Meenakshi Vaidya

Tragedy Others

4  

Meenakshi Vaidya

Tragedy Others

अस्तीत्व

अस्तीत्व

6 mins
363


राघव आजकाल जरा गप्प गप्प असायचा. त्याच्या गप्प राहण्यामागचं  कारण त्याची आई जाणून होती. महिनाच तर होतोय जेमतेम सविताला जाऊन.इतकी वर्षांचा संसार होता दोघांचा कसा विसरेल राघव सविताला एकदम? मुलं तर त्यांच्या विश्वात रमली आहेत. मीही माझं मन रमवते आहे. कितीही वरून दाखवलं तरी मलाही सवितेची आठवण छळते. सून नव्हती माझी मुलगीच होती.


लग्नं होऊन सविता या घरात आली आणि खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळाली आहे असं मला वाटलं.तिचं हसणं खूप आश्वासक होतं.माझ्या चेह-यावरून तिला कळायचं माझ्या मनात काय चाललं आहे. मुलगी देणार नाही इतकी लक्ष द्यायची माझ्याकडे. कुठेही गेली अगदी माहेरी सुद्धा तरी एक दिवसाच्या वर राह्यची नाही.विचारातून बाहेर येत  आईनी बाहेर डोकावून बघीतलं राघव झोपाळ्यावर बसला होता. राघव झोपाळ्यावर झोके घेत बसला होता. त्याचा चहा थंड झाला होता. त्याची कुठेतरी तंद्री लागली होती.


"राघव तुझा चहा थंड झालाय.गरम करून आणू का?" आईच्या बोलण्यानी राघवाची तंद्री भंगली.

"आई असू दे थंड चहा घेईन.ये न तूही झोपाळ्यावर बस." आईपण झोपाळ्यावर बसल्या. राघव अजूनही तंद्रीतच होता. म्हणाला "आई सविताचं या सगळ्या गोष्टीत मन रमलं होतं. हळहळत होती सगळं सोडून जावं लागणार म्हणून." "खरं आहे. बाईचा जीव तिनी मांडलेल्या चूल बोळक्यातच अडकलेला असतो. एवढ्या मेहनतीनी ऊत्साहानी तिनं सगळं रचलेला खेळ असा अर्धवट सोडून जाताना तिला जड गेलं असणार.पण नियतीपुढे कोणाचं चालतंय."


"आई अग झोपाळ्यावर बसू म्हणून एकदा तिनी हट्ट केला.  मी म्हटलं तुला गार वारा सहन होणार नाही.तर म्हणाली काही दिवसांनी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मी जाणार आहे.नका आज अडवू मला. सगळ्या झाडांचा जो मिश्र गंध येतो तो घ्यायचा आहे. आई तिच्या बोलण्यानी आलेला उमाळा महत्प्रयासानी मी दडवला होता." असं म्हणून राघव ढसाढसा रडू लागला.


त्याच्या पाठीवर थोपटत आई म्हणाल्या." रडू नकोस.सवितानं खूप धीरानी घेतलं. झालेल्या कॅन्सर सारख्या आजाराला खंबीरपणे तोंड दिलं. पण मुलांसाठी मात्र ती कासाविस झालीच असेल. तू सुद्धा खूप केलस तिचं. पण हळुहळू तुला या आठवणीतून बाहेर यावं लागेल. तुझ्याकडे बघीतल्यावर मुलं कोमेजतात. बोलत नाहीत पण मला त्यांचा चेहरा वाचून कळतं. त्यांची आई तर नाही आता. पण त्यांचे बाबाही त्यांच्यापासून लांब चाललेत.असं नको व्हायला वेळीच राघव वर्तमानात ये.सविता आता नाही हे सत्य स्विकार. तुझ्या मनात जश्या तिच्या आठवणी आहेत तश्याच मुलांच्या मनात पण आहे.

मुलं   दाखवत नाहीत. पण  आई नाही याचं दुःख त्यांनाही आहे. त्यांना आईची आठवण येत नाही असं नाही. ते सुद्धा दुखावले आहेत. त्यांना वर्तमानातच जगायला हवं. त्यांचं आयुष्य ख-या अर्थानी अजून सुरूही झालेलं नाही. त्यांना आईच्या आठवणीनी खचून चालणार नाही. तुला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे.

त्यांना घरी आल्यावर तुझ्याशी खूप बोलायचं असतं.काहीतरी सांगायचं असतं पण त्यांचे हसरे खेळकर बाबा आजकाल त्यांना सापडत नाहीत.माझ्याशी बोलतात.पण सतत तुझी चाहूल घेत असतात.


राघव ऐकरे बाळा.असं वागू नको.सविताला आवडणार नाही. तिला तिचं घर हसरं खेळतं दिसायला हवं."


"आई सविता म्हणायची आपल्याला ईश्वरानी एवढं छान आयुष्य जगायला दिलंय तर त्याची गुरूदक्षिणा द्यावीच लागेल. माझं आयूष्य आता संपत आलय. मी माझं आयुष्यच देणार आहे गुरूदक्षीणा म्हणुन ईश्वराला. आई सविता नी किती सहज स्विकारलं आपल्याला जायचं हे.माझ्या अंगावर तर आत्ताही काटा आला.एवढा समजूतदार पणा कुठून आणला असेल तिनी?"

"स्त्रीला आपसूक सगळं बळ येतं.राघव पुरूषांपेक्षा स्त्री खूप कणखर असते. ती सहजतेनी सगळा बदल स्विकारते. मुलांपुढे तिच्या जाण्याचा उल्लेख वारंवार करू नकोस.त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं बघायला शिक.त्यांना प्रोत्साहन दे. त्यांच्या जवळ रहा.त्यांचं मन जप. त्यांना तुझा आधार वाटेल असं कर.तर ते आपलं आयुष्य शांतपणे जगतील.राघव चल. मुलं येतील एवढ्यात" आई म्हणाल्या.

"आई मी चुकलो. मुलांची बाजू माझ्या लक्षातच आली नाही. मी माझ्याच दु:खात बुडालेला राहीलो.आई मला माफ कर.मी स्वतःला सावरेन. सविता आता फक्त माझ्या मनात असेल.मुलं जेव्हा तिची आठवण काढतील तेव्हाच मीही सवितेला आठवेन." 

"शहाणं माझं बाळ. आता नीट चेहरा धू. मुलं येतील. स्वाती प्रथम दोघांच्या प्रिलीम परीक्षेचा निकाल आज मिळणार होता. हसतमुखानी बाहेर ये."


राघव फ्रेश होऊन समोरच्या खोलीत मोबाईल वर काहीतरी बघत असतो. तेवढ्यात मुलं येतात. सवयीनी चुपचाप कोप-यात चपला काढून आत जाऊ लागतात.‌राघव हाक मारतो.


"कायरे मुलांनो आज प्रिलीमचा निकाल कळणार होता नं?" आणि मुलांकडे बघून हसतो.मुलं गोंधळात.आज त्यांचे बाबा पूर्वीसारखं बोलत होते.तेवढ्यात आई म्हणाल्या" अरे मिळाला नं निकाल.दाखवा मग." 

त्यानंतर दोघांचा धिंगाणा आणि भांडण सुरु झालं आधी बाबांना कोण दाखवणार? त्यांचं ते लडीवाळ भांडण बघून राघवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं मुलांना तो किती हवा आहे.

"अरे भांडता कशाला?आपण चितपट करूया."राघव चितपट करतो स्वातीचा नंबर येतो. प्रथम हिरमुसला होतो. त्याचा चेहरा बघून स्वाती म्हणते "बाबा मी हेड नव्हतं म्हटलं तुम्ही चुकीचं ऐकलं. हेड प्रथम म्हणाला होता." असं बोलून स्वातीनी लहान भावाचा गालगुच्चा घेतला. तसं हसून प्रथम म्हणाला "मला माहिती आहे तूच नेहमी तडजोड करून मोठ्ठी ताई होते." यावर राघव खो खो हसू लागला.


दोघा मुलांना त्यांचं हसणं जरा जास्तच वाटलं.त्यांनी आजीकडे बघीतलं.आजी डोळ्यांनीच खूण केली.

राघवलाही  जाणवलं की आपण  खूप दिवसांनी मनमोकळं हसलो. 

"मुलांनो यारे माझ्या कुशीत या." दोघंही लगेच राघवला बिलगली."बाळांनो तुमची आई गेली त्या दु:खातून तुम्ही लवकर सावरलात. मलाच दु:खातून बाहेर यायला वेळ लागला. आता मी तुमच्याकडे पूर्ण लक्षं देणार.दोघांची आता परीक्षा जवळं आली आहे. तुम्ही चांगल्या रितीने पास झालात तर तुमच्या  आईच्या आत्म्याला शांती मिळेल." राघव त्या दोघांना कुरवाळत गदगदल्या स्वरात बोलला.


मुलंही राघवला घट्ट बिलगली.आज खुप दिवसांनी त्यांना त्यांचे बाबा भेटले होते.आई गेल्यापासून मुलांना राघव सतत दु:खातच दिसत असे. धड कधी बोलत नसे. दोघांनाही आपल्या बाबांची खूप दया येत असे पण काय करणार? शेवटी त्यांनीही बाबा बहुदा असेच वागतील असं गृहित धरून  आपल्या अभ्यासात स्वतः:ला गुंतवून घेतलं.

आज अचानक त्यांचे बाबा मुलांना पुर्वीसारखे भेटले.हे काम नक्कीच आजीने केलय याची मुलांना खात्री होती. मुलं इतकी आनंदीत झालेली बघून राघव मनोमन ओशाळला.

त्यांच्या मनात आलं की मुलं या दु:खद परीस्थितीतून जात असताना त्यांचे बाबा पण त्यांच्याबरोबर नव्हते. किती अन्याय झाला माझ्याकडून मुलांवर.आईनी आत्ता सावध नसतं केलं आपल्याला तर ...काय झालं असतं कोणास ठाऊक!

"मुलांनो आज आपण फिरायला जाऊ.बाहेरच जेऊ आणि तुम्हाला आवडतं नं तर रात्री आपण पत्ते खेळू.काय कसा वाटला माझा बेत?"

याहू….असं ओरडायचच मुलांचं बाकी होतं.


"आई तूपण चलायचं." राघव म्हणाला.

" हो आजी तूपण यायचं" स्वाती म्हणाली.

प्रथमनी आजीचा हात घट्ट धरत म्हटलं "आजी तू नाही आलीस तर आम्हीं पण जाणार नाही."


"बापरे….तू तर धाकच घातलास मला. येईन मी. बर का राघव आपण आता सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळण्याचा कार्यक्रम करायचाच.हे पक्कं."

"हो बाबा." प्रथम म्हणाला.

नंतर इतकं छान आनंदी वातावरण तयार झालं होतं की मघापर्यंत असलेल्या नकारात्मक क्षणांचं गाठोडे बांधुन केव्हाच बाहेर फेकल्या गेलं.ते कुणालाच कळलं नाही.


आईपण हसल्या. मनातच म्हणाल्या "सविता तुझ्या आठवणीतून मी राघवला बाहेर काढलं म्हणून रागाऊ नको. मुलांना त्याची खूप गरज होती.तू बघते आहेस नं कसे तिघं छान एकत्र आहेत.त्यांच्याबरोबर तुझ्या आठवणी तुझं अस्तीत्व म्हणून आहे.तुझं अस्तित्व या घरकुलात नेहमीच राहणार.काळजी करू नको.


सविता अगं तुझ्या आठवणींचा मेळा भरतो आपल्या घरी.चहा करतांना स्वाती नेहमी तुझं वाक्य अगदी रोज न चुकता म्हणते."स्वाती चहापत्ती घातल्यावर जरावेळ ऊकळावी.छान रंग येतो. नाहीतर चहा पांचट होतो."आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूत तुझी आठवण आहे. तुझं अस्तित्व आहे. एक गृहिणी म्हणून तू घराला जी शिस्त लावलीस तीपण किती छान पद्धतींनी मुलं ,राघव तिचं पालन करतात.

त्या ईश्वराला आम्ही आमच्या काळजाचा तुकडा काढुन दिला ग तुझ्या रूपानी. आमचं चौघांचं  अस्तित्व अपूर्ण आहे तुझ्याशिवाय. माझ्या म्हातारीचा तर तू श्वास होतीस. देवानं माझा श्वासच नेला.पण तुला वचन देते. मी स्वाती, प्रथम,राघव सगळ्यांची काळजी घेईन.तुझ्यासारखी काळजी घेणं जमेल का मला ?

आपल्या घरातलं तुझं अस्तित्व अबाधित आहे हे मात्र खरं"

मनातच बोलल्या तरी आईंना दम लागला.डोळे आपसूक वाहू लागले.आनंदात भिजणा-या तिघांना कळू नये म्हणून घाईघाईने त्यांनी पंदरानी डोळे पुसले.तेवढ्यात प्रथम ओरडला "आजी तयार हो."

" हो रे राजा तयार होते." आणि हसल्या.


आज सविताला जाऊन वर्ष झालं.तरी आम्हा सगळ्यांच्या मनात तिचं स्थान अढळ आहे आणि राहणार आहे. स्वाती,प्रथम छान टक्क्यांनी पास झाले.आई जिथे कुठे असेल तिथे खूष होईल या आनंदात मुलं आहेत. राघव पण बराच सावरला आहे. नोकरी व्यतीरिक्त मुलांना भरपूर वेळ देतो आहे. झोपताना मात्र सवितेशी मनातच बोलतो.मला माहिती आहे.त्यानी किती नाकारलं तरी.कारण मी राघवची आई आहे. सविता आता नसली तरी तिच्या अस्तित्वाची रांगोळी तिनी आमच्या सगळ्यांच्या मनात छान  काढली आहे. हेच आमचं समाधान आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy