मटणाचा वास
मटणाचा वास
लक्ष्मी काकू आणि कोंडीबा एक गरीब जोडपे, त्यांना एकच मुलगा होता तो पण दूर शहरात बायको पोरांसह राहत होता.. कोंडीबा ने स्वतः ची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीत लावून दिला होता.. पुढे पोराचे लग्न झाले आणि पोरगा बदलला.. आई बापा कडे ढुंकून सुद्धा बघणे त्याने बंद करून टाकले होते.. हातात राहते घर सोडून काहीच राहिले नव्हते.. मोलमजुरी करून पोट भरण्या शिवाय त्या दांपत्यासमोर दुसरा पर्याय च नव्हता..
शेवटच्या भेटीत मुलाने केलेला अपमान सहन न होऊन सरळ मार्गी कोंडीबा दारू प्यायला लागला.. त्याची देवा वरची श्रध्दा उडून गेली.. दिवस भर मोलमजुरी करणे आणि संध्याकाळी त्याची दारू पिने बस एव्हढीच त्याची दिनचर्या झाली होती..
लक्ष्मी काकू चे पूर्ण पने वेगळे होते.. एव्हढे वाईट दिवस येऊन ही तीची देवावरील श्रद्धा कमी झाली नव्हती..
लक्ष्मी काकू गेली कित्येक वर्षे नवरात्रात घरी घट बसवत असे. त्यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात तिला खूप आनंद होत असे..
तिचा घरातल्या देवांवर प्रचंड विश्वास होता. यावर्षीही तिने मोठ्या श्रद्धेने घट बसवला. मनोभावे पूजा केली.. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने कोंडीबा ला विनवणी केली,
"अहो आता निदान धा दिस तरी त्या बयेला तोंड नका लावू, म्या पाया पडते तुमच्या."
कोंडीबा ने तिच्या कडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावाच्या दिशेने निघून गेला..
त्यांचे घर गावाच्या अगदी एका टोकाला होते..
अवघे दोन खोल्यांचे, कौला चे छप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवल्या मुळे त्या दिवशी अगदी लख्ख दिसत होते.. घराबाहेर जनावरे आत येऊ नये म्हणून बोरीच्या फांद्यांचे कुंपण होते....
पहिले दोन दिवस कोंडीबा एक थेंब दारू न पिता घरी आला होता.. हे बघून लक्ष्मी काकू देवीचे मनापासून आभार मानत होती..
नवरात्रीचा तिसरा दिवस होता..
देवीची संध्याकाळची पूजा आटोपून लक्ष्मी बाई दरवाजा बाहेर कोंडीबा ची वाट बघत बसली होती.. तिच्या शेजारीच पाळलेला कुत्रा खंड्या बसलेला होता..
कोंडीबा सकाळी पासूनच कुठे तरी कामाला गेलेला होता.. रात्री चे दहा वाजत आलेले.. काळजीत पडलेल्या लक्ष्मी काकू ला गावाकडून एक आकृती डुलत डुलत येताना दिसली.. त्या बरोबरच खंड्या देखील त्या आकृतीच्या दिशेने गेला.. कोंडीबाच आहे याची खात्री पटताच लक्ष्मी बाई त्याचे डुलणे बघून तोंडावर पदर दाबून हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून आली...
गेल्या दोन दिवसापासून एक थेंब पण दारू न पिलेला कोंडीबा.. त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता..
त्याच्या सोबत मटणाची पिशवी देखील होती.
कोंडीबा इथून मागे कधी एव्हढ्या खालच्या थराला गेला नव्हता... घरात पाऊल ठेवताच कोंडीबा बोबड्या शब्दात बोलला," लक्षुमे, कुठ तर्फडली, धर वशाट आणलाय.. मस्त कालवण करून आन.. मला लय भूक लागलीय.."
देवी चे घट घरात असताना मांसाहार शिजवणे म्हणजे लक्ष्मी काकू साठी पापच होते. तिने त्याला हटकले, “आव, असं करू नगा सा, देवीच्या नवरात्राला हे मटण घरात आणू नका सा! पाप लागल, देवी कोपली तर काहीच भी राहायचं न्हाई ”
पण कोंडीबा नशेत तर्र होता. तो कोपऱ्यात पडलेले फावडे हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला, " लक्ष्मे, वाटूळ व्हायचं काय बाकी रायलय.. अन् तू कुठे असली भक्त आहेस? मला बऱ्या बोलाने शिजवून वाढती का न्हाई, का फोडू टकुर तुझं?"
लक्ष्मी काकू त्याच्या तो रुद्रावतार बघून मागे सरकली.. पण परत निर्धाराने पुढे होत हात जोडून म्हणाली, "तुम्ही आज मला मारून टाका, पण मह्या हातन हे पाप न्हाई घडायचं."
कोंडीबा हात उगारून फावडे तिच्या डोक्यात टाकणारच होता, एवढ्यात अचानक बाहेरून खंड्या भुंकत वेगात आत शिरला.. त्याच्या मालकिनी ला मारणाऱ्या कोंडीबाच्या अंगावर तुटून पडला.. खंड्या प्रचंड खवळला होता.. कोंडीबा वर भयानक रागात हल्ला करत होता.. कोंडीबा खंड्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजा कडे पळाला.
कोंडीबा ने दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवलेच होते.. तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायरी जवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पाशवी नजरेने पाहत असताना त्याला दिसली... तिच्या डोळ्यांत काहीतरी विचित्र होते.. तीची जळजळीत नजर थेट त्याच्या मेंदू पर्यंत भेदत गेली... कोंडीबा च्या अंगातली सगळी दारू एक क्षणात उतरली... भीतीने पोटात गोळा उठला.. त्याने पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण आतून खंड्या परत गुरगुर करत रागाने त्याच्यावर धावला...
लक्ष्मी काकू ना मात्र काय घडत आहे याचा काहीच तपास लागत नव्हता.. त्यांनी खंड्या ला शांत केले आणि कोंडीबा कडे बघितले .. कोंडीबा चा भीतीने पांढरा फट्ट पडलेला चेहरा बघून लक्ष्मी काकू बुचकळ्यात पडल्या..
तेव्हढ्या घाबरगुंडी उडालेला कोंडीबा लक्ष्मी काकूला दरवाजाकडे इशारा करत बोलला,"लक्षमे भायेर बघ कोण हाय? माला तर काय तरी वंगाळ वाटतंय.."
ऐकताच लक्ष्मी काकू पुढे झाल्या,
त्यांनी दरवाज्यात येऊन बाहेर डोकावून बघितले... एक बाई शेवटच्या पायरी जवळ बसलेली होती.. आता तिचे रूप पालटत चालले होते... लक्ष्मी काकू ला कळले की हे साधे प्रकरण नाही. तिने कोंडीबा ला मागे ओढले.. स्वतः पुढे होत "ए बाई एवढ्या रातच्याला काय उंबरा धरून बसली हायेस.. काय पाहिजे ग तुला? भूक लागली असल तर मेथीची भाजी अन् भाकरी हाय वाढून दीवू का?" हिम्मत करून त्या बाईला विचारले..
ती बाई आता लक्ष्मी काकू च्या डोळ्यात पाहत होती. तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला... चेहेऱ्यावर क्रोधित भाव यायला लागले होते... लाळ टपकणारी गर्द लाल जीभ ओठांवर फिरवून ती बाई भयानक घोगऱ्या आवाजात बोलली... "ये मला ते मेथी फिती काय नको... एक तर तुझा नवरा दे, नाय तर त्याने आता आणलेल मटण दे. त्याच्या वासानच मी त्याच्या माग हितवर आलीय. ते तुझ्या घरात तू बसिवलय ना म्हणून मला घरात न्हाई येता आल.. दे लवकर भायेर"
तिचा आवाज ऐकून लक्ष्मी काकू च्या काळजाचा थरकाप उडाला... तिने आत मध्ये कोंडीबा कडे नजर वळवली... तेवढ्यात कोंडीबा ने भीतीने थरथर कापत हातातील मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकली...
त्या बाईने कोणाला कळण्याच्या आतच, एखाद्या हिंस्त्र श्वापदा सारखे आवाज करत, त्या पिशवी वर झडप घातली... पिशवी तोंडात पकडुन काही क्षणांतच ते अनोळखी श्वापद अंधारात गायब झाले... खंड्या देखील त्याच्या मागे पळत जावून, कुंपणा जवळ उभा राहून अंधारात बघत भुंकू लागला होता..
ते सर्व बघून कोंडीबा भीतीने घामाघूम झाला होता. त्याने धाय मोकलून घटा समोर डोके टेकवले, देवीची क्षमा देवीची क्षमा मागितली, "देवी माफ कर, माफ कर! असं पुन्यांदा न्हाई हूनार! लक्ष्मी परत मी अशी चूक नाही करणार. मला माफ कर.."
लक्ष्मी काकूला सगळी परिस्थिती समजली होती.... , तिला कळले होते की आलेले हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते.. कदाचित या घटने मुळे थरकाप उडालेला कोंडीबा परत योग्य मार्गावर येऊ शकणार होता...
लेखक: रूद्रदमन

