अतर्क्य
अतर्क्य


श्रेया आणि सुमेध हे एक पुण्यात राहणारं एक सुखवस्तू जोडपं होतं. त्यांना स्निशा नावाची एक गोड कन्या होती. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते उत्सुक होते. सुमेध आणि श्रेया दोघेही कंपनीमध्ये ३-४ दिवसांची रजा टाकून घरी येतात.
श्रेया:-" आलास घरी! तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं
आहे."
सुमेध:-" हो हो! आधी जेवण तरी करून घेऊ! स्निशा
कुठे आहे?" असं म्हणत सुमेधने स्निशाला आवाज दिला. जेवण जेवता जेवताच श्रेयाने पुन्हा विषय काढला.
श्रेया:-" यावेळी मस्त कुठेतरी फिरायला जाऊ. काय
म्हणतो?"
सुमेध:-" नक्कीच. पण या वेळी मला कोकणात जावसं
वाटतंय. तर्करली बीच चालेल का?"
श्रेया:-" हो नक्कीच."
शांतपणे त्यांचा संवाद ऐकणारी स्निशा मनोमन खुश झाली. आता ३-४ दिवस तरी आई-बाबा सोबत राहिला मिळेल आणि कंटाळवाण्या शाळेपासून तेवढीच सुटका मिळेल या विचाराने ती देखील उत्साहित झाली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी सामान भरलं आणि प्रवासाला निघाले. स्वतःचीच कार असल्यामुळे त्यांना फारशी काळजी वाटत नव्हती. प्रवास मजेत चालला होता. अवतीभवतीचा सुंदर निसर्ग पाहून स्निशा हरकून गेली. जसा जसा अंधार पडू लागला तसं श्रेया म्हणाली:-" रात्र होत आली आहे. एखादा लॉज शोधूया का?"
सुमेध:-" हो. पण आधी जेवण करू. स्निशाला भूक
लागली असेल."
जेवणासाठी भरपूर हॉटेल मिळाले एका ठराविक अंतराने, पण लॉज भेटत नव्हता. जे भेटले ते एक तर मनासारखे नव्हते किंवा मग भरलेले होते. शेवटी, जेवण करून मगचं लॉज शोधायचं ठरलं. जेवल्यानंतर दमलेली स्निशा झोपी गेली. इकडे त्यांना हॉटेल सोडा, वस्ती देखील दिसत नव्हती. रात्रीचे अकरा वाजता आले होते. दोघांनाही झोप आलेली. पण करणार काय? थोडं आणखी पुढे गेल्यावर त्यांना एक जुना वाडा दिसला. जवळच अनेक छोटी-मोठी झाडी-झुडपी होती. खरंतर श्रेया वैतागली होती. पण पर्याय नव्हता. सुमेधने वाड्याकडे जायला असणाऱ्या पायवाटेकडे गाडी वळवली. त्या अरुंद रस्त्यातून त्याने कशीबशी गाडी वाड्याजवळ आणली. तिघेही गाडीतून उतरले आणि वाड्याकडे निघाले.
दरवाजा बंद असेल म्हणून त्यांनी ठोठावला पण दरवाजा बहुदा उघडा असावा, त्याच्या हलक्या धक्क्याने तो उघडला. आत गडद अंधार होता. मोबाईलच्या टॉर्चने त्याने इकडेतिकडे पहिले. थोडं आत जाणार तेवढ्यात साधारण ३० वर्षांची एक स्त्री कंदील घेऊन आली. ती स्त्री त्यांना म्हणाली:-" कोण तुमी? आणि इकडे काय करताय?"
सुमेध:-" मी सुमेध. मी, माझी बायको आणि मुलगी
कोकणात फिरायला आलो आहोत. पण
आम्हाला लॉज मिळाला नाही. तुमची जर
हरकत नसेल तर आम्ही आजची रात्र इथे राहू शकतो का? हवं तर भाडंही देऊ."
स्त्री:-" पोर लई लहान दिसतीये! राहा हितचं. एक सांगू
सायेब, परतेक गोस्ट पैशात नाय मोजली जात.तुमी शराकडली माणसं करता तसं. आमी गावकडली आडाणी माणसं. आमाला नाय समजत असला व्यवार. माज नाव मालती. काय लागलं तर आवाज द्या." इतक्यात एक माणूस तिथे आला. तोही साधारण तेवढ्याच वयाचा किंवा थोडा मोठा होता.
तो:" माले! कोण गं ही माणसं?" मालतीने सगळं सविस्तर सांगितलं त्यावर तो म्हणाला:-" आज रातच्याला हितचं रा. माज नाव यशवंत. काय लागलं तर मला किंवा मालतीला आवाज द्या."
इतकं बोलून त्याने मालातीजवळचा कंदील त्यांना दिला आणि दोघे अंधारात निघून गेले. काही क्षणात मालतीने त्यांना जेवणाची विचारपूस केली आणि झोपण्यासाठी अंथरून देऊन गेली. आजूबाजूच्या झाडीतून रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. एक अज्ञात असं भयानक वातावरण त्याला जाणवू लागलं. झोपलेल्या श्रेया आणि स्निशाला पाहून तो काहीच बोलला नाही.
रात्री सव्वा एकला अचानक मालती आणि यशवंत आले. पण आता त्यांची पाऊले धडधड पडत होती. त्यांच्या आवाजाने श्रेया आणि स्निशा जाग्या झाल्या. मालती आणि यशवंत एकमेकाला नजरेतून काहीतरी खुणवत होते. इतक्यात मालतीची नजर स्निशाकडे वळली आणि ती ओक्षीबोक्षी रडू लागली. श्रेयाला काही समजेना. ती त्यांना सावरायला गेली. ती त्यांना हात लावणार तेवढ्यात मालतीने गर्रकन मान फिरवली आणि रडक्या आवाजात म्हणाली:-" आमची मधूमिता बी अशीच बारकी व्हती, लय देखणी, नक्सत्रावाणी. कोणाची नजर लागली काय म्हायीत. खेळता खेळता अचानक हिरीत की हो पडली!" असं म्हणत मालतीने हंबरडा फोडला. सुमेधही तिला सावरायला आला.
इतक्यात यशवंतने स्निशाला हवेत उचलले आणि गडगडाटी हास्य करीत म्हणाला:-" आमाला ही पोर पायजे." एव्हाना रडणारी मालतीही जोरजोरात हसायला लागली. श्रेयाला थोडा अंदाज आला. तिने तत्परता दाखवत सुमेधला खुणावले. इकडे श्रेयाने फळं कापण्यासाठी आणलेली सुरी यशवंतकडे फेकली पण ती त्याच्या आरपार गेली. यामुळे भडकलेले यशवंत आणि मालती श्रेयाच्या पाठीमागे लागले. श्रेया भीतीने गळीतगात्र झालेली तरीही होते नव्हते तेवढे प्राण एकटावून ती जिवाच्या आकांताने पळू लागली. अंधारात तिला वाट सापडेना तरीही अंदाज लावत ती पळत राहिली. इकडे सुमेधने स्निशाला उचलून गाडीत ठेवले आणि श्रेयाची वाट पाहू लागला.
श्रेयाला वाट सापडत नव्हती. अशा वेळी देवाचीच आठवण येते. ती मोठ्यामोठ्याने देवाचं नामस्मरण करत राहिली. जवळपास अर्ध्या तासाने तिला त्यांची गाडी दिसली. एव्हाना चिंतीत झालेला सुमेध तिला शोधायला निघणार तेवढ्यात त्याला ती दिसली. तिला पाहून त्याला हायसं वाटलं. पटकन दोघे गाडीत बसले आणि गाडी सुरु केली.
गाडी वेगाने पळवण्यासाठी तो अकॅसलेटर वर पाय देणार इतक्यात त्यांची गाडी हवेत तरंगू लागली. इवलीशी स्निशा भीतीने बेशुद्ध पडली. श्रेयाने गाडीतला गणपती व्यवस्थित केला आणि पुन्हा एकदा देवाचं नामस्मरण करू लागली. ५ मिनिटांनी त्यांची गाडी हळूहळू जमिनीवर येऊ लागली. मालती आणि यशवंतची किंकाळी घुमत होती. एक मोठे झाड ते गदागदा हलवून ते गाडीवर पाडण्याचा प्रयत्न करू लागले. वेळ न संपणारा वाटत होता. गाडीच्या चाकांचा जमिनीला स्पर्श झाल्याबरोबर सुमेधने गाडी सुसाट पळवली. त्यांची गाडी निसटली आणि ते भलं मोठं झाड पडलं. अगदी एका सेकंदाच्या फरकाने ते वाचले.
सुमेधने जरी गाडी सुसाट वेगाने पळवली तरी यशवंत आणि मालतीच्या विळख्यातून ते अजूनही सुटले नव्हते. दोन तासांप्रमाणे वाटणाऱ्या दोन मिनिटांनी सुमेधची गाडी पुन्हा वाड्यासमोर आली. तो पुढे जाणार इतक्यात आणखी एक भलं मोठं झाड त्यांच्यासमोर पडलं. आपलं कौशल्य पणाला लावत सुमेधने गाडी कशीबशी सोडवली आणि अधिक वेगाने सुसाट पळवली. पुन्हा तेच घडलं. त्याच्या लक्षात आलं ते चकव्यात सापडले होते. श्रेयाही भीतीने गोठून गेलेली. होतं नव्हतं ते बळ एकटावून दोघेही देवाचा धावा करू लागले. म्हणतात ना जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरु होतं. आज त्यांनी प्रत्येक्षात अनुभवलं.
चकव्यात फिरता फिरता पहाटेचे ४ वाजले. इतक्यात त्यांना समोरून येताना एक आजोबा दिसले. त्या आजोबांनी क्षणभर पाहिलं आणि सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ते सुमेधच्या गाडीसमोर येऊन थांबले. सुमेधने कचकन ब्रेक दाबून गाडी थांबवली. ते आजोबा त्याला म्हणाले:- " तुमीं लई मोट्या संकटात हायसा. म्या तुमची मदत करतो. त्या बदल्यात तुमी मला हायवेच्या थोड्या पुढं असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात सोडा." त्यांचं बोलणं ऐकून सुमेधने लगेच होकार दर्शवला आणि त्यांना गाडीत बसवून ते सांगतील त्या दिशेने जाऊ लागला. कसंबसं चकव्यातून बाहेर येऊन त्यांना मूळचा रस्ता दिसला. ते रस्त्यावर आले. पहाटेचे पावणे पाच वाजले होते. सुमेध आणि श्रेयाने मागे वळून पाहिले तर त्या गर्द झाडीत तो वाडा केव्हाच गायब झाला होता. काल जवळ वाटणारा वाडा आज खूप लांब किंबहुना दिसतच नव्हता.
थोडं पुढे गेल्यावर त्याला एक मंदिर दिसलं. ठरल्याप्रमाणे त्याने आजोबांना तिथे सोडले. ते आजोबा त्यांना म्हणाले:-" पोर लय ग्वाड हाय! पण ती बेशुद हाय बहुतेक." असं म्हणत त्यांनी तिच्या अंगावर पाणी शिंपडलं. स्निशा जागी झाली. पण घाबरल्यामुळे खूप रडत होती. तिला पाहून श्रेया आणि सुमेधने मंदिरात राहायचं ठरवलं. त्यांनी गाडी बाजूला लावून मंदिराचा आश्रय घेतला. त्यांनी घडलेला प्रकार आजोबांना सांगितला. तसं ते आजोबा म्हणाले:-" आरं, त्ये दोग माजे ल्येक सून हायेत. ५ वरसांपूर्वी माज्या नातीचा हिरीत पडून मुरत्यू झाला. त्यो आघात त्यांना सहन झाला नाही आणि दोगानीबी आतमात्या केली. पर अजूनबी त्ये तिलाच शोधतायेत." दमलेल्या त्यांना कधी झोप लागली कळलच नाही. सकाळी उठले तर पुजारी मंदिरात आलेले. सुमेधने त्यांना त्या आजोबांविषयी विचारले. पहिल्यांदा पुजारी गोंधळले पण नंतर त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. ते म्हणाले:-" अरे, ही घटना पाटील घराण्याची आहे. पण त्यांच्यातलं आता कोणीच राहीलं नाही. काल शनी अमावस्या होती. त्या दिवशी जे कोणी वाड्यात जातं ते पुन्हा कधीच परत येत नाही. तुम्ही आलात तेच नवल!" सुमेध आणि श्रेया निःशब्द झाले.