रक्षाबंधन-संवादातून कथा
रक्षाबंधन-संवादातून कथा


घरातील एक संवाद
तो :- आज जावंच लागेल का?
ती :- हो, दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे?
तो :- जर हारणार आहे हे माहित असताना का प्रयत्न करते?
ती :- संकट सगळ्यांवर येतं, म्हणून कोणी लढणं सोडतं का?
तो :- मला खरंच आता किमोथेरपी नको झाली आहे!
ती :- मला माहित आहे, पण मला माझा भाऊ आधीसारखा अवखळ आणि शानदार हवा आहे ना! मग मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी देवालाही साकडं घातलं. मला माहित आहे तू नक्की बरा होणार. माझ्या खोड्या काढायला कोणी तरी नको का?
तो :- तू पण ना ताई! नेहमी माझी बाजू घेणारी आज डॉक्टरांची बाजू घेत आहेस. तुला तरी माझा चेहरा पाहू वाटतो का?
ती :- तो तर मला आधीपासूनच आवडत नव्हता! माकड कुठला.
तो :- -----
ती :- चल आवर. आज शेवटची किमो आहे. आणि यानंतर तू पूर्णपणे बरा होणार आहेस. चल जाऊ.
तो :- हो.
(डॉक्टरांकडून घरी आल्यानंतर)
तो :- काय म्हणाले डॉक्टर?
ती :- अजून काही दिवस जावं लागेल!
तो :- आणि?
ती :- स्टेज वाढत आहे, ऍडमिट व्हावं लागेल.
तो :- -----
ती :- लक्षात ठेव, ट्रीटमेंट माझ्यासाठी करत आहेस आपल्या ताई पासून प्लिज दूर जाऊ नको.
तो :- नाही जाणार.
ती :- नक्की ना?
तो :- हो, येणाऱ्या रक्षाबंधनला माझ्यासाठी एक चांगली राखी घेऊन ठेव. आणि काही अनाथ आश्रमातील मुलांसाठीसुद्धा. माझ्यानंतर त्यांनाच राखी बांधणार ना?
एव्हाना तिच्या डोळ्यातील अश्रूंनेच उत्तर दिले.
ती :- तुला काही होणार नाही, आपण सर्वोत्तम डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेऊ.
तो :- जशी तुझी इच्छा. आई-बाबांना माझ्यामुळे उगाच त्रास.
ती :- त्यात त्रास काय? अरे माकडा गप आता, चल जा तुझ्या हॉस्पिटलला.
काही दिवसांनी..
तो :- मग गं माकडे, राखी कुठंय माझी?
ती :- ये बंधू. आणि हो आज आपण अनाथाश्रमात जाणार आहोत, तेथील मुलांना राखी बांधायला. तिथल्या मुलींसाठी तू काहीतरी गिफ्ट घेऊ चल.
तो :- ताईसाहेब भलत्याच खूष दिसत आहेत!
ती :- देवाने माझा भाऊ जो मला परत दिला!
इतकं बोलून ते अनाथ आश्रमाकडे रवाना झाले.