती होती.. जिवंत असताना तिने मनुष्याची अतिशय गलिच्छ बाजू बघितलेली असणार होती... त्यानुसार तिच्या घरात आलेली व्यक्ती नक्की काय आहे हे तिला समजे पर्यंत ती विरोध करणारच हे जोशी गुरुजींना माहीत होते...

त्यांनी व्यवस्थित पूजेची मांडणी केली, आणि लगेच सुरुवात पण केली...मंत्रोच्चारांच्या पहिल्या काही शब्दाबरोबरच घराच्या हवेचा सूर बदलला. घरातले वातावरण अधिकच भीतीदायक बनले होते. आश्लेषा च्या भोवती अचानक गारठा पसरू लागला. ती खोली जणू थंड वाऱ्यांच्या फेऱ्यात अडकली होती.. एक विचित्र, अदृश्य शक्ती त्या वातावरणात फिरत होती. आश्लेषा ला ती थंडी हाडां पर्यंत जाणवत होती. जणू कोणीतरी अदृश्य हातांनी तिच्या शरीरात घुसून तिच्या आत्म्याला गोठवण्याचा प्रयत्न करत होते.


गुरुजींनी दिपज्योत प्रज्वलित केली, पण ती अचानक जोराने थरथरू लागली. वातावरण आता अधिकच गडद आणि भयप्रद झाले होते. संपूर्ण घराला एक अघोरी शांतता व्यापून टाकत होती. जोशी गुरुजींनी मंत्रोच्चारांची गती वाढवली होती. प्रत्येक मंत्राच्या उच्चारा बरोबरच घरातील अंधार अधिक गडद होत चालला होता.. जसे काही ते शब्द स्वतः त्या अंधाराशी लढत होते. आश्लेषा एका कोपऱ्यात थरथरत उभी होती...

अचानक, एक भयानक गर्जना झाली. खोलीतील दिवे मंद झाले होते.. एका क्षणात त्या आवाजाने खोली तली हवाच जड झाल्यासारखी वाटली. घराच्या कोपऱ्यातून एक वेदनांनी भरलेला, क्रोधाने गजबजलेला आवाज उठला. जोशी गुरुजींच्या मंत्रांनी तो आवाज आणखी भडकवला होता. एक जीवघेना थरार वातावरणात पसरला आणि तेव्हा आश्लेषा च्या डोळ्यासमोर ते भयंकर दृश्य उभे राहिले.. तिला दिव्याच्या प्रकाशात अंधाऱ्या जिन्यात एक काळी सावली भिंतीवरील डागातून उसळून बाहेर येताना दिसली.. हळू हळू एका स्त्रीचे रूप त्या आकृतीला आले.. त्या रात्री आश्लेषा ने बघितले होते अगदी तेच रूप.. मंत्रोच्चारांचे आवाज त्या काळोख्या हवेत गुंफले जात होते. आश्लेषा च्या मानेवर काटा उभा राहिला.. हृदयाची धडधड तिच्या काना पर्यंत पोहोचत होती.

खोलीत एक क्रूर थंडावा पसरला होता. एका क्षणात, आश्लेषा च्या कानात एक आर्त आवाज घुमला, एका स्त्रीचा क्रोधी, करुण स्वर, "मी इथे आहे!" जिन्यात समोर उभी असलेली आकृती आश्लेषा च्या दिशेने सरकायला लागली... 

तो आवाज इतका तीव्र होता की आश्लेषा च्या मनावर वज्रा सारखा आदळला. तिच्या श्वासा चा वेग वाढला, ती मागे हटन्या चा प्रयत्न करत होती पण तिची पावले जागेवरच थिजली होती.. 

"घाबरु नकोस ती तुला काहीही करू शकणार नाही.. तिला तुझ्या शी संवाद साधायचा आहे... येऊ दे तिला पुढे... तू निर्धाराने उभी रहा.. हे घर आता तुझे आहे.. हे जग तुझे आहे... तिचे आता इथे काहीच नाही... तिला तिच्या जगात जावे लागेल.." गुरुजींचा करडा आवाज आश्लेषा च्या कानात घुमला... तिला त्या आवाजाने धीर आला...

तिला स्पष्ट दिसले की ती स्त्री तिच्या अतिशय जवळ आहे.. खूपच जवळ... 

तिच्या जवळ असण्याच्या जाणिवेने तिच्या अंगावर काटा उभा राहिला, शरीर गोठल्या सारखे वाटले होते.. तिने मनात अजून हिम्मत एकवटून त्या स्त्री च्या आकृती कडे बघितले... तिच्या चेहऱ्यावर दुःख, क्रोध आणि वेदनेचे भाव एकत्र दिसत होते...

"घाबरु नकोस तिला विचार तिला काय हवे आहे? आणि ती इथे का आहे? तिला स्पष्ट सांग की ही तिची जागा नाही, हे तिचे जग नाही.. तिला इथून जावे लागेल.. तिला इथून मुक्त व्हायचे असेल तर आपण तिची मदत करू शकतो.." गुरुजी आवाजातील गंभीरता वाढवत म्हणाले..

"कोण आहेस तू आणि काय हवे आहे तुला?गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे आश्लेषा ने तिला धीराने विचारले...

खोली भर एकच वावटळ उठली... 

त्या पाठोपाठ आत्म्याचा आवाज खोलीत घुमला.. तो आवाज इतका खोल आणि प्रचंड होता की तो खोलीच्या भिंतीतून, लाकडांमधून प्रतिध्वनीत होत होता. 

"मी शालिनी... या घराच्या मालकाची बायको," ती म्हणाली.. तिचा प्रत्येक शब्द आश्लेषाच्या कानात घुमत होता.

शालिनीची आत्मा आता आश्लेषा पासून अगदी दोन हितीच्या अंतरावर होती. तिचा चेहरा क्रोधाने विकृत झालेला होता, डोळ्यांमध्ये तीव्र वेदना आणि अन्यायाची भावना स्पष्ट दिसत होती. ती भयप्रद सावली आश्लेषा वर चाल करेल की काय असेच क्षणभर वाटले..

आश्लेषा ने मात्र आता कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचा निर्धार केला होता..

"सांग तू इथे का आहेस, तू इथे थांबू नाही शकत, हे जग आता तुझे नाही.. तुला जावे लागेल इथून.." आश्लेषा निर्धाराने तिच्या नजरेत नजर घालत थरथरत बोलली...


त्या आत्म्याच्या चेहऱ्यावर दु:ख आणि संतापाचे मिश्रण होते.. "माझा नवरा माझ्या सावत्र बहिणीवर प्रेम करत होता. तिने माझ्या नवऱ्याचे मन जिंकून त्याचे पूर्ण वर्चस्व मिळवले. त्या दुष्ट स्त्रीने माझ्या नवऱ्याला माझ्याविरुद्ध भडकवले. त्या दिवशी, माझा नवरा आणि ती माझ्या जीवावर उठले. त्यांनी मला या घरातल्या वरच्या बेडरूममध्ये निर्दयीपणे बांधून ठेवले होते. ते काही तरी अनन्या साठी बाहेर गेले असताना मी कशी तरी सुटले... हे घर सोडून पळून जाण्यासाठी मी जिना उतरतच होते की ते दोघे घरात आले... मला त्या वेळी तिथे बघून माझ्या नवऱ्याने बंदूक काढली आणि माझ्या कडे करून बार उडवला... बंदुकीची गोळी थेट माझे डोके भेदून मागे भिंती मध्ये रुतली... तो बघ माझ्या रक्ताचा त्या भिंतीवर पडलेला सडा अजुन पण तसाच आहे..." क्रोधाने बोलत त्या अकृतीने जिण्या कडे बोट केले... 

आश्लेषा ने जिन्याच्या भिंतीकडे बघितले... तो डाग आता रक्ता सारखा लाल लाल दिसत होता...

सर्व ऐकून आश्लेषा च्या मनात भीतीचे थरारक वादळ उठले. पण शालिनी चे दुःख तिला जाणवले.. जिवंतपणी झालेला अन्याय तिच्या आत्म्याच्या प्रत्येक कणात भरला होता... काय बोलावे हेच तिला समजत नव्हते.. 

शालिनी चा चेहरा क्रोधा नेच नव्हे, तर असीम वेदनेने विकृत झाला होता. ती जोरात ओरडली, "माझे रक्त व्यर्थ गेले. मी जिवंत असताना माझ्या पतीचे मन जिंकू शकले नाही, कोणाचे प्रेम मिळवू शकले नाही. मी त्यांचे प्रेम मिळवण्या ऐवजी त्यांच्या कपटी जाळ्यात अडकले, आणि त्यात माझा जीव गेला,

मला न्याय हवा आहे... न्याय हवा आहे. माझ्या बरोबर ज्यांनी अन्याय केला त्यांना शिक्षा झालेली बघायची आहे मला.."


तेव्हा आश्लेषा ला शालिनी ची पीडा कळली. तीने शालिनी ला विचारले,"अग पण या सगळ्या गोष्टींना होऊन किती तरी काळ लोटला आहे.. तुझे मारेकरी मी साधी ओळखत पण नाही मग त्यांना मी शिक्षा कशी मिळवून देऊ शकते." आश्लेषा च्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तीला शालिनी ला न्याय मिळवून द्यायचा होता. पण कसा हे तिला समजत नव्हते...


"मला सुद्धा मुक्ती हवी आहे.. कित्येक वर्षांपासून मी रोज रोज तेच मरण अनुभवते आहे.. पण त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय माझी यातून सुटका होणार नाही... उद्या सकाळी पोलिसांना बोलावून घे आणि या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक छोटे आंब्याचे झाड आहे.. त्याच्या खाली खोदण्यास सांग... त्या नराधमाने मला तिथेच पुरले होते..." एव्हढे बोलून शालिनी ची आत्मा हळूहळू पुन्हा त्या डागा मध्ये ओढली गेली...

तिचा शेवटचे वाक्य होते,"आश्लेषा मला मुक्ती हवी आहे.. माझी या जाचा मधून सुटका कर."


त्या रात्री अजून काहीच होणार नव्हते... पहाट होत आली होती.. जोशी काका उठले.. त्यांनी आश्लेषा ला घेऊन घर गाठले... अंघोळ आवरून दोघे जण लगेच पोलीस स्टेशन ला हजर झाले... तिथल्या ऑफिसर ला विश्वासात घेऊन सर्व घटना सांगितली आणि त्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली... ऑफिसर श्रद्धाळू होते... ते तातडीने खरे खोटे बघण्यासाठी काही स्टाफ घेवून आश्लेषा च्या घरी पोहोचले... शालिनी ने सांगितल्या प्रमाणे घराच्या मागेच एक चार पाच वर्ष जुने आंब्याचे झाड होते... तिथे खोदकाम करण्यात आले.. थोड्याच वेळात सर्वांचे डोळे आश्चर्याने विस्फारले... तिथे एक मानवी सांगाडा होता.. 

तो सांगाडा फॉरेन्सिक च्या लोकांनी तपासला... तो एका पंचवीस वर्षीय स्त्री चा असल्याचा निष्कर्ष निघाला... एकंदरीत आश्लेषा आणि जोशी काकांनी सांगितलेले सर्व काही खरे होते याची खात्री ऑफिसर ला पटली होती... 

पुढील चक्रे वेगाने फिरलीत.. आश्लेषा ने ज्या एजंट कडून घर विकत घेतले होते, त्याच्या साहाय्याने पोलीस त्या घराच्या मालका पर्यंत पोहोचले... परदेशी गेल्याचा नावाखाली ते दोघे नवरा बायको मुंबई मध्येच सुखी आयुष्य जगत होते... त्यांना तिसऱ्याच दिवशी तातडीने अटक करण्यात आली होती... 

आरोपी पकडले गेले ही बातमी जोशी काकांना कळली होती... पण आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत असलेल्या त्रुटींमुळे ते जोडपे अलगद सुटेल याची खात्री त्यांना होती.. कोणालाही काहीही न सांगता त्यांनी मनातल्या मनात एक योजना आखली... त्यानुसार जोशी काका घाई घाईने पोलीस स्टेशन ला गेले... त्या ऑफिसर ला भेटून आरोपींना स्पॉट पाहणी साठी सायंकाळीच आणण्याची विनंती केली..

ऑफिसर ने जोशी काकांची विनंती मान्य केली.. पुढच्या दिवशी सायंकाळी स्पॉट वर जाणार असल्याचे सांगितले...

जोशी काका प्रसन्न चेहऱ्याने पोलीस स्टेशन बाहेर पडले होते... त्यांनी जे योजले होते त्या प्रमाणेच घडणार होते... त्या दिवशी रात्री ते आश्लेषा ला घेऊन पुन्हा बंगल्यावर गेले.. त्यांनी परत एकदा शालिनी ला आवाहन केले... या वेळी शालिनी मध्ये खूपच बदल झाला होता.. आश्लेषा शी संवाद साधताना तिच्या मधील क्रोध जवळ पास संपुष्टात आला होता.. 

"शालिनी ज्यांनी तुझी निर्घृण हत्या केली ते दोघे जण उद्या सायंकाळी इथे आणण्यात येणार आहेत... तू हवा तर तुझ्या हाताने तुझा सुड पूर्ण करू शकतेस." जोशी काकांनी प्रथमच तिच्या शी संवाद साधला.. 

ते सर्व ऐकून शालिनी च्या चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव तरळून गेला होता.. तिचा खून केलेले आता पोलीसांच्या अटकेत आहे हे ऐकून तिच्या आत्म्याला मनस्वी आनंद झाला होता.. तिने जोशी काका आणि आश्लेषा चे आभार मानले.. "आश्लेषा, काका उद्या नंतर मी इथे नसेल.. मला मुक्ती देण्यासाठी तुम्ही जे सहकार्य केले त्या बद्दल मी तुमची कायम ऋणी राहील.. उद्या रात्री नंतर या घरात असलेले माझे सावट पूर्ण पने विरघळून जाईल.. तुम्ही कोणीच उद्या इथे हजर राहू नका... हा माझा तुम्हाला दोघानाही शेवटचा नमस्कार." असे बोलत ती परत एकदा त्या डागा मध्ये शोषली गेली... 

आश्लेषा आणि काका नी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिला निरोप दिला.. 

दुसऱ्या दिवशी सायंकाळी.. त्या बंगल्याच्या पूर्ण प्रकरणावर पडदा पडनार होता.. जोशी काका नी त्या दिवशी दुपारीच बंगल्याच्या चाव्या पोलीस स्टेशन ला पोहोच केल्या होत्या.. इतर कामात अडकल्या मुळे ऑफिसर ने सायंकाळी स्वतः न जाता दोन शिपायांना त्या नवरा बायको ला घेऊन बंगल्यावर पाठवले होते... 


काम उरकून ऑफिसर रात्री 11 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन वर आले... दोन्ही आरोपींना घेऊन गेलेले शिपाई अजून परतले नव्हते... हे बघून ते स्वतः काही जण सोबत घेवून बंगल्यावर पोहोचले... गेट सताड उघडे होते... बंगल्याचा दरवाजा देखील उघडा होता.. सर्वत्र शांतता पसरलेली होती... दोन जण बंगल्याच्या आत पाठवून ते स्वतः एकाला घेवून मागच्या खड्ड्याच्या दिशेने गेले... खड्ड्या जवळ त्यांचे दोन्ही शिपाई मूर्च्छित होऊन पडलेले होते.. बरोबर असलेल्या एकाला त्यांनी गाडीतून पाणी आणून त्यांच्या चेहेर्यावर मारायला सागितले.. तेव्हढ्या त घरामधून आत गेलेले दोन जण त्यांना आवाज देत त्यांच्या कडे धावत येताना दिसले... त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते... ऑफिसर त्यांच्या बरोबर बंगल्यात शिरले... त्या दोघांनी जिन्याच्या दिशेने बोट केले... 

ऑफिसर ने त्या दिशेला बघितले.. ते दोघे नवरा बायको रक्त भांबाळ अवस्थे मध्ये एकमेकाला नखांनी ओरबाडत होते... दोघांचे ही पूर्ण शरीर नखांच्या खुणा नी भरलेले होते... डोळ्यात एक वेडे पना ची झलक होती...त्यांची दोघांचीही तूच तिला मारले अशी असंबध बडबड सुरु होती... 

ऑफिसर ला सर्व संदर्भ लागला... ते दोघे त्यांनी केलेल्या नीच कर्माची शिक्षा आयुष्यभर भोगणार होते... फाशीच्या शिक्षे पेक्षा कितीतरी जास्त कठोर शिक्षा होती ती... 

त्या दोन वेड्यांना हात पाय बांधून घेऊन गाडी मेंटल हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेली...

जिन्याच्या वरून शालिनी त्यांना घेऊन गेलेल्या दिशेकडे बघत होती... गाडीचा आवाज जसजसा कमी होत गेला.."आता मी मुक्त आहे..." एक आवाज घरात घूमला... त्या आवाजाबरोबर ती देखील अनंतात विरघळत गेली... तिच्या मागे त्या भिंतीवरील डाग देखील पूर्णतः मिटला गेला होता...


दुसऱ्या दिवशी सकाळीच जोशी काका आणि आश्लेषा त्या घरात पुन्हा आले... पण आता वातावरणात असलेला प्रसन्न पणा जोशी काकांना सर्व काही सांगून गेला होता...

आश्लेषा हळूहळू जिन्यात गेली.. भिंतीवर असलेला डाग पूर्ण पने गायब होता.. तिने पूर्ण बंगल्यात एक चक्कर टाकली एक शांत, नितळ प्रकाश संपूर्ण घरभर पसरलेला असल्याचे तिला जाणवले. तीने अनुभवलेल्या भयावह रात्रीं चा मागमूसही आता मागे उरला नव्हता. शालिनी ला अखेर मुक्ती मिळाली होती.. आश्लेषा चे घर आता पुन्हा एकदा शांत आणि सुरक्षित झाले होते...


तीने मनोमन देवाचे आणि शालिनी चे आभार मानले... 

जोशी काकांच्या हस्ते एक छोटीशी वास्तू शांतीची पूजा करून आश्लेषा ने जोशी काका काकूंच्या आशीर्वादाने नवीन आयुष्याला सुरुवात केली...


©®लेखक: रुद्रदमन 


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror