शिक्षणाची सद्यस्थिती..
शिक्षणाची सद्यस्थिती..


शिक्षण म्हणजे नुसतं अध्ययन आणि अध्यापन असतं का? आपण लहान असताना आपल्या शाळेतले शिक्षक एखादी कविता किंवा धडा शिकविताना नुसतंच वाचून नाही दाखवायचे.. प्रत्येक गोष्ट असो वा कविता त्याचं चित्रण डोळ्यांपुढे येईल असे समजवायचे.
चौथीत असताना महाराजांचा इतिहास शिक्षक असे शिकवायचे कि आपण त्या कल्पनेत मग्न व्हायचो.. अगदी शिवाजी महाराज आणि अफजलखानाची प्रतापगड भेट असो वा राज्याभिषेक मुलं अगदी अभिमानाने मग्न असायची.. अंगावर शहारा आल्याशिवाय तास संपायचाच नाही. मुलं अगदी मेंदुनेच नव्हे तर मनानेही त्यात गुंतायची.. महाराजांवर नाटक करायचं म्हटलं.. कि मुलं "मी शिवाजी होणार " म्हणून भांडायची आणि कित्येकदा तर पात्र मिळवायला रडायची.
आताच्या मुलांमधील ती कल्पनाशक्ती कुठेतरी संपते आहे.. संपते आहे म्हणण्यापेक्षा हरवली आहे. स्पर्धेचं युग आहे म्हणता म्हणता मुलं आपण कसं स्पर्धेत टिकून राहू याचाच विचार करतात. त्यांची विचारसरणी सुद्धा बदलत चालली आहे.. त्यांना वाटतं आपल्याला काय करायचंय हे जाणून की शिवाजी महाराज कोण होते? आपल्याला फक्त इतिहासात "स्कोर" करायचा आहे. काहीही झालं तरी स्पर्धेत टिकून राहायचं आहे.
"घोका आणि ओका "... मेंदू सतत कार्यरत ठेवायचा.. सतत हाच विचार कि मार्क्स कसे मिळवायचे. समजून घेणे किंवा एखाद्या गोष्टीत गुंतून त्यात मग्न होणं हे आजकाल मुलांमध्ये दिसतच नाह
ी.. याचं कारण तंत्रज्ञान... तंत्रज्ञानाचे फायदे खूप आहेत. पण आजकालच्या मुलांनी तंत्रज्ञानाला त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक मानले आहे. अर्थात तंत्रज्ञानाला फक्त दोष देता येणार नाही.. सोबतच कुठेतरी पालक, शिक्षक तेवढेच जबाबदार आहेत. पालकांनी मुलांनी दिलेली सूट.. अगदी वर्षाचं बाळ जरी रडलं कि त्यांच्या हातात मोबाईल देतात.. हळूहळू बाळाला सवय होते.. मग जरी तुम्ही त्यांच्या हातून फोन ओढून घेतलात तर रडून दंगा घालतील, पण शेवटी फोन घेऊनच ऐकतील.
आताचे काही शिक्षक जेव्हा पहिल्या दिवशी वर्गात येतात तेव्हा नाव सांगण्याऐवजी पगार सांगतात. आणि साफ सांगतात कि आम्ही येणार, शिकवणार आणि निघून जाणार.. शेवटी शिक्षकही घोका आणि ओका.. यामुळे मुलंही नीट लक्ष देत नाहीत. त्यांना माहित असतं.. कि शिक्षक येतील काहीतरी बडबड करतील.. 40मि. झाली कि निघून जातील. परीक्षेत आपल्यालाच वाचायचं आहे ना मग तेव्हा लक्ष देऊ. मुळात आजकाल शिक्षक एखाद्या गोष्टीची कल्पना मुलांच्या डोळ्यांसमोर रंगूच देत नाहीत. त्यामुळे मुलंही मेंदूनेच विचार करतात. मनाने त्या गोष्टीत गुंततच नाही. कल्पनेतले शिवाजी महाराज हे कसे दिसतात ? याचं चित्रण मुळात त्यांनी कधी केलचं नाही.
लहान असताना शिक्षक पाढेसुद्धा तालात म्हणायला सांगायचे.. पण आजकाल ते पाढ्यांचे सूर आणि ताल कुठेतरी हरवलेत.. कोणत्याच वर्गातून ते ऐकू येत नाहीत. कदाचित चार भिंतींमध्येच गुदमरले असावेत.