STORYMIRROR

Sandip Khurud

Thriller

3  

Sandip Khurud

Thriller

भुताचा वाडा

भुताचा वाडा

8 mins
253

           परीक्षा संपून मी खुप दिवसांनी गावाकडे आलो होतो. त्या काळी मोबाईल सर्वांकडेच नसायचा. गावातील एखाद्याकडेच असायचा त्यामुळे पारावर गप्पांची चांगली मैफल रंगायची. असेच रात्री नऊ वाजता आम्ही मित्र मारुतीच्या पारावर गप्पा मारत बसलो होतो. लाईट गेली होती. सगळीकडे अंधार होता. बोलता बोलता गण्यानं जगन सावगाराचा विषय काढला. गावाच्या पूर्व बाजूला जगन सावकाराचा टोलेजंग चिरेबंदी वाडा होता. मोठया वाडयामध्ये तो एकटाच राहत होता. गावातील जवळ जवळ सगळया कडेच त्याचे पैसे होते. गावातले लोक त्याला गुलामासरखे वाटत होते. तो वसुलीच्या नावाखाली सर्वांना त्रास द्यायचा. पण एके रात्री दरोडेखोरांनी त्याला वाडयातच मारुन टाकले. व त्याचा मृतदेह वाडयातीलच आडात फेकून दिला. सावकार वाडयात एकटाच राहत होता. त्यामुळे दोन-तीन दिवस तो मेल्याचे कोणालाच कळले नाही. एक दिवस धनगराचा चक्या वाडयाजवळ गेल्यावर त्याला दुर्गंध येऊ लागला त्यानं वाडयात जावून त्यानं आडात पाहिलं तर त्याला सावकाराचा मृतदेह दिसला. त्यानं पळत येवून गावकऱ्यांना सांगीतलं. मृतदेहाचा खुप वास येत असल्याने सर्वांनी मिळून त्याला त्या आडातच पुरुन टाकले होते. ही घटना जवळ जवळ आमच्या जन्मापूर्वी आजपासून तीस वर्षापुर्वीची होती. पण आजही त्या वाडयात सावकाराचा आत्मा आहे असे वडीलधारी माणसं, गावकरी बोलत असत. भुताच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या. कोणी आपले एक एक किस्से सांगत होतं. माळयाचा बाल्या सांगु लागला, “आमचा आज्जा तर भुताबरं कुस्ती खेळायचा, भुतास्नी चितपट करायचा.” सच्या बोलु लागला, “मी एकदा तालुक्याहून आलो होतो. तवा मला पुलावर एक हाडळीन दिसली होती. मी देवाचं नाव घेत पळालो म्हणून वाचलो.”

           मी म्हणलो, “माझा काय भुताबितावर विश्वास नाही ब्वा.”

           तेवढयात गण्या म्हणला, “ मग लावतो का पैज?”

           मी म्हणलो, “मी काय भितो काय, सांग काय करु ते?”

           तेवढयात सच्या म्हणला, “तर मग ऐक, उद्या आमावस्या आहे, आम्ही एक रुमाल त्या भुताच्या वाडयात ठेवणार. तु तो आमावस्याच्या रात्री वाडयात जावून आणायचा.”

           मी मागचा पुढचा काहीच विचार न करता म्हणलो, “एवढच, तर मग हयो पठ्ठया तुम्हाला तो रुमाल आणूनच दाखवीन.”

           सन्या म्हणला, “आरे, वेडा आहेस तु. पैज नको लावु, पंधरा दिवसांपुर्वी त्या वाडयाचा कोणी वारस नसल्याने आमदाराने कागदावर काही तरी काळं-पांढरं करुन तो वाडा स्व्त:च्या नावावर केला होता. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो आमदार झटका येऊन मेला.”

           मी म्हणलो, “ तो योगायोग असु शकतो.”

           सन्या वैतागुन म्हणला, “कर मग काय करायचे ते.”

           मी म्हणलो, “ मी लावणारच पैज काय भितो काय?”

दहा- पंधरा माणसांमध्ये मी बोललो होतो. आता माघार घेता येणार नाही हे मला माहित होते. सगळेजण आपापल्या घरी गेले.

           माझ्या घराकडे जायला अंधारच होता. मी भितभितच देवाचं नाव घेत घराकडे गेलो. जेवण करुन झोपलो पण झोप काही केल्या येईना. लहाणपणापासून मी त्या वाडयाबद्दल ऐकत आलो होतो. पण एवढया जणांमध्ये मी उगाचच फुशारकी मारली होती. आता मला पश्चाताप होत होता. पण मी गेलो नाही तर सगळेजण मला भेकड म्हणतील. त्यामुळे आता माघार घ्यायची नाही जे होईल ते होईल असा विचार करुन मी झोपी गेलो.

           सकाळी लवकर उठलो, अंघोळ केली. गावातील सर्व मंदिरात पाया पडायला गेलो. भुतापासून संरक्षण करा म्हणून सर्वांना प्रार्थना केली. सगळयाच देवळातला थोडा- थोडा अंगारा पुडीत बांधून खिशात ठेवला. मारुतीरायाचा लहानसा फोटो पाकीटात ठेवला. भुत आहे का नाही हे काहीच माहीत नाही. पण आता असलं तरी मी अंगारा, देवाचा फोटो सोबत घेतला होता. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही असं मी मनालाच बजावलं. दिवसभर माझं मन कशातच लागलं नाही. आता रात्री काय होईल याचाच विचार मनात येत होता.

           दिवस मावळला, कामावर गेलेली माणसं आपापल्या घरी परतली, पाखरं दाही दिशा हिंडून हिंडून आपल्या घरटयाकडे आली. पाखरांची पिलं, माणसांची लेकरं, शेळयांची करडं, आपापले आई-बाप घरी आल्यानं. आनंदून गेले. घरोघरी चुली पेटल्या. आयाबाया भाकरी कालवणाच्या तयारीला लागल्या. लेकरांना भुका लागल्यानं लेकरं जेवायला वाढा म्हणून चुलीजवळच ताटं घेवून बसले. दिवसभर थकले भागलेले जीव कधी एकदा तुकडा खातोय अन् कधी आंग टाकतोय या विचारातच होते. सगळे जण आपापल्या परीनं काहीना काही करत होते. माझ्या मात्र तोंडचं पाणीच पळालं होतं.आईनं माझ्या आवडीची गवारची भाजी, बाजरीची भाकरी केली होती. सोबतीला ठेचा अन् कांदा होताच. तोंडी लावायला भाजके शेंगदाने अन् बाजरीची पापडी,लिंबाचं लोणचं, खोबऱ्या आंब्याची गोड कैरी असे शेलके आयटम होतेच. मात्र माझं जेवणात लक्षच लागेना कदाचित हे माझं शेवटचं जेवण ठरणार असा विचार मनात आला. रात्रीचे नऊ वाजले असतील, मी जेवणच करत होतो. तेवढयात, चव्हाणाचा बारका चम्या मला बोलवायला घरी आला. मी त्याला येतो म्हणून सांगीतलं.

           कसं बसं जेवण केलं, बॅटरी सोबत घेतली आणी पारावर निघालो. बाहेर काळोख दाटला होता. पावलं जड झाल्यासारखे वाटत होते. पुढं जावसं वाटेना. पण नाही गेलो तर सगळे भेकड म्हणतील या विचाराने मी पारावर आलो. बरीच गर्दी जमली होती. गावातल्या जवळ जवळ सगळयाच पोरांना माहित झालं होतं. मी भुताच्या वाडयात जाणार आहे म्हणून. चिल्ले- पिल्ले, तरुण पोरं एवढचं काय काही म्हातारे पण पारावर जमा झाले होते. “शनी आमावस्या हाई आज, कशाला पैज लावली कायकी हयानं, आता हे काई वापस येत नाही, कुठं पण डेरींग करीत असत्येत काय?” अशी कुजबुज माझ्या कानावर पडली. पण आता माघार घ्यायचीच नाही असं मी मनोमन ठरवलं.

           सर्वजण मला वेशीपर्यंत सोडवायला आले. लाईट गेलेलीच होती. सगळीकडे दाट काळोख होता. एक हातावरच्या अंतरावरलंही दिसेनासं झालं होतं. मी बॅटरी मुद्दामचं घेतली होती. वाडयामध्ये गेल्यावर कामाला येईल म्हणून. तेथे सुद्धा काहीजण मला, “नको जाऊ फुकट मरशील.” म्हणत होते. पण आता “मी माघार घेणार नाही.” असं म्हणून मी त्या भुताच्या वाडयाकडे निघालो.

           गावापासून लांब जात जस जसा वाडा जवळ येऊ लागला तसतसं माझं हदय जोरजोराने धडकु लागलं. मी पार घाबरून गेलो. माझ्या पावलावर कोणीतरी पाऊल ठेवून माझ्या मागे येत आहे असा मला भास झाला. बॅटरी चमकून मी मागं वळून पाहिलं कोणीच दिसलं नाही. मी देवाचं नाव घेत घेत पुढं चालू लागलो. गाव मागे पडलं होतं. गावातली कुत्री विव्हळण्याचा आवाज तेवढा कानी येत होता. सोसाटयाचा वारा सुटला होता. घोंगावणारा वारा माझ्या विरुद्ध दिशेने होता. त्यामुळे मला जोर लावून चालवं लागत होतं. तो वारा जणू मला बजावत होता. इकडे येऊ नको परत जा. तरीही मी देवाचं नाव घेत वाडयाच्या दिशेनं चालतच होतो.

           मी वाडयाजवळ आलो. वाडयातल्या वडाच्या पानांचा सळासळाट माझ्या कानी आला. जणु काय तो वड माझी वाटच पाहत होता. दिवसा भिती वाटावी असा तो वाडा आणी त्या वाडयाजवळ मी रात्री ते पण आमावस्याच्या रात्री आलो होतो. मी अंगाऱ्याची पुडी खिशात चाचपून पाहिली तर काय? माझ्या लक्षात आलं, अंगाऱ्याची पुडी टेबलवरच राहील होती. आता मात्र माझे हातपाय गळाले. तरी देवाचं नाव घेत उसनं आवसान आणून मी वाडयाचं जाडजूड गेट ढकललं. तसा कर्र्कर्र् आवाज झाला. आत जाताच एक जोराची वावटळ माझ्याच दिशेनं आली. माझं हदय जोरजोरांन धडधडायला लागलं. अंग थरथरायला लागलं, वावटळ माझ्या अंगावर येवून मला झटका देवून गेली. नक्कीच त्या वावटळीत त्या सावकराचं भुत असणार या विचारानं माझं अंग शहारून गेलं.

           मी सावधगिरीनं एक-एक पाऊल टाकत चालत होतो. एवढया मोठया वाडयात रुमाल कोठे ठेवला हेच विचारायचं मी विसरुन गेलो होतो. मी चालत चालत सावकराला पुरलेल्या आडाजवळ आलो. आडामध्ये बॅटरी चमकवली तर, कोणाचे तरी डोळे चमकत होते. माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं. मी मोठमोठयानं ओरडु लागलो. पळावं तर पायात आवसानच राहीलं नाही. तेवढयात एक काळंझ्यार मांजर त्या आडातून बाहेर आलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं या मांजराचेच डोळे चमकले. ते मांजर निघून गेल्यावर त्या आडामध्ये मी बॅटरी चमकवली. रुमाल काही दिसला नाही. पुन्हा मी मनाशीच पश्चाताप करत होतो. निदान तो रुमाल कुठे ठेवला आहे ते तरी विचारायला पाहिजे होते. बहुतेक तो रुमाल कुठल्यातरी खोलीतच लपवला असणार असा अंदाज बांधून मी पुढे पुढे चालु लागलो. एकामध्ये एक अशा सात दगडी खोल्या होत्या. हे आम्ही दिवसाच एकदा वाडयात येवून गेल्यामुळे मला माहित होतं. मी पहिल्या खोलीमध्ये भितभितच गेलो. खोलीमध्ये सगळीकडे बॅटरी चमकवली. भिंतीतल्या लाकडी कपाटात, वर माळवदाला वटवाघुळं लटकलेले होते.वटवाघळं माझ्या अंगावर येवून परत दिशा बदलून जात होते. मी शांतपणे एक-एक पाऊल पुढे टाकत खोलीचे कोपरे, दिवळया, कपाटामध्ये रुमाल शोधु लागलो.

           रुमाल शोधत शोधत मी पाचव्या खोलीमध्ये आलो. मी एका कपाटात बॅटरी चमकावली. मला आनंद झाला कारण मला मित्रांनी ठेवलेला लाल रुमाल दिसला होता. मी झपाटयाने कपाटाकडे जावून तो रुमाल हातात घेतला, बघतो तर काय? अडीच-तीन फुटाचा लाल भडक साप माझ्या हातात. त्या सापालाच मी रुमाल समजून चुकलो होतो. मी भितीनं पटकन तो साप खाली फेकला. भितीमुळं माझ्या हातातील बॅटरी पण खाली पडल्यामुळं बंद झाली. आता सगळीकडं अंधार झाला. समोरचं काहीच दिसेना. आता दुहेरी भिती निर्माण झाली एकीकडून भुत आणी एकीकडे साप. कारण, आता मी फेकलेला साप अंधार असल्यामुळं मला दिसेना. आता कधी माझा त्याच्यावर पाय पडेल आणी कधी तो मला डसेल सांगता येत नव्हतं. मी देवाचं नाव घेत त्याच जागेवर थोडा वेळ उभा राहिलो. थोडया वेळानं साप गेला असेल असा विचार करुन जपूनच एक-एक पाऊल पुढे टाकू लागलो. सर्वत्र अंधार असल्यामुळे नेमका कुठे चाललो कळेना. पण अंदाजाने भिंतीला चाचपडत मी कसा तरी सहाव्या खोलीपर्यंत आलो. देवाचं नाव घेतच मी कसेतरी कपाट तपासले.रुमाल सापडला नाहीच.

           आता शेवटची खोली उरली होती. एवढया अडचणींचा सामना करत इथपर्यंत आलो, आता तरी रुमाल सापडु दे. अशी देवाला मनोमन प्रार्थना केली. शेवटच्या खोलीमध्ये प़़वेश केला तर खोलीमध्ये कोणीतरी असल्याची चाहूल लागली. आपल्या मनाच्या दुबळेपणामुळं आपल्याला भास झाला असेल या विचारानं मी भिंतीला चाचपडत कपाट शोधू लागलो. तेवढयात, कोणीतरी अगदी माझ्याजवळ कर्कश ओरडायला लागलं. बहुतेक दोन भुतं होती. माझ्याजवळच कर्कश आवाजात ओरडत होती. आता मात्र मी वाचत नाही या विचारात मी मोठयानं ओरडायला लागलो. ती दोन भुतं अंदाजानं माझ्या जवळ हाताच्या अंतरावर होती. मी प़़तिकार करण्यासाठी जोरजोरानं देवाचं नाव घेत हात पाय फिरवु लागलो. तर खरचं माझी एक बुक्की एका भुताच्या तोंडावर बसली. तसं ते भुत मोठमोठयानं ओरडायला लागलं. ते भुत सच्याच्या आवाजात का ओरडतयं मला काही कळेना. तेवढयात कुणीतरी बॅटरी लावली. तेव्हा माझ्या लक्षात आलं हे भुत नसून माझे मित्र सच्या आन् शश्या आहेत. तेव्हा माझ्या जिवात जीव आला. आम्ही तिघजण एकमेकांकडे बघून हसू लागलो.

           आम्ही तिघजण हसत वाडयाच्या बाहेर आलो. वेशीजवळ आलो पोरं आमची वाटच बघत होते. शेवटी सर्वांनी मी पैज जिंकल्याचे मान्य केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller