STORYMIRROR

Krishna Shuchi

Drama Horror Thriller

3  

Krishna Shuchi

Drama Horror Thriller

अकल्पित

अकल्पित

10 mins
149

अत्यंत महत्वपूर्ण सूचना :-


सदर कथेचा उद्देश हा निव्वळ शुद्ध-मनोरंजनासाठी असून त्याद्वारे समाजात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरविण्याचा लेखिकेचा उद्देश नाही, हे कृपया वाचकांनी जाणावे.

कथेतील सर्व पात्रे, स्थळे आणि घटना या पूर्णतः काल्पनिक असून केवळ कथेची आवश्यकता म्हणून त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे, त्यांचा वास्तवातील कोणतीही जीवित किंवा मृत व्यक्ती, स्थळे अथवा घटना यांच्याशी संबंध नाही. तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव असून, लेखिकेच्या परवानगीशिवाय सदर कथा-

१) अन्य व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहांच्या नावे प्रकाशित केल्यास,

२) कथेचा गैर अथवा अनधिकृत वापर केल्यास,

३) सदर कथा अन्य प्रकाशनीय माध्यमांमार्फत प्रदर्शित केल्यास,

संबंधित व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया वाचकांनी दखल घ्यावी, ही नम्र विनंती. 


"श्री... डबा भरलास का बॅगेत ?", आईने किचनमधून येत विचारलं त्यावर श्रीधरने हो म्हणून मान डोलवली. चार्जिंगला लावलेला मोबाईल काढून खिशात टाकला आणि बॅगेत सगळं सामान व्यवस्थित भरल्याची खात्री केली.


"आई येतो गं... पोहोचल्यावर फोन करतो... काळजी करू नकोस.. आणि सगळी औषधं वेळेवर घे ", म्हणत श्रीधर आईच्या पाया पडून घाईघाईने घराबाहेर पडला.


"नीट व्यवस्थित जा रे, आणि... " आईचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच श्रीधर एक मजला उतरून गेला होता.


"हा आणि ह्याची गडबड..." सुस्कारा सोडत आईने त्याच्यामागे दार लाऊन घेतले. 


जिना उतरतांना श्रीधरने एकवार घड्याळावर नजर टाकली तर काटे पार कुठच्या कुठे पळाले होते. 'अरे बापरे, खूपच उशीर झाला आज..' म्हणत तो आणखी वेगात खाली उतरला. खालीच ड्रायव्हर गाडी घेऊन थांबला होता.


"काका चला लवकर, खूपच उशीर झालाय आपल्याला..." म्हणत श्रीधरने घाईघाईने गाडीत बॅग टाकली आणि आत येऊन बसला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि वेगात एअरपोर्टच्या दिशेने घेतली... 


'श्रीधर भावे' पुण्यात राहणारा एक हुशार इंजिनियर तरुण... लहानपणीच वडिलांचं छत्र हरवल्याने त्याचं संपूर्ण पालनपोषण आणि शिक्षण त्याच्या आईनेच पूर्ण केलं. पुण्याच्या मध्यवर्ती भागातच एका आलिशान फ्लॅटमध्ये तो आणि त्याची आई राहत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच श्रीधर एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागला आणि दोन-तीन वर्षातच त्याने कामाचा चांगला रिपोर्ट देऊन बढतीही मिळवली.

आज त्याला कंपनीच्याच एका नव्या प्रोजेक्टच्या कामासाठी नागपूरला जायचं होतं. कंपनीचा एक नवीन प्लांट नागपूरजवळील एका लहानश्या खेड्याजवळ, अर्थात माणगाव येथे उभारला जाणार होता आणि त्या प्रकल्पाची सगळी सूत्रे श्रीधरच्या हाती सोपविण्यात आली होती. प्रत्यक्ष कामास आणि कारखान्याच्या बांधकामास सुरुवात होण्यास अजून एक-दीड महिना होता मात्र त्यापूर्वीच्या साईट विजिटिंगसाठी आणि उरल्यासुरल्या काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आज श्रीधरला नागपूर दौरा करावा लागणार होता. दोन-तीन दिवसांचा मुक्काम असल्यामुळे त्याने तेवढ्यापुरते सामान पॅक करून ठेवले. रहाण्या-खाण्याची सोय साईटपासून जवळच असलेल्या एका लॉजमध्ये झाली होती त्यामुळे 'श्रीधरच्या जेवणा-खावणाची सोय कशी होणार' ही आईची चिंताही मिटली होती. सकाळी १०.३० वाजताचे त्याचे नागपूरला जायचे विमानाचे तिकीट कंपनीनेच बुक केले होते आणि एअरपोर्टपर्यंत सोडायलाही कंपनीचीच गाडी येणार होती.

वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असणाऱ्या श्रीधरला मात्र आदल्या दिवशीचे जागरण आणि कामाचे टेंशन यामुळे सकाळी उठण्यास बराच उशीर झाला आणि पर्यायाने पुढच्या सगळ्याच वेळापत्रकावर पाणी फिरलं...


चौकाला वळसा घालून गाडी एअरपोर्टच्या दिशेने वळली... 


"येस ऑफकोर्स सर, आय विल डेफीनेटली लुक इंटू दॅट... ओके सर", म्हणत श्रीधरने फोन कट केला आणि खिशात ठेवला. बाहेर बघितलं तर एअरपोर्ट नजरेच्या टप्प्यात आलंच होतं.


"साहेब, आलं एअरपोर्ट", म्हणत ड्रायव्हरने गाडी थांबवली. एका हातात सामानाची बॅग आणि दुसऱ्या हातात कंपनीची बॅग घेऊन श्रीधर घाईघाईने उतरला. तो आत गेल्यानंतर ड्रायव्हर गाडी माघारी फिरवून निघून गेला. लगोलग आत प्रवेश करत त्याने सर्व बाबींची पूर्तता केली चेक इन ची प्रक्रिया होईपर्यंत १०-१५ मिनिटे वेळ गेला. अखेर तो विमानात येऊन बसला. नागपूरला पोहोचायला आता किमान तास-दोनतास तरी लागणार होते. तिथून पुढे कंपनीचीच गाडी त्याला एअरपोर्टला घ्यायला येणार होती आणि त्याच गाडीने तो माणगावला पोहोचणार होता. तो साधारण एक-सव्वा तासाचा प्रवास असणार होता. श्रीधर मनातल्या मनात सर्व वेळेची आखणी करत होता तेवढ्यात विमानात टेक-ऑफची घोषणा झाली. विमानाने उड्डाण घेतले तसे श्रीधरने एक सुस्कारा सोडला. 'आता जराच वेळेचा विसावा आणि पुन्हा सगळ्या कामांची रांग...', त्याच्या मनात विचार येऊन गेला.

डोक्यातील असंख्य विचारांच्या गर्दीला एक एक करून हटवत त्याने मन शांत केलं. शांतपणे डोळे मिटले अन् सीटवर मान टाकली. डोळ्यांपुढे फिरणारी विचारांची रांग आता हळूहळू धूसर होत गेली अन् अखेरीस संपून गेली...


"तो येणार.... आज तो नक्की येणार.... केलेल्या असीम पापांची फळं भोगणार.... तो..तो येणार.... न..न..नव्हे... तो तो...शुशsss...शुशsss.... तो...तो....आलाय....!! खिs खिs खिs...." भयंकर आणि कर्कश्य अश्या आरोळ्या 'त्याच्या' चारही बाजूंनी सबंध आसमंतात घुमत होत्या.

एका झपाट्यात ओढून भक्ष्याला गिळंकृत करतील अश्या विशाल विखारी वृक्षांनी वेढा दिलेल्या त्या भयाण जंगलात 'तो' आला तरी कसा हे कळायला मुळी कुठलाच मार्ग दिसत नव्हता. गर्द वृक्षांचा अन् चित्रविचित्र पाना-वेलींचा खडा पहारा असणाऱ्या त्या गर्द रानाच्या मधोमध पसरलेल्या एका विस्तीर्ण मोकळ्या पठारावर तो येऊन पडला होता. अवतीभोवती अनामिक पण पाशवी अश्या भयाण वादळाने त्याला चहू-बाजूंनी घेरून टाकले होते. त्याच महा-वादळाच्या अष्टपादाप्रमाणे वळवळणाऱ्या लाटांमधून असंख्य काळ्या, सैतानी सावल्या मोठमोठ्याने किंचाळत 'त्याच्या' मृत्यूची जणू नांदीच गात होत्या. सबंध आसमंतात नकारात्मकतेने उच्चांक गाठला होता.

भयंकर गर्भगळीत झाला होता तो''..!! डोळे भीतीने रक्तासारखे लाल झाले होते, घसा कोरडा पडून ठणकायला लागला होता. सर्वांगात अनामिक असा विषारी ज्वर पसरून अंग पूर्णपणे बधिर पडत चाललं होतं. शरीर तर दूरच पण भीतीने मनाचेच इतके अधःपतन झाले होते की तोंडातून शब्द तर दूरच पण मेंदूतही एखादा विचार जन्म घेऊ शकत नव्हता. काहीही करून इथून सुटका मिळवणं महत्वाचं होतं ही भावना 'त्याच्या' मनाला सतत ओरबाडून टाकत होती. कशीही हालचाल करून या भयाण नरकातून बाहेर पडणं भाग होतं. नाहीतर अवतीभोवती घोंगावणारं हे भयाण वादळ काहीच क्षणांत आपल्या अस्तित्वाला निरस्तीत्वित करेल ही प्रचंड भीती उरात दाटून येत होती. विचार करण्यासाठी मेंदू जारी साथ देत नसला तरी मन मात्र भयंकर भावनांचे वार सहन करून जबर जखमी झालं होतं...


इथून काहीही करून सुटकेचा मार्ग शोधायला हवा ही भावना अखेर मनात पक्की झाली आणि मेंदूची विचारचक्रे पुन्हा भानावर आली. दुप्पट वेगाने कार्य करू लागली. त्याने उठून उभे राहण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला. कुठल्यातरी अनामिक शक्तीने जखडून ठेवल्यासारखं झालं त्याला. मेंदूच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी शरीराचे कुठलेही इंद्रिय त्याला साथ देईनात. कितीही विचार केला, मेंदू पोखरला तरी आपण कुठे आहोत, ही जागा काय आहे आणि आसमंतात चारही दिशांना भटकणारं हे भयाण काय आहे याची त्याला कल्पनाच येत नव्हती. काही मिनिटांच्या स्थिरतेनंतर त्याने पुनः एकदा मेंदूवर ताण दिला. यावेळी मात्र विचारांच्या कड्या नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्या अन् एकमेकांत जुळल्या जाऊन एक-एक स्मृतिशृंखला आखली जाऊ लागली. "विमान.. विमान... एअरपोर्ट.. ना.. नागपूर..! हो हो..!! मी तर प्लेनमध्ये होतो ना..! म् मग इथे क..क.. कसा काय आलो...??!" अखेर ती संपूर्ण स्मृतिरेखा मेंदूने त्याच्यासमोर मांडून दिली. त्या विचाराने मात्र त्याच्या कपाळावर क्षणात घर्मबिंदू जमा झाले. हो...तो 'श्रीधर' होता. न जाणो नियतीच्या कुठल्या दुष्टचक्रात की आणखी कुठल्या अगम्याच्या उदरात येऊन फसला होता... आपण इथे कसे काय आलोय आणि ही जागा नक्की काय आहे हा विचारच आता त्याच्या मेंदूवर स्वार झाला...


आसपासची उंचच उंच उभी असणारी अजस्त्र झाडे आता घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळे आणखीनच गदा-गदा हलू लागली नव्हे सैतानी नृत्यच करू लागली. न जाणो त्यांतील कुठलं झाड हिंस्त्र श्वापदासारखं अंगावर झेप घेऊन त्याचा घास घेईल हे सांगता येत नव्हतं. चारही दिशांनी भयंकर अश्या काळोखाने आसमंत झाकोळायला सुरुवात केली होती...

