ƦƲSӇƖKESӇ M KADAM PATIL

Drama Tragedy

4  

ƦƲSӇƖKESӇ M KADAM PATIL

Drama Tragedy

अंधार | short story | part 2.

अंधार | short story | part 2.

8 mins
458


☆☆ Read part 1 please visit my profile..

☆☆ भाग 1 वाचण्यासाठी प्रोफाईल ला भेट द्या..

part 2....

आज कधी नव्हे ते अनन्याला बसमध्ये बसायला जागा मिळाली होती. घरापासून मकरंदचे ऑफिस जवळ असले तरी अनन्याला मात्र दोन बसेस बदलून ऑफिस गाठावे लागे. घर जर भाड्याचेच घ्यावयाचे होते तर दोघांच्या सोयीने घ्यायला नको होते का असे अनन्याला कधी कधी वाटे. (आधी भाग 1 वाचा )

अनन्याने मोबाईलमधले फेसबुक पहावयास सुरुवात केली आणि ती थबकली. तिची कॉलेज फ्रेंड ईशानीच्या लग्नाचे फोटो, हनिमूनचे फोटो अपलोड केलेले होते. पैठणी नेसलेली, नवऱ्याच्या गळ्यात हार घालणारी, केरळच्या बॅकवॉटरच्या मधील बोटीत नवऱ्याबरोबर टायटॅनिकची पोझ देणारी ईशानी बघून अनन्याला थोडी असूया वाटली, पण' हनिमून लास्टस् ओन्ली फॉर अ वीक' या मकरंदच्या मख्ख प्रतिक्रियेवर ती निरुत्तर झाली. शेवटी असे आयुष्य जगण्याचा निर्णय तिनेच घेतला होता ना!

अनन्याने तिचा आणि मकरंदचा डबा भरला आणि ती खरकटी भांडी घासू लागली. लवकर घर सोडावे लागत असल्याने तिला कामवाल्या बाईची वेळ सांभाळणे शक्य नव्हते. मकरंदची अॉफिसमध्ये जाण्याची वेळ फिक्स नव्हती,पण आजकाल तो घरची कामं शिताफीनं टाळतो असं अनन्याला जाणवत असे.

'उद्या मम्मी आणि दादा घरी येणारेत रहायला', मोबाईल वरची नजर न काढता मकरंद सहज स्वरात म्हणाला आणि भांडी घासणारे अनन्याचे हात थांबले.

'काय?'तिने आश्चर्याने विचारले.'तू त्यांच्या संपर्कात आहेस?'

'अर्थात!'अजूनही मकरंदची नजर मोबाईलवरच स्थिर होती.

'मकरंद, अरे आपले काय ठरले होते, की घर आपले दोघांचेच असेल म्हणून, 'अनन्याने मकरंदच्या हातातून मोबाईल काढून घेतला.

'हो,मग मी कुठे नाही म्हणतोय?' आळस देत मकरंद म्हणाला.'ते काय कायमचे थोडेच रहायला येणार आहेत? मी एकुलता एक मुलगा आहे त्यांचा. त्यांच्याकडे मला बघायला नको? या शनिवारी सकाळी ते येतील आणि रविवारी संध्याकाळी परत जातील.'संवादाचा समारोप करावा तसा मकरंदने मोबाईल परत हातात घेतला.

अनन्या हतबुद्ध होऊन त्याच्याकडे बघत राहिली. स्वतःच्या आईवडीलांशी नियमित संपर्कात रहाणाऱ्या, त्यांना परस्पर घरी बोलावतांना अनन्याचे साधे मत विचारण्याचे साधे सौजन्यही न दाखविता तिला गृहीत धरणाऱ्या मकरंदचे हे रुप अनन्याला संपूर्णपणे अनोळखी होते.

'मला न विचारता तू त्यांना का बोलावले?'आवाजावर संयम ठेवत अनन्याने विचारले.

'त्यात काय विचारायचे?' मकरंद ज्या सहजतेने म्हणाला त्याने अनन्याच्या डोक्यात संतापाने तिडीक उठली.

'अरे पण आपलं ठरलं होतं ना, इंग्लिश मूव्ही, चायनीज रेस्टॉरंट मध्ये जेवण, मॉलमध्ये शॉपिंग?'

'सगळं कॅन्सल.माझ्यासाठी माझे मम्मी दादा , त्यांना खूष ठेवणे ही पहिली प्रायॉरिटी.'

'मला चालणार नाही.'अनन्या किंचाळली.'मी तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे पाश तोडले आणि तू मात्र.....'अनन्याला पुढे बोलवेना.अॉफिसची वेळ होत आली.सिंकमधील अर्धवट घासलेली भांडी तशीच टाकून ती तयारी करायला धावली.

अॉफिस मध्ये काम करतानाही अनन्याच्या कानात मकरंदचे शब्द घुमत होते.'माझे मम्मी दादा माझी पहिली प्रायॉरिटी!' मग मी माझी रक्ताची नाती तोडून आले त्याचे काय?

अनन्याचा उतरलेला चेहरा पाहून तिचा कलिग उन्नीकृष्णन तिच्यासाठी कॉफी घेऊन आला.गरम कॉफीचा घोट पोटात जाताच अनन्याला जरा तरतरी आली.'थॅंक्स',तिने उन्नीकृष्णनकडे पाहून स्मित केले.

घरी येण्यासाठी गर्दीत घुसून बसमध्ये शिरकाव केला आणि अनन्याच्या लक्षात आले,आज आपण मकरंदला एकदाही फोन केला नाही.तिने एका हाताने बसचे हॅंडल पकडून मकरंदला फोन लावला.नुसतीच रिंग वाजत राहिली.

किचनमधील सिंकमधील भांड्यांचा ढीग तसाच पडलेला पाहून अनन्याच्या डोक्यात संतापाने तिडीक उठली. कितीतरी वेळा मकरंद उशिरा अॉफिसला जातो,वर्क फ्रॉम होम करतो मग मला थोडी मदत केली तर काय झाले? अनन्याने तणतणतच कपडे बदलले आणि सिंकमधील भांड्यांचा पसारा उपसायला सुरुवात केली.

रात्रीचे दहा वाजले तरी मकरंदचा पत्ता नव्हता. फोन स्वीच ऑफ लागत होता. आता मात्र अनन्याचे धाबे दणाणले. अस्वस्थपणे ती मोबाईल हातात धरून बसून राहिली. काय झालं असेल? कुठे गेला असेल? अनन्या सैरभैर झाली. रात्रीचे बारा वाजले. अनन्याला असं एकटं घरात बसवेना. शेवटी मनाचा हिय्या करुन बाबांना फोन लावला. रिंग वाजत राहिली नुसती. मग आईला फोन लावला. आईचा 'हॅलो' असा आवाज ऐकला आणि अनन्याच्या डोळ्यात पाणी आले. गळा भरुन आला. तिच्या तोंडून शब्द फुटेना.

'हे बघ अनन्या, आम्हाला फोन करत जाऊ नकोस. आमची झाली तेव्हढी शोभा बस झाली. आणि कृपा करून तनयाला फोन करू नकोस. तुझ्यामुळे तिला सासरी किती सहन करावं लागलं ते आमचं आम्हाला माहीत!'आईने फोन बंद केला.

अनन्या सुन्नपणे बसून राहिली.मकरंदबरोबर सहजीवन जगताना आज प्रथमच तिला असहाय्य , अगतिक वाटलं.आणि मकरंद हेच आपले सर्वस्व मानणाऱ्या अनन्याला पहिली ठेच लागली.

सकाळी मकरंदचा फोन सुरू झालेला पाहून अनन्याने 'आय अॅम सॉरी'असे व्हॉट्स ॲप वर टाकले. नाहीतरी काय पर्याय उरला होता तिला?

मकरंदचे मम्मी दादा आले. अनन्या त्यांना आधीपासून ओळखत होतीच. एखाद्या कजाग सासूप्रमाणे मम्मींनी घरभर फिरुन निरीक्षण केले. अनन्याचे एव्हढेसे घर, इतरांना त्या घरात स्थानच नव्हते. दोघेही दिवसभर नोकरीसाठी बाहेर रहाणार मग मोठ्या घराची जरुरच काय असा युक्तिवाद मकरंदने केला होता. अनन्याचा शनिवार, रविवार किचनमध्ये पाहुण्यांची उस्तवार करण्यात गेला आणि रात्र हॉलमधील जमिनीवर सतरंजी टाकून झोपण्यात. मम्मीदादांना बेडरूम बहाल करून मकरंद सोफ्यावर झोपला हॉलमधल्या.

'लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये दोघेही समान पातळीवर असतील', मकरंदचे हे शब्द आठवत अनन्या झोपेची आराधना करू लागली.

अनन्या अॉफिस मध्ये, मित्र मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सहभाग घेण्याचे टाळत असे.एकतर घरची कामं, दोन बसेस बदलून अॉफिसची वेळ गाठणं या तारेवरच्या कसरतीत ती अगदी दमून जात असे.

घरी असताना आईच्या हातचा तयार डबा घेऊन जाताना जाणवत नसे, पण संसारात पडल्यापासून....संसार? नाही.मकरंदच्या मते हे तर गोंडस सहजीवन होतं. कदाचित या रुढीबाह्य जीवनपद्धती मुळे तर समाजात मिसळणे टाळतो का? शिवाय मन मोकळं करणार तरी कोणाकडे? डरती हूं आजकल किसीको अपने राज बताने में क्योंकि लोगोंको वक्त नही लगता किसीके दर्दका मजाक बनानेमें!

आज ऑफिसमध्ये सेंड ऑफ पार्टी होती कुणाची तरी.बरं वाटत नाहीये असं सांगून अनन्या सटकली. एटीएममधून पैसे काढले. डीमार्टमधून महिन्याचे सामान भरायचे, आठवडाभराच्या भाज्या आणायच्या.... अनन्याच्या डोक्यातील कामाची यादी संपत नव्हती.मकरंद आपणहून पैसे देत नसे आणि अनन्याला ते मागणे उचित वाटत नसे.मग काय, अनन्याचा अर्धाअधिक पगार घरखर्चात संपू लागला. घरी आली तेव्हा अनन्याला हसण्याचे आवाज येत होते. मकरंद आणि सुमेधला बघून अनन्याला आश्र्चर्य वाटले. सुमेधजीजू तनयाचा नवरा. मकरंदचा मावसभाऊ. दोघेही बीअरच्या बाटल्या समोर घेऊन बसले होते.

'अरे वा, अनन्या आज लवकर घरी आलीस! आता असं कर, आमच्यासाठी गरमागरम कांदाभजी कर.'मकरंदने फर्मान सोडले.

'काय सुमेध,बीअरबरोबर कांदाभजी एकदम फक्कड बेत होईल ना?'

'हो हो नक्की,'बीअरचा घोट घेत अनन्याला नखशिखांत न्याहाळत सुमेध म्हणाला.'साली तो आधी घरवाली होती है...मग तिच्या हातची भजीच काय, काहीही चालेल!'

सुमेधचे तिला एकटक न्याहाळणे, डोळे मिचकावत सूचक बोलणे.... अनन्याला त्याचे हे रुप अगदी नवखे होते. अनन्या किचनमध्ये सटकली.

'सुमेध म्हणत होता, तुझ्या बाबांनी चांदीचं ताट दिलं अधिकमासाचं!' मकरंद मोबाईलशी चाळा करता करता म्हणाला.

'मग?'अनन्याने कणिक भिजवता भिजवता त्याच्याकडे पाहिले.

'मजा आहे बुवा सुमेधची!ओवाळलं काय, अनारसे घालून चांदीचं ताट काय!'

'मग? करतोस का लग्न माझ्याशी? जावई म्हणून तुझं सुद्धा कौतुक होईल, तुलापण देतील चांदीचं ताट! 'मकरंद चपापला.' अगं तुझी गंमत करत होतो' म्हणून सटकला. अनन्या विषण्णपणे हसली. वैवाहिक आयुष्याचे सगळे फायदे पाहिजेत पण जबाबदारी, कमिटमेंट नको याला. आजकाल मकरंदच्या जागी तिला मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगाच दिसत असे.

अनन्या अंथरुणावर पडली खरी पण तिला सुमेधचे तिला एकटक न्याहाळणे, सूचकपणे बोलणे आठवत होते. आजपर्यंत सुमेध कधी आपल्याशी असं वागला नव्हता! मग आज? अनन्या दचकून अंथरुणात उठून बसली. आपला कलिग उन्नीकृष्णनही आपल्या अगदी जवळ उभा राहून कंप्युटरमध्ये डोकावतो, कॉफी ऑफर करताना बोटांनी स्पर्श करतो ते हेतुपुरस्सर? मी काय त्याला 'तशी' मुलगी वाटले? अनन्याचे डोळे भरून आले. मकरंद शेजारी गाढ झोपला होता. मंद स्वरात त्याचे घोरणे सुरू होते. अनन्याच्या मनात चाललेली उलथापालथ त्याला संपूर्णपणे अज्ञात होती. नाहीतरी कळूनही त्याच्या वागण्यात काय फरक पडणार होता?

जब इन्सानकी जरुरत बदल जाती है तो उसका बर्ताव भी बदल जाता है!

अनन्या ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होती. आज तिने टिकली लावली, खोटे मंगळसूत्र घातले. मंगळसूत्र आणि टिकली हे स्त्रीच्या गुलामगिरीचे लक्षण नसून लंपट पुरुषांपासून संरक्षण मिळण्याचे साधन आहे असे आजी म्हणत असे.

उम्र इतनी भी नहीं थी जितने सबक सीख लिए हमने!

नेहमीप्रमाणे मकरंदचे मम्मी दादा शनिवारी आले. 'उद्या लवकर जायचंय बरं का आम्हाला, तनयाचे डोहाळे जेवण आहे ना', पोळ्या लाटणारे अनन्याचे हात थांबले. ताईला बाळ होणार? अनन्याचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले. 'तुला पण बोलावणं आलं असेलच', मम्मींनी खोचकपणे विचारले. अनन्याचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते.

अनन्याने छानशी साडी नेसली, गळ्यात नाजूकसा हार घातला. मम्मीदादांबरोबर डोहाळे जेवणासाठी जाण्यासाठी ती तयार झाली. सख्ख्या बहिणीच्या फंक्शनला जाण्यासाठी आमंत्रण कशाला? तिला वाटले. हॉलच्या दारात बाबा पाहुण्यांचे स्वागत करत होते. इतक्या दिवसांनी बाबांना पाहून अनन्याचा चेहरा फुलला. बाबा मम्मी दादांचे स्वागत करण्यास पुढे झाले. अनन्याकडे त्यांची नजर गेली आणि त्यांच्या कपाळावर आठी उमटली.

मम्मी दादा स्टेजसमीप गेले, पण अनन्या मात्र कोपऱ्यातील सीट पकडून स्टेजवरील लगबग न्याहाळू लागली. हिरवी साडी नेसलेली, फुलांची आभूषणे ल्यालेली तनयाताई, तिच्या अवतीभवती उत्साहाने वावरणाऱ्या आई, आजी, ताईच्या सासूबाई...

'अगं बाई, अनन्या तू?'कॉलनीतल्या 'भोचक भवान्या' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चौकडीने अनन्याला घेरले.'मग आता तुझे पेढे कधी?'एकीने विचारले.'अगं आधी लग्नाचे लाडू तर मिळू देत', दुसरी खिदळली.एव्हाना अनन्या आल्याची कुजबुज हॉलमध्ये पसरली होतीच!सर्वांचे लक्ष स्टेजवरून हटले आणि अनन्याकडे वळले.अनन्याला ओशाळवाणे झाले.ती पटकन उठली आणि हॉलबाहेर पडण्यासाठी वळली.

'लग्नाचे लाडू खायला बोलव बरं का आम्हाला',एकजण नाटकीपणाने म्हणाली आणि दुसरीने तिला टाळी दिली.

रिक्षात बसल्यावर पुन्हा पुन्हा भरुन येणारे डोळे पुसत अनन्या सुन्नपणे बसली होती.ती चौकडी आपली टिंगल करताना खुदूखुदू हसत त्यांना प्रतिसाद देणाऱ्या मम्मींना आठवत.

पण मम्मीना तरी दोष का द्यावा? मकरंदच्या घरात माझे स्थान नक्की कोण म्हणून आहे?

पत्नी म्हणून? नाही! मैत्रीण 'म्हणून?पण मैत्रिणीला कोणी exploit करत नाही.मग नक्की कोण?एक रखेल?

अनन्याला दरदरून घाम फुटला.

मनाप्रमाणे जगावयाचे

किती छान बेत होते!

कुठेतरी मी उभीच होते, कुठेतरी दैव नेत होते!

अनन्याने किचनमध्ये एक नजर फिरवली. मकरंदसाठी स्वयंपाक करून ओट्यावर झाकून ठेवला होता. काल रात्रभर खूप काम असल्याने तो ऑफिसमधून पहाटे आला होता आणि आता गाढ झोपला होता. अनन्या ऑफिसला जाण्यासाठी पायात चप्पल घालणार तोच मोबाईलची रिंग वाजू लागली. मोबाईलच्या रिंगचा आवाज ऐकून अनन्या आश्र्चर्यचकित झाली. तिच्या किंवा मकरंदच्या मोबाइलच्या रिंगटोनपेक्षा वेगळाच आवाज होता. आवाज मकरंदच्या लॅपटॉपच्या बॅगेतून येत होता. अनन्याने घाईघाईने लॅपटॉपची बॅग उघडून मोबाईल काढला.

'हाय मॅक, कितनी देर लगा दी तुमने फोन उठानेमे!' एक मुलगी लाडे लाडे बोलत होती. 'कल रात कितना मजा आया ना! आज रात भी आओगे ना?'

अनन्या जमिनीला खिळून उभी राहिली.

'हॅज दॅट बिच लेफ्ट फॉर द ऑफिस?' त्या मुलीच्या प्रश्नावर अनन्याच्या तोंडून फक्त 'हॅलो' एव्हढाच शब्द बाहेर पडला. त्याबरोबर 'ओह शिट' असे उच्चारुन त्या मुलीने गडबडून फोन ठेवून दिला.

संताप, अगतिकता, फसवले गेल्याची भावना याने अनन्याचे मन भरून गेले. तिरीमिरीने ती बेडरुममध्ये गेली आणि तिने गाढ झोपलेल्या मकरंदला गदागदा हलवले.

'ही कोण मुलगी आहे जिच्या बरोबर तू ऑफिसच्या नावाखाली रात्रभर राहिला होतास?' मकरंदसमोर मोबाईल नाचवत अनन्याने विचारले. संतापातिरेकाने तिचा आवाज चिरकला होता. 'सुमोना चॅटर्जी नाव आहे तिचं, माझ्या ऑफिसमध्ये आहे ती.'

मकरंदच्या निर्लज्ज खुलाशाने अनन्या रागाने बेभान झाली. 'तुला काही लाजलज्जा? ऑफिसच्या कामाच्या नावाखाली खुशाल त्या मुलीकडे रहातोस? मी अजिबात खपवून घेणार नाही तुझे असले धंदे. तिला कळवून टाक मी येत नाही म्हणून!'

अनन्या आणखीही काही बोलणार होती पण तिची बस चुकली असती. रागाने धुमसतच ती घराबाहेर पडली.

अनन्याचे ऑफिसच्या कामात लक्षच लागेना. असंख्य चुका होत होत्या. उन्नीकृष्णनने मदत हवी आहे का म्हणून विचारलेही, पण तिने त्याला ताबडतोब उडवून लावले. सभ्य माणसांचा मुखवटा घालून वावरणाऱ्या या लांडग्यांचा तिला वीट आला होता.

दोन बसेस बदलण्याचा सव्यापसव्य करून अनन्या घरी आली व लॅच की ने तिने दार उघडले. घरात सामसूम होती. अनन्याला बरेच वाटले. आजचा दिवस तरी मकरंदचे तोंड पहाण्याची तिची इच्छा नव्हती. तिने कॉफी केली आणि हॉलमध्ये बसून घुटके घेऊ लागली. समोरच्या टीपॉयवरील कागदाकडे तिचे लक्ष गेले. कसला कागद म्हणून तिने तो उचलला.

'मी हे घर सोडून जात आहे. घरमालकाकडे वर्षभराचे भाडे भरले होते ते पुढच्या महिन्यात संपेल. नंतर तू तुझी सोय बघ.', मकरंदने लिहीलेली चिठ्ठी अनन्याच्या हातातून गळून पडली. सारे घर तिच्याभोवती फिरु लागले...


thanks for reading .☺

To read part 1 of this story 👇

https://storymirror.com/read/story/marathi/z9yoxh69/andhaar-short-story-part1/detail


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama