रबर गर्ल
रबर गर्ल
कॅबरे नृत्य प्रकाराची राणी म्हणून आपण हेलनला ओळखतो. परंतु सिनेसृष्टीत या नृत्याची मुहूर्तमेढ कुकू मोरे उर्फ कुकू या अँग्लो इंडियन नर्तकीने केली. आज हे नाव कित्येकांना माहितीही नाही किंवा स्मरतही नाही. पण नृत्य पदन्यासाच्या आपल्या लवचिक हालचालींनी प्रेक्षकांना भुरळ घालणार्या कुकूने त्या काळी ‘रबर गर्ल’ म्हणून उपाधी मिळविली होती. तिच्या प्रतिभासंपन्न तसेच दिलखेच अदाकारीने 1940 ते 1950 च्या दशकात बॉलीवूड चित्रपटांचे पान कॅबरे नृत्याशिवाय हलत नव्हते.
या नृत्य सम्राज्ञीचा जन्म 1928 चा. 1946 मध्ये ‘अरब का सितारा’ या चित्रपटाद्वारे तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात तिचा अभिनय व नृत्यलालित्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर 1948 मध्ये मेहबूब खान निर्मित ‘अनोखी अदा’ हा चित्रपट तिच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने तिला मुख्य नृत्यांगणा म्हणून रसिकमान्यता दिली. नर्गीस दत्त, दिलीपकुमार आणि राज कपूर अशी तगडी मंडळी असलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातील शृंगारिक गाण्याच्या संधीचे तिने सोने केले.
त्या काळी ती एका नृत्यासाठी 6000 रुपये आकारात असे. ती त्यावेळेची सगळ्यात मोठी बिदागी होती. प्रमुख भूमिकेत असलेल्या नटनट्यांनाही इतके शुल्क मिळत नसे. कुकूचे जीवन अतिशय विलासी, ऐश्वर्य मिरविणारे होते. प्रसध्दी व संपत्ती तिच्या पायाशी लोळण घेत होती. तिच्या दारात त्यावेळी तीन गाड्या असे. त्यातील एक तिच्या पाळीव श्वानाची, एक तिची व तिसरी मित्रमंडळीसाठी. अँग्लो-बर्मीज नृत्यांगना आणि अभिनेत्री हेलनचा कुकूशी कौटुंबिक परिचय होता. कुकूनेच हेलन आणि प्राणला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी मोठी मदत केली.
1951 मधील शबिस्तान आणि आवारा सारख्या चित्रपटांमध्ये कोरस डान्सर म्हणून 13 वर्षाच्या हेलनला काम मिळवून दिलेे. चलती का नाम गाडी आणि याहुदी या चित्रपटात कुकू आणि हेलन जोडीने नृत्यधमाल केली. हेलनच्या उभरत्या काळाने व वैजयंतीमालाच्या नृत्यनिपुण पदार्पणाने कुकूच्या कारकिर्दीला काहीशी उतरती कळा लागली. त्याशिवाय तिची चैनीची जीवनशैलीही अनेकांच्या असूयेचा विषय होती.
त्यामुळे तिच्या आलीशान बंगल्यावर जेव्हा आयकर विभागाची धाड पडली, तेव्हा झालेल्या झाडाझडतीत कितीतरी बंगल्यांचे कागदपत्र सापडले परंतु त्या कागदपत्रांच्या कायदेशीर नोंदी व्यवस्थित नसल्याने किंवा कुकूने त्या बाबतीत गांभिर्य दाखविले नसल्याने ते बंगले तिनेच विकत घेतले असूनही तिच्या नावावर सिध्द करता आले नाही. परिणामी आयकर बुडवल्याने ती अमाप मालमत्ता जप्त करण्यात आली. सोनेनाणे, पैसा पाहता पाहता उडत गेला. 1963 नंतर अविवाहित श्रीमंत कुकू हलाखीत जीवन जगू लागली. तिच्याकडे अन्नधान्य आणण्यासाठीही दमडी शिल्लक नव्हती. भाजीवाल्यांनी फेकून दिलेल्या सडक्या भाज्या आणून ती शिजवत व खात.
1980 मध्ये तिला कर्करोगाचे निदान झाले, पण दैवाचे फासे असे की तिच्याकडे इलाज करण्यासाठीही पैसे नव्हते. योग्य औषधाअभावी कुकूची प्रकृती खालावत गेली. 1981 मध्ये कुणीतरी तिला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेथेच उपचारादरम्यान 30 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. आयुष्याचे विचारपूर्वक नियोजन न करता, केवळ चंगी उपभोग घेण्याच्या बेफिकिर वृत्तीमुळे, ही चंदेरी दंतकथा कारुण्यरसात निमाली