'तो आला.... मालक, तो आला.... शिक्षा द्या त्याला मालक....धरा त्याला... गिळून टाका त्याला....', पुनःएकदा काळजाला चिरून टाकणारी भयंकर अमानवी अशी गर्जना आसमंतात घुमली. ती भयंकर गर्जना ऐकून मात्र श्रीधर चांगलाच हादरला... सर्व बाजूंनी आक्रमण करत येणारं हे वादळ आपला घास घेणार ही भावना त्याच्या सबंध उरात दाटून आली... त्या कर्कश आरोळ्यांना आता आणखीनच उधाण आलं... जणू कुठल्यातरी अतिमहा पाशवी शक्तीचे तिथे आगमन होणार होते आणि तिच्याच स्वागतासाठी या असुरांकडून भयंकर आरोळ्या देऊन अत्यानंदचा उच्चांक गाठला जात होता. कुणीतरी एखाद्या तुच्छ किटकाला आपटून टाकल्यासारखा जमिनीवर पडलेला श्रीधर आता मात्र अंगात असल्या-नसलेल्या सर्व शक्तिनिशी उठून उभा राहिला. काहीही करून इथून सुटका करून घेणं भाग होतं. परंतु सुटकेचे सर्वच मार्ग जणू बंद झाल्यासारखे दिसत होते. चारी दिशांनी दाटून येणारा काळोख, हे घोंगावणारं भयाण वादळ आणि सबंध आसमंत व्यापून टाकणाऱ्या अन् साक्षात मृत्यूला आमंत्रित करू पाहणाऱ्या या कर्कश आरोळ्या... हाच अंत आहे... इथेच सर्व संपणार आहे....मृत्यू.... साक्षात मृत्यू.... श्रीधरच्या मनात विचार आला... अचानक डोळ्यांसमोर समिधा, परेश, विजूकाका यांचे चेहरे येऊ लागले अन् हळूहळू डोळ्यांत जमा होणाऱ्या अश्रूंत ते चेहरे विरूनही जाऊ लागले. केलेल्या घोर पातकांच्या पश्चातापाची जीवघेणी भावांना अश्रू-रूपातून डोळ्यांतून बरसू लागली. आपल्याला हे काय होतंय हेच श्रीधरला कळेना... मनात अचानक माजलेला भावनांचा कल्लोळ त्याला आवरताच येईना... घडून गेलेल्या, नव्हे श्रीधरनेच घडवून आणलेल्या त्या कृष्ण-घटनांच्या स्मृति त्याच्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागल्या. प्रेमाच्या नावाखाली त्याने समिधाची केलेली फसवणूक, गेल्या वर्षी कंपनीत झालेल्या पैश्यांच्या अफरा-तफरीत मुद्दाम त्यानेच अडकवलेलं परेशचं नाव आणि त्यामुळे त्याची गेलेली नोकरी, वडीलोपार्जित जमिनीचा सगळा हक्क बळकावण्यासाठी स्वतःच्या सख्या चुलत्यांची, अर्थात विजूकाकांच्या खुनाची दिलेली सुपारी या सर्व कृष्णस्मृती त्याच्या मनःपटलावरून पुनःपरावर्तित होऊ लागल्या. कितीही गाडून टाकण्याचा प्रयत्न त्याने केला तरी पुन्हा पुन्हा उफाळून वर येऊ लागल्या. आपण केलेल्या या असीम दुष्कृत्यांच्या प्रायश्चित्ताची आता हीच अंतिम वेळ आली आहे, ही भयंकर भावना मेंदूत, मनात शरीराच्या नसानसांत प्रचंड उत्पात माजवू लागली. श्रीधर पार वेडापीसा झाला. आपल्या पापांची शिक्षा देणारा शासक आता समीप येऊन ठेपला आहे, या अनामिक जाणिवेने त्याला भयंकर घाम फुटला... मनाचा एक-न-एक कंगोरा पार नियंत्रणाच्या बाहेर गेला...


"धरा त्याला मालक.... सोडू नका या पाप्याला... ठेचा त्याला मालक ठेचा एकदाचा.... ठेचून टाका....!!", चारी बाजूंनी सैतानी अस्तित्वाचा नंगानाच घातलेल्या त्या कर्कश आरोळ्यांनी आता मात्र आपल्या सर्वशक्तीचा उच्चांक गाठला. समीप येऊन ठेपलेल्या त्या भयाण वादळातून तीच कर्कश गर्जना करणाऱ्या असंख्य भुकेल्या पाशवी काळ्या सावल्या श्रीधरभोवती एखाद्या वावटळासारख्या घुमू लागल्या. भूक...भयंकर भूक होती त्या प्रत्येक सावलीच्या नजरेत... आणि श्रीधरच त्यांची ही असीमित भूक आज शांत करणार होता, अर्थात त्यांचा बळी ठरणार होता... त्या असंख्य सैतानांना पाहून श्रीधरची बोबडीच वळली... आपला अंत जवळ आला आहे याची पूर्ण खात्री झाली...


"आवळला.... फास आवळला.... पाप्या... आता तू सुटू शकणार नाहीस... न्याय होणार... आज न्याय होणार.... पापांचा विनाश होणार.... खिs खिs खिs....", त्या सैतानी सावल्यांनी पुनः एकदा गर्जना केली. ती ऐकून तर श्रीधर पुरता गर्भगळीत झाला. भयंकर भीतीने त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटेनसा झाला. चेहरा भीतीने लालबुंद झाला... आजूबाजूला वेगाने वाहणाऱ्या त्या भयंकर पिशाच्चांनी आता श्रीधरला जखडून ठेवायला सुरुवात केली. पाय, हात धड एक एक करत आक्रसले जाऊ लागले. स्वतःच्या हालचालींवर असलेलं त्याचं सगळं नियंत्रण नाहीसं होऊ लागलं. अतिमजबूत अश्या दोरखंडाने एखाद्या कोंबडयाचं नाजुक मानगुट एका क्षणात पिरगळून टाकावं तसं श्रीधरचं शरीर पिरगळलं जाऊ लागलं... 


"व..व..वाच्... वाचवा, कुणीतरी मला वाचवा...!!!", महत्प्रयासांनी त्याच्या तोंडून कसेबसे शब्द फुटले आणि मग मात्र तो बेंबीच्या देठापासून ओरडला... "क क कुणीतरी मला वाचवा....ह हे हेल्प मी...!!", शरीराच्या वेदना सहन न होऊन तो कळवळून ओरडला...


"आता तुला कुणीही वाचवू शकणार नाही अघोर पाप्या... साक्षात 'मणी'च्या दरबारात होणाऱ्या न्यायाला खुद्द तो सृष्टीकर्ताही ललकारू शकत नाही... तू असाच तडफडून तडफडून मरणार... केलेल्या सर्व पापांची शिक्षा इथेच भोगणार..!! खिs खिs खिs...!", छद्मी हसत एकच कर्कश आवाजात त्या सर्व काळ्या सावल्या श्रीधर भोवती नाचत किंचाळल्या...


श्रीधरच्या डोळ्यापुढे वेदनेने अंधारी येऊ लागली... पुढचे काहीच क्षण तो प्रचंड सैतानी तांडव सुरू राहिला आणि अचानक एका क्षणाला अगदी पूर्ण शांत झाला. श्रीधर भोवती आवळलेला तो सैतानी फास क्षणात विरळ होऊ लागला. इतका वेळ जखडून ठेवलेलं श्रीधरचं शरीर अचानक सुटका झाल्यामुळे जमिनीवर कोसळलं. एका क्षणात काय घडले हेच त्याला कळले नाही. डोळ्यांपुढे आलेली अंधारी हळूहळू नाहीशी झाली आणि काही क्षणांनी तो भानावर येऊ लागला. एकाचवेळी शेकडो सर्पांनी भयंकर विषारी असा दंश द्यावा ती भयंकर वेदना श्रीधरच्या अंगाअंगात संचार करू लागली...

त्या प्रचंड सैतानी सावल्या श्रीधरपासून वेगाने होऊ लागल्या आणि हळूहळू तिथल्या काळ्या गहन काळोखात दडून जाऊ लागल्या... संपूर्ण वातावरणात हाडे गोठून त्यांचा भुगा होईल इतका प्रचंड गारवा दाटून आला... सोसाट्याचा वारा शांत होऊन ती सारी अजस्त्र झाडे एकाएकी शांत झाली आणि एक-एक करून तिथलं प्रत्येक झाड अर्ध्या उंचीवर मानवंदना दिल्याप्रमाणे वाकलं जाऊ लागलं... आधीच अर्धमेल्या झालेल्या श्रीधरची अवस्था हा सर्व प्रकार बघून आणखीनच खालावली... इथे नक्की काय होतंय हेच त्याला कळायला मार्ग नव्हता... त्याच्या रक्ताच्या एक-न-एक थेंबासाठी भुकेल्या त्या सावल्या अश्या एकाच क्षणात कशा नाहीश्या झाल्या हे त्याला कळेना... आणि पुढच्याच क्षणाला एक भयंकर विचार त्याच्या मनावर जबरदस्त ओरखडा मारून गेला... 'कुणीतरी यांहूनही महाभयंकर अस्तित्व इथे अवतरित होणार..!' आणि या विचाराने मात्र भीतीने क्षणभर त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला...


"बरोबर.. अगदी बरोबर.. आता तुझा विनाश कुणीही रोखू शकणार नाही.. साक्षात तो सृष्टीकर्ता परमेश्वरही नाही..!!", श्रीधरच्या मनातील एक-न-एक विचार ओळखून मागे लपलेले ते पिशाच्च भयंकर सुरात किंचाळले... "आले .. आले... स्वामी आले...", म्हणत एका सुरात आरोळ्या देऊ लागले आणि प्रचंड वेगात श्रीधरभोवतीचा आवार वेगाने मोकळा करीत दूर अंधारात दडून जाऊ लागले... त्या कर्कश आरोळ्या ऐकून श्रीधरने भीतीने अजूबाजूस बघायला सुरुवात केली... न जाणो त्या गहन अंधारातून कोणत्या दिशेने तो सैतान बाहेर पडणार आणि त्याचा घास घेणार..! हळूहळू हवेतील गारवा शिगेला पोहोचला... त्या सैतानी सावल्यांच्या आरोळ्या अतिकर्कश झाल्या अन् पुढच्याच क्षणाला सारंकाही गोठलं... हवा, हालचाल, आवाज सारंकाही कुंठित झालं... क्षणभर काळही थांबला...

...आणि...

पुढच्याच क्षणी खर्ज स्वरात एक मोठी गगनभेदी गर्जना झाली..! श्रीधरच्या नजरेसमोरची अजस्त्र झाडे हळूहळू बाजूला होऊन एक रुंद अशी वाट निर्माण झाली, नव्हे जणू राजमार्गच आखला गेला... भीती आणि उत्कंठा या भावना शिगेला पोहोचल्या... श्रीधरच्या डोळ्यांनी नकोश्या उत्कंठेने त्या वाटेवरच्या गूढ अंधारात दूरवर नजर लावली आणि एका अनाहूत क्षणाला त्याच्या डोळ्यांना ते अतिविषारी, सैतानी हिरवेजर्द डोळे नजरेस पडले...

त्या जीवघेण्या विखारी हिरव्या रंगाच्या मधोमध ओरखडा मारल्यासारखी पिवळ्याधमक्क रंगाची अन् काळ्याकभिन्न किनारीची उभट्ट अशी चीर वळवळत होती... झटका लागल्यासारखा श्रीधर क्षणभरात भीतीने मागे सरकला... वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत ते भयानक अजस्त्र डोळे त्या गूढ अंधारातून लुकलुकत पुढे सरसावू लागले... अन् एका निमिषमार्धात एक अजस्त्र, काळीकुट्ट अशी महासैतानी काया वळवळत श्रीधरसमोर प्रकट झाली...

...साक्षात 'मणीराज' श्रीधरसमोर अवतरला...!

तीस-पस्तीस फुट लांब पसरलेल्या अजस्त्र सैतानी कायेचा तो एक भयंकर विषारी नाग होता... अंधारलेल्या आसमंतांची छाया झेलणारा, साक्षात मृत्यूप्रमाणे भासणारा त्याच तो भयंकर काळा फणा त्या अजस्त्र झाडांच्याही वर उंचीवर डोलत होता... त्याच्या सबंध काळ्या कातडीतून निघणारा भयंकर विषारी उग्र दर्प अवघ्या आसमंताचा श्वास कुंठित करीत होता... मूखातून वळवळणारी ती लांबसडक मोठी लालभडक रक्तासारखी जीभ एका झपाट्यात भक्ष्याचे शरीर ओढून गिळंकृत करण्यासाठी आसुसली होती... खोल काळ्या जबड्यातून आकार घेणारे ते दोन अणकुचिदार अजस्त्र सुळे कातळही फोडून भक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुसज्ज झाले होते...

चारी दिशांवर आपली हुकूमत गाजविणाऱ्या त्या दोन डोळ्यांची वळवळणारी तीक्ष्ण भेदक नजर अखेर श्रीधरवर येऊन स्थिर झाली अन् साक्षात मृत्यूच्या त्या हिरव्या गहिऱ्या डोहात नजर जाताच श्रीधरच्या काळजात आत्यंतिक भीतीने भयंकर कळ दाटून आली...!! 


घाला पडतो काळाचा

करी 'मणी' मृत्यू प्रहार |

नियतीच्या विवरात बुडाला

तो भाबडा कुसूत्रधार || 


(क्रमशः)





साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama