Sunita madhukar patil

Inspirational Others

4.5  

Sunita madhukar patil

Inspirational Others

अनुकरण

अनुकरण

3 mins
483


भातुकलीच्या खेळात रमलेल्या श्रुतीला पाहून अंजली भारावून गेली. चहाचे घोट हळुहळु रिचवत ती प्रेमाने लेकीच्या एक एक बालसुलभ हालचालींना मनाच्या कॅमेरात टिपत होती.

छोटी श्रुती छान ओढणीची साडी गुंडाळून आईच्या मायेने हातातल्या बाहुलीची वेणी फणी करत होती आणि तिला मायेने भरवत होती. कुशीत घेऊन जोजवत होती. हे सगळं पाहून, " अरे !!! आपली लेक आता मोठी होऊ लागली आहे हा विचार अंजलीच्या मनात चमकून गेला आणि तिचे डोळे भरून आले.

एकदिवस ह्या इटुकल्या पिटुकल्या भातुकलीत रमणारी लेक खरोखरच्या संसारात रमून जाईल, या विचाराने ती शहारली. आपल्या लेकीला चांगलं शिक्षण, चांगले कपडेलत्ते, चांगलं आयुष्य द्यायचं. तिला काही कमी पडू द्यायचं नाही. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या या सगळ्या विचारात ती असताना तिनं पाहिलं की श्रुतीने खेळण्यातलं छोटसं जेवणाचं ताट नेऊन तिच्या जुन्या, मळकट बाहुलीसमोर आपटलं आणि म्हणाली, " गिळा आता... कधीपासून भुक भूक म्हणुन ओरडताय." श्रुतीचं असं वागणं पाहून ती दचकली. 

ती श्रुतीजवळ जवळ गेली आणि तिला विचारलं, " बाळा श्रुती हे तू आता काय केलंस."

" काय मम्मा?" तिने निरागसतेने विचारलं.

" हे जेवणाचं ताट असं आपटू नये बाळा. देवबाप्पा रागवेल ना?" तिने प्रेमाने तिला समजावलं.

" हो!!! मला देवबाप्पा रागावणार, पण मम्मा तू तर रोज आजीला असचं जेवण देतेस मग तुला पण देवबाप्पा रागावला. मी नाही देणार माझ्या सोनूच्या आजीला अस जेवण परत. तू सांग देवबाप्पाला मला रागावू नको म्हणून." ती तिच्या लाडक्या बाहुलीला कवेत घेत म्हणाली.

अंजलीकडे श्रुतीशी पुढे बोलायला काही शब्दच नव्हते. ती गप्प झाली. आज श्रुती खेळाखेळातच किती मोठी गोष्ट बोलून गेली होती याची जाणीव तिला झाली. आपण किती चुकत होतो. लहान मुलांच संगोपन म्हणजे फक्त महागातील महाग वस्तू त्यांना आणून देणे किंवा त्यांचे सारे योग्य, अयोग्य हट्ट पुरवणे, साऱ्या सुख सोयी त्यांच्या पायात आणून ओतणे. भौतिक वस्तू पुरवणे हीच काय ती अंजलीच्या नजरेत संगोपनाची परिभाषा होती. पण मुलांच्या संगोपनात त्यांची बौद्धिक विचारांची पातळी देखील कशी ऊंचावता येईल या दृष्टीने तिने कधी विचारच केला नव्हता. लहान मुलं खूप गोष्टी मोठयांच्या आचरणातून, त्यांच निरीक्षण करून शिकतात. त्यांचं अनुकरण करतात आणि तसंच वागतात. 

इतरांचे निरीक्षण करून व त्यांच्याप्रमाणे वागण्यामधून मुले समाजात कसे मिसळावे हे शिकतात. तसेच कशाप्रकारची वागणूक समाजात स्वीकारली जाते व कशाप्रकारची नाही हे देखील त्यांना समजते.

मुलाच्या वागण्याबोलण्यास व व्यक्तिमत्वास आकार व योग्य दिशा देण्यासाठी महत्वाच्या गोष्टी म्हणजे त्याच्या आसपासच्या मोठ्या माणसांचे व वयाने मोठ्या मुलांचे वागणे ही बाब पालकांनी लक्षात ठेवायला हवी. मुले इतरांच्या वागण्याचे अनुकरण करतात. पालकांनी आरडाओरडा किंवा मारहाण केल्यास मुले तसे वागायला शिकतात. मोठ्यांचे इतरांशी वागणे सौजन्याचे, आदराचे व संयमाचे असल्यास मुले त्याचे अनुकरण करून तसचं शिकतात.

मुलांना दुसऱ्याची भूमिका वठवणे आणि ढोंगीपणा करणे आवडते. हे देखील त्यास करू द्यावे कारण ह्यामधूनच त्यांना इतरांची विचारसरणी समजून घेण्यास मदत मिळते आणि चांगलं... वाईट काय? याची खात्री पटते.

श्रुतीच्या बोलण्याने अंजलीच्या डोळ्यात चांगलेच जळजळीत अंजन घातलं होतं. तिला तिची चूक उमगली होती. तिने तिची चूक सुधारून एक चांगली सुदृढ, निरोगी आणि संस्कारी पिढी घडवण्याचा प्रण घेतला.


© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational