Urmila More

Romance

4.0  

Urmila More

Romance

आठवणीतलं प्रेम

आठवणीतलं प्रेम

22 mins
602


चेतन आणि अनघाची ही कथा आहे.. या पूर्ण कथेत मी सतत त्यांची नावं नाही लिहिली आहेत.. (तो आणि ती) कारण या कथेतला कोणता तरी किस्सा तुमच्या सोबत घडून गेलेला असेलच आणि वाचणारी प्रत्येक व्यक्ती ही कथा चेतन आणि अनघाच्या जागी स्वतःला ठेऊन वाचतील.. प्रत्येकाला त्याच्या आठवणीतलं प्रेम आठवेल.. चेतन आणि अनघाच्या वयातला फरक अगदी बारा-तेरा वर्षांचा आहे.. आपण नेहमी असं म्हणतो की हिरो-हिरोईन एकत्र असतील तर ते प्रेम.. पण या दोघांची कथा खूप वेगळी आहे.. चेतन आणि अनघाच्या "आठवणीतलं प्रेम" नक्की वाचा..


ती आर्टसमध्ये होती आणि तो सायन्समध्ये होता. ती विद्यार्थीनी आणि तो शिक्षक..


एक दिवस ती वर्गाबाहेरुन मैत्रिणींसोबत मस्ती करत जात असते आणि तो वर्गात मुलांना शिकवित असतो. तिचा आवाज जास्त होतो आणि पूर्ण वर्ग तिच्याकडे बघत असताना तो अचानक बाहेर येतो. ते पाहून मैत्रिणी घाबरून पळून जातात, पण मात्र तिला भीतीने पळता येत नाही.. तो तिच्याकडे थोडावेळ बघतच राहतो.. तिला जरा अवघडल्यासारखं होतं ती मान खाली घालून असते आणि मग साॅरी बोलताना त्याच्याकडे बघते तर तो एकटक तिलाच पाहत असतो. तिला ते आवडत नाही आणि ती तिथून निघून जाते. पूर्ण रात्र त्याचाच विचार करते की मी मोठ्याने ओरडून जात होते ते सर बाहेर आले.. पण काही बोलतच नव्हते फक्त बघतच होते. त्याचंही असंच काहीसं झालं होतं की, मी लगेचच बाहेर का गेलो.? तिला ओरडलो का नाही? त्यानंतर ती जेव्हा पण तिथून जायची तेव्हा शांत आणि वर्गात बघून जायची की ते सर नाही ना.. आणि तिथे नेमका तोच असायचा. दोघे एकमेकांना काॅरिडोरमधून जाताना खूप वेळा बघायचे पण बोलायचेच नाहीत. नजर भिडत होती पण बोलणं काही होतच नव्हतं. हळूहळू ती सतत त्याचाच विचार करायला लागते.

काही दिवसांनी काॅलेजमध्ये परीक्षा असल्यामुळे आर्टसच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडतात. तिची सवय असते की काॅलेज सुटलं की लगेच घरी जायचं. काॅलेजमध्ये सगळे टाईमपास करत कॅम्पसमध्येच असतात. ती निघते रस्ता ओलांडते आणि वाटेतच एक अपघात झालेला असतो. काॅलेजपासून काही अतंरावरच लोकांची भयंकर गर्दी झालेली असते.? पण कोणीच मदतीला जात नाही. का? कुणाचं ठाऊक पण ती तिथे जाऊन बघते तर जखमी अवस्थेत तोच असतो. डोळे पूर्ण बंद नसतात. ती पाणी पाजण्याचा प्रयत्न करते पण तो काही सेकंदातच डोळे पूर्ण बंद करतो. तिला कळत नसतं की आत्ता आपण काय करावं?काॅलेजमधून कोणाला बोलवून आणावं का? की आपणच यांना हाॅस्पिटलला न्यावं. मनाची घालमेल होत असते, पण त्याला वाचवायला हवं म्हणून तिच रिक्षा थांबवते. लोकांच्या मदतीने त्याला रिक्षात बसवते. आणि त्याला घेऊन हाॅस्पिटलला निघते. त्याला अशा अवस्थेत पाहत असताना तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नसतं. तिने त्याला घट्ट धरुन ठेवलेलं असतं.. हाॅस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डाॅक्टर त्याला आयसीयूमध्ये नेतात.. ती फाॅरमॅलिटी पूर्ण करत असताना रिलेशनच्या पुढे फ्रेंड लिहिते. वाॅर्डबाॅय त्याचं सगळं सामान आणि औषधांची चिठ्ठी देतो आणि म्हणतो लवकर आणा.. मॅडम तुमच्या मिस्टरांची तब्येत नाजुक आहे.. ती जाऊन औषधं आणून देते. घरी फोन करून सांगते की यायला उशीर होईल...त्याच्या घरी फोन करुन कळवते... ऑपरेशन सुरूच असतं. काही वेळातच त्याच्या घरचे तिथे पोहोचतात आणि ती त्यांना सगळं सविस्तर सांगते. आणि निघून जाते. ऑपरेशन संपल्यावर तो काही तासांनी शुद्धीवर येतो. तिला काळजी लागून असते की तो शुद्धीवर आला असेल का?त्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? नको नको ते प्रश्न मनात येत असतात. एक दिवस हाॅस्पिटलमधील नर्स त्याला विचारते, काय हो तुमची बायको दिसत नाही?


तो म्हणतो कोणाविषयी बोलताय तुम्ही?


अहो तुम्ही बेशुद्ध होतात ना तेव्हा तुम्हाला घेऊन एक मॅडम आल्या होत्या.. खूप रडत होत्या. डॉक्टरांना सतत सांगत होती की त्यांना वाचवा.. तुमच्या घरचे आल्यावर ती गेली. तो बराच वेळ विचार करतो की कोण असेल ती? त्याला वाटतं कदाचित त्याला फाॅरमॅलिटी पेपर्समधून तिच्याविषयी काहीतरी मिळेल. म्हणून तो सिस्टरला विचारतो की मला ते पेपर्स पाहायला मिळतील का? आणि सिस्टर त्याला ते आणून देते. त्यातला नंबर नोट करतो. काही दिवसांनी घरी येतो आणि त्या मुलीला फोन करतो. ती फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तो सुरुवातीला तिला थँक्यू म्हणतो. तिला आधी काही कळत नाही की एकतर अनोळखी नंबर आणि मला थँक्यू का म्हणतेय ही व्यक्ती?


ती विचारते, कोण तुम्ही? नाव काय तुमचं? मला का थँक्यू म्हणताय? बरेच प्रश्न विचारते.


तो उत्तर देण्याची वाट पाहत असतो. तिचं बोलून झाल्यावर तो म्हणतो, काही दिवसांपूर्वी एम. के. कॉलेजजवळ एक अपघात झाला होता आणि तुम्ही त्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेलं होतं. मी तोच बोलतोय.. तिला खूप आनंद होतो की तो आता बरा झालाय.. त्याला विचारते की आता तुमची तब्येत कशी आहे.. खरं तर सॉरी म्हणजे मी तिथे थांबायला हवं होतं पण आई काळजी करत होती आणि उशीर झाला होता.. म्हणून मी तुमच्या घरचे आल्यावर निघाले.


तो म्हणतो, सॉरी का म्हणताय.? मी थँक्यू म्हणायला फोन केला आहे, खरंच थँक्यू तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलला नेलात. तो संवाद तेवढाच असतो ती वेलकम म्हणून फोन ठेवते. तेव्हा ती त्याचा नंबर सेव करून ठेवते आणि नेहमी व्हाट्सअपला त्याचे डीपी पाहत असते. तिथे तोही हेच करत असतो एकमेकांना मेसेज करावंसं वाटत असतं पण समोरून उत्तर आलं नाही तर.. याचाच विचार दोघेही करत असतात. एक दिवस तोच तिला गुड मॉर्निंगचा मेसेज करतो.


ती काही सेकंदात रिप्लाय देते. आता ते दोघं हळूहळू मेसेजवर बोलायला लागले होते.. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. त्याला नेहमी तिला भेटावंसं वाटायचं आणि तिलाही असंच काहीसं वाटायचं..


एक दिवस त्याने तिला मेसेज केला की आज भेटशील का वेळ असेल तर? काॅफी प्यायला जाऊयात.. तिलाही भेटायचं असतं ती हो म्हणते.. आता दोघांनाही ओढ लागलेली असते भेटण्याची.. दोघेही त्यादिवशी सुंदर तयार होतात... काॅलेजला येतात पण मन मात्र त्या भेटीकडेच लागून असतं.. ती आणि तो ठरलेल्या वेळेवर पोहोचायचं म्हणून लेक्चर झाल्यावर लगेचच निघतात.


एकाच काॅलेजमध्ये असूनही आज त्यांनी एकमेकांना पाहिलेलंही नसतं. ती आधी पोहोचते आणि त्याची वाट पाहत असते. काही वेळातच तोही तिथे येतो. आता मात्र नजर खालीच असते. चोरुन एकमेकांकडे पाहत असतात पण बोलावं काय? हेच सुचत नसतं. सुरुवातीचे वीस मिनिटं शांत, एकमेकांना चोरून बघण्यातच जातात. बोलायला सुरुवात तोच करतो, कशी आहेस?


ती म्हणते, हो बरी आहे.. तुमची तब्येत कशी आहे?


हो बरा आहे मी आता.. तो म्हणतो. त्या दिवशी तू वेळेवर आलीस म्हणून.. नाही तर माझं काही खरं नव्हतं.. म्हणून हे तुझ्यासाठी..


हे काय? ती विचारते..


तो म्हणतो.. असंच मला वाटलं की तुला काहीतरी द्यावं म्हणून..


हो पण याची खरंच काही गरज नव्हती..


अगं आपल्या मैत्रीची आठवण म्हणून तरी ठेव.. ती ते ठेवते.. आता ते दोघे अगदी फार जुनी मैत्री असल्यासारखे बोलत होते. बोलण्यात दोन तास कसे निघून गेले कळलेच नाही.. काही वेळातच ते तिथून निघतात. तो तिला रिक्षात बसवतो.. नंतर तोही जातो. थोड्या वेळाने तिला मेसेज करतो.. पोहोचलीस का नीट घरी.. ती हो म्हणते..


काही दिवस त्यांचं बोलणं झालं नाही. तो नेहमी मेसेज करायचा पण अभ्यास असल्यामुळे ती बरेच दिवस ऑनलाईन आली नव्हती..त्याला वाटलं की तिच्या आयुष्यात अशी कुणी व्यक्ती तर आली नसेल ना? की ती मला विसरतेय, नाही तिने मला विसरायला नकोय, काय करू तिला जाऊन भेटू का? पण कॉलेजमध्ये कसं बोलणार? तिला सकाळी लायब्ररीमध्येच भेटतो.. हा.. सकाळी लायब्ररीमध्ये पण कुणीच नसतं म्हणजे बोलता येईल.. तो एकटाच बडबडत असतो..


दुसऱ्या दिवशी सकाळी तो कॉलेजला लवकर जातो. स्टाफ रूममध्ये जाऊन बॅग ठेवतो आणि लायब्ररीमध्ये जातो. लायब्ररी पूर्ण मोकळी असते.. एवढ्या सकाळी कोणीच आलेलं नव्हतं.. त्याला माहित होतं की तिला शांततेत वाचायला आवडतं म्हणून ती लायब्ररीमध्ये सकाळी लवकर यायची. तो आत सगळीकडे तिला शोधत असतो. तितक्यात तिची बॅग त्याला दिसते. ती समोरच पुस्तकं शोधत असते. तो तिच्या समोर जाऊन उभा राहतो, तो असा अचानक समोर आल्यामुळे ती दचकते.. थोडं थांबून विचारते तुम्ही इथे.. तिला बघताच तो मनातला सगळं बोलायला सुरुवात करतो, ती बोलायचं प्रयत्न करत असते पण तो तिचं ऐकूनच घेत नसतो.. तू मला रिप्लाय का देत नाहीयेस.. रोज वेड्यासारखा मेसेज करतोय.. नकोनको ते विचार मनात येत होते.. तुला काही झालं तर नसेल ना? तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तर नसेल ना? त्या व्यक्तीमुळे तर तू मला विसरली नसशील ना? त्या सगळ्या बोलण्याचं रूपांतर रागात कधी झालं त्यालाच समजलं नाही आणि एका क्षणाला राग इतका वाढला की त्याने तिला धक्का दिला आणि तो रागात निघून गेला..


तिचं डोकं बुकशेल्फला लागलं आणि रक्त येऊ लागलं.. तिला घडलेला प्रकार कळतच नव्हता.. तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं.. डोळे पुसून ती वर्गात गेली. मैत्रिणीने तिला विचारला अगं तुझ्या कपाळाला लागलंय का काही रक्त येतंय.. तिने सोंग आणून कपाळाला हात लावला आणि म्हणाली अगं.. हो ते आता लायब्ररीमध्ये खालच्या शेल्फमधून पुस्तक घेऊन उभी राहत होते तेव्हा लागलं.. रक्त येतंय का? मला वाटलं थोडंच असेल काहीतरी.. असं म्हणून ती विषय बदलते.. तो स्टाफ रूममध्ये जाऊन बसतो.. सकाळचे सगळे शिक्षक लेक्चरला गेलेले असतात त्यामुळे स्टाफ रूममध्येही कोणीच नसतं.. थोड्या वेळाने राग शांत होतो.. आणि त्याला लक्षात येतं की.. मी तर तिच्याशी बोलायला गेलेलो पण मला राग का आला.. मी तिला नकोनको ते ऐकवत होतो.. ती बोलायचा प्रयत्न करत होती पण मी तिला बोलूच दिलं नाही.. आणि तिला धक्काही दिला..तिला लागलं तर नसेल ना?


तो लगेच उठला आणि तिला कॉलेजमध्ये सगळीकडे शोधू लागला..ती एका वर्गात एकटीच बसून होती. तो तिला सगळ्या वर्गांमध्ये शोधत होता. त्याला एका मोकळ्या वर्गात ती एकटी बसलेली दिसली. त्याने सुटकेचा श्वास घेतला. तिच्या डोळ्यात पाणी होतं, कपाळाला लागलेली जखम तशीच होती, तिला अजूनही कळत नव्हतं की तो का रागावला माझ्यावर, त्याने माझं साधं ऐकूनही घेतलं नाही.. तितक्यात तो तिच्या बाजूला जाऊन बसतो.. ती त्याला पाहिल्यावर जायला निघते.. तितक्यात तो तिचा हात धरतो आणि म्हणतो.. खरंच सॉरी अगं मला तुझ्याशी बोलायचं होतं, तुला विचारायचं होतं पण राग कसा आला आणि मी काय वागत होतो मला नाही कळलं खरंच अगं... आणि तो तिच्या कपाळाला औषध लावतो.. हे पाहून तर तिला कळतच नव्हतं की हा असा काय वागतोय.. काही वेळापूर्वी हाच माणूस माझ्यावर चिडलेला, मला धक्का देणारा.. आणि आता हाच मला औषध लावतोय.. ती काहीच बोलत नव्हती.. त्याच्याकडेच बघत होती आणि विचार करत होती. तितक्यात तो पुन्हा तिला म्हणतो, खरंच साॅरी.. मला भीती वाटत होती तुला गमावून बसण्याची.. तुझी काळजी वाटते गं मला...


कधीतरी एकमेकांना बघायचे.. स्मित हास्य करुन निघून जायचे.. मेसेजवरसुद्धा बोलणं हळूहळू वाढत होतं.. आता तर रोज एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना चैनच पडायचं नाही... त्यांना एकमेकांची एवढी सवय झाली होती की त्याच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे एक नातं उमलत होतं.. ही जाणिव दोघांनाही होती.. "जस्ट लाईक अ टिपीकल स्टोरी.." कळतंय पण वळत नाहीये.. तिला वाटत होतं की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचं नात म्हणजे शेवट आणि ती विचार करत होती वयातील अंतर..


पदवी परीक्षा संपली होती..ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जाणार होती..हे तिने त्याला सांगितलं होतं..म्हणून तो ठरवतो की तिने पुण्याला जाण्याआधी तिला मी मनातलं सगळं सांगणार आहे...तिचं उत्तर काहीही असू दे...पण मला तिला भेटायचं आहे..तो तिला मेसेज करतो...एक शेवटची काॅफी प्यायची आहे तुझ्यासोबत नेहमीच्या ठिकाणी तासाभरात भेटशील का? ती हो म्हणते..ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटतात...त्या दिवशीची ती शेवटची काॅफी कधी संपूच नये.. असंच दोघांना वाटत होतं..बराच वेळ बसले..तो मनातलं सगळं तिला सांगायचं हे ठरवून आला होता पण त्याला ते काही केल्या जमेना!! शांतता संपून आता बोलायला सुरुवात होत असते.


तो तिला विचारतो...कधी निघणार आहेस...


उद्या पहाटेच..ती म्हणते..


बरं.!!काही अडचण असेल अभ्यासातली तर मेसेज कर मी समजून सांगेन...


ती म्हणते हो नक्की...आणि शेवटी निघताना तो म्हणतो.. काळजी घे स्वतःची...नीट जा आणि वेळ मिळेल तसं मेसेज करत जा..


हो करेन... ती त्याला म्हणते काळजी घे, कामाचा जास्त ताण करून घेऊ नकोस, मी नसणारे आता तुला काहीही सांगायला..


तो म्हणतो.. हो मॅडम अजून काही??


बाकीचं मेसेज करून सांगते.. आणि ती निघते.


ती पुण्याला पोहोचल्यावर त्याला मेसेज करते..आता तिचा अभ्यास सुरु झालेला असतो..दिवसभर 12 तास अभ्यास सुरुच असायचा..तो रोज रात्री चॅट उघडून बसायचा..पण जर ती अभ्यास करत असेल तर तिला आपल्यामुळे त्रास होईल..म्हणून तो मेसेजच करायचा नाही...तिकडे मात्र ती 12 तास अभ्यास करायची आणि एक तास जास्त जागी राहायची त्याच्या मेसेज आणि फोनची वाट बघायची.... आता तिला पुण्याला येऊन सहा महिने झाले होते.. सहा महिन्यात ते दोघे 5, 6 वेळा मेसेजवर आणि 2 वेळा फ़ोनवर बोलले होते. जानेवारीच्या 17 तारखेला तिचा वाढदिवस असतो. तिचा पहिला वाढदिवस जो ती कुटुंबासोबत साजरा करत नव्हती. 16 तारखेचा दिवस उजाडला, तो सकाळपासून ऑनलाईन नव्हता.. ती अभ्यास करता करता सतत त्याचा लास्टसीन पाहत होती.. पण तो ऑनलाईनच येत नव्हता. आता रात्र झाली होती. ती जेवून पुन्हा अभ्यासाला बसली होती. रात्रीचे बारा वाजले, तिला सगळ्यांचे फोन मेसेज येत होते, पण त्याचा काही पत्ताच नव्हता. अभ्यास करताना आता रात्रीचे दोन वाजून गेले होते. ती दमून झोपायला गेली. सकाळी पहाटे लवकर उठली होती. वाढदिवसाच्या दिवशी दगडूशेठला जाऊन दर्शन घ्यायचं ठरलं होतं.


ती आवरून नुकतीच नाश्ता करायला बसणार तितक्यात दारावर बेल वाजली. तिने दार उघडलं तर समोर कोणीच नव्हते.. मात्र खाली एक कागद पडला होता.. तिने तो कागद उचलला.. त्यात कुणीतरी हॅप्पी बर्थ डे लिहिलं होतं.. तिला वाटलं कुणीतरी मैत्रिण असेल येईल परत म्हणून ती आत गेली.. आणि नाश्ता करत होती तितक्यात पुन्हा बेल वाजली.. ती पटकन बाहेर गेली.. पुन्हा बाहेर कुणीच नव्हतं.. पुन्हा एक चिट्ठी दिसली.. तिने ती उचलली.. त्यात लिहिलेलं ती वाचू लागली.. त्यात लिहीलं होतं.. "कितने दफे दिलने कहाँ, दिलकी सुनी कितने दफे, वैसे तो 'तेरी ना मे भी मैने ढून्डली अपनी ख़ुशी तू जो अगर हा कहे तो बात होगी और ही....." हे वाचण्यात ती मग्न असताना अचानक कोणीतरी समोर येऊन उभं राहतं.. ती मान वर करून बघते तर "तो" तिला ते सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत असतं.. ती त्याच्याकडे बघत स्तब्ध उभी असते.. दोघांच्याही डोळ्यात नकळत पाणी येतं.. ती त्याला आत यायला सांगते आणि त्याला पाणी देते. ती त्याला विचारते कू, त्याला तिचा पत्ता कसा मिळाला? अचानक कसं येणं केलं? आधी कळवायचं का नाही? कालपासून ऑनलाईन का नाही? असे बरेच प्रश्न तिने विचारले.. तो तिच्याकडे बघून हसू लागला.. तिने आश्चर्यानं विचारलं काय झालं? तो म्हणाला काही नाही गं..एकतर आपण एवढ्या दिवसांनी भेटलो आणि तू एवढे प्रश्न विचारते.. मग काय करू? अगं मला भूक लागली आहे.. खायला दे ना काहीतरी.. अरे हो आलेच.. ती आत जाते..तो सगळी पुस्तकं बघत असतो आणि त्याला एका वही उघडलेली दिसते..त्यातली पहिली ओळ तो वाचतो.. (मला नाही कळत आहे त्याला मनातलं कसं सांगू? ती शेवटची कॉफी पितानाही वाटत होतं त्याला सगळं सांगावं पण नाही जमलं.. नेहमी प्रश्न पडतो "लोकं काय म्हणतील?" तितक्यात ती येतानाची चाहूल होते..तो वही बंद करतो आणि नाश्ता करतो..


तो तिला म्हणतो, आजचा पूर्ण दिवस तू अभ्यास करणार नाहीस कारण आजचा तुझा दिवस माझा आहे.. आपण पुणे फिरुयात.. त्याला एवढ्या दिवसांनी पाहिलेला असतं आणि तो एवढ्या आनंदात असतो की तिला नाही म्हणताच येत नाही..


ती त्याला म्हणते की, ठिक आहे मी आवरून येते..


तो म्हणतो, ऐक ना.. साडी राहू दे ना तू खूप छान दिसतेस.


हो.. आलेच.. ती आवरून बाहेर येते.. ती विचारते पण जायचं तरी कुठे?


तो म्हणतो.. पहिले आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊयात चालेल?


ती हो म्हणते.. ते दोघं निघतात. तिथून ते दोघंही दगडूशेठला जातात..


दर्शन झाल्यावर तो तिला म्हणतो, इथेच थांब मी आलोच...आणि तो प्रसाद घ्यायला जातो. तितक्यात तिथे फुलं विकणारा एक लहान मुलगा येतो आणि तिला म्हणतो ताई हे घे ना.. ती म्हणते अरे..बाळा माझं दर्शन झालंय. तो म्हणतो ताई ही चिठ्ठी मला एका दादाने तुला द्यायला सांगितली.. ती चिठ्ठी उघडते आणि वाचायला लागते.. लोकं काय म्हणतील हे मला माहित नाही पण पाहिल्याक्षणी तुला जेव्हा पाहिलं त्याचवेळी तुझ्या प्रेमात पडलो होतो.. तू कॉलेजमध्ये नेहमी दिसायचीस पण कधी बोलताच आलं नाही.. एवढा शिकलेला मी पण मला कधी कॉलेजमध्ये कुणीच आवडली नाही.. तुझ्या सोबत म्हातारं होत आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलंय.. त्या स्वप्नासाठी आज पुण्यापर्यंत आलोय.. फक्त एकदा लोकं काय म्हणतील हे सोडून मन काय म्हणतंय हे बघ ना.. तिचं वाचून होतं आणि तितक्यात तो येतो.. त्याला बघून ती गडबडीत चिठ्ठी बॅगेत ठेवते..


तो म्हणतो चल निघुयात.. तिथून ते दोघं सारस बागेत जातात.. तिथे बराच वेळ गप्पा मारत बसलेले असताना तिचा एक मित्र मागून येऊन तिच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि विश करतो. तो आल्यावर ती त्याच्याशी गप्पा मारत असल्याचं बघून त्याला खूप राग येतो.. तो मनात बडबडत असतो (कशाला आला हा मधेच.. एकतर एवढ्या दिवसांनी हिच्याशी बोलायला वेळ मिळाला होता आजच्या दिवसातली दहा मिनिटं यानेच वाया घालवली..आता जा रे बाबा लवकर.. निघ चालता हो.. आणि परत तोंड पण दाखवू नकोस.. तुला तर मी आमच्या लग्नात पण बोलावणार नाही.. निघ रे बाबा आता..) असं रागात तो मनातल्यामनात बडबडत असतो.. तितक्यात तिचा मित्र म्हणतो चल मी निघतो.. त्याच्या गप्पा पुन्हा सुरु होतात.. मध्येच लक्ष घड्याळाकडे जातं.. दुपारही झालेली असते.. दोघं हॉटेलमध्ये जेवायला जातात.. हॉटेलमध्ये गेल्यावर तो केकची ऑर्डर द्यायला जातो. ती बसलेली असताना वेटर पाणी आणतो आणि सोबतच एक चिठ्ठी देतो.. ती पुन्हा चिठ्ठी उघडते आणि वाचायला लागते..त्यात त्याने लिहिलेलं असतं की "तुम्हे कोई और देखे तो डरता है दिल.. बडी मुश्किलोंसे फिर संभलता है दिल.. क्या क्या जतन करते है तुम्हे क्या पता.. हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारे बिना.." ती चिठ्ठी बॅगेत ठेवते आणि तो केक आणतो.. केक कापल्यावर.. जेवून ते दोघं निघत असतात.. त्याला 6 च्या गाडीला निघायचं असतं..


ती मध्येच त्याला एका जागी थांबायला सांगते आणि म्हणते मी दहा मिनिटात आलेच.. तो बराच वेळ तिथे उभा असतो.. ती येते आणि त्याला म्हणते निघुयात.. आणि स्टेशनच्या दिशेने निघतात.. आता शेवटचा एक तास ते दोघं एकत्र असणार होते हा शेवटचा एक तास कधी संपूच नये असं दोघांना वाटत होतं.. स्टेशनला अर्धा तास आधीच ते दोघं शांत जाऊन बसलेले असतात.. त्या वेळी त्याने तिचा हात धरून ठेवलेला असतो.. स्टेशनच्या एका बाकावर ते शांत बसलेले असताना ती त्याला म्हणते.. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय..त्याच्या हातात एक बॉक्स देते.. आणि म्हणते हा बॉक्स ट्रेनमध्ये बसल्यावर उघड.. आणि आवडलं तर लगेच कॉल कर.. तितक्यात ट्रेन येते.. तिचा हात काही सुटत नसतो.. तरीही ट्रेनमध्ये जाऊन बसतो.. डोळ्यात येणारं पाणी दोघांनी कसंबसं थांबवलेलं असतं.. ट्रेन चालायला लागलेली असते.. आजचा घालवलेला दिवस हळूहळू डोळ्यांसमोर येत असतो तो तिला म्हणतो काळजी घे आणि कॉल करत राहा वेळ मिळेल तसं.. हो.. करीन. आणि दोघेही आपापल्या दिशेने निघून जातात. ती त्याच्या फ़ोनची वाट बघत बसलेली असते.. तिकडे तो नुकताच बाॅक्स उघडतो.त्यात तिने एक बाप्पाची मुर्ती दिली होती. आणि त्याच्याखाली एक चिठ्ठी होती.


तो ती चिठ्ठी उघडतो.. त्यात तिने लिहिलेलं असतं.."तुला आज काहीतरी सांगावंसं वाटलं. आपण पूर्ण दिवस एकत्र घालवला पण तरी नाही बोलता आलं.. तुला माहितीये तू परीक्षेला सुपरवायझर म्हणून आला होतास आणि तू तेव्हा सतत माझ्याकडेच पाहत होतास हे मला कळत होतं.. मी वर्गाबाहेरून जाताना तू जेव्हा बाहेर आलास तेव्हा तू काहीच बोलला नव्हतास तेव्हा तू ओरडायला आला होतास पण मलाच बघत होतास आणि मी गोंधळून तिथून निघून गेले तेव्हापासून मला सतत वाटायचं की आपली मैत्री व्हावी.. आणि मध्येच तुझा अपघात झाला तो योगायोग होता की काय कोण जाणे पण तुला त्या अवस्थेत बघताना डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं.. त्यानंतरचा तुझा पहिला कॉल, त्यानंतर आपलं बोलणं सुरु झालं..ती पहिली कॉफी, लायब्ररीतलं ते तुझं वागणं, मग औषध लावणं, आपली ती पहिली भेट, तू दिलेलं घड्याळ. एकमेकांविषयी ती काळजी वाटणं... आज पुण्याला येऊन अचानक मला भारावून टाकणं.. हे सगळं अजूनही मला स्वप्नच वाटतंय.. मला आजचा तुझा तो चिठ्ठ्यांचा खेळ आवडला.. दाराबाहेरच्या चिठ्ठ्या, मंदिरातली चिठ्ठी, मला माहिती आहे, माझ्या मित्राचं वागणं तुला नाही आवडलं तुला रागही आला होता हे मी पाहिलं.. कदाचित तू मनात त्याला खूप काही बोलत होतास.. हो हे मला कळत होतं.. तुझे डोळे बोलके आहेत अरे.. तू आज या चिठ्ठ्या जरी दिल्या नसत्या तरी मला सकाळीच तुझ्या डोळ्यांनी तुझ्या मनातलं सांगितलं होतं.. म्हणूनच तू पुण्याला आला होतास ना.. मी तुला सकाळी पाहिलं होतं तू माझ्या वहीत काहीतरी वाचत होतास.. आणि मी येताच तू जागेवर येऊन बसलास.. हो रे.. मला नेहमी हा प्रश्न पडतो की लोकं काय म्हणतील..पण आजच्या तुझ्या या चिठ्ठ्यांनी मला याचं उत्तर दिलंय..


मलाही तुझ्यासोबतच म्हातारं होत आयुष्य घालवायचं आहे, आपली सगळी स्वप्न एकत्र पूर्ण होताना पाहायची आहेत, मी ही पहिल्या क्षणी तुला पहिलं तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडले.. आणि रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडतेय.. तुला माहितीये.. मी जरी बारा तास अभ्यास करत बसले ना रोज तरी एक तास अशीच बसून असते.. कारण तुझा फोन येईल आणि मी झोपलेली असेल तर.. मला माहितीये मी प्रत्येक गोष्ट सांगायला फार उशीर करते आणि आजही उशीर केलाय.. माझ्या डोळ्यातलं ओठांवर आलाय पण डोळ्यांसमोर तूच नाहीस हे पाहायला.. "हो.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. आणि कायम राहील." वाचून झालं असेल तर आता फ़ोन कर ना पटकन.. वाचून झाल्यावर तो एकटाच हसत असतो.. आणि आनंदाचे अश्रूही असतात डोळ्यात.. पुण्याला आल्याचं सार्थक झालं असं त्याला वाटत होतं.. तो तिला फोन करतो.. ती पहिली रिंग ही पूर्ण होऊ न देता फ़ोन उचलते.. पहिले कोण बोलतंय याची ते दोघं वाट पाहत असतात.. शांत असले तरी डोळे अश्रूंनी भरलेले असतात.. एकमेकांना भेटायचं असतं त्या क्षणी घट्ट मिठी माराविशी वाटत असते.. पण सुरुवात ही दोघांच्या हसण्यानेच होते, दोघं वेड्यासारखे हसत असतात..


काही महिन्यांनी काॅलेजमधून काॅन्वोकेशनसाठी मेल येतो..लवकरच ती मुंबईला येणार असते.काॅन्वोकेशनच्या 2 दिवस आधीच मुंबईला यायचं ठरतं...ती घरच्यांना आणि त्याला सांगते की, घ्यायला कोणीच येऊ नका.. मी येईल. तिला माहित तिला असतं की घरचे येणार नाहीत पण हा काही ऐकणार नाही.. तो तिला फोनवर सांगतो की ठीक आहे नाही येणार घ्यायला.. आणि सकाळीच आवरुन नाश्ता न करता आणि डबा न घेता तिला भेटायचं म्हणून स्टेशनला पोहोचतो...ती ट्रेनमधून उतरते आणि त्याला फोन करते..मी पोहोचले..घरी गेल्यावर फोन करते..तो म्हणतो हो ठीक आहे पण तुझ्या मागे आवाज कसला आहे एवढा..आवाज!! नाही...आणि मागे वळून बघते तर तो उभा असतो.. ती त्याला बघताच घट्ट मिठी मारते..तो ही तिला दोन्ही बाहुंनी धरुन घट्ट मिठी मारतो..आणि म्हणतो बघ हा..आपण स्टेशनवर आहोत आणि लोकं आपल्याला पाहतायत बायको..किती ते प्रेम गं..तू माझी थट्टा करतोय का? मी नाही विचार करत लोकांचा.. हो का...होय!! असा हा संवाद संपतो ..आणि तो तिला रिक्षात बसवतो आणि म्हणतो पोहोचल्यावर मेसेज कर,विसरू नकोस. हो नाही विसरणार. .आणि त्याला बॅगेतून पोळी-भाजीचा डबा देते..तो म्हणतो हे काय? ती म्हणते तुला स्वतःपेक्षा जास्त ओळखायला लागलीये मी.. मला ठाऊक होतं की तुला कित्येकदा सांगूनही तू स्टेशनला येशीलच. नाश्ता न करता आणि डबा न घेता निघालास ना...म्हणून हा डबा! तू वेडी आहेस बायको. हो ना..मग आता बायकोचा आदेश आहे की लवकर काॅलेजला जा,नाहीतर उशीर होईल, डबा जरा लवकर खा, बाहेरचं खाऊ नकोस कळलं...हो मॅडम अजूनही काही! बाकीचं मेसेज करुन सांगते..आणि हसत हसत दोघेही निघून जातात.


कॉनव्होकेशनसाठी सगळ्या मैत्रिणी साडी नेसून यायचं ठरवतात.. सकाळी 11 वाजता सगळ्या मैत्रिणी गेटजवळ भेटतात.. आणि एकत्र आत जातात. कार्यक्रम सुरु होतो डिग्री हातात असते. सगळे शिक्षकांची भेट घेत असतात.. शेवटचे कॉलेजमध्ये फोटो काढत असतात.. सगळ्या मुली ग्रुपने शिक्षकांसोबत फोटो काढतात.. आणि मधेच तो पण येतो.. आणि तिच्याच बाजूला उभा राहतो.ती कॅम्पसमध्ये सरांसोबत बोलत उभी असते.. सगळे शिक्षक तिला अभ्यासविषयी विचारपूस करत असतात.. बोलता बोलता सर तिला म्हणतात आता आरोही पार्टी हवी हा.. आणि तिच्यामागून तो येत असतो.. तितक्यात एक सर त्याला म्हणतात.. आरोही तर पार्टी देईलच पण सर तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे.. बाकीचे शिक्षक विचारतात का? 2 दिवसांपूर्वी सरांचं लग्न ठरलंय ना.. हे ऐकून तिला धक्का बसतो.. तिला त्या वेळी काहीच सुचत नसतं.. त्याला तिला सगळं सांगायचं असतं पण कसं सांगू.. असा विचार करत असतो.. आता तिच्याशी बोलताही येत नव्हतं. कॉलेजमध्ये बोलायला गेलो आणि कोणी पाहिलं तर.. ती मैत्रिणीसोबत निघत असते.. तो गेटच्या बाहेर येऊन तिला शोधत असतो.. ती मैत्रिणीसोबत गेटजवळच उभी असते.. त्याला बघून ती मैत्रिणींना म्हणते.. मी निघते.. तितक्यात तो तिला हाक मारतो.. आणि तिच्या जवळ जातो.. तिला म्हणतो मला बोलायचं होतं तुझ्याशी मैत्रिणी समोर असल्यामुळे दोघेही नॉर्मल वागत असतात..


मैत्रिणींपासून लांब घेऊन तो तिच्याशी बोलायला सुरुवात करतो.. "मला तुला सगळं सविस्तर सांगायचं होतं.." पण.! पण काय?? मी नाही रे रागावली तुझ्यावर.. फक्त आत कसं वागावं हे मला नाही कळलं.. मला या गोष्टीची भीती वाटत होती पण हे सगळं इतक्या लवकर होईल असं नव्हतं वाटलं.. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत तो तिला म्हणतो.. ऐक ना.. मी आजच घरच्यांशी आपल्याविषयी बोलतो.. मला नाही करायचंय दुसरं कोणाशी लग्न..ती म्हणते हो.. तू टेन्शन नको घेऊस सगळं ठिक होईल अरे.. आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना.. मग झालं तर.. आणि ती घरी यायला निघते..तो घरच्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण घरचे नाही ऐकत.. दुसऱ्या दिवशी ते दोघं कॉफीला भेटतात.. घरच्यांना समजवायचं कसं याचाच विचार करत होते.. त्याच्या आईला तर ती मुलगी खूप पसंत असते.. तिला भेटून तो घरी जातो तर ती मुलगी घरी आलेली असते.. तो फ़ोनवर बोलत असल्याचं नाटक करून रूममध्ये जातो.. आणि त्या दोघांचा फोटो बघत शांत बसलेला असतो.त्याच्या मनाला जे घडत होता ते पटत नव्हतं.. आणि जे घडणार आहे ते नको व्हायला असं वाटत होतं.. थोड्या वेळाने त्याची आई त्याला बाहेर बोलावते तो बाहेर येऊन बसतो.. घरचे तिच्याशी गप्पा मारत असतात तो सगळं शांत बघत बसलेला असतो.तितक्यात त्याची बहीण तिला विचारते तुला मेथीची भाजी जमते का.? कारण माझ्या भावाला आठवड्यातून एकदा मेथी खायचीच असते.. ती मुलगी म्हणते.. ई.... मेथी.. मला नाही आवडत आणि मला नाही जमणार बनवायला.. हे ऐकून त्याला तिची आठवण येते.. (की जेव्हा ती पुण्याहून आली होती, तेव्हा तिने त्याच्यासाठी पोळी-भाजी लवकर उठून पुण्याहून बनवून आणली होती.. कारण मी उपाशी राहू नये.वेडी माझी बायको..) आणि तो हसत असल्याचं घरचे बघतात आणि विचारतात की काय रे तुला काय झालं हसायला तो म्हणतो काही नाही असंच..


काही दिवसांनी ती पुण्याला निघणार असते..


एक दिवस तो तिला मेसेज करून भेटायला बोलावतो..भेटल्यावर तो तिला म्हणतो.. आपण मंदिरात जाऊन लग्न करूयात.. माझ्या घरच्यांनी लग्नाची तयारी पण सुरु केली आहे. मला नाही पटत आहे हे.. तूच सांग काय करू मी? ती थोडा वेळ विचार करते.. आणि "जस्ट लाईक अ टिपिकल स्टोरी "त्याला सांगते.. तू त्या मुलीसोबत लग्न कर... तू काय बोलतेस.. (तो चिडून बोलतो) ती म्हणते तू ऐक माझं जर तू हे लग्न केलंस ना तर तुझ्या घरच्यांना खूप आनंद होईल.. तू ऐक त्यांचं.. आणि तुझं काय? आपल्या प्रेमाचं काय? आपल्या स्वप्नांचं काय? ते सगळं आता.. आता काय?? विसरायचं का मी तुला.. हे बघ हे माझ्याने नाही होणार गं.. तूच तर मला नेहमी समजून घेतेस ना.. ती त्याच्याजवळ जाते त्याचा हात हातात घेत म्हणते.. आपलं काय ठरलं होतं.. आपण घरच्यांना दुखावून त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही.. हो ना.. मग माझं ऐक हे लग्न कर.. आपलं प्रेम कायम आपल्या मनात राहील ना.. हो.. फक्त आपण सोबत नसू.. आपला जोडीदार वेगळा असेल. पण आपल्या प्रेमाचा आदर कायम राहील.. तुला माझी शप्पथ आहे तू हे लग्न कर.. तो थोडा वेळ शांत राहतो आणि तिला म्हणतो ठिक आहे मी हे लग्न करेन फक्त तू सांगतेस म्हणून.. तिला बायकोचं प्रेम पण देईन पण.. पण काय?? तू मला तिच्या नावाची हळद लावताना समोर पाहिजे आणि लग्न लागताना पण.. हो.. येईन ना.. तू प्रॉमिस कर की तू मला सतत फोन करणार नाहीस, आणि स्वतःला कसलाच त्रास करून घेणार नाहीस.. हमम.. हमम काय ?प्रॉमिस कर.. बरं.. अजून काही मॅडम.. बाकीचं मेसेज करून.. (थोडं थांबून )नाही एवढंच.. (डोळ्यातलं पाणी पुसताना तिला विचारतो )आता तू मला प्रॉमिस करशील..ती म्हणते.. काय ?? तू पण या सगळ्याचं विचार करून स्वतःला त्रास करून घेणार नाहीस, कधीही काहीही अडलं तर मला लगेच कॉल करशील, अभ्यास कायम ठेवशील? आणि माझं, आई-बाबाचं स्वप्न पूर्ण करशील.. हो.. नक्की.. तुला एक विचारू.. हमम विचार ना (ती म्हणते). तुझे डोळे पुन्हा मला काहीतरी वेगळंच सांगतायत.. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येतं..


ती पुण्याला निघून जाते.. दोन महिन्यांनी लग्न असतं.. तिचा अभ्यास सुरूच असतो.. दोन महिन्यांनी घरी गणपती पण असतात..ती आठवडा भर आधीच येते.. त्याचं घर लग्नाच्या पाहुण्यांनी गजबजलेला असतं..याआधी ती त्यांच्या घरच्यांना  भेटली होती त्याची मैत्रिण म्हणून.. घरचे गणपती येऊन जातात.. त्याच्या हळदीचा दिवस येतो.. सकाळी 10 च्या मुहूर्तावर ती त्याच्या घरी पोहोचते.. सगळ्यांना भेटते आणि त्यालाही..


तो पाटावर बसलेला असतो.. तिच्या नावाची हळद लागायला सुरुवात होते.. ती सगळ्यात मागे उभी राहून त्याला पाहत असते.तिने अजूनही त्याला हळद लावलेली नसते.. ती सगळ्यांना मदत करत असते.. तितक्यात त्याची आई तिला म्हणते.. अगं अनघा तू हळद लाव की त्याला.. ती उठते.. त्याच्याजवळ जाते हळद घेते.. आणि त्याला लावायला जाते तर तो एकटक तिच्याकडेच बघत असतो (अगदी त्या दिवशी परीक्षेला जसा पाहत होता तसाच). ती त्याच्या गालाला हळद लावायला जाते तर तो तिचा हात धरून स्वतःला हळद लावून घेतो.. ती डोळ्यातलं पाणी लावण्याचा प्रयत्न करत असते.. पण त्याच्यापासून ते नाही लपत.. तो आईला म्हणतो.. आई आता अंघोळीला जाऊ का? आणि तो आत खोलीत जातो.. ती बाहेर सगळ्यांना मदत करीत असते..


थोड्यावेळाने त्याची आई तिला म्हणते अनघा.. त्याला आत हे कपडे देऊन येशील का.. त्याला द्यायलाच विसरले.. आणि त्याला नाश्ता पण देऊन ये.ती पोहे आणि त्याचे कपडे घेऊन त्याच्या खोलीत जाते.. टेबलवर नाश्ता ठेवते आणि बेडवर कपडे ठेवतच असते तितक्यात तो बाहेर येतो.. त्याला बघून ती निघत असते.. तितक्यात तो म्हणतो थांब ना जरा.. ती म्हणते.. काकूंनी हे कपडे आणि नाश्ता पाठवलाय.. लवकर आवरून बाहेर यायला सांगितलंय.. हमम. तो तिला विचारतो कशी आहेस.. ती म्हणते.. बरी आहे.. अभ्यास कसा चाललाय.. मस्त. तू कसा आहेस.. तो म्हणतो ठिक आहे."जस्ट लाईक अ टिपिकल स्टोरी".. तो म्हणतो एक विचारू.. मला हळद लावताना तुझ्या डोळ्यात पाणी का होतं.. अरे.. ते तर हळदीचा हात डोळ्याला लागला ना म्हणून.. तू नाही सुधारणार ना.. परत तुझे डोळे काहीतरी वेगळंच सांगतायत मला.. सगळे खुश आहेत जे तुला हवं होतं.. त्याची आई पाणी द्यायला आत येणार तितक्यात तिच्या कानावर त्याचं बोलणं ऐकू येतं...


तुला माहितीये मला काल स्वप्न पडलं की आपलं लग्न होतंय आणि सगळे खुश आहेत.. मी मुंडावळ्या घालून तुझी वाट पाहतोय.. आणि तू समोरून नउवारी नेसलेली टिपिकल मराठी नवरी मुलगी.. माझ्या बाजूला येऊन बसलीस.. आपल्या लग्नाच्या मंगलाष्टका कानावर पडत होत्या.. कारण चेतनचं अनघावरच प्रेम आहे आणि राहील कायम.. पण ते स्वप्न..आता स्वप्नच राहिलंय.. मला ते स्वप्न कधी संपूच नये असं वाटत होतं.. हे ऐकताच त्याची आई आत येते.. आणि त्याला पाणी देते.. तेव्हा त्याच्या आईला कळतं की ज्या मुलीवर चेतन प्रेम करतो ती अनघाच आहे.. अनघा रूममधून बाहेर येते.. आणि घरी निघून येते.. तो तेव्हा आईला सगळं सांगतो.. आणि हे लग्न करण्यासाठी अनघाने शप्पथ दिली म्हणूनच करतोय हे ही सांगतो.. तेव्हा त्याच्या आईला वाईट वाटतं पण सगळ्याच गोष्टी खूप पुढे आलेल्या असतात.. दुसऱ्या दिवशी ती लग्नाच्या हॉलवर पोहोचते.. तो नवरा म्हणून मंगलाष्टकांसाठी उभा असतो.. नवरी येऊन उभी राहते.. तिच्या डोळ्यांसमोर त्याचं लग्न लागतंय हे तिला नाही पाहता येत ती त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहिते, एक बॉक्स ठेवते. आणि ती तिथून निघून जाते.


लग्न लागल्यावर तो चेंज करायला रूम मध्ये जातो तर त्याला एक चिठ्ठी आणि बॉक्स दिसतो.. तो बॉक्स उघडतो त्यात एक घड्याळ असतं.. आणि चिठ्ठी असते. तो चिठ्ठी उघडतो त्यात तिने लिहिलेलं असतं.. "मला नाही पाहता आलं तुझं लग्न.. तो मंगलाष्टकांचा आवाज सहन होत नव्हता रे.. मला माहितीये मी तुला प्रॉमिस केलं होतं पण नाही जमलं रे.. खूप प्रयत्न केलं पण डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं.. म्हणून हे घड्याळ आपण घालवलेल्या चांगल्या आठवणींचं प्रतीक.. तुझी जबाबदारी आता वाढली आहे.. तुला लक्षात आहे ना.. मला ना आज तुला सांगयच होतं की तू नको करुस हे लग्न पण तुझ्या आईच्या चेहर्यावरचा तो आनंद लाखमोलाचा होता.. मी पुण्याला जाते आहे.. तुझं आणि आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायला. मी नाही स्वतःला त्रास करून घेणार.. अभ्यास कायम ठेवेन.. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की आपण जी स्वप्न पहिली होती ती आता नाही पूर्ण होणार.. आपलं प्रेम हे आपल्या "आठवणीतलं प्रेम" राहील फक्त.. सगळया लव्ह स्टोरीमध्ये कितीही ट्विस्ट आले तरी ते दोघे शेवटी भेटतात पण आपलं नाही झालं रे.. तसं.. पण ठिक आहे.. आपलं "आठवणीतलं प्रेम " आणि प्रेमाच्या आठवणी कायम आपल्या सोबत आपल्या आठवणींमध्ये राहील."


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance