बालयोगिनी मुक्ताई
बालयोगिनी मुक्ताई
विरक्ती, ज्ञान आणि भक्ती याचे मूर्तिमंत प्रतिक असलेल्या संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव या दिव्य संत शिरोमणींच्या सानिध्यात राहणार्या संत मुक्ताबाई या स्वत:ही स्वतंत्र अध्यात्मिक प्रतिभेच्या धनी होत्या. शके 1201 मध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदेला, घटस्थापनेच्या दिवशी त्यांचा आपेगाव येथे जन्म झाला असा उल्लेख आहे. बालवयातच त्यांच्या मनावर वडील विठ्ठलपंत आणि आई रुख्मिणीच्या देहत्यागाचा मोठा आघात झाला. दहा वर्षाच्या निवृत्तीनाथांनी मातापित्याप्रमाणे भावंडांचा सांभाळ केला. असामान्य बुद्धिमता लाभलेल्या अलौकिक भावंडांच्या तेजोवलयात मुक्ताबाईही भक्तीयोगात पारंगत होऊ लागल्या.
शुद्धिपत्र मिळविण्यासाठी जेव्हा ही चारही कोवळी भावडं पैठण या गावी गेली तेव्हा तेथील ब्रम्हवृंदाने त्यांना स्विकारण्यास नकार देऊन प्रचंड अपमान केला. त्या अवमानाने व्यथित ज्ञानेश्वरांनी आत्मक्लेषाने स्वत:ला कोंडून घेता, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ असे आर्जव मुक्ताईने केले. पुढे हेच 42 अभंग ताटीचे अभंग म्हणून लोकप्रिय झाले. त्यात ज्ञानदेवाची विनवणी करताना त्यांनी आदिनाथांपासून गहीणीनाथांकडे आणि नंतर त्यांच्याकडे आलेल्या नाथसंप्रदायाचे स्मरण करुन दिले.
योगी पावन मनाचा । साहे अपराध जनांचा
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश
विश्वपट ब्रम्हदोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्द्ल ठायीचे ठायी
तुम्ही तरुण विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा
मुक्ताईचा करुण, हळवा स्वर ऐकून ज्ञानेश्वर दार उघडतात आणि त्यानंतर त्यांच्या हातून घडलेले कृपाकार्य सर्वश्रुतच आहे. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करण्यात लहानग्या मुक्ताबाईचा मोलाचा वाटा आहे. मुक्ताईंनी हरिपाठाचे अभंगही रचले आहेत. त्यांची अभंग निर्मिती ओघवती, परखड, अर्थपूर्ण, प्रतिभाशाली, योगमार्गाच्या खुणांनी ओतप्रोत, अध्यात्मिक उंची गाठलेली, साक्षात्काराचे पडसाद उमटवणारी व समाजाभिमुख आहे.
अखंड जायला देवाचा शेजार
कारे अहंकार नाही गेला ।
मान अपमान वाढविसी हेवा
दिवस असता दिवा हाती घेसी ॥
त्यांनी ‘ज्ञानबोध’ या ग्रंथाचेही लेखन केले आहे. यात संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या आधी हे लिखाण झाले असल्याचा अनुमान आहे. मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’ चा अर्थ सांगितला. योगी चांगदेवांचा अहंकार मुक्ताबाईचे अगाध ज्ञान बघून गळून पडला. त्यानंतर चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईचे शिष्यत्व पत्करले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव होऊन अमृत संजीवनीची प्राप्ती झाली होती.
ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, ज्ञानेश्वरांनी त्यांना दिलेली सनद, विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग. पालकांच्या त्रिवेणी संगमातील देहविसर्जनानंतर गृहीणीपदाची जबाबदारी हळुवार, सोशीक, समंजसपणे पेलवत, हसण्याबागडण्याच्या वयात निरागस मुक्ताई प्रौढ, गंभीर, प्रगल्भ बनली. भावंडांवर मायेची पखरण करताना त्यांनी वेळप्रसंगी त्यांना वात्सल्य व मार्दव आत्मीयतेने दाटले देखील. त्यांचा ज्ञानाधिकार सर्व संताना मान्य होता.
संत ज्ञानदेवांच्या समाधीनंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाईंसह तीर्थयात्रा करताना तापी तीरी आले. तेथे अचानक वीज कडाडली आणि संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड लोळात लुप्त झाल्या (12 मे 1297). जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे मुक्ताबार्ईची समाधी आहे.
