भाग ४ . वारस !
भाग ४ . वारस !
तीन महिन्यात लागोपाठ चार मुलींचा अश्याच प्रकारे मृत्यु झाला . मागे काहीच पुरावा न ठेवता .
सगळ्या गावावर भीतीचे सावट उभे राहिले होते . तरण्याताठया मुलींना त्यांचे आई वडील बाहेर सोडेनासे झाले . काहींनी तर मुलींना गावापासून लांब असणाऱ्या नातेवाईकांकडे पाठवून , त्यांचे लग्न लावून दिले .
गजबजलेलं गाव ह्या प्रकरणामुळे ओस पडले होते .पुरुष माणसं सोडली तर रस्त्यांवर बाई माणूस दिसत नव्हतं . हातावर पोट असणारे ,
' दोन घास कमी असेल तरी चालतील पण , बाई माणसांची अब्रू जपण्याला जास्त महत्व देत होते . '
हया भीतीच्या सावटाखाली रामजीचे कुटुंब सुध्दा भयभीत झाले होते .
रामजीला मुलगी नव्हती , पण सून सुध्दा त्याला मुलीसारखी होती . त्यात ती गरोदर होती .
रामजी आणि सखूने तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवायचा निर्णय घेतला .
दुसऱ्या दिवशी दिवस उजाडताच निघायचे ठरले .पण रात्री काय घडले कळलेच नाही , रूपाला अचानक पोटात कळा येवू लागल्या आणि तिला काही कळायच्या आत ओटीपोटात असलेला तो ३-४ महिन्याचा इवलासा गर्भ गळून पडला . रुपा चक्कर येवून पडली , ती बेशुध्द झाली .
रामजी , मल्हारी आणि सखू ह्या प्रसंगाने अगदी घाबरून गेले .तिला तशीच जवळच्या दवाखान्यात घेवून गेले .तिच्या आई वडिलांना बोलावून घेतले . सगळे खुप दुःखी झाले ह्या प्रकाराने .
रामजी आणि सखुला खुप वर्षांनी मुल झाले होते , पण आपल्या मुलाला लवकर बाळ होणार म्हणून दोघेही खुप सुखावले होते . रूपाला ते अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत होते .
पण नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक ?
रूपाला आरामासाठी माहेरी पाठवून दिले .
१५-२० दिवस गेले आणि गावात पुन्हा एका मुलीचा बळी गेला .
आता मात्र पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली . तपासाचा वेग वाढवला .कसून शोध घेतल्यावर एक गोष्ट समोर आली , गुन्हेगार पीडित मुलीला आधीच विष प्यायला द्यायचा , नंतर ती मुलगी थोडीशी गुंगली की आपले कुकर्म करून त्यांना नदीमध्ये फेकून द्यायचा .
मुलीच्या घरच्यांना काही खबर लागायच्या आधीच , तिचे प्रेतच समोर यायचे .
ह्यावेळी जी मुलगी बळी पडली होती , तिची चौकशी करताना , तिच्या एका मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की , तिचे एका मुलासोबत दोन तीन दिवसांपूर्वीच सुत जुळले होते . आई वडील शेतात गेल्यावर तो मुलगा घरी यायचा .तो कोण होता ते नाही तिने सांगितले पण ते दोघे घरी सांगून लग्न करणार आहेत असे ती म्हणत होती .
माहिती मिळाली पण तो कोण हे कोणालाच माहित नव्हते . तिला बाहेर पडतानाही कोणीच पाहिले नव्हते .
प्रेम करताना मुले मुली स्वतःला सगळ्यांपासून का लपवत असतात ते पोलीस पाटील साबळेना कळत नव्हतं . बरं अजून एक म्हणजे जर मुलगी कोणताही प्रतिकार न करता आधीच विष कसे काय घेत असेल ?
कारण त्या सगळ्या मुलींच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्ट नुसार त्यांना आधी विष दिल्याचे आणि नंतर बलात्कार झाल्याचे दिसत होते .
चौकीत बसल्या बसल्या ते सगळ्या घटनांचा बारकाईने आढावा घेत होते . सगळ्याच घटनांमध्ये मुलींच्या घरचे काहीच मदत करत नव्हते .
मुलगी मेली संपलं ! काही करून ती परत नाही येणार हा समज !
हातावर पोट भरणारे , दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून कष्ट करणारे गरीब शेतकरी , नसत्या उचापती न करता शांत रहाणं पसंत करत होते .मुलगी मेली त्यापेक्षा खाणारे एक तोंड कमी झाले अश्या भावनेने दुःख पचवून कानामागे टाकत होते .
साबळेना एक गोष्ट लक्षात आली , ज्या मुलींचा बळी गेला होता , त्या अत्यंत गरीब परिवारातल्या होत्या .काहीतरी आमिष दाखवून त्यांना फसवले गेले असावे . एकदोन भेटीतच त्यांची बलात्कार करून हत्या होत होती . म्हणजे हे कुकर्म करणारा फक्त वासनाधिन पशुच असावा . त्याला फक्त शरीर हवे असायचे . शरीराशी खेळून तो त्याचा खेळ संपवत होता .
साबळे मनाशी काहीतरी ठरवून , दोन कॉन्स्टेबल सोबत घेवून पुन्हा पहिल्या बळी गेलेल्या मुलीच्या घरी पोहोचले . त्यांना पाहून घरातले थोडे गडबडले . त्यांना शांत व्हायला सांगून , मुलीच्या आईला म्हणाले , " ताई घाबरु नका , मी काही त्रास द्यायला नाही आलो . मला जर थोडी मदत केली तर आपण हे भीतीचे सावट नक्की दूर करू शकतो .गावात काय चाललय तुम्ही बघता आहात . तुमची मुलगी परत येणार नाही पण बाकीच्या मुलींना नक्कीच वाचवू शकतो ."
त्यांनी मग नुकत्याच घडलेल्या घटनेबद्दल त्यांना सांगितले . आणि त्यांच्या मुलीचं असं काही होतं का तेही विचारलं .
ते मायबाप एकमेकांच्या तोंडाकडे घाबरून बघायला लागले .बोलले नाही काही पण त्यांची देहबोली साबळे समजून गेले .
गरिबीपेक्षा स्वतःच्या अब्रूला जपणारी माणसे कशी उघडी करणार स्वतःची लक्तरं ??
साबळे तिथून निघाले , तिथे थांबून हाती काही लागणार नाही याची खात्री झाली त्यांची. इतर ठिकाणी पण जवळपास असाच अनुभव आला त्यांना . एक मात्र लक्षात आले त्यांच्या की गुन्हेगार सगळीकडे एकच पद्धत अमलात आणत होता . त्याला फक्त शरीर हवे म्हणजे तो नक्कीच विकृत आहे . आपला खेळ अगदी सफाईदार पणे खेळत होता .कुठेही काहीही पुरावा , काही धागादोरा शिल्लक ठेवत नव्हता .त्याच्या जाळ्यात गरीब , भोळ्या आणि ऐन वयात आलेल्या मुली अलगद अडकत होत्या .
विचार करता करता त्यांना आपणही एक धाडसी खेळ खेळावा असे वाटू लागले .आणि मग त्यांनी त्याची व्यूहरचना आखली .सोबत फक्त दोन अगदी विश्वासाची माणसे घेतली .....
क्रमशः !
